|| रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ

फक्त ए. के. हंगलचा तो प्रश्न नव्हे.. बाबा आमटे आठवतात, विनोबा, गांधीजी किंवा १९८० च्या दशकापासूनचे कार्यकर्तेही आठवतात.. दिल्ली दूर आहे; पण भीती सर्वदूर. अशा भावनांमागील कारणांचा हा आत्मशोध.. 

राजधानी दिल्ली खूप दूर आहे माझ्यापासून, किंवा मी दिल्लीपासून. मी इथे सेवाग्राममध्ये आहे – बापू कुटीमागील माझ्या निवांत घरात. सेवाग्राम एके काळी या देशाची लोकधानी होती; राजधानी दिल्लीहून अधिक महत्त्वाची. देशाचे वर्तमान व भविष्य इथे घडत होते. इथल्या मातीला अजून गांधीजींच्या हाताचा सुगंध येतो – चरखा चालवणारे, कुष्ठरुग्ण परचुरेशास्त्रींच्या वाहत्या ओंगळ जखमा धुणारे, – त्या हातांचा स्पर्श अजून येथील चराचरावर रेंगाळतोय. सकाळी उठल्यावर मला फक्त पक्ष्यांचा कलकलाट ऐकू येतो. घरात टीव्ही नाही. सोशल मीडियावरील पोस्ट्स वाचणे मी टाळतो. पण वेळी-अवेळी दिल्ली माझ्यावर चाल करून सारे काही तहस-नहस करून टाकते. काळ आणि अवकाश, वास्तव व दु:स्वप्न, इतिहास आणि मिथके सर्व परस्परात विरघळून जातात. अपरात्री अचानक आश्रमातूनच फोन येतो, ‘भाऊ, इतका भयानक दरुगध कुठून येतोय?’ मी म्हणतो, ‘गावाबाहेरील स्मशानात जळत असेल एखादे प्रेत. तू झोप, काळजी करू नकोस.’ पण स्मशानात आज एकही प्रेत गेले नव्हते आणि आता वाराही पडला आहे, हे मला माहीत आहे आणि फोन करणाऱ्या व्यक्तीलाही. कुबट वास येत राहतो. प्रत्यक्ष पाहिलेल्या, अंतर्मनात अनुभवलेल्या घटनांची रिळे सरकत राहतात मागेपुढे. नि:शब्द स्फोट होत राहतात. घरे जळतात, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया, तरुण, वृद्ध रक्ताने न्हाऊन निघतात. कोणी कोणाचे तरी मुंडके त्रिशुळावर टोचून नाचतात. मग सगळीकडे शांतता.. त्या जीवघेण्या शांततेत अचानक थिएटरमधली साऊंडसिस्टीम सुरू झाल्यासारखा थकलेल्या हंगलचा प्रश्न येतो – ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’

जानेवारी १९९३ : माझी मुलगी दहा वर्षांची आहे. रात्री लोकलने आम्ही घरी जात आहोत. ट्रेनमध्ये शुकशुकाट. कोणी कोणाशी बोलत नाहीत. निर्वात पोकळीतून चाललाय आमचा प्रवास. ठाणे येते. माणसांत आल्यासारखे वाटते. आम्ही कळव्याला घरी पोहोचतो. नंतर किती तरी दिवस मुंबई धुमसत असते, पण ठाण्यापलीकडे सगळे काही शांत असते. आम्ही असतो सुरक्षित(?). आमच्या घरावर हल्ला होत नाही, कोणी कोणाला जाळत नाही. किंचाळ्या नाहीत. पण किती तरी दिवस लोकलमध्ये सर्व धास्तावलेले असतात. चार महिन्यांनी कॉलेजमध्ये लॅब अटेण्डण्ट फुशारकी मारतात- चाळीच्या समोर दुकान फोडले होते, तेव्हा मी हे उचलून आणले. माझी बोहरा सहकारी विचारते – ‘तो काय म्हणत होता?’ मी काहीच सांगत नाही. आदल्याच महिन्यात तिच्या वृद्ध वडिलांचा तिला पुण्याहून फोन आलेला असतो – ‘इथे सारे शांत आहे, पुण्यात कधीच गडबड होत नाही. आपल्या शेजारच्या बंगलेवाल्याने भिंत तोडून आपल्या प्लॉटचा काही भाग बळकावला आहे. पण जाऊ  दे. आपला प्लॉट मोठा आहे, थोडासा भाग गेला तर गेला. घराला तर काही झाले नाही ना? शिवाय आपल्याला त्यांच्या शेजारीच तर राहायचे आहे..’ ती  काहीच बोलत नाही. डोंगरीतले तिचे घरही सुरक्षित आहे. आसपास सगळी मुस्लीम वस्ती. मात्र तिचे कॉलेज, मुलांचे करिअर यांचा विचार करता आपले वडिलोपार्जित घर सोडून अंधेरीला लोखंडवालात घर घेण्याचा विचार ती सोडून देते. त्याच सुमारास बाबा आमटे मुंबईत आलेले असतात. आम्ही त्यांना भेटायला जातो. एरवी बाबांच्या भोवती पत्रकार आणि चाहत्यांची तोबा गर्दी असते. पण या वेळी सर्व शुकशुकाट. ‘मी दंगलीच्या विरोधात पत्रक काढले ना, त्याचा हा परिणाम.. बरे वाटले की पुन्हा भारत जोडोची मोहीम हाती घ्यावी लागेल,’ बाबा सांगतात. त्यानंतर मराठी मध्यमवर्गाने बाबांना आपले म्हटले, पण ते त्यांच्या मृत्यूनंतरच.

