सतीश आळेकर

इब्राहीम अल्काझी. वय ९४. गेले. काही वर्षे ते त्यांचे नव्हतेच. कारण अल्झायमर. मी काही त्यांचा विद्यार्थी नाही किंवा त्यांनी दिग्दर्शित केलेली सगळी नाटकेही मी बघितली नाहीत. त्यांचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध अगदी थोडा आला. १९९८ मध्ये पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील भीमसेन जोशी अध्यासनात ते व्याख्यानासाठी आले होते. नंतर त्यांनी विद्यार्थ्यांबरोबर एक दिवस घालवला होता आणि महेश एलकुंचवारांनी त्यांची मुलाखत घेतली होती. आपल्या देशाच्या रंगभूमीची नेमकी जाण आणि तिच्या समृद्ध होण्याचा नेमका मार्ग सापडलेला हा द्रष्टा होता. एकूण कलाविश्वाची नेमकी जाण असणारा हा योगी आता आपल्यात नाही. त्यांच्या कलादृष्टीची छाया स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीवर पडलेली अजूनही दिसते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचं कुटुंब मूळचं कुवेतचं. जन्म पुण्याचा आणि नाटकाचं शिक्षण लंडनच्या रॉयल अ‍ॅकॅ डेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमधलं. एक प्रशिक्षित रंगकर्मी होते ते. पण भारतात आल्यावर मुंबईत दीर्घ काळ इंगजी नाटके  केल्यावर, दिल्लीत नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाची सूत्रे त्यांच्याकडे आली. त्यांनी भारतीय रंगभूमीच्या नागरी आणि ग्रामीण या दोन्ही धारा चिमटीत पकडून भारतीय नाटय़ प्रशिक्षणाचा ढाचा विकसित केला. हे करताना त्यांनी एका हातात दोनशे वर्षांच्या ब्रिटिश अमलाचा परिणाम झालेली भारतीय नागर रंगभूमी आणि दुसऱ्या हातात नाटय़शास्त्र व त्याचबरोबर त्याही आधीची  लोकरंगभूमी परंपरा अशा दोन्ही झांजा समतोल, नेमक्या, शिस्तबद्ध आणि सुस्पष्ट वाजवतील असे कलाकार तयार करण्याचे अंगण सारवले. या अंगणाची माती लागलेले नसिरुद्दीन शहा, ओम पुरी यांच्या सारखे अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत.  त्यांची कलादृष्टी दीर्घकाळ आपली सोबत करेल. त्यांच्या जाण्याने एक कलापर्व संपलेले आहे.