लोकेश शेवडे

राजकारण, सहकार, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. चतुरस्र रसिक अशी त्यांची ख्याती होती. त्याविषयीच्या त्यांच्या आठवणी जागविणारा हा लेख..

पु. ल. देशपांडे यांचे एक विधान प्रसिद्ध आहे : ‘पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढय़ावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाटय़, शिल्प, खेळ यांतल्या एखाद्या कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल.’ पुलंचं हे विधान जे कोणी वास्तवात जगू शकले असतील, त्यात विनायकदादा पाटील अग्रणी ठरतील. पुलंच्या पहिल्या वाक्यानुसार शेती, वनीकरण, राजकारण, हॉटेल या सर्व खटपटी दादांनी जिद्दीने केल्या. त्यात यशही कमावले. पुलंनी पुढे, ‘एवढय़ावरच थांबू नका. एखाद्या कलेशी मैत्री जमवा’ असंही म्हटलं होतं. विनायकदादा केवळ एखाद्याच नव्हे, तर पुलंनी नमूद केलेल्या सर्वच कलांशी मैत्री जमवून बसले. दादांची मैत्री फक्त कलांपुरती मर्यादित नव्हती, तर कलाकारांशीही होती. किंबहुना कलाकारांशी अधिकच गहिरी मैत्री होती.

तात्यासाहेब तथा वि. वा. शिरवाडकर, वसंतराव कानेटकर, बाबुराव बागूल हे सारे दादांच्या अगोदरच्या पिढीतले ज्येष्ठ साहित्यिक असले, तरी त्यांच्याशी दादांचे स्नेहसंबंध असणे यात काही आश्चर्य नाही. कारण साहित्य क्षेत्रातली ही दिग्गज मंडळी नाशिकचीच होती. पण दादांचं वैशिष्टय़ असं होतं की, त्यांचे स्नेहसंबंध पु. ल. देशपांडे, गोविंदराव तळवलकर, व्यंकटेश माडगूळकर, पंडित जसराज अशा नाशिकबाहेर असलेल्या त्यांच्या अगोदरच्या पिढीतल्या ज्येष्ठ साहित्यिक-कलाकारांशीही तितक्याच जिव्हाळ्याचे होते. आदल्या पिढीपासून व्हाया अनिल अवचट, सुभाष अवचट असे विविध, त्यांचे साधारण समकालीन कलाकार ते अगदी आजच्या काळातले चंद्रकांत कुलकर्णी, दत्ता पाटील, प्रकाश होळकर अशा कलाकार, साहित्यिकांपर्यंत दादांचा मित्रपरिवार होता. तथापि, दादांचं अन्योन्यत्व, वेगळेपण मात्र असा अवाढव्य मित्रपरिवार असणं यात नसून, सर्व कलाक्षेत्रांची सखोल माहिती असणं आणि त्या क्षेत्रात त्यांच्या मित्रपरिवारातल्या प्रत्येकाच्या कलागुणांची, त्यांच्या योगदानाची त्यांना पूर्ण माहिती असणं यात होतं.

साहित्य, साहित्यिक, कला, कलाकार या साऱ्यांची दादांना जाण आणि सखोल माहिती असण्याचा नाशिकच्या सांस्कृतिक विश्वावर एक परिणाम झाला. तो म्हणजे गेली किमान पंधरा-वीस वर्ष नाशिकच्या बहुतांश सांस्कृतिक कार्यक्रमांना, मग ते पुस्तक प्रकाशन असो किंवा चित्र, शिल्प प्रदर्शन असो, अध्यक्षस्थानी विनायकदादाच असायचे. सांस्कृतिक कार्यक्रमांना विनायकदादांना अध्यक्षस्थान दिलं जाण्याचं आणखी एक कारण होतं. ते म्हणजे त्यांचं उत्स्फूर्त आणि अमोघ वक्तृत्व. आयोजकांनी दादांच्या भाषणासाठी जितका वेळ ठेवलेला असे, तितका वेळ दादा श्रोत्यांना अक्षरश: खिळवून ठेवत. त्या भाषणात संदर्भित कला, कलाकार यांची इत्थंभूत माहिती असेच, पण त्याखेरीज नर्मविनोद, धमाल, खिल्ली हे सारे प्रकार असत. दादा इतकी हुकमी दाद मिळवत, की दर पाच मिनिटांनी टाळ्या वाजल्या आणि दर तीन मिनिटांनी हास्यलकेर आली की सभागृहाच्या बाहेरच्या लोकांनाही लक्षात येई की ‘व्यासपीठावर दादा बोलताहेत’! अशा हमखास यशस्वी होणाऱ्या भाषणासाठी दादांना कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी लागत नसे. ते व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर जरी त्यांना नुसतं विषय आणि निमित्त सांगितलं तरी ते भाषण माहितीपूर्ण आणि रंजक होई. या त्यांच्या सर्वव्यापी अध्यक्षपदाबद्दल आणि भाषणाच्या यशस्वितेबद्दल ते स्वत: मात्र बोलत नसत. उलट स्वत:च्या अध्यक्षपदाची आणि भाषण हमखास यशस्वी होण्याचीदेखील ते खिल्ली उडवत. त्यांना याबाबत प्रश्न विचारला तर, ‘‘उरलो अध्यक्षपदापुरता, उरलो हसवण्यापुरता. अरे, ज्याला दुसरं काही येत नाही. तो फक्त भाषणच करू शकतो, मी आता माझ्याबरोबर पोडियम आणि माइक घेऊनच फिरणार आहे. ‘अध्यक्षपद दिलं तर पोडियम-माइक फुकट’ अशी अध्यक्षपदाची ‘ऑफर’ सुरू करणार आहे!!’’ अशी स्वत:ला सामान्य ठरवणारी, स्वत:चीच चेष्टा करणारी त्यांची प्रतिक्रिया असे. स्वत:चीच चेष्टा करणे हा विनोदाचा सर्वोच्च प्रकार मानला जातो. विनायकदादांचा त्याबाबतीत हातखंडा होता.

