मुख्यमंत्री ठाकरे यांचा विश्वास

मुंबई : हेतू प्रामाणिक आणि स्वच्छ असेल तर सारे काही चांगलेच घडते. भाजपबरोबर युती असताना आम्ही प्रामाणिकपणे साथ दिली. वाईट काळात एकत्र आलो आणि युती टिकली. सुवर्ण काळ आल्यावर बिनसले. पण हे असे का झाले याच्या तपशीलात मला जायचे नाही. भाजपबरोबर युती २५ ते ३० वर्षे जशी टिकली तशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबरची शिवसेनेची आघाडीही टिके ल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत शनिवारी व्यक्त केला.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार सत्तेत येऊ शकते हे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. पण परिस्थितीमुळे हे सारे अकल्पीक घडले. निवडणुकीत शिवसेनेची वर्षानुवर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढत होत असे. परिणामी तळागाळात काही प्रमाणात कटुता होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि करोनाचे संकट उभे ठाकले. यातून तिन्ही पक्षांचे नेते तळागाळातील कार्यकत्र्यांपर्यंत पोहोचू शकल नाही. यामुळे तीन पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर काही प्रशद्ब्रा निर्माण झाले. वरिष्ठ पातळीवर मात्र सूर चांगले जुळले. वास्तविक मी कधीही विधिमंडळ वा महापालिके त काम के ले नव्हते. पण सहकारी पक्ष आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच गेले दीड वर्षे चांगले काम करू शकलो. तीन पक्षांमध्ये योग्य आणि चांगला समन्वय असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. स्वार्थासाठी एकत्र आल्यास ते तकलादू ठरते. चांगल्या कामांसाठी किं वा राज्याचा विकास हे ध्येय समोर ठेवून आम्ही तीन पक्ष वाटचाल करीत आहोत. कु रबुरी असत्या तर हे सरकार टिकलेच नसते. हेतू प्रामाणिक आणि स्वच्छ असल्याने तीन पक्षांची आघाडी मजबूत होईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त के ला.

भाजपबरोबरच्या युतीमध्ये २५-३० वर्षे शिवसेना सडली, असे वक्तव्य मी केले होते. कारण शिवसेनेची भूमिका कायम प्रामाणिकपणाची होती. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्याशीही व्यक्तीगत संबंध चांगले होते. कधी वाद झाला, मौन पाळले, तरी महाजन यांच्या खेळकर स्वभावामुळे सर्वकाही सुरळीत होत होते. हिंदुत्वाच्या एका भक्कम विचाराने केलेली ती युती होती. निवडणुकीत जागावाटप करताना खेचाखेची झाली, तरी तेथे भगवा फडकेल, या विचाराने तडजोड होत होती. संबंधांमध्ये मोकळेपणा होता. युतीमध्ये बुद्धीबळाप्रमाणे राजकारण आले होते. त्यामुळे शिवसेना सडली, असे म्हणालो होतो. भाजपचे निर्णय आता दिल्लीत होतात. त्यावेळी ते येथे होत होते. महाविकास आघाडीतही मी मुंबईत, शरद पवार मुंबईत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही दूरध्वनीवरून संपर्क साधतात. त्यामुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते. भाजपबरोबर युती झाली तेव्हा आम्ही विरोधात होतो. हिंदुत्व हा आमच्यातला समान धागा होता. १९८७ मध्ये विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनेने पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढविली व जिंकली. त्याची किंमत शिवसेनाप्रमुखांना मोजावी लागली ते वेगळे. पुढे भाजपनेही आक्र मक हिंदुत्वाचा पुरस्कार के ला. आमच्यात त्यातून घनिष्ट संबंध निर्माण झाले. महाजन- मुंडे यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी अगदी जवळचा मानतो. अर्थात ते मला किती मानतात हे माहित नाही. आता नेत्यांची पिढी बदलली आणि सारेच बदलले, अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त के ली.

