26 January 2021

News Flash

का मंत्रेचि वैरी मरे?

विशेष दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या यंत्र-तंत्रांची आपल्याकडे अजिबात कमी नाही.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. हमीद दाभोलकर

अमुक देव-देवतेचे यंत्र वापरले की आयुष्यातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील असे दावे करणाऱ्या वस्तुविक्रय जाहिराती माध्यमांतून झळकतात. यातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आता उच्च न्यायालयाच्या अलीकडच्या एका निकालाने कायदेशीर हस्तक्षेप शक्य झाला आहेच; पण महाराष्ट्रासह जगभरातील विवेकवादी चळवळीला हा निकाल दिशादर्शक ठरेल..

विशेष दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या यंत्र-तंत्रांची आपल्याकडे अजिबात कमी नाही. अनेक माध्यमे या जाहिराती व्यवसायाचा भाग म्हणून प्रसारित करताना आपण पाहतो. अमुक देव-देवतेचे यंत्र किंवा मशीन वापरले की तुमच्या आयुष्यातील सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतील, व्यवसायातील अडचणी दूर होतील, संसार सुखाचा होईल, आरोग्याचे प्रश्न आपोआप मिटतील.. असे असंख्य दावे त्यात केलेले असतात. थोडीदेखील चिकित्सक बुद्धी वापरून विचार करणाऱ्या व्यक्तीला त्यातील फोलपणा आणि फसवणूक लक्षात येते. असे असले तरीही, दिवसाउजेडी चाललेली ही फसवणूक थांबवण्यासाठी कायदेशीररीत्या फारसा काही हस्तक्षेप करणे शक्य नव्हते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५ जानेवारी रोजी देव-देवतांच्या नावाने यंत्रा-तंत्राच्या जाहिराती प्रसारित करणे बेकायदेशीर ठरवणारा निवाडा दिला आहे; त्यामुळे आता अशा जाहिरातींवर थेट कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमधील मैलाचा दगड ठरावा असा हा निकाल आहे. तो नीट समजून घ्यायला हवा.

त्याचे झाले असे की, राजेंद्र अंभोरे यांनी २०१५ साली औरंगाबाद येथे राज्य सरकार, केंद्र सरकार, यंत्रे विकणारे टेलीशॉपिंग कॉर्पोरेशन, त्याची जाहिरात करणारे अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल हे ‘सेलेब्रिटी’ आदी २२ जणांना प्रतिवादी करून एक याचिका दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हनुमान चालिसा यंत्राची जाहिरात बघून ते खरेदी केले होते. त्या जाहिरातीत असे दाखवले होते की, ‘बाबा मंगलनाथ नावाच्या एका विभूतीने हे यंत्र तयार केले आहे. या मंगलनाथ बाबा यांना विशेष सिद्धी प्राप्त असून त्यांना देव प्रसन्न झाला आहे. त्यामुळे हे यंत्र घरात आणणे म्हणजे प्रत्यक्षात मारुतीरायाला घरी आणल्यासारखे आहे. केवळ एवढेच नाही, तर या यंत्रावर जर्मन भाषेत हनुमान चालिसा लिहिली आहे आणि ती कधीही पुसली जात नाही.’ तसेच हे यंत्र सोन्याचा मुलामा दिलेले असून ते घरी आणल्यामुळे आपले सर्व प्रश्न सुटतील, असे आश्वासनदेखील त्यामध्ये देण्यात आले होते. याचिकाकर्ते अंभुरे यांनी ५,२०० रुपयांना हे यंत्र विकत घेतले आणि थोडय़ाच दिवसांत त्यांच्या लक्षात आले की प्रत्यक्षात हे यंत्र घरात आणून आपल्याला काहीही फायदा झालेला नाही. म्हणून त्यांनी ही याचिका दाखल केली होती. ती त्यांनी तीन वर्षांनी मागे घेण्याचे ठरवले; परंतु यात गुंतलेले व्यापक समाजहित ध्यानात घेऊन न्यायालयाने या अर्जाची सुनावणी चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ अधिवक्ता व्ही. डी. सपकाळ यांनी या खटल्यासाठी न्यायमित्र (Amicus Curiae) म्हणून काम पाहिले. (न्यायमित्र म्हणजे अशी व्यक्ती, जी त्या खटल्यामध्ये पक्षकार नसते व जी आपल्याकडील माहिती, तज्ज्ञता, मर्मदृष्टी यांचा उपयोग करून न्यायालयाला मदत करते.) अनेक वेळा मूळ तक्रारदाराने तक्रार मागे घेतली तर न्यायालय तो खटला रद्द करते; पण देवा-धर्माचे प्रस्थ राजकारण आणि समाजकारणात मोठय़ा प्रमाणात वाढत चाललेल्या कालखंडात न्यायालयाने अशा संवेदनशील प्रकरणाची सुनावणी सुरूच ठेवण्याची घेतलेली भूमिका आश्वासक आहे. केवळ तेवढेच नाही, मानवी श्रद्धा आणि शोषण यांच्यामधील पुसट सीमारेषा स्पष्टपणे कायद्याच्या भाषेत नोंदवण्याच्या दृष्टीनेही हे अत्यंत महत्त्वाचे होते.

