News Flash

रंगीत फुलकोबीचा प्रयोग!

आतबट्ट्याच्या ठरत असलेल्या शेती व्यवसायात आजकाल तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग राबवताना दिसत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

प्रल्हाद बोरसे

आतबट्ट्याच्या ठरत असलेल्या शेती व्यवसायात आजकाल तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग राबवताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्याच्या दाभाडी येथील महेंद्र निकम या तरुण शेतकऱ्याने केलेला पिवळ्या आणि जांभळ्या अशा दोन रंगांमधील फुलकोबी लागवड प्रयोगही सध्या असाच चर्चेत आहे.

पारंपरिक पद्धतीची पिके घेतल्यावर हातात फारसे काही लागत नसल्यामुळे शेती आतबट्ट्याची ठरत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना पदोपदी येत आहे. दुसऱ्या बाजूला शेतीतले हे दशावतार संपुष्टात आणतानाच अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या जिद्दीतून आजकाल विशेषत: तरुण शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग राबवताना दिसत आहेत. वेगवेगळ्या संकटांचा नेटाने सामना करणाऱ्या या तरुण शेतकऱ्यांची ही धडपड अनेकदा फळास येत असल्याचे चित्र असून सध्याच्या निराशाजनक वातावरणात अन्य शेतकऱ्यांना ते नक्कीच प्रेरणादायी ठरत असते. नाशिक जिल्ह्याच्या दाभाडी येथील महेंद्र निकम या तरुण शेतकऱ्याने केलेल्या पिवळ्या आणि जांभळ्या अशा दोन रंगांमधील फुलकोबी लागवड प्रयोगाची कीर्ती सध्या अशीच सर्वदूर चर्चेत आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच लागवड झालेल्या रंगीत फुलकोबीच्या या नव्या वाणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले असून या निमित्ताने शेतकऱ्यांना आणखी एका नगदी भाजीपाला पिकाचा चांगला पर्याय उपलब्ध होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे.

पारंपरिक शेती पिके घेणाऱ्या एका गरीब शेतकरी कुटुंबात महेंद्र यांचा जन्म झाला. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गरिबीमुळे महेंद्रला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचे स्वप्न भंग पावल्यानंतर कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा म्हणून गाव परिसरातील अन्य शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांच्या छाटणीचे काम करण्याची पाळी त्याच्यावर आली. हे काम करता करता डाळिंब पीक व्यवस्थापनाचे बऱ्यापैकी ज्ञान त्याला अवगत झाले. त्यातून वडिलोपार्जित शेतीत डाळिंब बाग फुलवण्याचे बघितलेले त्याचे स्वप्न साकार झाले आणि त्याद्वारे चांगल्यापैकी कमाई देखील झाली. या कमाईतून दाभाडीलगतच्या बेळगाव शिवारात निकम कुटुंबाने १० एकर शेतजमीन खरेदी केली. कालांतराने तेल्या व मर रोगांमुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला. मात्र त्यापुढे हार न मानता वेगवेगळे पर्याय शोधत नवनवीन पिके घेण्याचा महेंद्र यांनी चंग बांधला. त्याद्वारे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतातून चांगले उत्पादन घेण्याचा त्यांचा हातखंडा तयार झाला. दरम्यानच्या काळात संरक्षित पद्धतीने दर्जेदार भाजीपाला उत्पादन घेता यावा म्हणून चार एकर क्षेत्रावर त्यांनी ‘शेडनेट’ची उभारणी केली. शेडनेटमधून आजवर लाल, पिवळी, काळी, जांभळी व हिरव्या रंगाच्या रंगीत ढोबळी मिरचीचे त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. शेडनेट व खुल्या शेतीमध्ये निकम यांनी केलेले नावीन्यपूर्ण शेती प्रयोग नेहमीच लक्षवेधी ठरत आलेले आहेत. यापूर्वी झुकेनी, आईसबर्ग, ऑस्ट्रेलियन ग्रीन बेरी पपई, बेसील यांसारखी ‘हटके’ पिके घेऊन शेतीतून कसा चांगला पैसा मिळवता येतो, याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.

जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झाले असले, तरी पीक पद्धतींमधील जागतिक पातळीवरील अद्ययावत माहितीचे ज्ञान आत्मसात करण्याची इच्छा तसेच शेती क्षेत्रातील नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती निकम यांच्या ठायी ठासून भरलेली आहे. याच जिज्ञासेतून ‘सीजेंटा’ ही बहुराष्ट्रीय बीजोत्पादक कंपनी भारतात रंगीत फुलकोबीचा वाण प्रायोगिक तत्त्वावर लागवडीसाठी देणार असल्याची माहिती निकम यांना समजली. त्यानंतर स्वत:च संपर्क साधत हे वाण मिळवण्यासाठी त्यांनी कंपनीकडे आग्रह धरला. प्रायोगिक तत्त्वावरील या वाणाची निकम हे यशस्वी लागवड करू शकतील, याची खात्री झाल्याने मग या कंपनीनेही त्यांना बियाण्याचा पुरवठा केला. त्यानुसार ३० गुंठे क्षेत्रावर पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या प्रत्येकी १० हजार याप्रमाणे एकूण २० हजार रोपांची लागवड करण्यात आली. त्यासाठी तीन रुपये प्रति रोप याप्रमाणे एकूण ६० हजारांचा खर्च आला. या कंपनीच्या वाणाची युरोपीय देशांमध्ये आधीपासून लागवड होत आहे. भारतामधील मात्र हा पहिलाच प्रयोग असतानाही कष्ट घेण्याची तयारी आणि दुर्दम्य आत्मविश्वाासाच्या जोरावर या वाणाची लागवड करण्याचे निकम यांनी दाखविलेले धाडस खरोखरच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागला. गेल्या डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात रोपांच्या लागवडीनंतर फुलकोबीचे उत्पादन घेण्यासाठी ६५ दिवसांचा कालावधी लागला. या पिकासाठी निकम यांनी रासायनिक ऐवजी जैविक पद्धतीची खते व फवारणीची औषधे वापरण्यावर भर दिला. शेतीची मशागत, रोपे, खते, औषधे, मजुरी, पॅकिंग, वाहतूक असा पीक काढणीपर्यंतचा संपूर्ण खर्च दोन लाखांच्या घरात गेला.

पिवळ्या व जांभळ्या रंगातील या फुलकोबीचे गड्डे अत्यंत आकर्षक असल्याने कुणालाही त्याची भुरळ पडावी, अशी एकंदरीत स्थिती असते. याशिवाय ब्रोकोली किंवा पांढऱ्या फुलकोबीच्या तुलनेत रंगीत फुलकोबीत पोषकद्रव्ये तसेच ‘अ’ आणि ‘ब’ ही जीवनसत्त्वे देखील अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे या देखण्या फुलकोबीला बड्या शहरांमधील पंचतारांकित हॉटेल्समधून चांगली मागणी असते. या मागणीनुसार मुंबई, पुणे, नाशिक येथे हे फुलकोबी निकम यांनी विक्रीस पाठवले. त्याला प्रतिकिलो ५० रुपये दर मिळाला. जवळपास चार टन माल विक्रीतून आलेल्या दोन लाखांच्या रकमेतून झालेला खर्च वसूल होऊ  शकला, पण वरची कमाई काही झाली नाही. असे असले तरी निकम यांना त्याचे काही दु:ख झाले नाही. त्यांच्या मते, थोडे नियोजन चुकल्याने आणखी किमान १० ते ११ टन माल वेळेवर काढणे शक्य होऊ  शकले नाही. त्यामुळे पिकाच्या संपलेल्या कालमर्यादेमुळे फुलकोबी गड्ड्याचा आकार वाजवीपेक्षा अधिक मोठा झाला तसेच उन्हाचे चटके बसल्याचा परिणाम माल खराब होण्यातही झाला. जर हा माल वेळेवर काढता आला असता तर ३० गुंठ्यांतून १५ टनांच्या आसपास एकूण माल विक्री करता आला असती असे त्यांचे म्हणणे आहे.

या पिकासंबंधी पूर्वानुभवाच्या अभावामुळे काही चुका झाल्या नसत्या तर अवघ्या सव्वा दोन महिन्यांत ३० गुंठे क्षेत्रातून खर्च वजा जाता तीन ते चार लाखांचे उत्पन्न सहज मिळाले असते असा निकम यांचा दावा आहे. आता झालेल्या चुका टाळून वेळेवर माल विक्रीचे योग्य नियोजन करत या नव्या वाणातून भविष्यात चांगले उत्पन्न मिळविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. हिवाळ्याच्या हंगामात हे पीक उत्तम रीत्या येते. साध्या फुलकोबीच्या तुलनेत या वाणामध्ये प्रतिकारशक्ती अधिक आहे. बुरशीजन्य आजारांना ही कोबी सहसा बळी पडत नसल्याचा तसेच कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्चही तुलनेने कमी असल्याचा अनुभव निकम यांनी बोलून दाखवला.

निकम यांनी प्रायोगिक तत्त्वावर लागवड केलेल्या रंगीत फुलकोबी वाणाची महती समजल्यावरून देशातील अनेक भागाच्या शेतकऱ्यांनी या वाणाच्या लागवडीसाठी रुची दाखवली आहे. या वाणासाठी भारतात १५ सप्टेंबर ते पाच डिसेंबर हा कालावधी अनुकूल असल्याने त्या अनुषंगाने पुढील वर्षासाठी बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आखले जात आहे.

– शिरीष शिंदे, पीक विशेष तज्ज्ञ, सिजेंटा इंडिया लिमिटेड कंपनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:21 am

Web Title: article on experiment with colored cauliflower abn 97
Next Stories
1 चिंचेचे ‘शिवाई’ वाण!
2 विश्वाचे वृत्तरंग : अराजकाच्या उंबरठय़ावर..
3 ‘ऑफलाइन’ परीक्षाच विद्यार्थिहिताच्या!
Just Now!
X