News Flash

अंतरीच्या ऊर्जेने धावणारे अशोक-चक्र!

या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे समीपदर्शन..

डॉ. अशोक मोडक

विनय सहस्रबुद्धे 

विद्यापीठ अनुदान आयोगाने राष्ट्रीय प्राध्यापक दर्जा दिलेले, बिलासपूर येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक मोडक वयाची ८० वर्षे पार करीत आहेत. या सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे समीपदर्शन..

सत्तरच्या दशकातले दिवस! रुईया महाविद्यालयात त्यावेळी एकापेक्षा एक दिग्गज मंडळी प्राध्यापक म्हणून शिकवायला होती. सदानंद रेगे, कृ.ना. वळसंगकर, स.गो. वर्टी, पुष्पा भावे, अर्थशास्त्रातल्या दिग्गज चंद्रा दलाया, साहूराजा सर या सर्वाच्या बरोबर आणखी एक प्राध्यापक विशेषत: डिबेटिंग सोसायटीच्या मुला-मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते, ते म्हणजे प्रा. अशोक मोडक! सायकॉलॉजी आणि तत्त्वज्ञान शिकविणाऱ्या प्रा. शुभदा जोशी नुकतीच त्यांची विद्यार्थीदशा संपवून रुईयातच प्राध्यापकी करू लागल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्येही पुढे गाजलेली खूप मंडळी होती. विनय आपटे, शांताराम पंदेरे हे काही जण नुकतेच माजी विद्यार्थी झाले होते, पण पद्माकर ओझे, ललिता केणेकर (बर्वे), वीरेन पाठारे असे अनेक जण आज ही स्पर्धा, उद्या ती ढाल, असं करत ‘डीपी’, ‘मणीज्’, आमडेकरांचं मराठी हॉटेल आणि खुद्द कॉलेजच्या ‘कृष्णाचं कॅ न्टीन’ असं सर्व काही एन्जॉय करायचे.