हा निकाल देताना उच्च न्यायालयाने जादूटोणाविरोधी कायद्याचा आधार घेतला आहे. सदर निकालात स्पष्टपणे म्हटले आहे : कुठल्याही देवाच्या किंवा बाबा-बुवांच्या नावाने असलेले यंत्र; त्यात जादूई, अतिमानवी गुण असल्याचा दावा करणे; त्यामुळे बरकत येईल असा दावा करून ते विकणे- हे जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम तीन अन्वये बेकायदेशीर आहे. तसेच अशा स्वरूपाची जाहिरात प्रक्षेपित करणे बेकायदेशीर आहे आणि अशा जाहिराती प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांसही या गुन्ह्य़ासाठी जबाबदार धरले जाईल. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील आणि जगभरातील विवेकवादी चळवळीला दिशादर्शक ठरेल असा एक भाग या प्रकरणात आहे, तो समजून घेऊ या..

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देव-धर्म नाकारूनच काम करावे लागेल, अशी भारतातील तसेच जगभरातील बहुसंख्य विवेकवादी संघटनांची भूमिका राहिली आहे  महाराष्ट्रातील श्रीराम लागू यांच्यासारखे प्रखर बुद्धिवादीदेखील हीच भूमिका मांडत असत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मात्र सातत्याने मांडलेली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लावून धरलेली भूमिका ही त्यापेक्षा वेगळी आहे. त्या भूमिकेनुसार भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे देव आणि धर्म मानण्याचा किंवा न मानण्याचा अधिकार येथील प्रत्येक नागरिकाला आहे. पण देवाच्या किंवा धर्माच्या नावावर जर कोणी दुसऱ्याचे शोषण करत असेल तर मात्र त्याला विरोध करणे हे आपले सांविधानिक कर्तव्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वातील दीर्घकालीन लढाईनंतर आणि अंतिमत: त्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात पारित झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यामध्येही हीच भूमिका अधोरेखित आहे. न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. शेवलीकर यांनी दिलेल्या निकालाने ही भूमिका आणखी ठळक झाली आहे. विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची ही भूमिका आहे. जगभरातील बहुतांश धर्माचा मूळ उद्देश मानवी मनातील चांगुलपणाला आधार देणे हा आहे. मात्र अनेकदा त्याच्या नावावर जनसामान्यांचे शोषण झालेले दिसते. हे सर्वच धर्मामध्ये कमी-अधिक प्रमाणात घडून येताना आपण पाहतो. हे शोषण टाळण्याचा आपल्याकडे उपलब्ध असलेला एकमेव मार्ग म्हणजे, आपल्या देव आणि धर्म या संकल्पनांची सातत्याने तपासणी करणे आणि त्यामधील जे कालसुसंगत नसेल, मानवी प्रतिष्ठेला बाधा आणणारे असेल ते त्यागणे. ही प्रत्येक माणसाने आणि समाजाने सातत्याने करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यामधून मानवी समाज अधिक उन्नत व टप्प्याटप्प्याने अंधश्रद्धेपासून दूर होऊ शकतो. त्यासाठी दरवेळी देव आणि धर्म नाकारण्याची गरज नाही, ही भूमिका ठाशीवपणे पुढे येते.

दैवी शक्तीच्या नावे यंत्रे, स्टोन्स, गंडेदोरे, ताईत वापरून आपले प्रश्न सोडवण्याची हमी- हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि युरोप-अमेरिका तसेच आखाती देशांतदेखील मोठय़ा प्रमाणात दिसून येते. न्यू यॉर्कसारख्या प्रगत शहरातही अशा जाहिरातींचा सुळसुळाट दिसतो. त्यामुळे वरील प्रकरणी न्यायालयाने दिलेला निकाल देशपातळीवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील दिशादर्शक ठरू शकतो. या निकालाचे आणखी एक महत्त्वाचे अंग म्हणजे, यात न्यायालयाने राज्य सरकार व जादूटोणाविरोधी कायद्याखाली नेमण्यात आलेल्या दक्षता अधिकाऱ्यांना (प्रत्येक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी) असे निर्देश दिले आहेत की, अशा वस्तूंच्या जाहिराती करणाऱ्या आणि त्या विकणाऱ्यांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हे नोंदविण्यात यावेत. तसेच राज्य व केंद्र सरकारला सूचना केली आहे की, मुंबई येथे एक विशेष कक्ष स्थापून दूरचित्रवाहिन्यांवरील अशा जाहिरातींच्या प्रसारणावर लक्ष ठेवावे. त्याची अंमलबजावणी करणे ही आता सरकारची जबाबदारी आहे.

महाराष्ट्राला संत आणि समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे सातशे वर्षांपूर्वी म्हणून गेले आहेत : ‘‘का मंत्रेचि वैरी मरे। तरी का वायाचि बांधावी कटारे। रोग जाय दुध साखरे। तरी निंब का पियावा।।’’ इतका साधा कार्यकारणभाव आपण लक्षात घेतला, तर या फसवणुकीपासून आपला बचाव होऊ शकतो. पण अडचणींमुळे तणावग्रस्त झालेल्या माणसाचा कार्यकारणभाव असा चालेल याची खात्री देता येत नाही, म्हणूनच हा दिशादर्शक निर्णय स्वागतार्ह आहे.

लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.

hamid.dabholkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:08 am

Web Title: article on tv ads promoting superstition illegal under black magic act bombay hc abn 97
Next Stories
1 ‘भविष्य निर्वाहा’चा काय भरवसा?
2 यंत्रणेतील उणिवांची लक्तरे..
3 आठवडय़ाची मुलाखत : ‘बर्ड फ्लू’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज!
Just Now!
X