… म्हणूनच झोपेत असताना मार्गदर्शक तत्वे…

करोना निर्बंध शिथिलीकरणासंदर्भात प्रशासनाने काही निकष ठरविले होते आणि त्यावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या  बैठकीत आमचे एकमत झाले होते. आणखी एक-दोन दिवस करोना रूग्णसंख्या पाहून निर्बंध शिथिल करण्याची सूचना मी दिली होती. पण खाटा, प्राणवायू उपलब्धता आणि रुग्णसंख्या या निकषांवर निर्बंध शिथिलीकरणाचे पाच स्तर तयार करण्यात आले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात घोषणा करण्यात काहीच गैर नव्हते. फक्त लगेचच निर्बंध शिथिल के लेले नाहीत एवढाच खुलासा सरकारने के ला. वडेट्टीवार म्हणाले तसेच आदेश जारी करण्यात आले आहेत. तसे आदेश आले नसते तर वडेट्टीवारांवर कु रघोडी के ली असे झाले असते.

मध्यरात्री मार्गदर्शक तत्त्वे का लागू के ली अशी विचारणा सुरू झाली. ‘सरकार झोपेत असताना पडेल असे काही जण म्हणतात म्हणूनच सारे झोपेत असताना आम्ही मार्गदर्शक तत्वे लागू के ली’ या शब्दांत ठाकरे यांनी असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

फडणवीस सरकारने दिशाभूल केली असे म्हणणार नाही…

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती अणि केंद्र सरकारला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सांगितले आहे. त्यामुळे आम्ही राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपतींसाठी निवेदन सादर केले. सर्वपक्षीयांनी विधिमंडळात एकमताने कायदा केला आहे. १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर आरक्षण देण्याचा राज्याला अधिकार नसेल, तर कायदा करून दिशाभूल का केली, असे मी विचारणार नाही. आधीच्या सरकारने जे वकील दिले होते, तेच या सरकारने दिले. त्यामुळे त्यांनी भाजप सरकारच्या काळात योग्य बाजू मांडली आणि आता आमच्या सरकारच्या काळात मांडली नाही, असे विरोधी पक्षांना म्हणायचे आहे का? हे ज्येष्ठ वकिलांचा अवमान करणारे ठरेल. राज्य सरकार आरक्षण द्यायला तयार आहे. कुठेही संघर्ष नाही, मग रस्त्यावर कोणाविरोधात उतरणार? सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात रस्त्यावर उतरणार? असा सवाल ठाकरे यांनी केला.

राजकारणाला मानवतेचा आधार हवा

शिवसेनेचे हिंदुत्व हे कधीही शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नव्हते. घंटा बडवणे-स्तोत्र म्हणणे म्हणजे के वळ हिंदुत्व नव्हे. आमच्यासाठी हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जात-धर्म यांच्यापलिकडे देशप्रेम म्हणजे हिंदुत्व. धर्मावरून कोणाला मारणार असाल तर कसला धर्म? उलट धर्माचा आधारच घ्यायचा तर संत गाडगेबाबा व इतर साधुसंतांनी भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी व निराधाराला आधार द्या हा जो मानवतेच्या धर्माचा संदेश दिला त्याप्रमाणे राजकारण हवे. राज्यकर्ता म्हणून तेच माझे काम आहे.

करोना आकडेवारी  लपवली नाही

करोनाच्या उद्रेकानंतर मी वारंवार स्पष्ट के ले होते की सरकार रुग्णसंख्या-मृतांची संख्या अजिबात लपवणार नाही. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर मांडली जाईल. सुरुवातीच्या काळात काही वेळा चाचणीचा अहवाल येण्याआधीच रुग्णांचा मृत्यू झालेला असायचा आणि त्याची नोंद त्यावेळच्या व्याधीशी निगडीत व्हायची. पण मी स्पष्ट आदेश दिला की ज्या मृतांचे अहवाल नंतर करोनाबाधित आले त्या रुग्णांची नोंदही करोना मृत्यू अशीच करावी. कारण करोना हे शंभर वर्षांतून एखादेवेळी येणारे आरोग्यसंकट आहे. यापूर्वी पहिल्या महायुद्धानंतर स्पॅनिश तापाची साथ आली होती. पण त्यावेळची फारशी माहिती उपलब्ध नाही. आम्ही आता पुढील पिढीसाठी सध्याच्या साथीबाबत दस्तऐवज तयार करत आहोत. करोनाचे स्वरूप, रुग्णसंख्या आणि त्यात होणारी वाढ-घट, रुग्णांचा मृत्यू, उपचार पद्धती, नियंत्रणाच्या उपाययोजना अशा सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. त्यातून पुढच्या १०० वर्षांत समजा पुन्हा कु ठला साथीचा रोग आला तर आधीच्या पिढीने नेमके  काय के ले होते याची माहिती त्यांना मिळेल आणि काही उपयोग होईल हा त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे करोनाचे रुग्ण व मृत्यू लपवण्याचा प्रशद्ब्राच नाही.