प्रा. अशोक मोडक, या सर्व दिग्गज प्राध्यापकांमध्ये असूनसुद्धा ‘ऑड मॅन आऊट’ होते. बाकी बहुसंख्य समाजवादी- पुरोगामी, तर मोडक सर रा.स्व. संघाचे स्वयंसेवक आणि अभाविपचे खंदे कार्यकर्ते. पण रुईयाच्या कॉमन रूममध्ये  मोडक सरांबद्दल विरोधी विचारांच्या प्राध्यापकांमध्येही नितांत आदर होता व तो व्यक्तदेखील होई. अशोक मोडकांची अभ्यासू वृत्ती, दांडगा व्यासंग, पराकोटीची मेहनत करण्याची त्यांची नित्य असलेली तयारी आणि अंगीकृत कामाबद्दलची त्यांची अव्यभिचारी निष्ठा या सर्व गुणांमुळे मोडक सर सर्वाच्या आदराचा विषय ठरले होते.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या अशोक मोडकांना घरच्या स्थितीने साथ दिली असती तर ते संघाचे प्रचारक म्हणूनच निघाले असते. पण, ती कसर आयुष्यभर निरपेक्ष भावनेने काम करून त्यांनी भरून काढली. पुण्यात राहून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या सहकार्याने त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नंतर ते चाळीसगावच्या महाविद्यालयात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे दोन्ही विषय शिकवू लागले. याच टप्प्यावर त्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती मिळाली. प्रारंभी काही वर्ष दिल्लीत राहून, नंतर मॉस्को विद्यापीठात संशोधन करून त्यांनी ‘सोविएत रशियाची भारताला आर्थिक मदत’ या विषयावर प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळवली. डॉक्टरेटनंतर मोडक सर मुंबई विद्यापीठाच्या सोविएत अध्ययन केंद्रात व पुढे युरेशियन स्टडीज सेंटरमध्ये शिकवू लागले व यशावकाश तिथूनच निवृत्त झाले.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासून पुढे जवळपास १०-१२ वर्षे अशोक मोडक अभाविपच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते. पुढे मोडक सर अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्षही झाले, पण मुंबई शहरात त्यांनी जे संघटनात्मक काम उभे केले त्याला तोड नव्हती! दिवसभर महाविद्यालयानंतर कॉलेजातच डबा खाऊन अभाविपच्या बैठकांसाठी मुंबईत उभा-आडवा प्रवास आणि संध्याकाळी गिरगाव, काळाचौकी, बोरिवली वा घाटकोपर अशी कुठेतरी विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांची बैठक आटोपून डोंबिवली लोकल गाठून प्रवास, रात्री उशिरा घरी पोहोचून पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरची तयारी असा दिनक्रम मोडक सरांनी वर्षांनुवर्षे निभावला. जोडीला लेखन, सेमिनारसाठी पेपर्स हे सारं. लोकलमध्ये बसायला जागा मिळालीच तर, मोडक सर मांडी ठोकून आखीव कागदांवर आपल्या रेखीव अक्षरात लेखनप्रपंच मांडायला तयारच असायचे. नेहमी फाऊंटन पेनाने लिहिणारे मोडक सर, लोकलच्या गर्दीतही एकाग्रपणे सुबक अक्षरात अजिबात खाडाखोड न करता कसे काय लिहू शकतात हा आम्हा सर्वाच्या कुतुहलाचा स्वाभाविक विषय असायचा. वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या अशोक मोडकांनी आतापर्यंत शेकडो लेख, जवळपास अर्धा शेकडा पुस्तके/पुस्तिकाही लिहिल्या आणि अनेक परिषदा वा चर्चासत्रांसाठी निबंधही लिहिले. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असलेल्या डॉ. अशोक मोडकांनी मराठी वाङ्मयाची आवड आयुष्यभर जोपासली. संस्कृतमधले अनेक श्लोक आणि अर्थवाही मराठी कविता त्यांना आजही मुखोद्गत आहेत. अनेकांना माहिती नसेल, पण मोडक सर उत्तम कविता करतात. त्यांच्या आप्तेष्टांची लग्ने अशोकरावांनी रचलेल्या व स्वत: गायलेल्या मंगलाष्टकांशिवाय लागली नाहीत. संघ, अभाविपची गीते तर सर खडय़ा आवाजात गातातच, पण भा. रा. तांब्यांची ‘मधुघट’ ही कविता मोडक सरांकडून ऐकणे हा दुर्मीळ, पण संस्मरणीय योग असायचा.

महाराष्ट्रात मोडक सरांनी आपल्या वक्तृत्वाने गाजविली नाही अशी एकही व्याख्यानमाला नसावी! त्यांच्या वक्तृत्वात ओजस्विता असतेच; शिवाय किस्से, कहाण्या असे भाषणाला आकर्षक करणारे घटकही असतात. पण त्याचबरोबर गाढा व्यासंग दाखविणाऱ्या अचूक संदर्भाची रेलचेलही असते. एकाचवेळी अकादमिक उंची गाठणारे आणि तरीही जनसामान्यांनाही समजण्याइतके सोपे करून मांडलेले विषय प्रतिपादन ही अशोकरावांच्या मांडणीची वैशिष्टय़े त्यांच्या लेखनातून आणि भाषणातूनही ठळकपणे समोर येतात!

