19 September 2020

News Flash

‘एक भारत- श्रेष्ठ भारत’चे शिल्पकार..

सत्तराव्या वाढदिवशी, श्रेष्ठ भारताचे यशस्वी पंतप्रधान अशी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे, त्याविषयी..

पंतप्रधानपदाची जबाबदारी निभावताना पक्षविस्तारासाठी सुद्धा तितकीच मेहनत घेतात. निवडणूक काळात सकाळ-संध्याकाळ त्यांच्या प्रचारसभा सुरु असतात. रात्री उशिरापर्यंत जागून काम करतात

योगी आदित्यनाथ 

मुख्य मंत्री, उत्तर प्रदेश

सत्तराव्या वाढदिवशी, श्रेष्ठ भारताचे यशस्वी पंतप्रधान अशी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे, त्याविषयी..

‘राजा कालस्य कारणम्’ असा जो उपदेश महाभारताच्या शांतिपर्वात युधिष्ठिराला भीष्म पितामहांनी केला, त्याचा अर्थ असा की शासक हा परिस्थितीचा दास नसतो. जसा देशाचा शासक आणि जशी त्याची नीती, तशी परिस्थिती घडते. स्वातंत्र्योत्तर काळातील नेतृत्वामुळे अव्यवस्था, अभाव, अराजकता, असुरक्षा आणि अविश्वासाची स्थिती देशात पसरली; तसेच जगातही भारतास मानाचा मार्ग मिळेनासा झाला. याउलट गेल्या सहा वर्षांत, एक प्रगतिशील भारत दिसू लागला. विश्वव्यासपीठावर नव्या उमेदीने भारत एक नवी ओळख घडवू लागल्याचे जगानेही पाहिले. हे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चे नवे रूप होय. त्याचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, यात संदेह नाही.

भारतामधील सर्वात तळाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणाऱ्या विकास योजना, व्यवस्थात्मक विकासाचे नवे प्रतिमान (मॉडेल), विश्व-क्षितिजावर भारताची वाढलेली प्रतिष्ठा आणि अंत्योदयातून राष्ट्रोदय या भावनेचा उदय ही ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चीच रूपे आहेत. जननी जन्मभूमीबद्दल आपल्या भावना काय असाव्यात हे भारतीयांनी, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या सहा वर्षांतील कामांतून, मोहिमांतून आणि सत्प्रयत्नांतून स्पष्टपणे पाहिलेले आहे.

पंतप्रधानांच्या या सत्प्रयत्नांतून गावे, गरीब, शेतकरी, तरुणवर्ग व महिलावर्ग हे सारे विकासाच्या मुख्य धारेशी जोडले जाऊन ‘सब का साथ -सब का विकास’ निश्चित झाला. ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना या साऱ्या योजना तळागाळातील व्यक्तींबरोबरच स्त्री-सन्मानाशीही जुळलेल्या मोहिमा आहेत. याच साखळीत ट्रिपल तलाकसारख्या कुप्रथेचे उच्चाटनही येते, ज्यामुळे मातृशक्तीला प्रतिष्ठेने जगण्याचे मूलभूत हक्क मिळाले.

गेल्या सहा वर्षांत कल्याणकारी योजनांना मूर्तरूप देऊन सामाजिक-आर्थिक न्यायाची स्थापना झाली, लोककल्याण वाढले. या योजनांमुळे देशातील गावागावांत प्रधानमंत्री आवास योजनेतून तीन कोटी भारतीयांना घरे मिळाली, चार कोटी लोकांना सौभाग्य योजनेतून वीज-जोडण्या मिळाल्या, आठ कोटी लोकांना उज्ज्वला योजनेतून स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या मोफत मिळाल्या, १२ कोटी शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान सम्मान निधि’चा लाभ मिळाला आणि २३ कोटींहून अधिक तरुणांना ‘मुद्रा योजने’शी जोडले गेले. ‘जनधन योजने’मार्फत ३६ कोटींहून अधिक लोकांना भारताच्या वित्तीय सेवांशी जुळण्याची संधी मिळाली आणि ५० कोटी जणांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळाला. घराघरांत नळ, ‘वन नेशन – वन रेशनकार्ड’ वा सौभाग्य, आयुष्मान आदी योजनांतून गावांचे, गरिबांचे कल्याण निश्चित झाले. ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’, ‘प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना’, किमान आधारभूत किंमत तसेच ‘किसान सम्मान’सारख्या योजना देऊन, दशकानुदशके उपेक्षित राहिलेल्या शेतकऱ्यांना नवी स्फूर्ती प्रदत्त झाली. स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यांतून भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळालीच; शिवाय तरुणांना उद्योजकतेशी जोडून युवा भारताला आत्मनिर्भर करण्यात आले.

