दिल्लीवाला

आई आणि भाऊ  लोकसभेत गेले. बहीण राज्यसभेत येणार की नाही, यावर सध्या खल सुरू आहे. बहिणीला राज्यसभेवर यावं लागेल असं मानलं जातंय. मोदींनी राज्यसभेचा मार्ग दाखवून दिला आहे. त्यात थोडं तथ्य आहे. मोदींनी गांधी कुटुंबाचं एसपीजी सुरक्षा कवच काढून घेतलेलं आहे. हे कवच होतं म्हणून गांधी कुटुंबातील सदस्याला नवी दिल्लीतील बंगल्यामध्ये राहण्याची मुभा होती. सोनिया, राहुल हे खासदार असल्यानं त्यांना त्यांचे सरकारी बंगले सोडावे लागणार नाहीत. प्रियंका गांधी-वढेरा सध्या लोधी इस्टेटमध्ये राहतात. त्यांना या बंगल्यात राहायचं असेल तर त्यांना राज्यसभेचं सदस्य व्हावं लागेल. त्यांना खासदार व्हायचं आहे का, हे माहिती नाही; पण पक्षातील मंडळी त्यांना राज्यसभेवर पाठवायला तयार आहेत. प्रियंका खासदार होणारच असतील तर झारखंड, मध्य प्रदेशमधून त्यांना संधी दिली जाऊ  शकते. महाराष्ट्रातून काँग्रेसला एकच खासदार पाठवता येईल. त्या जागेसाठी अनेक इच्छुक आहेत. मल्लिकार्जुन खरगेंना महाराष्ट्रातून पाठवलं जाईल अशी चर्चा होती. ती आता संपली. त्यांना कर्नाटकच्याच कोटय़ातून निवडलं जाईल असं दिसतंय. परवा एकनाथ खडसे दिल्लीला येऊन गेले. त्यांनी भाजपचे समन्वयक बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा केली. राज्यसभेसाठी भाजपच्या तिसऱ्या उमेदवारात संभाव्य नाव एकनाथ खडसे यांचं असल्याचंही बोललं जातंय. खडसेंना विधान परिषदेवर जायचं आहे. अजय संचेती यांच्या नावाची चर्चा होतीच. शेवटच्या क्षणी फडणवीसांची वर्णी लागेल असंही म्हणतात. शिवसेना कोणाला उमेदवारी देणार, हा आणखी एक प्रश्न. राजकुमार धूत यांना पुन्हा संधी की नवा कोणी? प्रियंका चतुर्वेदी यांचं नाव घेतलं जात होतं. पण कोणी म्हणतं, शिवसेना नवा चेहरा आणेल. नाही तर जुने नेते रांगेत आहेतच. धुळवडीला नावांची उधळण मात्र जोरात आहे.

अंधश्रद्धा बिनकामाची..

