खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
सांगली, चंद्रपूर

विनोबांच्या भूमीत शिक्षण सम्राटाचे साम्राज्य!
महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या आश्रमांमुळे पावन झालेल्या वर्धा जिल्ह्य़ाचे राजकारण, समाजकारण यांची वाटचाल उलटय़ाच दिशेने झाली. दारूबंदी असलेल्या या जिल्ह्य़ात नागरिकांना चांगली दारू मिळावी म्हणून दारूबंदी उठवावी, अशी मागणी तीही विधानसभेत करण्यापर्यंत या जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधींची मजल गेली. गेल्या वेळी या मतदारसंघातून शिक्षणसम्राट म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता मेघे निवडून आले. दत्ताभाऊंचे पवारांशी बिनसले आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावर आक्रमक अशी त्यांची प्रतिमा. दत्ताभाऊंनी मतदारसंघांत कामे किती केली, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह असले तरी रुग्णसेवेच्या माध्यमातून लोक जोडण्याचे काम केले. पुढील निवडणुकीत मेघे स्वत: लढण्यास फारसे उत्सुक नसून, मुलाला उमेदवारी मिळावी हा प्रयत्न आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात दिवंगत नेत्या प्रभा राव यांचा गट अद्याप सक्रिय आहे. प्रभा राव यांचे भाचे आणि बांधकाम खात्याचे राज्यमंत्री रणजित कांबळे आणि मेघे यांच्यातून अजिबात विस्तवही जात नाही. मेघे नसल्यास प्रभा राव यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, असा त्यांच्या गटाचा प्रयत्न आहे. मेघेही तेवढेच तयार गडी. आपल्या पसंतीचा उमेदवार नसल्यास काय होते ते बघाच, असा सूचक इशाराच त्यांनी पक्षाला दिला आहे. भाजपमध्ये माजी खासदार सुरेश वाघमारे आणि रामदास तडस यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या तरी मेघे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.  
लोकसभा मतदारसंघ : वर्धा
विद्यमान खासदार : दत्ता मेघे, काँग्रेस<br />मागील निकाल :  
भाजपचे सुरेश वाघमारे पराभूत
जनसंपर्क
शहरातील मुख्य बाजारआळीतील तिरुपती अर्बन बँकेच्या आवारात दत्ता मेघे यांनी संपर्क कार्यालय थाटले आहे. ग्रामीण भागात दौरे करण्यावर भर आहे. शक्यतो लग्नसोहळे न चुकविण्यावर त्यांचा कल आहे.
मतदारसंघातील कामगिरी :
*वर्धा-अमरावती पट्टयातील संत्रा बागायतदारांचा प्रश्न
*कुपोषणग्रस्त बालके, ग्रामीण वैद्यकीय सेवा, विदर्भ विकासाचे धोरण हे प्रश्न लावून धरले
*रेल्वे मंत्रालयाकडे वर्धा, हिंगणघाट, धामणगाव या स्थानकांवर महत्त्वाच्या गाडय़ांचा थांबा देण्याचा मुद्दा
*शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शुल्कात सवलती
लोकसभेतील कामगिरी
सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न
२८७, तारांकित २६, अतारांकित २६१.
एकूण हजेरी ३०० दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले महत्त्वाचे प्रश्न
*विदर्भात मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे.
*वर्धा मतदारसंघात खेडोपाडी रस्त्यांचे जाळे तयार करून ते शहरांना जोडणे.
*ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलणे.
*विदर्भातील संत्रा
उत्पादकांना आर्थिक
आणि तंत्रज्ञानविषयक
मदत पुरवणे.
*विदर्भातील रस्तेबांधणीसाठी केंद्राच्या निधीची गरज.
*विदर्भातील कुपोषण तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला
वल्गना करणारा नेता
दत्ता मेघे वल्गना करणारे नेते आहेत. वर्धा रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याचे काम आपण दोन वर्षांत मार्गी लावू, असे मेघे जाहीरपणे म्हणाले होते. पण त्यानंतर त्याचा पाठपुरावा झाल्याचे कु ठेच दिसून आले नाही. उड्डाणपुलाचे विस्तारीकरण अत्यंत गरजेचे आहे. हा प्रश्न रेल्वेच्या अखत्यारीत असल्याने एका खासदाराकडूनच तो सुटणे अपेक्षित आहे. मात्र खासदाराने काहीच केले नाही.
सुरेश वाघमारे, भाजप

Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

रुग्णसेवेतून जनसेवा
सावंगीच्या नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, शरद पवार दंत महाविद्यालय व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांची आजवर सेवा केली आहे. खासदार जरी नाही राहिलो तरी आयुष्यभर हे काम चालणार आहे. ग्रामीण भागात सर्व त्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे हे मध्य भारतातील एकमेव केंद्र आहे. मतदारसंघातील विविध भागांत रोज २५ बसेस रुग्णांच्या उपचारासाठी धावतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून हे कार्य चालले आहे.
दत्ता मेघे