संजीव चांदोरकर

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना नक्की कोणत्या व किती हालअपेष्टा सहन कराव्या लागणार हे मात्र त्या भूभागातील प्रचलित राजकीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. टेक्सासच्या रहिवाशांना वीज-पाण्याविना आठवडा काढावा लागतो, तो अनियंत्रित बाजारशक्तींवर अंधविश्वास ठेवणाऱ्या आर्थिक तत्त्वज्ञानामुळे!

gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

खरे तर निसर्ग देशांच्या किंवा देशांतर्गत राज्यांच्या राजकीय सीमा कधीच जुमानत नाही. गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या वादळांमुळे अमेरिका, युरोपातील काही देश, रशिया सारेच बाधित झाले. पण हाहाकार मात्र फक्त अमेरिकेतील टेक्सास राज्यातच उडाला. ‘टेक्सास’च का?

उत्तर ध्रुवावर होणाऱ्या घडामोडींमुळे कमीजास्त दाबाचे पट्टे तयार होऊन शीतलहरी खाली सरकणे नवीन नाही. पण त्यांची तीव्रता आणि वारंवारता मात्र हवामान बदलामुळे निश्चितच वाढत आहे. प्रचंड हिमवृष्टीसह अशीच शीतलहर मागच्या आठवडय़ात अमेरिकेतील काही राज्ये, युरोपातील काही देश आणि रशियावर येऊन धडकली.

हिमवादळांनी खूप मोठा भूभाग बाधित झालेला असताना सर्वत्र चर्चा मात्र अमेरिकेतील टेक्सास राज्यात उडालेल्या हाहाकाराची होत आहे. कारण तेथे उडालेला हाहाकार जेवढा हिमवृष्टीमुळे होता तेवढाच वीजनिर्मिती आणि वीज वितरण यंत्रणा कोसळल्यामुळे होता. या यंत्रणा काही तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्या नाहीत तर वीजकंपन्यांचे गेल्या अनेक दशकांतील विशिष्ट प्रकारचे वर्तन आणि त्या वर्तनाला मान्यता देणारे त्या राज्यातील संबंधित कायदे त्याला कारणीभूत आहेत. त्यातून भारतासारख्या देशालादेखील काही धडे शिकता येतील.

नक्की काय झाले

मागच्या आठवडय़ातील प्रचंड हिमवृष्टीमुळे टेक्सासमधील नैसर्गिक वायू वाहून नेणाऱ्या पाइपलाइन्स थिजल्यामुळे आणि पवनचक्क्यांवर बर्फ जमा झाल्यामुळे वीजनिर्मितीत मोठय़ा प्रमाणात घट झाली. तर दुसऱ्या बाजूला प्रचंड थंडीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरांमध्ये वीज वापरून उष्णता निर्माण करणाऱ्या संयंत्रांचा एकाच वेळी वापर सुरू केल्यामुळे विजेच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाली. वीजनिर्मिती व वितरण यंत्रणांना इजा होऊ नये म्हणून सर्वत्र स्वयंचलित रोधकयंत्रणा असतात. त्या कार्यान्वित झाल्या आणि वीज उत्पादन आणि वितरण यंत्रणा कोसळल्या. परिणामी राज्यातील ९० टक्के जनतेचा वीजपुरवठा गेले काही दिवस खंडित झाला.

टेक्सासमध्ये पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटल्या, वीज नसल्यामुळे पाणी शुद्धीकरण यंत्रे, पंप बंद पडले आणि पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली. वीज नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू विकणारी अनेक दुकाने बंद राहिली; जी उघडली त्यांतील सामान हातोहात संपले. जवळपास ४० लाख नागरिकांना या सगळ्याची झळ बसली; लहान मुले, आजारी आणि वयस्कर माणसांचे प्रचंड हाल झाले. ५० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले. विजेच्या मागणी-पुरवठय़ात आलेल्या टोकाच्या तफावतीमुळे ‘स्पॉट मार्केट’मधील विजेचे भाव आकाशाला भिडले. आणि वीजवितरण कंपन्यांनी त्याचे हजारो डॉलर्सचे बिल थंडीत गारठलेल्या ग्राहकांना पाठवलेदेखील. ही बाजार-अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता!