भाजपमधील मंत्री-नेते यांची विधानं ऐकली की आपण अचंबित होतो. ‘आइनस्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.. डार्विनचा सिद्धांत बोगस होता.. न्यूटनला काही कळत नव्हतं.. प्रत्येक रोगावर गोमूत्र हाच उपाय असतो.. अणू आणि अणुबॉम्बचा शोध कुठल्याशा ऋषीने लावला..’ या नेत्यांचे विचार भन्नाट आहेत. त्याला आव्हान देण्याच्याही भानगडीत कोणी पडू नये. चिखलात दगड मारला तर राळ आपल्याच तोंडावर येऊन पडेल. या महान वक्त्यांच्या विधानाला कोणता आधार वा तथ्य नसते. किंबहुना बहुतांश विधाने अंधश्रद्धा या वर्गातच मोडतात. त्यामुळं भाजपमध्ये अंधश्रद्धेला महत्त्व न देणारा नेता पाहिल्यावर आपोआपच तोंडात बोट गेलं. नेता मराठी, बोलण्यात मराठवाडय़ातलं रांगडेपण. ऐसपैस बसून गप्पा मारण्याची या नेत्याला सवय. अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आणि प्रेम. त्यामुळं अर्थातच मोदीविरोधकांवर राग. या विरोधकांमध्ये नेतृत्वक्षमतेचा कसा अभाव आहे, हे त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगून टाकलं. त्यांच्या संगतीला पश्चिम महाराष्ट्रातले दोन खासदार. त्यातल्या एकाला मंत्री व्हायचं आहे. शरद पवारांशी न पटल्यानं ते भाजपमध्ये गेले. खासदार बनले. दिल्लीत खासदारांना नवी घरं मिळाली आहेत. या खासदारांनीही गृहप्रवेश केलाय. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘घर दक्षिणमुखी आहे. मंत्री व्हायचं असेल तर ते उत्तरमुखी हवं.’’ मराठवाडय़ातील नेते म्हणाले, ‘‘दक्षिण-उत्तर काही नसतं. मी मंत्री होण्याआधी तीन दशकं खासदार राहिलो. दक्षिणमुखी घरातच राहिलो. झालो ना मंत्री.. मी खासदार व्हायला तयार नव्हतो. आमदारकीच बरी असते. आमदार राज्य करतो. खासदाराला कोण विचारतंय, असं मला वाटायचं. पण प्रमोद महाजन म्हणाले की, वाजपेयींना पंतप्रधान करायचंय. तुझी पसंती-नापसंती महत्त्वाची नाही.. महाजनांनी सांगितल्यावर अमावास्येला मी उमेदवारी अर्ज भरला आणि पहिल्यांदा निवडून आलो.. अंधश्रद्धेला महत्त्व द्यायचं नसतं. लोकांशी तुम्ही कसं वागता, यावर लोक ठरवतात तुम्हाला निवडून आणायचं की नाही. निवडून आल्यावर दोन महिन्यांत तुमच्या बोटांवर सोन्याच्या अंगठय़ा दिसल्या की लोक समजतात तुम्ही काय केलंत.. लोकांच्या समोर निवडणुकीच्या आधी जसे वागत होतात तसंच वागा. नम्र व्हा..’’ पस्तीस-चाळीस वर्ष राजकारण केल्यावर आलेलं हे शहाणपण!

चर्चेकडं लक्ष

राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा युक्तिवाद मुद्देसूद होता. ते म्हणाले, ‘‘जगभर दिल्ली दंगलीवर चर्चा केली जात आहे. आपण स्वत:ला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानतो. लोकशाहीचं सर्वोच्च स्थान असलेल्या संसदेत या विषयावर चर्चा होणार नसेल तर त्यापेक्षा लाजिरवाणी बाब दुसरी कुठली नसेल..’’ ही चर्चा आता ११ मार्चला होणार आहे. लोकसभेच्या बुधवारच्या कार्यक्रमपत्रिकेत दिल्ली दंगलीच्या चर्चेचा विषय समाविष्ट केलेला आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर देणार आहेत. देर आए दुरुस्त आए.. एवढंच विरोधक म्हणू शकतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात केंद्र सरकार चर्चेला तयार का झालं नाही, हे मोदी-शहांनाच माहीत. त्यांना वाटत असावं की, चर्चा केली तर सभागृहांमध्ये दोन्ही बाजूंचे सदस्य प्रक्षोभक भाषणं करतील. त्यातून दंगा पुन्हा भडकण्याची भीती असेल. मोदी-शहांना कदाचित स्वपक्षाच्या सदस्यांची धास्ती अधिक असावी. विरोधकांकडं बोलणारं आहेच कोण? लोकसभेत तर निम्मे दक्षिण भारतातील. ते बोलणार इंग्रजीत. त्यांचं इंग्रजी ऐकून ईशान्य दिल्लीतील लोकांच्या भावना भडकण्याची शक्यता कमीच. त्यामुळं चर्चा करायला काहीच हरकत नव्हती. उलट, हिंदीत बोलणारे आणि आक्रमक पवित्रा घेणारे बहुतांश सदस्य सत्ताधारी बाकांवर बसलेले होते. त्यांनी पुन्हा प्रक्षोभक भाषणं केली तर, असा प्रश्न मोदी-शहांना पडला असावा. बहुधा त्यांना घाबरून मोदी-शहांनी चर्चा पुढच्या आठवडय़ात ढकलली असावी! लोकसभेत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य भडकले, त्यामागे दिल्ली दंगलीवर चर्चा करू दिली नाही हे कारण असलं तरी; सभागृहात गोंधळ सुरू असताना विधेयक मंजुरीची प्रक्रिया सुरू होती हेही कारण होतं.

