गौतमीपुत्र कांबळे

एकूण मानवी अस्तित्वच धोक्यात आणू पाहणाऱ्या करोना महामारीमुळे आज ‘जिवंत राहणे’ ही मोठी आणि प्राथमिक समस्या म्हणून पुढे आलेली आहे. अगदी उद्योगपती रतन टाटांपासून ते गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच म्हणताहेत की, ‘जिवंत कसे राहायचे, हे पाहा. बाकी सगळ्या गोष्टी गौण.’ हे मान्य, परंतु व्यक्ती वा मानवी समूह जिवंत असणे म्हणजे काय? केवळ श्वासोच्छवास चालू असणे म्हणजे जिवंत असणे काय? माणसाच्या, ‘मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल’पासून ‘मॅन इज अ लाफिंग अ‍ॅनिमल’पर्यंत अनेक व्याख्या आहेत. आज आपण अनुभवत आहोत की, आजचा माणूस सामाजिकतेपासून बेदखल झालाय. तसाच तो हसण्यापासूनही बेदखल झालाय. एका उर्दू कवितेत म्हटलेय, ‘तकल्लुफसा आ ही जाता है मेरे हँसी में। सलीका भूल चुका हुँ मुस्कुराने का।’ आजच्या माणसाची काहीशी अशीच अवस्था झालीय. तो जसा हसणारा प्राणी राहिला नाही, तसाच तो सामाजिक प्राणीही राहिला नाही. ‘स्वातंत्र्या’बद्दल तर बोलायलाच नको!

मात्र इतकी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तरीही दुर्दम्य इच्छा आणि जिद्दीच्या जोरावर माणूस न हरण्याच्या इराद्याने लढतोय, हे विशेष! जगातील प्रत्येक माणूस आपला प्राण पणाला लावून या करोना महामारीविरुद्ध एक योद्धा म्हणून लढतोय. मग या जागतिक लढय़ापासून कलावंत स्वतला अलिप्त कसा ठेवू शकतो? शिवाय कलावंत असण्यापूर्वी तोही ‘माणूस’च असतो. त्यामुळे त्याची ‘माणूस’ म्हणून आणि कलावंत म्हणूनही- अशी दुहेरी लढाई सुरू आहे.

कलावंतांनी आपापल्या क्षमतेनुसार आणि माध्यमांच्या मर्यादेत ‘अस्वस्थ वर्तमान’ आणि त्यामुळे निर्माण झालेली कलावंताची घालमेलही कलाकृतींतून व्यक्त केली आहे. या तशा अल्पजीवी अनुभवाला कलाकृतींच्या माध्यमातून दीर्घजीवी बनविले आहे.

उदाहरणार्थ, चित्रकार आणि प्रदर्शनविचार-नियोजक (क्युरेटर) प्रभाकर कांबळे यांचे ‘ब्रोकन फूट’ हे मांडणशिल्प. ते कालच्या नि आजच्याही ‘अस्वस्थ वर्तमाना’वर कलात्मक भाष्य करते. ‘ब्रोकन फूट’ हे प्रतीक आहे, इथल्या तुटलेल्या समाजाचे- ज्यांच्याशी शतकानुशतके भेदभावपूर्ण वर्तन केले गेले. ही भेदभावपूर्ण वागणूक करोना महामारीच्या काळातही न संपता तिचे उघडपणे अमानवी प्रकटीकरण होत आहे. करोना महामारीच्या या अस्वस्थ वर्तमानात लाखो मजूर शेकडो किलोमीटरचे अंतर चालून आपापल्या घरी पोहोचले, त्यांच्या पायांची जी अवस्था झाली त्याचेही प्रतीक हा ‘ब्रोकन फूट’ आहे. त्यामुळे त्या तुटलेल्या आणि चिरलेल्या पायाकडे पाहून कोणाही संवेदनशील माणसाच्या मनात एक ‘अपराध-जाणीव’ निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

करोना महामारीवरचा एक उपाय म्हणून देशभर टाळेबंदी घोषित करण्यात आली. मुंबईसारख्या औद्योगिक शहरात देशभरातून रोजगारासाठी आलेल्या मजुरांच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्यातून त्यांनी स्वीकारलेला एक पर्याय म्हणजे आपापल्या गावी जाणे. त्यातून त्यांच्या वाहतुकीची समस्या पुढे आली. मग शेवटचा पर्याय म्हणून त्या मजुरांनी रस्त्याशीच आपल्या पायाचे घट्ट नाते जोडले. त्यामध्ये वृद्ध, लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी लोकांची अन्नपाण्याविना, औषधांविना, वाहतुकीच्या साधनांविना जी परवड सुरू झाली ती मन सुन्न करून टाकणारी होती. त्यातील काही रस्त्यांवर प्राणास मुकले. या त्यांच्या दुखाला, यातनेला, असाहाय्यतेला आणि अगतिकतेला काही कलावंतांनी कलाकृतींच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.

चित्रकार सुनील अवचार यांनी या विषयावर अधिक प्रमाणात रेखाटने केलीत. ती सगळी रेखाटने आशयाच्या अणकुचीदारपणासह पाहणाऱ्याच्या मेंदूत थेट घुसतात. त्यामुळे त्यांच्या रेखाटनातील आशयाला शाब्दिक पाठबळाची गरज भासत नाही.