ही नैसर्गिक आपत्ती आहे की नाही? आहे. पण अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना नक्की कोणत्या व किती हालअपेष्टा सहन कराव्या लागणार हे मात्र त्या भूभागातील प्रचलित राजकीय अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. नेहमीच. टेक्सासदेखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे टेक्सासमधील वीज क्षेत्रातील घटनांकडे एक सुटी घटना म्हणून न बघता राजकीय आर्थिक प्रणालीचा अविभाज्य भाग म्हणून बघावयास हवे.

‘टेक्सास’चे वेगळेपण

अमेरिकेतील वीज क्षेत्रापैकी, टेक्सासमधील वीज क्षेत्र कोणालाच न जुमानणाऱ्या गावातील मस्तवाल दांडगटासारखे आहे. ती मस्ती येते महाकाय ऊर्जास्रोतांच्या मालकीतून. टेक्सासमध्ये अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील मोठे नैसर्गिक वायूचे साठे आहेत. नैसर्गिक वायू (५४ टक्के), कोळसा (२० टक्के), पवनचक्क्या (१८ टक्के) अशा विविध ऊर्जास्रोतापासून अमेरिकेतील सर्वात जास्त वीजनिर्मिती आणि विजेचा वापर करणारे राज्य टेक्सास आहे.

विजेच्या व्यवस्थापनासाठी राज्य हाच घटक मानला तरी देशातील विविध राज्यांमधील वीज वितरणाची जाळी परस्परांशी जोडणे, त्यासाठी संस्थात्मक ढाचे तयार करणे आता सर्वसाधारण बाब आहे. उदा.- आपल्या देशातील पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन. अशा ‘ग्रिड’मुळे  एखाद्या राज्यातील अतिरिक्त वीज परराज्याला विकता येते आणि मुख्य म्हणजे संकटकाळात इतर राज्यातील वीज तातडीने बाधित राज्याला पाठवता येते. यात काही तडजोडी अनिवार्य होतात. एका समूहाचा सभासद झाल्यामुळे, समूहाने बनवलेल्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक सभासदाला ‘खेळ’ खेळावा लागतो. त्या प्रमाणात त्याला ‘स्वातंत्र्य’ गमवावे लागते.

आणि हेच टेक्सासला खुपते. आपल्या ऊर्जा-श्रीमंतीमुळे आपल्याला कोणाची, कशाला गरज पडणार? आणि गरज पडणार नसेल तर आपल्या ऊर्जा स्वातंत्र्यावर कोणाची, विशेषत: केंद्र (फेडरल) सरकारची, आच कशाला येऊ द्यायची? याच विचारांनी टेक्सासने उपलब्ध राष्ट्रीय वीज वितरण जाळ्याशी संलग्न होण्यास गेली काही दशके सातत्याने नकार दिला आहे. अमेरिकेतील ते एकमेव राज्य आहे की ज्यातील वीज वितरण जाळे पूर्णपणे स्वतंत्र आहे.

मागच्या आठवडय़ातील टेक्सासमधील हिमवर्षांव सरासरीपेक्षा किती जास्त होता हा मुद्दा दुय्यम आहे. तेथील वीज वितरण जाळे राष्ट्रीय वीज वितरण जाळ्याचा भाग असता तर बाहेरून तातडीने अत्यावश्यक वीज वळवता आली असती आणि लाखो नागरिकांच्या आयुष्याशी जीवघेणा खेळ झाला नसता. मग प्रश्न असा उपस्थित होतो की टेक्सासच्या अशा वागण्यामागील ढकलशक्ती कोणती?

वेगळेपणामागील ढकलशक्ती

ती ढकलशक्ती आहे वीजनिर्मिती आणि वीज वितरण क्षेत्रातील खासगी मालकीच्या कंपन्या; ती ढकलशक्ती आहे अनियंत्रित बाजारशक्तींवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवणारे आर्थिक तत्त्वज्ञान!

दोन राज्यांमधील विजेच्या आदानप्रदानाला नियमित करण्यासाठी अमेरिकन केंद्र सरकारचा कायदा अस्तित्वात असला तरी केंद्र सरकार कोणत्याच राज्याला त्यात सामील होण्याची सक्ती करू शकत नाही. अमेरिकन घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा वापर करीत टेक्सासने केंद्र सरकारच्या कायद्यापुढे मान तुकवायला नकार देत स्वत:चे ‘इलेक्ट्रिक रिलायबिलिटी कौन्सिल ऑफ टेक्सास (एर्कॉट)’ वीज वितरण जाळे तयार केले.