इराणींची मध्यस्थी

स्मृती इराणी यांना आक्रमक पवित्र्यात बघायची पत्रकारांना सवय झालेली आहे. पण अनुभवानं माणूस शांत होतो. बहुधा इराणींनाही अनुभवाने शिकवलं असावं. गेल्या आठवडय़ात लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांध्ये दोन वेळा धक्काबुक्की झाली. एकमेकांना मारायचं तेवढं शिल्लक होतं. अनेकदा इराणी विरोधकांशी संघर्षांच्या पवित्र्यात असतात. पण या वेळी त्यांनी परिस्थिती इतकी नीट हाताळली की, कोणालाही वाटेल हे काम लोकसभाध्यक्षांना का करता आलं नाही? सभागृह तहकूब न करता लोकसभाध्यक्ष निघून गेले. सदस्य भांडत राहिले. इराणी भांडण सोडवत होत्या. त्यांनी भाजपच्या सदस्यांना बाजूला केलं. काँग्रेसच्या सदस्यांना समजावलं. महिला सदस्यांना पुरुष सदस्यांच्या घोळक्यातून बाहेर काढलं. हे सगळं वाचायला अजब वाटू शकतं; पण ही वस्तुस्थिती!

तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यादेखील आक्रमक आहेत. या वेळी सभागृहात त्याही कागद फाडून भिरकावत होत्या. कितीही ताकदीने फेकण्याचा प्रयत्न केला तरी ते कागद त्यांच्या पायात पडत होते. हा सगळा प्रकार इराणी शांतपणे पाहात होत्या. त्यांना राहवलं नाही. त्यांनी महुआ यांना हातवारे करून जे सांगितलं त्याचा अर्थ असा होता.. काय चाललंय तुझं हे, कशाला ताकद वाया घालवतेस. कागदाचे कपटे जाणार आहेत का दूरवर, बघ ते पायातच पडलेत..! वरच्या कक्षातून पत्रकार हा प्रकार पाहात होते. तेवढय़ात इराणींचं लक्ष पत्रकारांकडं गेलं. पण तोपर्यंत सभागृहात धक्काबुक्की सुरू झाली आणि इराणी मध्यस्थी करायला गेल्या.

रेणूंची जन्मशताब्दी

दिल्लीत दोन-तीन दशकं काम केलेले हिंदी पत्रकार त्यांच्या तरुणपणातील बिहार-उत्तर प्रदेशच्या कथा सांगतात. हिंदीतील हे पत्रकार बहुतांश याच दोन राज्यांमधून आलेले आहेत. त्यांना उत्तर भारतातील ग्रामीण समाजाची नस पक्की माहिती आहे. कुठला समाज कधी आणि केव्हा प्रतिक्रियावादी होतो हे त्यांना बरोबर कळतं. त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की, फणीश्वरनाथ रेणूंची जन्मशताब्दी सुरू झाली. त्यानिमित्त कार्यक्रमही आयोजित केला होता. बिहार खऱ्या अर्थाने डोक्यात भिनवून घ्यायचा असेल तर फणीश्वरनाथ रेणूंची ‘मैला आंचल’ ही कादंबरी वाचण्याशिवाय पर्याय नाही. रेणू बिहारचे. १९४२ चे भारत छोडो आंदोलन, नेपाळमधलं आंदोलन, नंतर जयप्रकाश नारायण यांचं नवनिर्माण आंदोलन- सगळ्यात रेणू होते. अस्सल राजकीय, सामाजिक जीवन जगलेल्या रेणूंच्या ‘मैला आंचल’मधील डॉक्टरची व्यक्तिरेखा ‘भारता’चे उभे-आडवे धागे उलगडून देते.. रेणूंचा जन्म ४ मार्च १९२१ सालचा. हे वर्ष रेणूंचं!