दंगलीनंतर आम्ही मुंबईत आम्हाला जमेल ते केले- म्हणजे शांतियात्रा, पत्रकवाटप, दंगलग्रस्तांना मदत, दंगल का झाली यावरचे अभ्यास, त्यावर चर्चा. आणि कार्यकर्त्यांना हमखास करता येणारी गोष्ट – पोस्टमॉर्टेमवजा चिकित्सा! माझ्या मुलीने मोठे झाल्यावर लिहिले- ‘माझ्या भावविश्वाला तेव्हा पहिला तडा गेला. तोवर मला वाटायचे की माझे आईबाबा, नर्मदा बचाओ आंदोलनाचे आणि कुठल्या कुठल्या संघटनांचे कार्यकर्ते म्हणजे केवढी मोठी फौज आहे! ते असताना मुंबईत कधीच दंगली होणार नाहीत..!’ –  किती भाबडी असतात लहान मुलं आणि त्यांचा आपल्यावरचा, जगाच्या चांगुलपणावरचा विश्वास उडणे किती यातनामय! आम्हाला तर मोठे झाल्यावरही वाटत होते की मुंबईत कधीच दंगल होणार नाही म्हणून!

माहीम स्टेशनवर गेलो की आजही माझ्या काळजाचा ठोका चुकतो. तिथे २००६ च्या बॉम्बस्फोटांत मेलेल्यांच्या स्मृत्यर्थ एक छोटेसे स्मारक उभारले आहे. ‘ती’ माझी नेहमीच गाडी, ‘तो’ डबाही रोजचाच. ‘त्या’ दिवशी मात्र मला सांताक्रूझ स्टेशनला पोहोचताच इतका थकवा आला की मी जिना चढून ती गाडी पकडण्याचा कंटाळा केला होता. तो कंटाळा केला नसता तर, त्या यादीत एक नाव माझेही असते..

१९८४. खलिस्तानची चळवळ ऐन भरात असताना तिला हिमतीने विरोध करणारे एक कार्यकर्ते ऑक्टोबर महिन्यात मुंबईत आले होते. पथनाटय़ाच्या माध्यमातून त्यांनी दहशतवादाविरोधात कशी चळवळ उभारली होती हे ऐकताना आम्ही पार थरारून गेलो होतो. पण इंदिराजींची हत्या झाली आणि ते घाईघाईने परत जायला निघाले. डोक्यावरचे केस कापून व ट्रेनमध्ये बाकाखाली लपून तीन-चार दिवसांनी ते कसेबसे आपल्या घरी पोहोचले. त्यांचा निरोप येईपर्यंत कोणाच्याही जिवात जीव नव्हता. दिल्लीत काय घडले याबद्दल तेव्हाही वृत्तपत्रे गप्पच होती.

