15 August 2020

News Flash

दिल्लीत रमलेला खासदार!

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार नवी दिल्लीत फारसे रमत नाहीत, असा अनुभव येतो. खासदारांना दिल्लीपेक्षा गल्लीचेच जास्त

| September 1, 2013 01:07 am

खासदारांचा सातबारा

लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
पुढील रविवारी : भंडारा-गोंदिया, दिंडोरी

दिल्लीत रमलेला खासदार!
महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून येणारे खासदार नवी दिल्लीत फारसे रमत नाहीत, असा अनुभव येतो. खासदारांना दिल्लीपेक्षा गल्लीचेच जास्त आकर्षण असते. रामटेकचे खासदार मुकुल वासनिक यांचे मात्र वेगळे आहे. वर्षांनुवर्षे दिल्ली दरबारी राजकारण केलेले असल्याने वासनिक यांना दिल्लीचेच जास्त आकर्षण. यातूनच बहुधा त्यांना मतदारसंघात फिरण्यास कमी वेळ मिळाला असावा, अशी टीका केली जाते. रामटेक मतदारसंघ राखीव झाल्याने बुलढाण्याऐवजी वासनिक यांनी रामटेकचा आधार घेतला. नागपूर आणि रामटेक या जिल्ह्य़ांतील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. गांधी घराण्याशी असलेल्या जवळिकीमुळे वासनिक यांच्याकडे सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आली. देशातील दुर्बल घटकांचा नेता म्हणून स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्याची चांगली संधी वासनिक यांना चालून आली होती, पण वासनिक हे दिल्लीतच अडकले. त्यातच पक्ष संघटनेची जबाबदारी असल्याने त्यांना दुहेरी भूमिका पार पाडावी लागत होती. खात्यावर किंवा मतदारसंघात वासनिक स्वत:चा असा ठसा उमटवू शकले नाहीत. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात वासनिक यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आणि पक्षसंघटनेचे काम सोपविण्यात आले. निवडणूक जशी जवळ येऊ लागली तसे वासनिक यांचे मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. १९९९ पासून रामटेक मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. अगदी गेल्या निवडणुकीतही शिवसेनेने वासनिक यांना चांगली लढत दिली होती. शिवसेनेची या मतदारसंघात चांगली ताकद असल्यानेच रामदास आठवले यांचा या मतदारसंघावर डोळा असल्याचे बोलले जाते. आठवले यांचे या मतदारसंघात अधूनमधून दौरे सुरू असतात. शिवसेनेचा उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरीही वासनिक यांच्यासाठी पुढील निवडणूक सोपी नसेल हे मात्र पक्के.

लोकसभा मतदारसंघ : रामटेक
विद्यमान खासदार : मुकुल वासनिक, काँग्रेस
मागील निकाल :  शिवसेनेचे कृपाल तुमाने यांचा पराभव
जनसंपर्क
मुकुल वासनिक यांचा मतदारसंघ रामटेक असला तरी जनसंपर्काचे मुख्य ठिकाण नागपूरला आहे. रामटेक हा ग्रामीण भागातील मतदारसंघ असल्याने गावांचे दौरे करणे, गावपातळीवरील कार्यकर्ते आणि मतदारांशी प्रत्येक दौऱ्यात आपण जास्तीत जास्त संपर्कात राहण्याला प्राधान्य देतो. कोणालाही कोणत्याही वेळी भेटण्याची तयारी असते.

मतदारसंघातील कामगिरी :
* रामटेकमधील ग्रामपंचायती, नगर परिषदांना विविध विकासकामांसाठी निधी
* पर्यटन, तीर्थस्थळांसाठी केंद्रीय निधीतून अनुक्रमे ६० लाख आणि ४५ लाख उपलब्ध
* पाणीपुरवठा, रस्ते, भुयारी गटार योजना, घरकुल बांधकाम, मुस्लीम
भवनासाठी निधी दिला
* कन्हानवरील पुलाला मंजुरी, लोकांचा ५१ किमीचा फेरा वाचणार
* बुटीबोरी टेक्स्टाइल पार्कची निर्मिती

लोकसभेतील कामगिरी
* सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत स्वतंत्र अपंग विभागाची निर्मिती
* अपंगांसाठी राजीव गांधी फेलोशिप योजना
* अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृती
* ५० टक्क्यांपेक्षा अधिक अनुसूचित जातीबहुल पाच राज्यांतील १ हजार गावांचा एकात्मिक विकास
* अत्याचार पीडित अनुसूचित जाती-जमातींच्या कुटुंबांच्या नुकसान
भरपाईत वाढ
* रेल्वे प्रकल्पांसाठी आवाज उठविला
* गोसेखुर्द प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न

लोकोपयोगी कामांचा धडाका
गेल्या चार वर्षांत खासदार निधीचा जास्तीत जास्त विनियोग करण्यात आला. यातून अनेक लोकोपयोगी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अनेक योजना खेचून आणल्या. सिंचनविषयक कामे मोठय़ा प्रमाणात केली. केंद्रीय मंत्री असताना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्त्यांना मंजुरी देण्यात आली. याचा लाभ रामटेकच्या विद्यार्थ्यांनाही मिळाला. विदर्भाचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्त्व विभागाचे क्षेत्रीय कार्यालय नागपूरला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  
मुकुल वासनिक

निष्क्रिय खासदार
मुकुल वासनिक ‘१० जनपथ’चे सर्वात जवळचे म्हणून रामटेकच्या जनतेने त्यांना निवडून दिले. त्यांच्यावर विश्वास टाकला, परंतु जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याच्या दृष्टीने गेल्या चार वर्षांत त्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. सामान्य लोकांशी तर त्यांचा संपर्कच नाही. सतत रामटेकबाहेर राहणारा लोकप्रतिनिधी अशीच त्यांची ओळख आहे. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते सपशेल अपयशी ठरले आहेत. घोषणाबाजी करणे सोपे आहे, पण विकासकामांचा प्रत्यक्ष पाठपुरावा आणि अंमलबजावणी करवून घेणे कठीण असते. वासनिकांना मतदारसंघासाठी कधी वेळच मिळालेला नाही. कागदोपत्री कामे दाखविल्याने मतदार भुलणार नाहीत.

कृपाल तुमाने, शिवसेना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2013 1:07 am

Web Title: an account of a member of parliament mukul vasnik a vidarbha mp loitering in delhi
टॅग Mp
Next Stories
1 अन्नसुरक्षा : शुद्ध बीजापोटी..
2 अमली पदार्थाच्या विळख्यात मुंबापुरी
3 ‘हरी ओम.. बम बम भोले’
Just Now!
X