आपल्या रोजच्या जीवनात जशा अनेक घटना घडत असतात तशाच घटना आपल्या डोक्यावरच्या अथांग अंतराळातही घडत असतात. कधी धूमकेतू नावाचा पाहुणा येतो, तर कधी उल्कावर्षांव नावाची आतषबाजी होते. कधी काही ग्रह अगदी जवळ येतात म्हणजे त्यांची युती होते. काही वेळेला पृथ्वीची सावली चंद्रावर पडते (चंद्रग्रहण) तर काही वेळेस चंद्र सूर्यबिंबाला झाकून टाकतो (सूर्यग्रहण). या सगळ्या घटनांमध्ये सामान्य माणसाला सूर्यग्रहणाचे विशेष आकर्षण वाटते. याचे कारण म्हणजे या वेळी, एरवी आग ओकणारा सूर्य कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर ‘स्नेहहीन ज्योतीपरि’ मंद होत जातो आणि पाहता पाहता काळाठिक्कर पडतो. भरदिवसा अचानक संध्याकाळ झाल्याचा अनोखा अनुभव येतो. येत्या २१ जून रोजी अवकाशात हे सूर्यग्रहणाचे अनोखे नाटय़ रंगणार असून ते भारतातूनही दिसणार आहे.

प्रत्येक अमावस्येला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये  आलेला असतो. काही अमावस्या अशा असतात की त्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांचे केंद्रबिंदू एका रेषेवर आलेले असतात. अशा स्थितीत खग्रास ग्रहण घडून येते. (आकृती १). अशा वेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकते. चंद्र सूर्यापेक्षा खूप लहान असूनही तो सूर्याला पूर्ण ग्रहण लावू शकतो यामागे एक मोठा योगायोग दडलेला आहे. सूर्य चंद्रापेक्षा ४०० पट मोठा आहे आणि सूर्य-पृथ्वी अंतर चंद्र-पृथ्वी अंतराच्या ४०० पट आहे हा तो नैसर्गिक योगायोग. या योगायोगामुळेच आपल्याला खग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघायला मिळते. या काळात चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. ही सावली सुमारे २७० कि.मी. रुंदीच्या पट्टय़ात पडते. याचाच अर्थ या पट्टय़ात येणाऱ्या गावांमधून ग्रहण खग्रास म्हणजे पूर्ण स्वरूपात दिसते. या पट्टय़ापासून जसजसे दूर जावे तसतसे ते खंडग्रास स्वरूपात दिसते म्हणजे सूर्यबिंब कमी प्रमाणात झाकलेले दिसते. या पट्टय़ात चंद्राची दाट छाया (Umbra), तर इतर प्रदेशांत चंद्राची विरळ किंवा उपछाया ((Penumbra) पडली आहे असे म्हटले जाते. वर सांगितलेली पट्टय़ाची रुंदी प्रत्येक ग्रहणात थोडीफार बदलते.

चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह. तो पृथ्वीभोवती अंडाकृती कक्षेत फिरत असतो. साहजिकपणे त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर बदलत असते. सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये चंद्र आला की अंतराळात त्याची भलीमोठी सावली अर्थातच पृथ्वीच्या दिशेने पडते. ही सावली शंकूच्या आकाराची असून तिची लांबी असते सुमारे ३ लाख ७१ हजार ६२० कि.मी. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून यापेक्षा अधिक अंतरावर असतो तेव्हा ती सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही. ती अंतराळातच ‘संपून’ जाते. येत्या २१ जून रोजी चंद्र आपल्यापासून ३ लाख ८९ हजार ६०० कि.मी. अंतरावर असणार आहे. म्हणजे पृथ्वीपासून सुमारे १८००० कि.मी. अंतरावरच ही सावली संपून जाणार आहे. याचा परिणाम असा की, आपल्याला सूर्य १०० टक्के झाकलेला दिसणार नाही. सूर्याचा सुमारे ९९.४% भाग झाकला जाईल. सूर्याचा परीघ तेजस्वी दिसेल. म्हणजेच हे दृश्य एखाद्या तेजस्वी बांगडीसारखे दिसेल. म्हणून या ग्रहणाला म्हणायचे कंकणाकृती ग्रहण. हे दृश्य केवळ ३७ सेकंद टिकणार आहे; पण ते इतके सुंदर असेल की, तुमच्या मनावर उमटलेली त्याची मुद्रा आयुष्यभर टिकून राहील यात शंकाच नाही.

हे करून पाहा

ग्रहण पाहण्यासाठी भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेले गॉगल्स सर्वात चांगले. मात्र, सूक्ष्म-छिद्र कॅमेरा (पिन होल कॅमेरा) वापरून आपण ते पाहू शकतो. आणखी एक सोपा मार्ग म्हणजे गहू चाळायची चाळणी वापरणे. ग्रहणाच्या वेळेस ही चाळणी सूर्यकिरणे लंबरूप पडतील अशी धरायची. चाळणीखाली काही अंतरावर एखादा पांढरा सपाट कागद धरायचा. गंमत म्हणजे चाळणीला जेवढी भोके असतात तेवढे छोटे सूर्य आपल्याला दिसू लागतात आणि (मोठय़ा) सूर्याला ग्रहण लागले की या छोटय़ा सूर्यानादेखील ग्रहण लागते! या छोटय़ा सूर्याचा तुम्ही कॅमेऱ्याने/ मोबाइलने सहजपणे फोटो घेऊ  शकता.

कुठे पाहता येईल?

भारतातून पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांतून ते कंकणाकृती स्वरूपात दिसेल. हा ग्रहणपट्टा २१ कि.मी. रुंदीचा असेल. या पट्टय़ात जोशीमठ, डेहराडून, कुरुक्षेत्र अशी काही प्रमुख शहरे आहेत. उर्वरित भारतातून हे ग्रहण खंडग्रास दिसेल. मुंबईमध्ये सकाळी १० वा. १ मि. या वेळेस ग्रहणाला प्रारंभ होईल. ११ वा. ३८ मि. ही ग्रहण मध्याची वेळ आहे. म्हणजे त्या वेळेस सूर्य सर्वाधिक ग्रासलेला असेल. दुपारी १ वा. २८ मि. या वेळेस ग्रहण समाप्त होईल. महाराष्ट्रातील इतर शहरांसाठी या वेळांमध्ये अवघ्या काही मिनिटांचाच फरक असेल. या काळात सूर्य आकाशात खूप उंच म्हणजे जवळजवळ डोक्यावर असेल.

११ वर्षांनंतर योग

हा सावल्यांचा अद्भुतरम्य खेळ पाहण्याची संधी तुम्ही अजिबात दवडू नका. कारण यानंतर होणारे आणि भारतातून दिसणारे कंकणाकृती ग्रहण होणार आहे तब्बल ११ वर्षांनी, २१ मे २०३१ रोजी! ग्रहण पाहताना आधी सांगितलेली काळजी घ्या आणि टाळेबंदीचे नियमही काटेकोरपणे पाळा. तोपर्यंत, २१ जूनला ‘नभ मेघांनी आक्रमिले’ अशी परिस्थिती नसेल अशी आपण आशा करू या!

डॉ. गिरीश पिंपळे, खगोल-अभ्यासक, नाशिक