चित्रकार अन्वर हुसेनच्या रेखाटनांचा विषयही स्थलांतरितांच्या समस्या हाच आहे. सायकलसारख्या मिळेल त्या वाहनाने, जत्थेच्या जत्थे रस्त्यांवरून अनवाणी चालत आहेत. कडेच्या उत्तुंग इमारती याच मजुरांच्या कष्टावर उभ्या आहेत, पण हे बेघर. या भव्य इमारती आणि त्या उभ्या करणाऱ्यांची ही परवड हा विरोधाभास मानवी शोकांतिकेच्या टोकावर नेऊन सोडतो.

चित्रकार विक्रांत भिसे यांनीही स्थलांतरित मजुरांच्या यातनांना आपल्या रेखाटनांचा आणि चित्रांचा विषय बनविला आहे. त्यामध्ये लहान मुलाला एका हाताने छातीशी कवटाळून दुसऱ्या हातात ओझे सांभाळत एक स्त्री चालते आहे. तिची अशा या अवस्थेतही जगण्याची जिद्द जिवंत आहे.

चित्रकार पिसुर्वोने या अस्वस्थ वर्तमानाची आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून गांभीर्याने दखल घेतलेली दिसते. त्याच्या एका चित्रात स्थलांतरित वाटावेत असे दोन मजूर दोन दिशांनी चालताना दाखविलेत. त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर त्यांच्या ताकदीपेक्षा जड वाटावीत अशी ओझी. चालताना जणू ते एकेक पाऊल मोठय़ा कष्टाने टाकताहेत. ग्रीक पुराणकथेतील अ‍ॅटलसला त्याच्या चुकीबद्दल शिक्षा म्हणून पृथ्वी खांद्यावरून वाहून न्यावी लागते. अ‍ॅटलस हे ताकद आणि सहनशीलतेचे प्रतीक मानले जाते. तीच वैशिष्टय़े इथल्या मजुरांची. पण आमची चूक नसताना आम्हाला ही शिक्षा का, असा प्रश्न जेव्हा त्यांच्या मेंदूत निर्माण होईल, त्या क्षणी त्यांच्यातील सहनशीलता नष्ट होऊन उद्रेक होईल, अशी एक सुप्त शक्यताही पिसुर्वोच्या चित्रातून व्यक्त झालेली जाणवते.

चित्रकार राजू बाविस्कर हे साधारणपणे सामान्य माणसांचा जो स्तर आहे, त्याच्याही खालच्या स्तरावर जगणाऱ्या माणसांच्या नि:सत्त्व जगण्याला, त्यांच्या संघर्षांला आपल्या कलाकृतींतून मांडतात. त्यांच्या एका चित्रामध्ये एक तुटके चप्पल आणि त्यावर झोपलेला माणूस दाखविलाय. त्या चपलेचा एक तुकडा तीन-चार कुत्री ओढताहेत. मानवी जीवनाचे एक शोकात्म प्रतीक म्हणूनही या चित्राकडे पाहता येईल.

चित्रकार गोपाळ गंगावणे यांनीही आजच्या अस्वस्थ वर्तमानाचा अन्वयार्थ लावून त्यावर कलाकृतींच्या माध्यमातून भाष्यही केले आहे. आज सगळे मानवी जग एका इवल्याशा विषाणूमुळे त्रस्त झाले आहे. या जगात केवळ जगण्याचा नव्हे, तर या जगावर मालकी स्थापित करण्याचाही आपलाच अधिकार आहे असे समजून माणसाने स्वत:चे अस्तित्वच धोक्यात आणले. त्याचाच हा सगळा परिणाम. गोपाळ गंगावणे यांनी वर्तमानातील समस्यांचा, त्यांमागील कारणांचा वेध घेऊन त्यावर ‘सर्वाशी मत्री’ हा उपाय चित्राच्या माध्यमातून मांडला आहे. त्याचे कृतिशील अनुसरण करण्याची आज गरज आहे.

चित्रकार मयूरी चारी यांच्या कलाविष्काराचे माध्यम थोडे वेगळे आहे. त्यांच्या दोन/तीन कलाकृती कापडावर शिवणकाम करून साकारल्या आहेत. त्यातील एका कलाकृतीमध्ये एक स्त्री सायकल चालवते आहे आणि मागे एक पुरुष बसला आहे. हे चित्र टाळेबंदीमधील आहे, कारण त्या दोघांनीही मुखपट्टय़ा घातलेल्या दिसताहेत. या चित्राचे शीर्षक आहे- ‘लिबर्टी’!

छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांनी टिपलेल्या छायाचित्रांत मुंबईतील सुनसान रस्ते, निशब्द रेल्वे स्थानके, बंद दुकाने, रस्त्यांवर क्वचित ठिकाणी चालताना दिसणारे मुंबईबाहेर पडणारे जत्थे, शहरभर ठिकठिकाणी जीवनावश्यक वस्तूंसाठी लागलेल्या रांगाच रांगा, वैद्यकीय कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी २४ तास खडे पोलीस कर्मचारी यांचे दर्शन होते. ओलवे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून आजची ‘अस्वस्थ’ मुंबई उद्याच्या इतिहासासाठी चित्रबद्ध करून ठेवली आहे.

(लेखक कलाअभ्यासक आहेत.)