मुंबईत, तेदेखील पाल्र्यासारख्या ठिकाणी आणि मराठी मध्यमवर्गात मी वाढल्यामुळे राजकारण आणि राजकारणी लोकांबद्दल माझ्या मनात एक प्रकारचा तिरस्कार ठासून भरलेला होता. शिक्षण पार पडल्यानंतर १९७८-७९ साली व्यवसायानिमित्त मुंबई सोडून नाशिकला येताना हा तिरस्कार मनात घेऊनच मी आलो होतो. तो इमानेइतबारे जोपासत अंगी भिनवत होतो. अशा या जाज्वल्य तिरस्काराने भारलेला मी एका उद्योजकांच्या सभेत गेलो असताना तिथे दादांशी भेट झाली. बहुधा त्या काळी ते उद्योग राज्यमंत्री असावेत. तोपर्यंतचं विनायकदादांचं बहुतांश आयुष्य, (म्हणजे त्यांच्या वयाच्या चाळिशी-पंचेचाळिशीपर्यंत तरी) निवडणुका आणि राजकारणात गेलं होतं, हे त्या ओळखकर्त्यांच्या बोलण्यातून मला कळलं. परिणामत: त्यांच्याशी ओळख होताना माझ्या मनातला राजकारण्यांबद्दलचा तिरस्कार बोलण्यात आणि आविर्भावात जितक्या प्रखरपणे दाखवता येईल, तितका मी दाखवला होता. पुढे दोन-चार वेळा ओझरती भेट होण्याचा योग आला होता, तेव्हाही मी फारसं बोलणं टाळलं. पण नंतर कधी तरी एका पुस्तक प्रदर्शनात त्यांची गाठ पडली. तिथे त्यांना पाहून मला आश्चर्य वाटलं. केवळ कुतूहल म्हणून मी त्यांच्या हातातली पुस्तकं त्यांच्या नकळत निरखून पाहिली. मला ती पुस्तकं आजही लख्ख आठवताहेत. त्यावर जे. कृष्णमूर्तीपासून (‘संस्कृतीचा प्रश्न’) ओशो (‘शिक्षणक्रांती हीच खरी क्रांती’), भालचंद्र नेमाडे (‘बिढार’), रंगनाथ पठारे (‘ताम्रपट’) वगैरे अनेक नावं होती. त्या काळच्या माझ्या डोक्यातला एक यत्किंचित, तिरस्करणीय राजकारणी अन् पुस्तकं वाचतो, हे पाहून मला धक्काच बसला. तेवढय़ात दादा माझ्याजवळ आले आणि- ‘‘गौरी देशपांडेंचं एकही पुस्तक इथं सापडत नाहीय, तुला कुठे दिसतंय का?’’ असं विचारलं. त्यांच्या बोलण्यात माझ्या पूर्वीच्या वागण्याच्या अनुभवांचा लवलेशदेखील नव्हता. मी थक्क झालो. काही सुचेना. खजील होऊन म्हणालो, ‘‘माझ्याकडे आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर आणून देतो.’’

यानंतर आमचा मैत्रीचा सिलसिला सुरू झाला. आमच्याकडच्या प्रत्येक कार्यक्रमाला व्यासपीठावरची विनायकदादांची उपस्थिती ही जणू अनिवार्य ठरली. पुलंच्या विधानाचं मर्म अंगी बाणवणारी व्यक्ती म्हणून विनायकदादांचं महत्त्व राहीलच, पण शहरी मध्यमवर्गीयांचा राजकारण्यांबद्दलचा दृष्टिकोन बदलणारे म्हणूनही विनायकदादांचं महत्त्व कायम राहील.

lokeshshevade@gmail.com