राज्यकारण कर्नाटक

देशातील आणखी एका राज्याची विधानसभा निवडणूक एवढाच एरवी कर्नाटक निवडणुकीचा अर्थ. पण या वेळी ते तसे नाही. येत्या एप्रिलमध्ये होणाऱ्या या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेत परतण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भाजपमध्ये तेथे चुरशीची लढत आहे. गुजरातमधील पीछेहाट, राजस्थानमधील पोटनिवडणुकांमधील दारुण पराभव, मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेली बरोबरी या पाश्र्वभूमीवर कर्नाटक निवडणुकीतील भाजपच्या संभाव्य कामगिरीचा लेखाजोखा मांडला जात आहे. कर्नाटक आणि या महिन्यात त्रिपुरामध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यास आगामी लोकसभा निवडणूक मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच डिसेंबरमध्ये घेण्याबाबत भाजपमध्ये विचार होऊ शकतो. कर्नाटकात भाजपला अपयश आल्यास त्याचे राजकीय परिणामही होऊ शकतात. शिवसेना, तेलगू देशम, अकाली दल हे मित्रपक्ष भाजपला घेरण्याची संधी सोडणार नाहीत. भाजपचा दबदबा कमी झाल्याची हवा निर्माण होऊ शकते. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपला हे परवडणारे नाही.

या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे कर्नाटकचे दौरे सुरू झाले आहेत. गेल्याच आठवडय़ात बंगळूरुमध्ये झालेल्या जाहीर सभेतून मोदींनी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला. कर्नाटकातील भ्रष्ट सरकार हटवा, असाच संदेश मोदी यांनी दिला. त्यावर, गैरव्यवहारांच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खाऊन आलेले येडियुरप्पा भाजपला कसे चालतात, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे.

कोण कुठे बाजी मारणार?

कर्नाटकची चार विभागांमध्ये विभागणी होते. मुंबई-कर्नाटक (बेळगाव, धारवाड, विजापूर इ.), आंध्र-कर्नाटक (रायचूर, बल्लेरी, गुलबर्गा), म्हैसूर (बंगळूरु, म्हैसूर, मंडय़ा, हसन) आणि सागरी कर्नाटक (उडपी, कारवार, मंगलुरू). येथे लिंगायत, वोक्कालिग, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या निर्णायक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्व विभागांमध्ये बाजी मारली होती. सागरी कर्नाटकात भाजपने आव्हान उभे केले आहे. म्हैसूर या विभागात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ४०च्या आसपास आमदार निवडून आणण्याची देवेगौडा यांच्या जनता दलाची (धर्मनिरपेक्ष) ताकद आहे. मुंबई-कर्नाटक आणि आंध्र-कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजपने ताकद लावली आहे. देवेगौडा यांची सारी मदार ही वोक्कालिग समाजावर आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी करून एकत्र निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. वोक्कालिग, दलित, मागासवर्गीय अशी मोट बांधण्याची ही योजना काँग्रेससाठी त्रासदायक ठरणार आहे. देवेगौडा यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसची निवडणूकपूर्व किंवा नंतर आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कुमारस्वामी हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कुमारस्वामी हे भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. बदलत्या राजकीय परिस्थितीत कुमारस्वामी भाजपला अप्रत्यक्षपणे मदतच करतील, अशी शक्यता वर्तविली जाते. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कुमारस्वामी आणि भाजप या दोघांचे कट्टर विरोधक आहेत.

भाजपची सारी मदार लिंगायत समाजावर असतानाच काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म किंवा पंथाचे आश्वासन देत चुचकारले आहे. भाजपचा मात्र स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास विरोध आहे. लिंगायत समाजाला पुढे करीत काँग्रेस जातीपातींचे राजकारण करीत असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे असून, पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील, असा भाजपला विश्वास आहे.

भाजप दुभंगलेली

गटबाजी हा काँग्रेसला लागलेला शाप असे नेहमी म्हटले जाते. पण भाजपने उभ्या केलेल्या आव्हानामुळे काँग्रेसमध्ये कधी नव्हे तेवढी एकी आहे. पक्षाने आगामी निवडणूक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येईल, असे जाहीर केले आहे. प्रदेशाध्यक्ष परमेश्वरन, लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मंत्री वीरप्पा मोईली आदी साऱ्याच बडय़ा नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवल्याचे सध्या तरी चित्र आहे. सत्तेचे वेध लागलेल्या भाजपमध्ये मात्र गटबाजी दिसते. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा आणि अन्य नेत्यांचे फारसे जमत नाही.

तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश वा तेलंगणा या दक्षिणेतील प्रांतांमध्ये अद्याप भाजपची डाळ शिजू शकलेली नाही. दक्षिणेत २००८ मध्ये कर्नाटकात भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळाली होती. आगामी निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच, असा निर्धार मोदी आणि शहा यांनी केला आहे. याकरिता भाजपने सारी शक्ती आतापासूनच पणाला लावली आहे. देशात पंजाब आणि कर्नाटक या दोनच मोठय़ा राज्यांमध्ये सत्ता असल्याने काहीही करून कर्नाटकमध्ये सत्ता राखण्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भर आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक जो पक्ष जिंकतो त्या पक्षाचा लोकसभेत पराभव होतो (२००४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.) अशी चर्चा राजधानी दिल्लीत असते. (१९८९, १९९९, २००८ आणि २०१३ मध्ये तसे अनुभवास आले होते.) हा विचित्रच योगायोग म्हणायचा.

संतोष प्रधान santosh.pradhan@expressindia.com