01 March 2021

News Flash

हिंदू धर्माच्या थोरवीकडे दुर्लक्ष!

सर्वधर्म परिषदेत विवेकानंदानी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडांत फडकावला हेच शंभर टक्के सत्य आहे.

‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख १० जानेवारीच्या ‘रविवार विशेष’मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यावर साधकबाधक मुद्दे मांडणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. त्यांपैकी या काही…

‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख वाचला. ‘हिंदू धर्माने आपला प्रतिनिधी तेथे (शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत) पाठवला नव्हता’, ‘विवेकानंदांनी आमंत्रण नसताना कसेबसे पैसे गोळा करून तेथे जाणे’, ‘सर्वधर्म परिषदेच्या स्वागत कक्षातून खिल्ली उडवून विवेकानंदांना परत पाठवले जाणे’ – अशा गोष्टींचा लेखात विस्ताराने उल्लेख केला आहे. इथे ख्रिस्तोफर इशरवूड यांनी ‘विवेकानंदांची शिकवण’ या ग्रंथाच्या त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत उल्लेख केलेली एक घटना आठवते. हार्वर्ड विद्यापीठात ग्रीक भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापक जे. एच. राइट यांनी स्वामी विवेकानंदांना बोस्टन येथून शिकागोसाठी परतीचे तिकीट काढून देताना असे उद्गार काढले होते : ‘‘स्वामीजी, आपल्यासारख्या व्यक्तीला ‘अधिकृत आमंत्रण’ वगैरेबद्दल विचारणे, म्हणजे सूर्याला त्याच्या अंगभूत तेजाने तळपण्याची परवानगी आहे की नाही, असे विचारण्यासारखे होईल. राइट यांनी विवेकानंदांना स्पष्ट आश्वासन दिलेले होते की, त्यांना अधिकृत आमंत्रण नसले तरीही त्यांचे परिषदेत स्वागतच होईल. मात्र आज इतक्या वर्षांनीही ज्यांना ‘सर्वधर्म परिषदेत स्वामीजींनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडांत फडकावला’ हे शतप्रतिशत खोटे वाटते, त्यांना आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ‘अधिकृत आमंत्रण नसण्याचा’ मुद्दा उगाळावासा वाटतो.

हिंदू धर्मातील उणिवांविषयी विवेकानंदांनी वेळोवेळी काढलेले अनेक उद्गार जाणीवपूर्वक एका लेखात एकत्र करून, जणू काही ‘अशा हिंदू धर्माविषयी त्यांना काडीचाही आदर नव्हता, मग त्या धर्माचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करून, त्याला गौरव प्राप्त करून देणे तर दूरच’- असा आभास उत्पन्न करण्याचा प्रयत्न लेखात दिसतो. पण हे सत्य नाही. हिंदू धर्म, त्याच्या सगळ्या उणिवांसह विवेकानंदांना प्रिय होता, त्यांना हिंदू असण्याचा अभिमान होता, ही वस्तुस्थिती आहे. लेखात हिंदू धर्मावर विवेकानंदांनी केलेल्या कठोर टीकाप्रहारांची पखरण असली, तरी विवेकानंदांच्या विपुल साहित्यात- भाषणे, लेख, पत्रे आणि ग्रंथांत हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेची थोरवी गाणारी त्याहून किती तरी अधिक वचने आढळतील.

स्वामी विवेकानंदांच्या प्रचंड साहित्यातून विखुरलेल्या त्यांच्या अनेक वचनांचा आपल्याला हव्या त्या विशिष्ट अनुषंगाने अर्थ लावून त्या वाक्यांची एकत्रित गुंफण करणे, हा निव्वळ बुद्धिभेदाचा प्रयत्न झाला. बेलूर मठाच्या स्थापनेच्या वेळी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक रुपयाचीही मदत न केल्याचा उल्लेख लेखक आवर्जून करतात. पण कन्याकुमारीच्या विवेकानंद शिलास्मारकाला देशातील प्रत्येक राज्याने, असंख्य व्यक्तींनी, संस्थांनी भरघोस मदत केलेली आहे, याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माच्या वैश्विक पातळीवरील देदीप्यमान यशाचे प्रतीक ठरले आहेत. ही वस्तुस्थिती अनाकलनीय हिंदू धर्मद्वेष मुळीच बदलू शकत नाही. सर्वधर्म परिषदेत विवेकानंदानी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडांत फडकावला हेच शंभर टक्के सत्य आहे.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली (मुंबई)र्

हिंदू धर्माचे वेगळेपण…

‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख हिंदू धर्माचे अंधानुकरण करणाऱ्या सनातन्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. लेख वाचून हिंदू धर्माचे जाणवलेले वेगळेपण…