पण, विद्वत्ता आणि व्यासंग यांच्या जोडीला मोडक सरांनी जी संघटनशीलता जोपासली ती अद्वितीय म्हणावी लागेल. ते जितक्या सहजतेने सोव्हिएत कल्चरल सेंटरच्या रशियन प्रतिनिधींशी बोलायचे, तितक्याच अकृत्रिमतेने धारावीतल्या काळा किल्ला परिसरातल्या एखाद्या विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांच्या घरी चहा-नाश्ता करीत. एखादा कार्यकर्ता आजारी असल्याचे समजण्याचा अवकाश, मोडक सर त्याला हॉस्पिटलात वा घरी भेटायला जाणार म्हणजे जाणारच. स्वामी विवेकानंद, गोळवलकर गुरुजी, वीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मोडक सरांची दैवते!  विषय मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो, आरक्षणाचा असो वा रिडल्स इन रामायणाचा; मोडक सर तर्कसंगतीला सोडचिठ्ठी न देता या प्रत्येक विषयाचे सामाजिक, भावनिक पैलू इतक्या प्रभावीपणे मांडायचे की, समोरची व्यक्ती पूर्वग्रहांपासून दूर न गेली तरच नवल. त्यांच्या प्रभावी शैलीत त्यांच्या नितळ प्रांजळपणाचा, प्रामाणिक विचारनिष्ठेचा मोठा वाटा असतो. दीनदलितांविषयीचा त्यांचा कळवळा सामाजिक समरसतेबद्दलच्या त्यांच्या बौद्धिक बांधिलकीतून येत असे, आजही तो तसाच येतो!

१९९४ नंतर तब्बल बारा वर्षे अशोक मोडक कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले व तिथेही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत मोडक सर जसे आणि जितके रमले तसे ते राजकारणात रुजले नसावेत, नाहीत!  विद्यार्थी परिषद हा त्यांच्या ५०-६० वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा सुवर्णकाळ मानता येईल. चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, विनय नवरे, शशिकांत सावंत, अभय बापट अशी पुढे नावारूपाला आलेली कार्यकर्ते मंडळी मुदलात घडली ती अभाविपमध्ये. त्यांना घडविणाऱ्यांमध्ये इतर अनेकांप्रमाणे अशोक मोडकांचा मोठा वाटा होता!

ऐंशीवा वाढदिवस अलीकडेच साजरा केलेल्या अशोकरावांनी आपल्या आखीवरेखीव आयुष्यात   अनुशासन कायम ठेवले. वयोमानपरत्वे येणारे पथ्यपाणी सांभाळणाऱ्या मोडक सरांनी २५ सूर्यनमस्कार घातले नाहीत असा दिवस आदित्य-नारायणानेही सामान्यत: बघितला नाही.

आयुष्यभर कार्यकर्तेपण जपलेल्या अशोक मोडकांचे वैशिष्टय़ म्हणजे बौद्धिक उपक्रमशीलता, व्यासंग, अभ्यास आणि संघटना बांधणीसाठी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांला सलगी देण्याची, त्याच्यावर निरपेक्ष, निव्र्याज प्रेम करण्याची गरज या दोन्हीचे त्यांनी सतत जिवंत ठेवलेले लख्ख भान!  बौद्धिक उपक्रमशीलतेत रममाण होणारी मंडळी, कार्यकर्त्यांला सलगी देताना कळत नकळत हातचे राखून ठेवतात असे अनेकदा अनुभवाला येते. याउलट, शत प्रतिशत संघटन बांधणीला प्राधान्य देणारे बौद्धिकतेची सरासर उपेक्षा करण्यात धन्यता मानतात. अशोकरावांनी आयुष्यात कधीही हे होऊ दिले नाही! या दोन्हीमधील संतुलन साधणे त्यांना जमले, त्यामुळेच अंतरीच्या ऊर्जेने गतिमान झालेले हे ‘अशोक-चक्र’ ऐंशी पार करून आजही तितक्याच उत्साहात धावते आहे, अखंड!

लेखक राज्यसभा सदस्य व भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. vinaysvx@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 2:53 am

Web Title: bilaspur central university vice chancellor dr ashok modak personality zws 70
Next Stories
1 द्विशताब्दीचा ज्ञानप्रवाह..
2 चाँदनी चौकातून : पुनरागमन..
3 सर्वकार्येषु सर्वदा : समर्पणाला दाद
Just Now!
X