भारताच्या पौराणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला गेल्या सहा वर्षांतील भारतकेंद्री राजनयामुळे विश्वात प्रतिष्ठा मिळाली. नमामि गंगे, विश्व योग दिवस, श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचा शुभारंभ, काशी विश्वनाथ धाम आणि प्रयागराज कुंभ यांतून पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीला जागतिक ओळख दिली. आज २०० देश २१ जून रोजी योग दिवस  साजरा करून भारताच्या महान सांस्कृतिक-आध्यात्मिक परंपरेचा अनुभव घेतात, ‘स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ’मध्ये २४ कोटी भाविक येतात, कुंभपर्वाला युनेस्कोही ‘अमूर्त वारशा’चा मान देते, हे सारे पंतप्रधानांच्या प्रेरणेने झाले.

कित्येक दशकांपासून भारतापुढे संरक्षणविषयक आव्हाने होती, ती संपवून पंतप्रधानांनी सशक्त भारताचा पाया रचला. ईशान्य, तसेच पश्चिम व उत्तर सीमेकडून ही आव्हाने होती. ईशान्येतील राज्यांत पायाभूत विकास सुरू करून त्यांना मुख्य विकासप्रवाहात आणतानाच ‘अ‍ॅक्ट ईस्ट’नीतीतून पूर्व आशियाई देशांतून होणाऱ्या लाभांसाठी या राज्यांना तयार केले. त्याचप्रमाणे भारतीयांचे मन पोखरणारे अनुच्छेद ३७० व ३५ (ए) निष्प्रभ करून ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकारली. आज ईशान्येकडील राज्यांप्रमाणेच काश्मीरमध्येही शांतता आहे, सौहार्द आहे आणि लोक विकासाशी थेट जोडले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय संबंधांत पंतप्रधानांनी मित्रांशी मैत्री पराकाष्ठेने निभावतानाच, शत्रूंना योग्य उत्तर दिले. हिंदी महासागरात नवे समझोते करून भारताला महाद्वीपातील शक्ती म्हणून ओळख दिली. शेजारी देशांना ‘सर्जिकल स्ट्राइक’ व ‘एअर स्ट्राइक’द्वारे अशी काही जरब बसवली की, ते डोळे वर करून आपल्याकडे पाहात नाहीत. आज अमेरिकेसारखी महासत्ताही भारताला ‘स्ट्रॅटेजिक पार्टनर’ म्हणते, युरोपातील तसेच आखाती देशांशी आपले करार होऊन व्यापारी व संरक्षणसंबंध दृढ होतात.

उत्तर प्रदेशाचे हे भाग्यच की, या राज्यात काशी ही जगातील सर्वात प्राचीन नगरी आहे आणि संसद म्हणजे लोकशाहीच्या मंदिरात याच काशी नगरीचे प्रतिनिधित्व आपले यशस्वी पंतप्रधान मोदी करीत आहेत. गेल्या सहा वर्षांत मोदी जगात कोठेही गेले तरी ‘मेरी काशी’ असा उल्लेख करतात, त्यातून अध्यात्म व संस्कृतीच्या रक्षणाचे अर्थ निघतात. ‘माँ गंगा ने बुलाया हैं’ म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व काशीच्या घाटांप्रमाणेच विश्वनाथ मंदिराने पाहिले आहे. प्रधानसेवक, काशीचे लोकप्रतिनिधी, आदर्श खासदार म्हणून मोदी यांचे काम सर्वासाठी प्रेरणादायी आहे. काशीच्या प्रत्येक विकास योजनेकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यग्रतेतूनही ते येथील बूथ स्तरीय कार्यकर्त्यांशी तसेच या नगरीतील अनेक संघटनांशी संवाद साधतात, हे सर्वाना अनुकरणीय आणि उत्तर प्रदेशसाठी भाग्याचे आहे.

..असे राष्ट्रसेवक मोदी, ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’चे प्रेरणापुंज! मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आदींतून भारताला स्वावलंबी आणि वैश्विक स्तरावरील स्पर्धक बनवणारे कुशल राजनेता. तळागाळातील व्यक्तीपासून अंतराळापर्यंत भारत-विकासाची पटकथा लिहिणारे जननायक आणि ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’चे कुशल शिल्पकार, भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सान्निध्य व मार्गदर्शन साऱ्या देशवासीयांना अनंतकाळापर्यंत मिळत राहो आणि प्रत्येक भारतवासी ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या गौरवभावनेचा अभिमान बाळगत राहो, या शुभेच्छांसहित,

‘प्रार्थयामहे भव शतायु:

ईश्वर सदा त्वाम च रक्षतु।

पुण्य कर्मणा कीर्तिमार्जय

जीवनम् तव भवतु सार्थकम् ॥

(भावार्थ : आपण शतायुषी व्हावे, ईश्वराने नेहमी आपले रक्षण करावे, समाजोपयोगी कार्यातून यश आपण मिळवावे आणि सर्वासाठी आपले जीवन कल्याणकारी ठरावे, ही प्रार्थना मी करतो.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:00 am

Web Title: article by yogi adityanath on pm narendra modi seventieth birthday abn 97
Next Stories
1 नव्या क्षितिजाची आस..
2 ‘व्यंगचित्रां’चा उच्छाद!
3 धर्मादाय संस्थांची फरफट थांबवा!
Just Now!
X