News Flash

रंगधानी : कलावस्तूच्या पलीकडे..

शर्मिला सामंत यांच्या अनेक कलाकृती कलादालनांत किंवा कलेच्या महाप्रदर्शनांतून नावाजल्या गेल्या.

शर्मिला सामंत यांची ‘हॅण्डमेड सारी’

लोकसहभागातून सामाजिक कलेत भर घालू पाहणाऱ्या शर्मिला सामंत यांच्या अनेक कलाकृती कलादालनांत किंवा कलेच्या महाप्रदर्शनांतून नावाजल्या गेल्या. पण ‘कलावस्तू’च्या पलीकडे जाणारी कला उदारीकरण, कॉपरेरेटीकरण यांच्या काळात महत्त्वाची ठरते, हे शर्मिला सामंत यांनी ओळखलं होतं.. 

काही वर्षांपूर्वी मुंबईच्या मानखुर्दजवळच्या एका वस्तीतल्या रहिवाशांबरोबर एका कला प्रकल्पावर काम चालू होतं. कलाकार होत्या शर्मिला सामंत. विविध जनचळवळींबरोबरच्या जवळच्या संबंधामुळे या वस्तीशी शर्मिला यांचा अगदी जवळिकीचं नातं. मुंबई शहरातल्या जमिनीच्या प्रश्नांच्या संदर्भातला हा कलाप्रकल्प या वस्तीतल्या लोकसहभागातून उभारायचा असं त्यांनी ठरवलं. वस्तीत काही पडीक जमीन होती. तिथे थोडी दलदल साठलेली, कचराकुंडीसारखा त्या भागाचा वापर होत होता. तिथल्या लोकांबरोबर झालेल्या संवादातून ठरलं की त्या जागेची साफसफाई करून तिथे बगिचा तयार करता येईल. तसंच, वस्तीतल्या लोकांसाठी भाजीचे वाफे तयार करता येतील. जरी कल्पना सगळ्यांनाच आवडली तरी ती जागा स्वच्छ झाल्यावर तिची ‘खरी’ किंमत लक्षात आली. मुंबईसारख्या ठिकाणी एवढा जमिनीचा तुकडा हा भाजीपाल्यापेक्षा घरं उभारायला वापरला तर त्याला चांगली किंमत येऊ  शकते हे लोकांच्या लक्षात आलं. शेवटी, भाजीच्या वाफ्यांची कल्पना रद्द करावी लागली. अर्थात, शर्मिलाने ‘ओअ‍ॅसिस’ या त्यांच्या प्रकल्पात याच वस्तीतल्या लोकांबरोबर जुन्या बाटल्यांपासून बनलेले आणि खिडकी, दरवाजे किंवा गॅलरीत टांगता येतील, असे भाजीचे वाफे तयार केले.

पण यातला महत्त्वाचा मुद्दा होता की, लोकसहभागातून जनकला प्रकल्पांवर काम करताना कलाकाराची नेमकी भूमिका काय असावी? कलाकाराची कल्पना तिथं प्रत्यक्षात आणणं महत्त्वाचं ठरतं, सहभागी लोकांच्या मताचा आदर करणं की या दोन्हींच्या संवादातून घडणारी प्रक्रिया अधिक महत्त्वाची ठरते? ही संवादी प्रक्रिया कशी शक्य होते. या उदाहरणामध्ये ती स्वाभाविकपणे घडली त्याचं एक कारण होतं ते म्हणजे शर्मिला सामंत यांचं या वस्तीशी असलेले सान्निध्य. गेली अनेक वर्ष जन संघटनांच्या माध्यमातून त्या या वस्तीतल्या लोकांच्या संपर्कात आहेत. २०११ मध्ये मुंबईत लॅण्ड ऑफ माइन या जनकला प्रकल्पाचा भाग म्हणून हा कला- हस्तक्षेप आकाराला आला. पण त्या आधीपासून सामंत यांनी ‘ओपन सर्कल’ या आर्ट कलेक्टिव्हच्या आणि अन्य संघटनांच्या माध्यमातून लोकसहभागातून कलाविष्कार, कला हस्तक्षेप पार पाडले. या वस्तीतल्या मुलांसाठी त्यांनी दप्तरं डिझाइन केली. हलक्या वजनाची ही घडीची दप्तरं उघडली की छोटं टेबल म्हणूनही मुलांना वापरता येत होतं. याच वस्तीत महानगरातल्या जमिनीसंदर्भातले अनेक मुद्दे घेऊन कलाकारांनी शहरात हस्तक्षेप केले.