(१) हिंदू धर्मातील चातुर्वण्र्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक विषमतेपायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केली की, ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’’ १९५६ साली त्यांनी व त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्याआधी बाबा पदमनजी, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक आदी अनेक उच्चशिक्षितांनी परधर्म स्वीकारला. (२) शिवाय अलेक्झांडरपासून अनेकांनी या देशावर आक्रमण केले, सुमारे हजार वर्षे राज्य केले. अपवाद वगळता, राज्यकत्र्यांचे अत्याचार, आर्थिक लूट एतद्देशीयांनी अनुभवली. काही जण त्यांच्या प्रलोभनांना बळी पडले, विरोध केला त्यांना सत्ताधीशांनी संपवले. (३) शिवाय आपल्याकडे ‘सेक्युलर’ विचारधारा विस्तार पावत आहे. तसेच जागतिकीकरणामुळे पाश्चात्त्य जीवनपद्धतीचा आपल्या रोजच्या जगण्या-वागण्यावर फार मोठा परिणाम होत असतोच.

आश्चर्य वाटते की, इतकी सर्व परिस्थिती प्रतिकूल असूनही भारतात हिंदू धर्मीय ७९.८ टक्के नि जगभरात १५ टक्के आहेत (जनगणना २०११), हे कशामुळे? हजारहून अधिक वर्षे परधर्मीय राज्यकर्ते असूनही, भारतात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही ते का? बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिमान, उच्चशिक्षित, जगभरचे धर्म-विचार-आचार यांचा अभ्यास असणारे. त्यांना स्वत:ला एखाद्या धर्मात अडकण्याची गरज नसावी. पण ज्या जातीयतेमुळे दलितांना काही हजार वर्षे अत्याचार/ अन्याय सहन करावे लागले, ते हिंदू धर्मात राहिल्याने संपणार नाहीत याची जाणीव असल्याने त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण दलितांमध्येही जातींची उतरंड आहे व त्यामुळे विषमताही आहे. ती तरी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर नष्ट झाली काय? त्यांच्यात आपापसात तरी सर्रास रोटी-बेटी व्यवहार होतो काय? सर्वांना समान संधी, समान न्याय मिळतो काय?

– श्रीधर गांगल, ठाणे

 

विवेकानंद हे धर्मवादी नसून धर्मचिकित्सकच!

‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ हा लेख वाचून विवेकानंद हे धर्मवादी नसून धर्मचिकित्सक होते हे मनावर ठसले. विवेकानंदांची ‘कट्टर हिंदुत्ववादी धर्मगुरू’ अशी प्रतिमा काहींनी स्वत:च्या राजकीय लाभापोटी जाणीवपूर्वक उभी केली आहे, हेही लक्षात आले. १८९३ च्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील ज्या भाषणामुळे विवेकानंद प्रसिद्धीस आले; त्या भाषणात बोलू द्यावे म्हणून विवेकानंदांनी हिंदू धर्ममार्तंड असलेल्या शंकराचार्यांना हात जोडून विनवण्या केल्यावरही, कोणत्याही शंकराचार्यांनी हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पत्र दिले नाही. त्यांना एका ख्रिस्ती मिशनऱ्याने शिफारसपत्र दिल्यामुळे ते सर्वधर्म परिषदेत भाषण देऊ शकले, हे विदारक सत्य मात्र आजचे हिंदुत्ववादी सांगत नाहीत. दुसरे असे की, हिंदूंनी त्या सर्वधर्म परिषदेत आपला एकही प्रतिनिधी पाठवला नव्हता. विवेकानंद हे ब्राह्मण नाहीत म्हणून ते हिंदूंचे धर्मगुरू होऊ शकत नाहीत, असे म्हणणाऱ्या विचारधारेची मंडळीच आज मात्र विवेकानंद हिंदू धर्मगुरू आहेत म्हणून प्रचार करताना दिसतात!

विवेकानंद त्यांच्या बेलूर मठात चमत्कार, जात, फलज्योतिष, गूढ विद्या, पुरोहितशाही या गोष्टींच्या विरोधात बोलून कायम त्यांच्या शिष्यांना चिकित्सक होण्यासाठी प्रवृत्त करत. आज तरुणांमध्ये असे चिकित्सक विचार रुजवण्याची गरज आहे.

– जगदीश काबरे, नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 12:02 am

Web Title: article by dattaprasad dabholkar vivekananda religion hinduism ignore akp 94
Next Stories
1 चाँदनी चौकातून : विश्वासू…
2 पुन्हा ‘एल्गार’ कशासाठी?
3 विदाचोरीपासून वाचण्याची त्रिसूत्री…
Just Now!
X