टेक्सासमधील वीज क्षेत्रातील खासगी कंपन्यांची पकड निरनिराळ्या संदर्भात पुन:पुन्हा समोर येते. उदा. २०११ मध्येदेखील हिमवादळांमुळे वीजनिर्मितीत खंड पडून टेक्सासमध्ये खूप मोठे अरिष्ट आले होते. चालीरीतींप्रमाणे चौकशी समिती नेमली गेली; समितीने आपल्या ३५० पानांच्या अहवालात भविष्यात अशा संकटात कमी हाहाकार उडावा यासाठी काही ठोस सूचना वीजनिर्मिती आणि वितरण कंपन्यांना केल्या होत्या. त्यात वीज क्षेत्रातील उपकरणांचे ‘हिवाळीकरण (विन्टरायझेशन)’ ही गाभ्याची सूचना होती. त्यात पाइपलाइन्स बर्फामुळे थिजू नयेत, उपकरणांवर अवाजवी बर्फ साठू नये यासाठी त्यांना उबदार ठेवावे, इंधनाचा पुरेसा साठा करावा, डिझेलवर चालणारी संयंत्रे ठिकठिकाणी असावीत की जेणेकरून अडीनडीला छोटेमोठे हस्तक्षेप करता येतील, अशा सूचनांचा समावेश होता.

पण यापैकी कोणत्याही शिफारशी वीज क्षेत्रातील कंपन्यांवर बंधनकारक नव्हत्या. वीज कंपन्यांनी त्या काही अमलात आणल्या नाहीत. कारण उघड आहे. या सर्व सूचनांचा अमल करण्यासाठी वाढीव भांडवली खर्च आणि खेळते भांडवल लागले असते. त्याचा उपयोग कधीकाळी येणाऱ्या संकटात झाला असता हे खरे; पण वापरात न आलेल्या भांडवलामुळे नफ्याची पातळी कमी झाली असती हे जास्त खरे होते.

नैसर्गिक वायूचे आश्वासक साठे हाताशी असल्यामुळे वीजनिर्मिती कंपन्या वायूंचा मोठा साठा करत नाहीत. भूगर्भातील वायू काढला की त्यातून ऊर्जा मिळवून त्यातून लगेच वीजनिर्मिती केली जाते. यात लक्षात घ्यायची गोष्ट ही की, वायू काढायलादेखील वीज लागते. वीज अनुपलब्ध झाल्यामुळे नैसर्गिक वायूदेखील अनुपलब्ध झाला. अडीनडीला उपयोगात येणारे किमान साठे का नाही ठेवायचे? परत तेच कारण. त्यात भांडवल अडकते आणि परताव्याचा दर कमी होतो म्हणून!

व्यापक धडे

मुद्दा नेहमीचा खासगी क्षेत्रावर टीका आणि सार्वजनिक मालकीची भलामण हा नाही. मुद्दा आहे पाणी, वीज, सार्वजनिक वाहतूक आणि अगदी शिक्षण आणि आरोग्यासारख्या, सामान्य नागरिकांच्या अस्तित्वाशी निगडित असणाऱ्या, पायाभूत सुविधा क्षेत्रांना खासगी भांडवलाचे ‘नफा-केंद्री’ तर्कशास्त्र लागू करून द्यायचे का हा.

भारतात तर शेती क्षेत्रदेखील या यादीत घालावयास हवे. अर्थव्यवस्थेतील उपक्षेत्रे अधिकाधिक प्रमाणात कॉर्पोरेटच्या हातात गेल्यावर त्यांना नियमित करणारी आर्थिक धोरणे, कायदे बनण्याच्या प्रक्रियेवर निर्णायक प्रभाव टाकण्यासाठी कॉर्पोरेट कोणत्याही टोकाला जाणार हे उघड आहे. किमान लोकशाही राष्ट्रात हा निर्णय केवळ काही ‘निवडक’ अर्थतज्ज्ञांनी नाही तर सार्वभौम जनतेने घ्यायचा आहे.

लेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.

ईमेल : chandorkar.sanjeev@gmail.com