देशातील पहिल्या खासगी महिला गुप्तहेर म्हणून नावाजल्या गेलेल्या रजनी पंडित यांना अलीकडेच अटक झाली आणि सगळेच चक्रावले. त्यातून सुरू झाली चर्चा गुप्तहेर या व्यवसायाविषयी, त्यांच्या नैतिक-अनैतिक, कायदेशीर-बेकायदेशीर मार्गाविषयी. सर्वाच्याच मनात कुतूहल असलेला हा व्यवहार आपल्याकडे तरी अजून बेकायदेशीरपणाच्याच पायावर उभा आहे, हे आता स्पष्ट होत आहे. या हेरगिरी व्यवसायावर एक नजर..

‘मुलाला एक मुलगी सांगून आलीये. फोटोत सुंदर दिसते. उच्चशिक्षित आहे. कॉर्पोरेट कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करतेय म्हणे. नाही म्हटलं, बाकीची माहिती मिळेल हो.. पण चारित्र्याचं काय? कॉर्पोरेट संस्कृतीत वावरतेय ना.. प्रेमप्रकरणं, व्यसनं, वाईट संगत याची माहिती कोण देणार? एकुलता एक मुलगा आमचा. मनातल्या शंका दूर झाल्या की बोलणी करता येतील..’

असं म्हणत, आजुबाजूला विचारपूस करण्याआधी पालक थेट खासगी गुप्तहेराचं दार ठोठावतात आणि मग सुरू होतो एक भयानक पाठलाग.

फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टिंडर अशा समाजमाध्यमांवरील त्या मुलीचा वावर टिपण्यास सुरुवात होते. ‘फ्रेण्डलिस्ट’, अनुगामी म्हणजेच ‘फॉलोअर्स’ येथपासून तिने जाहीर केलेली छायाचित्रं, त्यातली माणसं, तिला आलेल्या, तिने केलेल्या कॉमेन्ट्स तपासल्या जातात. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. तिचा पाठलाग केला जातो. तिचे मित्र, तिची संगत, तिचे फोनवर बोलणे, तिच्या सवयी, त्याबाबत तिच्या पालकांना माहीत आहे का.. ही आणि अशी माहिती गुप्तहेर गोळा करतो आणि मुलाच्या पालकांसमोर ठेवतो. थोडक्यात खासगी गुप्तहेर या तरुणीच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यावरच हल्ला चढवत असतो.

भावी सून-जावई यांच्या चारित्र्य पडताळणीसाठी, पती वा पत्नीच्या विवाहबाह्य़ संबंधांच्या संशयावरून गुप्तहेरांकडे येणाऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय. त्या खालोखाल कॉर्पोरेट कार्यालयं, उद्योगसमूह किंवा राजकीय पुढाऱ्यांकडून प्रतिस्पध्र्यासोबत आपल्याच अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेरांची सेवा घेतली जाते. एखाद्याचा त्याच्या अपरोक्ष केलेला पाठलाग, त्याच्या वैयक्तिक-खासगी आयुष्याशी निगडित बारीकसारीक माहिती गोळा करून ती विकण्याचा प्रकार नैतिक की अनैतिक? कायदेशीर की बेकायदेशीर? हा गुन्हा ठरत नाही का? या प्रश्नाचं नेमकं उत्तर खासगी गुप्तहेरांच्या व्यवसायाशी निगडित तज्ज्ञ मंडळींना ठामपणे देता येत नाही.

मुळात खासगी गुप्तहेरांच्या कामाचं नियमन करणारा, नियमभंग केल्यास त्यांच्याविरोधात कारवाईचा अधिकार देणारा कायदा अद्याप अस्तित्वातच नाही. ऑगस्ट २००७ मध्ये ‘खासगी गुप्तहेर संस्था(नियमन) कायद्या’चा मसुदा राज्यसभेत सादर केला गेला. हा कायदा भविष्यात अमलात आला तर केंद्राच्या, राज्याच्या खासगी गुप्तहेर संस्था नियमन महामंडळाकडून गुप्तहेरांना, गुप्तहेर संस्थांना परवाना घेणं बंधनकारक असेल. अशा परवानाधारक संस्थांमध्ये गुप्तहेर म्हणून नेमणूक होण्यासाठी हेरगिरीसाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण, भारतीय नागरिकत्व, वयाच्या अटीसोबत शैक्षणिक-शारीरिक पात्रतेचे निकष बंधनकारक ठरतील. गुन्हेगारी स्वरूपाच्या खटल्यात दोन र्वष किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या, देशहिताला बाधक ठरणाऱ्या पर्यायाने बंदी घातलेल्या संस्था, संघटनांशी लागेबांधे असलेल्या आणि शासकीय आस्थापनेतून बडतर्फ करण्यात आलेल्या व्यक्तीला गुप्तहेर होता येणार नाही. सर्वात महत्त्वाचं हे की या कायद्यातील तरतुदीनुसार गुप्तहेर संस्थांना त्यांच्या नोकरवर्गासह ग्राहकांचे तपशील आणि ग्राहकांना हव्या असलेल्या सेवेचं स्वरूप नोंदवणं बंधनकारक असेल. या अटी-शर्तीचा भंग केल्यास महामंडळाला परवाना रद्द किंवा निलंबित करण्याचे, परवान्याशिवाय हेरगिरी करणाऱ्यांना पहिल्या खेपेस दोन लखांचा दंड करण्याचे अधिकार महामंडळाला असतील. त्यानंतरही विनापरवाना कार्यरत राहिल्यास दोन वर्षांपर्यंत कैद आणि पाच लाखांपर्यंत दंड तर एखाद्याच्या वैयक्तिक किंवा खासगी आयुष्यातील स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतल्याचं स्पष्ट झालं तर सहा महिन्यांपर्यंतची कैद आणि ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद कायद्यात आहे.