शर्मिला जे. जे. स्कूलमधून बाहेर पडल्या तेव्हा उदारीकरणाचे वारे वाहू लागले होते; आखाती युद्ध, आर्थिक अरिष्ट, बाबरी मस्जिदचा विध्वंस, धार्मिक दंगली आणि बॉम्बस्फोट अशा अनेक घडामोडी घडत होत्या. या परिस्थितीत चित्रकलेतील अमूर्तता त्यांना भावणं, आपलीशी वाटणं अवघड होतं. शिल्पकलेचं शिक्षण घेतल्यावर राइक्स अ‍ॅकॅडमी आणि गॅसवर्क्‍स इथे त्यांनी काम केलं. मुंबईहून अ‍ॅमस्टरडॅमला गेल्यावर झालेले भौगोलिक-सांस्कृतिक बदल टिपणं हा हेतू होता. ते करताना त्यांनी ‘सिल्क रूट’चा माग घ्यायचा ठरवलं. खुष्कीच्या मार्गाने भारतीय उपखंडातून युरोपमध्ये गेलेल्या लोकांना त्या भेटल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या. हा प्रवास आणि बदल टिपण्यासाठी पादत्राणे हे चिन्हक म्हणून वापरलं. वेगवेगळ्या प्रांतातले चपला-बूट गोळा करताना त्यांनी पहिल्यांदा लोकांबरोबर संवाद सुरू केला. ही पादत्राणं जमवताना मात्र त्यांनी अनेकांना संपर्क साधला. त्यांच्या मित्रांचे मित्र, नातेवाईक, सांस्कृतिक मंडळं, दूतावास यांना पत्रं लिहिली. यात त्यांचं संवादकौशल्य फार मोलाचं ठरलं. प्रत्येक बूट किंवा चप्पल मिळवण्यामागं काय काय घडलं, काय मिळालं, काय राहून गेलं, ते लिहिलेली दैनंदिनीची पानंदेखील प्रदर्शनाचा भाग बनली. नकाशा आणि पादत्राणे यांचं मांडणीशिल्प तयार झालं. ते स्थलांतर आणि विस्थापनाविषयी होतंच पण छोटे उद्योग, हाताने वस्तू बनवण्याचं कौशल्य आणि त्याची जागा घेत चाललेल्या प्रचंड मोठय़ा कंपन्या याबद्दलही हा प्रकल्प विचार करीत होता. प्रत्येक जोडामागे काही तरी आठवण होती, नाती होती, गोष्ट होती, धडपड होती.

या प्रकल्पातून नेमकं काय घडलं? तर शर्मिला म्हणतात की कलाकारकेंद्री विचार करण्याच्या सवयीला फाटा बसला. लोकसंवादातून कलाप्रकल्प पुढे नेता येतात याची जाणीव त्यांना झाली आणि त्याचा एक मार्गही या काळात सापडला. ओपन सर्कलच्या माध्यमातून ते काम त्यांनी पुढे नेलं.

यातून ‘ग्लोबल क्लोन्स’ हा व्हिडीओ पुढे तयार झाला. कोल्हापुरी चप्पल आणि ‘नाइके’चे बूट दाखवणारा हा व्हिडीओ क्रयवस्तूकरण आणि त्यातून झालेलं सपाटीकरण यावर भाष्य करतो. चपला-बुटाचं रूपक वापरून कॉपरेरेट कंपन्या, उपभोगवादी संस्कृती, विस्थापन यांसारखे अनेक पैलूंशी यातून जोडलं जातं. जागतिकीकरण, उपभोगवाद, अस्मिता या विषयांना धरून त्याकडे चिकित्सक दृष्टीने पाहत शर्मिला यांनी व्हिडीओ, शिल्पं, मांडणीशिल्प, छायाचित्र या माध्यमात काम केलं आहे. ‘लिसन टू युअर आइज’ या प्रदर्शनात निऑन आणि काचेच्या शिल्पातून समाजातील विकासाच्या कल्पना, रचनेतले हितसंबंध, त्यातून घडणारा भ्रष्टाचार या मुद्दय़ांना हात घातला. या कलाकृतीत एक प्रकारची सावधगिरीची सूचनाही दिसते. लाल-निळ्या रंगाच्या निऑन प्रकाश पट्टय़ा वापरून केलेला डोळ्याच्या आकार आपण नेमकं काय बघतो, जे दिसतं ते खरंच असतं का, आपल्याला जे दिसतं त्यामागे नेमकं काय असतं असे प्रश्न विचारतो. ‘आर्ट’, ‘टेररिझम’, ‘रिव्होल्यूशन’सारखे शब्द व त्यांचे अर्थ पितळी पट्टय़ांवर गणिती समीकरणासारखे लिहिलेले दिसतात. हे शब्द, साबणापासून बनवलेलं बेसिन आणि लाकडी व काचेच्या कपाटातल्या काचेच्या हातोडय़ा यातून शासन, कायदे आणि धोरणं याबद्दल भ्रमनिरास झालेला दिसतो.

