– गिरीश कुबेर
माहिती देणारा तपशील कधी ‘बातमी’ नाही म्हणून सुटून जातो.. अर्थकारण, राजकारण आणि आरोग्यकारण यांच्या आरशांमधून अशा तपशिलांची नक्षी नेमकी न्याहाळणारं नवं सदर..
हे असं कधी इतिहासात घडल्याची नोंद नाही. पण आजचं वर्तमान उद्याचा इतिहास असतो हे लक्षात घेतलं तर भविष्यात या इतिहासाची पुनरावृत्ती टाळता येईल की नाही याची काही शाश्वती नाही. गेले काही महिने- आणि बहुधा पुढचेही काही महिने- आपल्या सगळ्या आयुष्याला हा कोविड विषाणू ग्रासून राहिलेला असेल. आपला कौटुंबिक पैस, आपलं वृत्तविश्व, आपलं मनोरंजन.. आपलं सगळंच त्याभोवती फिरत असेल. आपल्या आयुष्याला या एका विषाणूची किती बाधा झालेली आहे हे कोणत्याही वर्तमानपत्रावर (ते मिळालं तर) आणि कोणत्याही वृत्तवाहिनीवर (ती नाही मिळाली तरी) नजर टाकली तरी कळू शकेल.
मग हा ‘कोविडोस्कोप’ काय?
शब्दश: असंख्य बातम्या, लेख, संपादकीय, चर्चा, परिसंवाद.. आणि आता हे वेब-संवाद.. या एका विषाणूभोवतीच फिरत असले तरी हा विषाणू आणि तत्संबंधी अनेक बाबी बातम्यांच्या रकान्यातून आणि वृत्तनिवेदकांच्या चऱ्हाटातून निसटून जातायत. कारण असं की या तपशिलात माहिती आहे. पण बातमी नाही. या माहितीला बातमीच्या व्याख्येत बसवता येत नाही. कॅलिडोस्कोपमध्ये भरले जाणारे बांगडय़ांचे तुकडे, कचकडय़ाचे मणी वगैरे एरवी अगदी अनाकर्षक असतात. आपण काही त्यांना पाहायला म्हणून जात नाही. पण हा सर्व ऐवज कॅलिडोस्कोपमध्ये घातला.. आणि जरा त्याला धक्का दिला की दरवेळी हरखून जाऊ इतके त्याचे विभ्रम असतात.
‘कोविडोस्कोप’मागचा विचार हाच आहे..
उदाहरणार्थ- ४०० कोटी मुखपट्टय़ा, हजारो टन वैद्यकीय सामग्री, हजारभर पीपीई आणि काही हजार गॉगल्स. हा इतकाच तपशील सांगितला तर फार काही आकर्षक वाटणार नाही. कोणा तरी सरकारी मदत योजनेची जंत्री वाटेल. पण यातल्या ४०० कोटी मुखपट्टय़ा या १ मार्च ते ४ एप्रिल या अवघ्या ३५ दिवसांत विकल्या गेल्या, असं सांगितलं तर भुवया जैसे थे अवस्थेतून बाहेर येतील. ही हजारो टन वैद्यकीय सामग्री, हजारभर पीपीई- आणि अन्य काही सामग्री घेऊन एक रेल्वे २१ मार्चला तब्बल १३ हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाली.. हे सांगितलं तर वाचणारा आता अधिक सावध होईल.
आणि हे जर पुढे स्पष्ट केलं की हे सगळं चीनबाबत आहे तर वाचणारा खडबडून भानावर येईल.
करोनाच्या साथीत वाताहत झाली असं सांगितलं जात होतं, त्या चीनची ‘द इकॉनॉमिस्ट’नं दिलेली ही ताजी व्यापार आकडेवारी तो देश त्यातून किती सावरला इतकंच सांगत नाही. तर त्याचबरोबर अमेरिकेइतकेच अन्य देशही या चिनीचक्राबाबत किती अनभिज्ञ आहेत हे त्यातून कळेल. १ मार्चला तर चीन या साथीने बेजार झालेला होता! तरीही अन्य देशांशी व्यापारसंधी तो सोडत नव्हता. अवघ्या ३५ दिवसांत तो ४०० कोटी मुखपट्टय़ा निर्यात करू शकला असेल तर गडी किती पोचलेला आहे, ते कळेल. ते बाकीचं सगळं सामान घेऊन चिनी रेल्वेगाडी पूर्व चीनमधल्या यिवू शहरातून थेट युरोपातल्या स्पेनमधल्या माद्रिदला पोहोचली. या ३५ दिवसांच्या काळात चीननं जगाला १४५ कोटी डॉलर्सची वैद्यकीय सामग्री विकली. आणि त्या देशाचं ‘औदार्य’ असं की श्रीमंत, विकसित जगाकडून चीननं या सगळ्याचं मोल पुरेपूर वसूल करून घेतलं आणि गरीब, दरिद्री अशा अफ्रिकी, आशियाई देशांना ती स्वस्तात किंवा फुकटात पुरवली. हे झालं फक्त चिनी सरकारपुरतं. त्याच्या जोडीला अलिबाबा, हुवेइ अशा बलाढय़ चिनी कंपन्यांनी पुरवलेली/ विकलेली साधनसामग्री वेगळीच. त्यात आहोत हजारो पीपीई संच, लाखो चष्मे आणि तितकेच रबरी हातमोजे. ज्या हुवेइ कंपनीवर बंदी घाला अशी मागणी अमेरिकेनं केली त्याच अमेरिकेच्या आर्थिक राजधानी न्यू यॉर्क शहरातल्या रुग्णालयांनासुद्धा चिनी सामग्रीच पुरवली गेलीय.
सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या २०१७ सालच्या पंचवार्षिक अधिवेशनात अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बोलून दाखवलं होतं.. पुढल्या काही वर्षांत चीन अमेरिकेच्या तोडीस तोड अशी महासत्ता म्हणून उदयास येईल.
विषाणूनं माणसं मरतात, शहरं उद्ध्वस्त होतात, देश कफल्लक होतात. खरंय हे. पण हाच विषाणू कधी कधी महासत्ताही जन्माला घालतो..