– गिरीश कुबेर

मॉडर्ना नावाच्या आणखी एका कंपनीस करोनाची लस तयार करण्यात यश येत असल्याची बातमी सोमवारी अनेकांना सुखावून गेली. अमेरिकेत भांडवली बाजारावरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. भांडवली बाजारात या कंपनीच्या समभागानेही चांगली उसळी घेतली. बेगान्याच्या शादीत दिवाने होत आपल्याकडेही या बातमीने आनंद व्यक्त झाला. ही लस वर्षभरात तयार होईल म्हणे.

तूर्त तिच्या फक्त आठ आरोग्य कार्यकर्त्यांवर झालेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. आता ६०० जणांवर त्या घेतल्या जातील आणि जुलै महिन्यापासून हजारो जण या लशीची ‘चव’ घेतील, असा तपशील या संदर्भात ‘ब्लूमबर्ग’ची बातमी देते. सध्याच्या आठ जणांवरच्या चाचण्या ज्यांच्यावर घेतल्या गेल्या त्यांच्या शरीरात यामुळे अपेक्षित अ‍ॅण्टिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार झाल्या. त्यामुळे पुढच्या चाचण्यांसाठी संबंधितांना चांगलाच हुरूप आला आहे.

..पण खरी बातमी ही नाही. ती या बातमीच्या पलीकडची आहे.

या संभाव्य लशीच्या निर्मितीचं महत्त्व आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्व आहे ते या बातमीपलीकडच्या बातमीचे. आपल्यासारख्या (अ/)विकसितांनी तर ते अधिकच समजून घ्यायला हवे.

या अध्यायातल्या वृत्तनायकाचे नाव आहे रॉबर्ट (बॉब) लँगर. मॉडर्ना कंपनीला करोना लसनिर्मिती करण्यात यश येत असल्याच्या वृत्ताने रॉबर्ट लँगर एकदम अब्जाधीश झाले. तसेही ते लक्षाधीश होतेच. पण या एका बातमीने त्यांच्याकडच्या लाखाचे अब्ज.. आणि तेही डॉलर्समध्ये.. झाले. खरे तर रॉबर्ट लँगर हे काही उद्योगपती वा वॉरन बफेसारखे भांडवली बाजारातले गुंतवणूकदार वगैरे नाहीत. पण तरीही ते अब्जाधीश आहेत. आणि हीच तर खरी बातमीमागची बातमी आहे.

कारण रॉबर्ट लँगर हे प्राध्यापक आहेत. विज्ञानविषयक वाचनाची ज्यांना सवय आहे, जैवविज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनव्या घटनांवर जे लक्ष ठेवून असतात त्यांना रॉबर्ट लँगर माहीत नाही असे सहसा होत नाही. तर प्राध्यापक लँगर ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’, म्हणजे विख्यात एमआयटी, या जगातील समस्त बुद्धिवंतांचे कायमस्वरूपी आकर्षण केंद्र असलेल्या विद्याकेंद्रात अध्यापनाचे काम करतात. अमेरिकेच्या फेडचे माजी प्रमुख बेन बर्नाके, रघुराम राजन यांच्यापासून ते अमेरिकेचे कडवे टीकाकर (आणि तरीही ज्यांचा त्या देशात आदरच होतो ते) नोम चॉम्स्की अशा शब्दश: हजारो प्रतिभावंतांचे एमआयटी हे घर आहे.

तर या संस्थेत आजमितीस फक्त १२ प्राध्यापक असे आहेत की ज्यांना ‘इन्स्टिटय़ूट प्रोफेसर’.. म्हणजे मराठीत म्हणायचे तर ‘संस्थास्वरूप प्राध्यापक’ असा दर्जा दिला गेला आहे. त्यामागील कारण अर्थातच विद्वत्ता. तर रॉबर्ट लँगर हे संस्थास्वरूप प्राध्यापक आहेत या विद्यापीठात. आणि हा दर्जा त्यांना का मिळाला? कारण रॉबर्ट यांच्या नावावर १४८० इतके विज्ञानविषयक प्रतिष्ठित प्रकाशनांतील लेख प्रकाशित आहेत. जगातल्या महत्त्वाच्या पुरस्कारांतले २००हून अधिक याआधीच त्यांना मिळालेत. संयुक्त राष्ट्र ते सर्व अमेरिकादी प्रगत देशांत त्यांना काही ना काही पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत. आज त्यांच्याइतका वारंवार उद्धृत केला जाणारा रसायनतंत्रज्ञ विरळा. जैवरसायन, सूक्ष्मजीवशास्त्रातील अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणजे हे आपले प्राध्यापक रॉबर्ट लँगर

आणि या सर्वापेक्षा महत्त्वाचे म्हणजे विविध संशोधनांशी संबंधित तब्बल १३६० इतकी पेटंट्स आज त्यांच्या नावावर आहेत. यापैकी काही त्यांना प्रदान करण्यात आली आहेत तर काहींची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना मिळालेल्या पेटंट्सपैकी ४०० पेटंट्सवर आधारित उत्पादने जगभरातल्या अनेक बलाढय़ औषध कंपन्यांनी विकसित केलेली आहेत. म्हणजे त्यावर आधारित औषधे/ द्रव्ये/ रसायने आदी बाजारात आली आहेत. या सर्वाच्या स्वामित्व धनापोटीची किंमत या प्राध्यापकाच्या खात्यात जमा होत असते.

आणि मॉडर्ना कंपनीच्या या करोना लशीपोटी असेच कोटय़वधींचे मानधन प्राध्यापक रॉबर्ट यांना मिळू लागेल. याचे कारण या संभाव्य लशीचे रासायनिक गुपित त्यांनीच तयार केले. त्यानंतर या क्षेत्रात अनेक बडय़ा कंपन्या असतानाही त्यांनी एका अत्यंत अपरिचित, नवख्या अशा मॉडर्ना कंपनीला हे गुपित भाडय़ाने दिले. या भाडय़ापोटी त्यांनी कंपनीच्या समभागांत गुंतवणूक केली. आणि आता हीच कंपनी जगात वृत्तचर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने या समभागांचे मूल्य अब्जावधी डॉलर्सवर गेले. याचा परिणाम असा की या कंपनीच्या प्रवर्तकाइतकी कमाई या प्राध्यापकाने केली. उद्योगपतीने कंपनी काढली. प्राध्यापक रॉबर्ट यांनी आपल्या प्रतिभेतून या कंपनीला उत्पादन दिले.

सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत.. ही धारणा आपण कधी सोडणार या प्रश्नाचा भुंगा काही अजून पाठ सोडत नाही.

@girishkuber