हे सर्व कायदा अमलात आल्यानंतर होईल. तूर्तास माहिती गोळा करण्यासाठी खासगी गुप्तहेरांच्या उचापतींना कायदेशीर चौकट नाही. नियमांचं बंधन नाही. त्यामुळे ग्राहकाला खूश करण्यासाठी गुप्तहेर कोणतीही पातळी गाठतात. तशा खासगी आयुष्यातील स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्यांना शासन करणाऱ्या काही तरतुदी माहिती तंत्रज्ञान कायद्यात आहेत. पण आक्षेपार्ह, अश्लील छायाचित्र काढणं, प्रसारित करणं इथपर्यंतच त्या मर्यादित आहेत.

एखाद्या कृतीमागील उद्देश वा हेतू ती कृती गुन्हा आहे का हे निश्चित करते. हेतू महत्त्वाचा. त्यामुळे वासनांध व्यक्तीकडून घडलेला पाठलाग गुन्हा ठरतो किंवा डिवचण्याच्या, चिडवण्याच्या, भीती घालण्याच्या उद्देशाने केलेला पाठलाग गुन्हा ठरतो. पण निव्वळ माहिती घेण्यासाठी गुप्तहेराने केलेला पाठलाग किंवा ठेवलेली नजर गुन्ह्य़ाच्या कक्षेत मोडत नाही, असं निरीक्षण या क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ मंडळी नोंदवतात. खासगी गुप्तहेरांच्या कामाचं स्वरूप अनैतिक आहे, संविधानाने प्रत्येकाला दिलेल्या अधिकारांच्या विरोधातलं आहे हे वास्तव. पण आज समाजाला गुप्तहेरांच्या सेवेची गरज आहे हेही नजरेआड करता येणार नाही. ही गरज लक्षात घेऊन खासगी हेरांच्या सेवेला लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत आणणं उचित ठरेल, असंही ही मंडळी सांगतात.

खासगी गुप्तहेर माहिती काढण्यासाठी तांत्रिक पाठलाग, अद्ययावत यंत्र-उपकरणांची, सॉफ्टवेअरची मदतही घेतात. चार भिंतींआड सुरू असलेलं संभाषण दूरवर बसून ऐकता येतं. लेझर तंत्रज्ञानानेही ते सहज साध्य होऊ शकतं. बाजारात आलेल्या नवनवीन सॉफ्टवेअरच्या मदतीने संबंधित व्यक्तीने मोबाइलवर केलेली प्रत्येक हालचाल गुप्तहेर आपल्या मोबाइलमध्ये पाहू, ऐकू शकतो. पण सर्वसाधारणपणे अशा आयुधांचा वापर बडय़ा आसामींसाठी होतो.

गेल्या महिन्यात ठाणे पोलिसांनी देशातल्या पहिल्या महिला खासगी गुप्तहेर आणि अगदी राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांचा सत्कार करण्यात आला आहे अशा रजनी पंडित यांना दोन व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड(सीडीआर) अवैधपणे विकत घेतल्याबद्दल अटक केली. तब्बल तीन दशकं या व्यवसायात असलेल्या पंडित यांचा राजकीय, उद्योग, व्यवसाय, चित्रपटसृष्टीसह सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक थरांत ग्राहकवर्ग आहे, हे विशेष. अटकेनंतर त्यांनी सीडीआर विकत घेतल्याचं कबूल केलं खरं. पण पहिल्यांदाच सीडीआर विकत घेतले. आजवर ग्राहकांच्या शंकांचं निरसन व्यक्तिश: पाठपुराव्यातून केल्याचं त्यांनी ठाणे पोलिसांना सांगितलं. पंडित यांनी याआधीही सीडीआर विकत घेऊन, मिळवून ग्राहकांना पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने तपासही सुरू आहे. ‘असोसिएशन ऑफ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अ‍ॅण्ड इन्व्हेस्टिगेटर्स ऑफ इंडिया’ या खासगी गुप्तहेरांच्या देशव्यापी संघटनेचे पदाधिकारी कुँवर विक्रम सिंग यांच्या मते सीडीआर किंवा तांत्रिक पद्धतीने एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यातली माहिती मिळवणं, ती ग्राहकांना विकणं हा गुन्हा आहेच, पण तो हेरगिरीतला जवळचा मार्गही आहे. अशा पद्धतीने माहिती मिळवणारे गुप्तहेर नव्हेत, तर माहितीचे दलाल आहेत..