सत्तेचाळीसला पाकिस्तानात हिंदू व शीख व दिल्लीत मुसलमान, चौऱ्याऐंशीला दिल्लीत शीख, मग काश्मिरात काश्मिरी पंडित, त्यानंतर काश्मिरात काश्मिरी मुस्लीम व सैन्यदलाचे जवान.. मधल्या काळात मोरादाबाद, मुजफ्फरपूर, २००२ गुजरात, आणि आता २०२०च्या सुरुवातीला दिल्ली? सुडाचे हे चक्र, त्यातून काहीच साध्य होत नाही हे समजल्यावरही थांबत का नाही?

दिल्लीत कोणी अंकित शर्मा आणि कोणी मुबारक हुसेन मेला. हे पूर्वीही घडत होते व आताही घडत आहे. पण ते वाचून शेकडो मैल दूर असूनही जिवाचा असा थरकाप कधी झाला नव्हता. कदाचित पूर्वीचे मुख्यमंत्री किंकाळ्या ऐकू येऊ  नयेत म्हणून कानाभोवती मफलर इतके घट्ट आवळून बांधत नसतील. पोलिसांना तेव्हा समोर दंगल होत असताना हाताची घडी घालून गप्प बसण्याचे किंवा सशस्त्र गुंडांना आपल्या वाहनाने पोहोचविण्याचे मार्ग शिकवले जात नसतील. दंगल आटोक्यात न आणणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्यास त्याचा त्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होईल असे न्यायालयाला सुनाविण्याचे ‘धैर्य’ पूर्वी सॉलिसिटर जनरलला होत नव्हते.

अशा सॉलिसिटर जनरलला ‘१९८४ची पुनरावृत्ती होऊ  देणार नाही’ असे सुनावण्याची वेळ कोणत्या न्यायाधीशांवर आली नव्हती. माध्यमे मिंधी होती; पण आगीत तेल ओतणारी नव्हती. सरकारी अधिकारी व न्यायाधीशांना जिवाची भीती नव्हती. आता सारा देश दारूगोळ्याचे कोठार झाले आहे आणि ‘कोठारात ठिणगी न पडेल, याची हमी देणे कठीण होत आहे.’

भीती याची आहे की सर्वत्र पेरलेले हे भूसुरुंग कुठे कसे फुटतील सांगता येत नाही. सध्या धर्माच्या नावाने हाकारा केला जात आहे. उद्या विशिष्ट जातींच्या, प्रदेशाच्या, स्थानिक/बाहेरच्या नावाने एकटय़ा-दुकटय़ाची किंवा समूहाची शिकार केली जाणार नाही कशावरून? नोकरी- व्यवसाय- शिक्षणासाठी शहरात, परगावी, परप्रांतात, परदेशी गेलेली आपली मुलेबाळे सुखरूप घरी येतील याची हमी कोण देणार?

खरे तर बाहेरच्या कोणाची भीती वाटत नाही; दहशत वाटते ती जवळच्यांची. शेजारी, कार्यालयातील सहकारी, बालमित्र, नातेवाईक, कांदा-लसूण न चालणारे शाकाहारी मित्र, साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळात वावरणारे. ते दरडावून सांगतात -‘आपण आपल्या धर्माचे रक्षण कोणत्याही परिस्थितीत केले पाहिजे.’ सर्व धर्म ‘खतऱ्यात’ असल्याचा इशारा त्या- त्या धर्माचे ठेकेदार देतात. ‘हिंसेने दु:खी होतो तो हिंदू’ व ‘इस्लाम म्हणजे शांती’ या विनोबांनी सांगितलेल्या व्याख्या त्यांना अर्थातच अमान्य असतात.

दिल्लीच्या मातीला गांधीजींच्या रक्ताचा वास आहे; ‘गोली से मारो सालों को’चा नाद आहे. या आठवडय़ात दिल्लीत २५-३० किंवा ५०-६० माणसे मेली असतील. पण आतापर्यंतच्या दंगलींत मेलेल्या लाखो प्रेतांची विल्हेवाट अजून लागलीच नाही. आपल्या देशाच्या तळघरात ती कुजताहेत. त्यांची प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. माझी झोप केव्हाच उडाली आहे. तुमच्यावर अजूनही झोपेच्या गोळीचा परिणाम होतो का?

लेखक कार्यकर्ते असून त्यांचे ‘विज्ञान-भान’ हे पाक्षिक सदर ‘लोकसत्ता’ने २०१८ मध्ये प्रकाशित केले होते.

ईमेल: ravindrarp@gmail.com