गिरीश कुबेर
विज्ञानाधिष्ठित औषधाचे मोठेपण असे की ते सर्वकालीन लागू पडते. म्हणजे ताप वा डोकेदुखीवर एखादी गोळी पश्चिम आशियाच्या वैराण वाळवंटात जगणाऱ्यास लागू पडत असेल तर ती आल्प्स पर्वतराजीत हिमगुंठित आयुष्य भोगणाऱ्यासही लागू पडते. जी गोष्ट औषधाला लागू तीच विषालाही. पण असे असले तरी विषाणू मात्र या सर्व विज्ञानापासून फटकून वागताना दिसतो. विशेषत: सध्या जगास व्यापून असलेला हा करोना..
जगातील विज्ञान जगतासमोर सध्या दोन आव्हाने आहेत. एक म्हणजे या करोनास रोखणारी लस तयार करणे आणि दुसरे म्हणजे या विषाणूचे वेगळेपण समजून घेणे. पहिली तातडीची गरज आणि दुसरी भविष्याची बेगमी. या दुसऱ्या मुद्दय़ास समजून घेण्यात काही मुद्दे वैज्ञानिकांना फार चक्रावून टाकणारे आहेत.
उदाहरणार्थ चीनमधल्या वुहान शहरात या विषाणूचा उगम मानला जातो. त्यानंतर त्या परिसरात पाच हजारांच्या आसपास बळी गेले. हे प्रमाण दर दशलक्ष नागरिकांत तीन असे होते. चीन आकाराने अस्ताव्यस्त असला तरी मूलत: त्याचे अस्तित्व हे आशिया खंडातच अधिक. त्याच आशिया खंडातल्या जपानसारख्या देशात करोना बळींचे प्रमाण आहे दर दशलक्ष नागरिकांमधे सात असे. पाकिस्तानात ते आहे सहा. दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया या देशात ते आहे पाच. भारतात (तूर्त तरी) हे प्रमाण आहे अवघे तीन. आणि कहर म्हणजे थायलंडमध्ये तर ते एकदेखील नाही. भयानक धक्कादायक बाब म्हणजे कम्बोडिया, मंगोलिया आणि व्हिएतनाम या देशांत तर करोना बळीची एकदेखील नोंद नाही.
त्या तुलनेत अत्यंत पुढारलेल्या अशा जर्मनीत प्रत्येक दशलक्षातील १०० जणांचा घास या करोनाने घेतला. त्याहून श्रीमंत अशा कॅनडात तर बळी गेले १८०. अमेरिकेत ३०० आणि ब्रिटन, इटली आणि स्पेनसारख्या देशांमध्ये प्रति दशलक्ष ५०० इतके बळी या करोनाने घेतले. असे विविध दाखले देता येतील. ते देता येतील याचे कारण जपानसारख्या देशात या करोनावैविध्याचा सर्वागाने अभ्यास केला जात आहे म्हणून. याचे श्रेय या अशा विज्ञानी महानुभावांना. ‘बोस्टन ग्लोब’सारख्या अमेरिकी दैनिकाने या जपानी विज्ञानविश्वात काय सुरू आहे याचा साद्यंत आढावा नुकताच घेतला. ‘‘जे काही घडते आहे ते नीटपणे पाहिल्यास करोनाच्या हाताळणीत प्रथम आपल्याला या प्रादेशिक आणि त्यातून दिसणाऱ्या जैविक विविधता लक्षात घ्यायला हव्यात. कारण उपाययोजना त्यावर आधारित असणे महत्त्वाचे आहे,’’ असे मत टोकियोतल्या औषधविज्ञानशास्त्र महाविद्यालयाचे प्रमुख अकिहिरो हिसाका यांनी व्यक्त केले.
या संदर्भात अभ्यास करणाऱ्यांनी दोन मुद्दे लक्षात घेतल्याचे दिसते. म्हणजे वेगवेगळ्या देशांतील नागरिकांची जनुकीय रचना हा तर एक मुद्दा आहेच. पण त्याच्या जोडीला ‘बीसीजी’ (बॅसिलस-कार्मेट-गुएरिन) या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लशीच्या मात्रा, तापमान आदी घटकांमुळे या विषाणूच्या प्रसारास अटकाव होत असणार, असा या संस्थेच्या वैज्ञानिकांचा कयास आहे. त्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने संशोधनही सुरू आहे. यातली एक दिशा अशी की ज्या देशात या विषाणूने हाहाकार उडवला त्या इटली वा स्पेन या देशांत जन्मणाऱ्यांच्या दंडावर ते बीसीजीचे ठसठशीत धब्बे नसतात. म्हणजे या देशात क्षयासारख्या तिसऱ्या जगातल्या आजारांचे उच्चाटन झालेले असल्याने या लशी दिल्या जात नाहीत. त्याचाही परिणाम करोना प्रसारात झाला असावा, असे मानले जाते.
हे सर्व समजून घ्यायचे कारण करोनास प्रतिबंध (आता त्याला हरवणे नाही) करण्यासाठी आपल्या धोरणांत या घटकांचा विचार असायला हवा, म्हणून. तो करायचा कारण हा विषाणू स्पेन वा इटली वा अमेरिका वा ब्रिटन या देशांत जसा वागला तसाच आपल्या देशातही वागेल असे नाही. भिन्न खंडानुसार या विषाणूचा उत्पात किती असेल, यात फरक आहे.
याचाच दुसरा अर्थ असा की स्पेन वा इटली वा अमेरिका वा ब्रिटन या देशाने या करोनास जसा प्रतिसाद दिला तसाच तो आपणही द्यायला हवा असे नाही. या मुद्दय़ावर एकता अनावश्यक. आता तरी ‘विभिन्नतेतील एकता’ आपण समजून घ्यायला हवी आणि तिचा आदर करायला हवा.
@girishkuber