खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
पालघर, वर्धा

‘उपरे’ अडसूळ पुन्हा नशीबवान ठरणार?
राजकारणात नशीब हे महत्त्वाचे असते ते शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्याबाबत लागू पडते. मुंबई उपनगरात राहणारे अडसूळ हे बँकिंग कर्मचाऱ्यांचे नेते. वऱ्हाडात शिवसेनेला वातावरण अनुकूल असल्याने आडसूळ यांनी बुलढाणा राखीव या मतदारसंघात आपले नशीब अजमाविले. १९९९ आणि २००४ या निवडणुकांमध्ये अडसूळ हे बुलढाणा राखीवमधून निवडून आले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर बुलढाणा हा मतदारसंघ खुला झाला तर शेजारील अमरावती हा राखीव झाला. अडसूळ यांनी शेजारी धाव घेतली आणि ते तिकडूनही निवडून आले. १९९८चा अपवाद वगळता १९९१ पासून सातत्याने अमरावती मतदारसंघ हा शिवसेनेने कायम राखला आहे. अडसूळ यांच्या विरोधात शिवसेनेत अंतर्गत नाराजी किंवा गटबाजी असली तरी अडसूळ हे पुन्हा नशीब अजमविणार हे नक्की. डॉ. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यावर अमरावतीचे भाग्य फळफळले होते. विकासाची काही कामे मार्गी लागली. अडसूळ यांच्या विरोधात लढण्यासाठी बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपल्या अभिनेत्री पत्नीचे नाव पुढे केले आहे. अमरावतीमध्ये वास्तविक काँग्रेसचे प्राबल्य पण गेल्या वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला. ज्येष्ठ नेते  रा. सू. गवई यांचे पुत्र राजेंद्र हे लढले होते. यंदा हा मतदारसंघ मिळावा अशी काँग्रेसची मागणी आहे. मतदारसंघ कोणाच्याही वाटय़ाला जावो पत्नीला काँग्रेस अथवा राष्ट्रवादीकडून लढविणार हे राणा महाशय ठामपणे दावा करीत आहे. राणा यांची सारीच पाश्र्वभूमी आणि मतदारसंघात कायमच वादग्रस्त ठरणारे अशी प्रतिमा लक्षात घेता गेल्या वेळी ‘उपरे’ म्हणून हिणविण्यात आलेल्या अडसूळ यांचे नशीब पुन्हा फळफळेल अशीच आता तरी चिन्हे आहेत.

लोकसभा मतदारसंघ :अमरावती
विद्यमान खासदार : आनंदराव अडसूळ, शिवसेना
मागील निकाल : आघाडीचे डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव
जनसंपर्क
अडसूळ यांचे जनसंपर्क कार्यालय विभागीय क्रीडा संकुलात आहे, पण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*अमरावती- नरखेड रेल्वे मार्गाचा प्रारंभ, आदर्श रेल्वे स्थानकाची उभारणी, पाच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ा
*भारत डायनामिक्सचा प्रस्तावित क्षेपणास्त्र सुटे भाग निर्मिती कारखाना ’रेल्वे व्ॉगन दुरुस्ती प्रकल्प
लोकसभेतील कामगिरी
सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न ११४१, तारांकित ८४, अतारांकित १०५८, अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग  
एकूण हजेरी २५६ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तान विशेषत: सिंधमध्ये हिंदूंच्या मानवी हक्कांचे उल्लंघन त्याबाबत चर्चा.
*मेळघाटात व्याघ्र प्रकल्पाने विस्थापित होणाऱ्या आदिवासींचे तातडीने पुनर्वसन करणे.
रेल्वेचे जाळे विस्तारल्याचा फायदा
अमरावतीत सुसज्ज रेल्वे स्थानक उभारले गेले, पाच एक्स्प्रेस रेल्वे गाडय़ा सुरू झाल्या. रेंगाळलेले नरखेड रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळू शकेल. नागपूर इंटरसिटीची वेळ बदलणे, नरखेड मार्गावर गाडय़ा सुरू करणे अशा प्रश्नांवर पाठपुरावा सुरू आहे.
आनंदराव अडसूळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिक होऊ शकले असते
जी कामे मार्गी लागल्याचा दावा केला जात आहे, त्यापेक्षा अधिक कामे होऊ शकली असती. मेळघाटचा परिसर अजूनही विकासापासून दूर आहे. रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न झालेले नाहीत.
राजेंद्र गवई