बीडमध्ये एकाच दिवशी बरेच मृत्यू झाल्याने एका शववाहिनीतून अनेक मृतदेह स्मशानभूमीत न्यावे लागले. पण प्रत्येकावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार झाले. आम्ही उत्तर प्रदेशमधील घटनांप्रमाणे मृतदेहांची विटंबना होऊ दिली नाही. करोनाचे संकट हे खूप मोठे आहे. आपण सर्व त्यासमोर खूप क्षुद्र आहोत हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

माझा पिंड राजकारणाचा नाही

माझा पिंड राजकारणाचा नाही हे जगजाहीर आहे. वडील दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मदत करण्यासाठी मी राजकारणात आलो. राजकीय पिंड नसला तरी जबाबादरी स्वीकारण्याचा आणि ती पार पाडण्याचा स्वभाव असल्याने मिळेल ती जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी झटकायची नाही या भावनेतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले. बाळासाहेबांना वचन दिले होते की शिवसैनिक मुख्यमंत्री होईल. ते वचन पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतली. अजूनही ते वचन अर्धेच पूर्ण झाले आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे. मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा नव्हती. त्यामुळे खुर्ची खेचायची असेल तर खेचा. ही खुर्ची माझे स्वप्न नव्हतेच, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

अर्थचक्राला गती, गुंतवणुकीत वाढ

करोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अजूनही करोनाची भीती गेलेली नाही. तिसरी आणि पुढे किती लाटा येतील हे माहीत नाही. पण कोणत्याही परिस्थितीत अर्थचक्र थांबणार नाही, हे कटाक्षाने पाहिले जाणार आहे. गेल्यावर्षी करोना काळात सव्वा लाख कोटींची गुंतवणूक करण्याबाबत सामंजस्य करार झाले. ही गुंतवणूक लवकरात लवकर कशी प्रत्यक्षात येईल, कोणत्या सवलती देता येतील, याचा आढावा घेणार आहे. उद्योग आणि रोजगारनिर्मिती वाढविण्यावर भर राहणार आहे. करोना काळात शेवटचा पर्याय टाळेबंदीचा आहे. पुढील काळात वेळ आली, तर अर्थचक्र थांबणार नाही, यादृष्टीने काय करायचे, यासंदर्भात ज्येष्ठ उद्योगपतींशी मी दोन-चार दिवसांत चर्चा करणार आहे. ज्या उद्योगांकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी कामगार-कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय कामाच्या ठिकाणीच करण्याचे नियोजन करावे. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी करावी लागली, तरी उद्योग सुरू राहतील. कार्यालयेही २४ तास सुरू ठेवून पाळ्यांमध्ये काम करावे. शक्य होईल, त्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची अनुमती द्यावी, असे पर्याय उद्योगपती आणि व्यावसायिकांपुढे मांडणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

परीक्षा रद्द करणे मलाही आवडत नाही

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करायला मलाही आवडत नाही. पण सध्या नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे असून त्यांचे जीव वाचविले पाहिजेत. करोना संसर्ग कमी करण्यासाठी लोकांचा एकमेकांशी संपर्क टाळणे महत्त्वाचे असते. त्यासाठी टाळेबंदीचा विचार सुरू झाल्यावरही १०-१५ दिवस सर्वांशी चर्चा करण्यात गेले. मला खरेतर आधीच टाळेबंदीसदृश निर्बंध घालायचे होते. म्हणजे करोना रुग्णसंख्येचा कमाल आकडा किंवा शिखर गाठले गेले नसते. आताही डॉक्टरांच्या कृतीदलाच्या सल्ल्यानुसारच निर्बंध शिथिलीकरणाचे निर्णय घेतले जात आहेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रायोजक

प्रस्तुती :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.