मागे पडत चाललेले हातमागासारखे उद्योग, त्यातले कष्ट आणि कारागिरी, त्यात होणारं शोषण, क्रयवस्तूकरण अशा अनेक मुद्दय़ांचा विचारही त्यांच्या कलव्यवहाराचा अविभाज्य भाग आहे. ‘हॅण्डमेड सारी’ यात शीतपेयांची बुचं/टोपणं एकमेकांना हाताने जोडून त्यापासून कलकत्ता साडी विणली. सुरुवातीला सोडा बाटलीच्या झाकणापासून साडी बनवली पण नंतर कोकाकोला, फॅन्टा यांसारख्या पेयांच्या बुचांचाही त्यांनी वापर केला.

जागतिकीकरणाच्या काळात स्थानिक उद्योग आणि उत्पादनं तसंच हस्तकला यांचं नेमकं काय होत चाललंय यावर परखड टिप्पणी करताना त्यांनी ‘लोका कोला’सारखी कलाकृतीही तयार केली. यात कोकाकोलाच्या काचेच्या बाटल्या गोळा करून त्यात वेगवेगळ्या प्रांतातली, देशातली स्थानिक पेयं भरली. ती कलादालनात हातगाडीवर आणि दालनाबाहेर रस्त्यावरही मांडली. बहुराष्ट्रीय कंपन्यांची धोरणं, त्यासाठी निसर्गाची ओरबाड आणि हानी, सपाटीकरणामुळे गमावत चाललेली स्थानिक चवींची, रंगांची, नक्षीची आणि पोताची विविधता याकडे त्या लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. ‘अगेन्स्ट द ग्रेन’ या मांडणीशिल्पात कापसाच्या ढिगातून धान्यापासून बनवलेले सापाचे आकार वर आलेले दिसतात. जनुकीय बदल घडवून अधिक पीक घेणारं बियाणं आणि त्यातून शेतकऱ्यांचं कर्जबाजारी होणं, हे प्रामुख्याने त्यातून मांडलं.

त्यांचं सुरुवातीचं काम हे स्त्रीचं शरीर, पुरुषी नजरांतून येणारी जाणीव, लैंगिकता या मुद्दय़ांना धरून होतं. पण त्यातल्या मर्यादा त्यांना जाणवल्या आणि केवळ स्त्रीवादी भूमिकेतून न पाहता अधिक व्यापक कलात्म आणि राजकीय विचारातून कलाव्यवहाराला भिडणं त्यांना गरजेचं वाटलं. कलावस्तू तयार करणं याबरोबरच माणसांबरोबरच्या संवादी नात्यातून कलाकृती उभ्या करणं, घडवणं हे त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी राहिलेलं आहे. त्यात साध्यासुध्या वाटणाऱ्या वस्तू त्यांच्या कलाकृतीत गुंतागुंतीच्या वास्तवाची, राजकीय-सामाजिक बदलांची चिन्हकं म्हणून आपल्या समोर येतात. यातूनच कलावस्तूचं नेहमी ‘वाचन’ कसं केलं जातं, तिच्याकडे कसं पाहिलं जातं, कसं पचवलं जातं याचे नियम धुडकावून लावत त्या कलेच्या विषयवस्तूकरणावर टीका करणं यातूनच त्यांचा कलाव्यवहार आकाराला आला आहे.

लेखिका कला समीक्षक आणि समकालीन कलेच्या संशोधक आहेत. ई-मेल :

नूपुर देसाई noopur.casp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 2:36 am

Web Title: article about artist sharmila samant artworks
Next Stories
1 राजकारणी, उद्योगपती व बाबांच्या युतीने देशाचा सत्यानाश
2 अर्थव्यवस्थेची नवी दिशा
3 जलक्षेत्रातील ‘नोटाबंदी’!
Just Now!
X