‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा २०२० सालचा ‘दिलीप वि. चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांना अलीकडेच जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांनी दूरदृकसंवादाद्वारे व्यक्त केलेल्या चिंतनशील मनोगतातील हा संपादित अंश…

मी लेखक होणार हे मला माहिती नव्हतं. माझ्या आईवडिलांनाही माहिती नव्हतं. परंतु हे मला त्यांनी शिकवलं आणि तेव्हापासून शब्दांचं जे महत्त्व आहे, शब्दांचं जे आपलं नातं आहे, त्याचा संस्कार कुठे तरी माझ्यावर झालेला होता आणि त्याच्यामुळे मी लिहितो. लिहावंसं वाटतं म्हणून मी लिहितो आहे. पण ही जी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा म्हणण्यापेक्षा मी हे जे वचन दिलेलं आहे शब्दांना, ते पार पाडण्यामध्ये मी कितपत यशस्वी झालो आहे, याबद्दल मला नेहमी शंका येतात. आपण लोकानुरंजनाकरिता शब्द उधळले का? आपण स्वत:ला काही मिळावं म्हणून शब्द उधळले का? आपल्याला आपल्याबद्दलचं काही गाºहाणं सांगायचं आहे, आत्मकरुणा व्यक्त करायची आहे म्हणून शब्द उधळले का? आपल्यालाच सत्य सापडलंय, आपलंच बरोबर आहे असा हट्टी आव आणतोय का मी? इतरांचं हनन करण्यासाठी ते शब्द मी वापरतोय का? मुळात माझे हेतू शुद्ध आहेत का? अशा विविध टप्प्यांवर, विविध पातळ्यांवर जेव्हा आपण स्वत:ची तपासणी करू लागतो तेव्हा लक्षात येतं की, आपण आपलाच पराभव खूप वेळा केलेला आहे. तेव्हा स्वत:ला लेखक म्हणवून घेण्याची माझी हिंमत नाही. माझा लेखक होण्याचा प्रयत्न चालला असेल कदाचित. मी लिहितो… सातत्याने लिहितो आहे मी; परंतु लेखकपणाचं जे एक अत्यंत व्रतस्थ असं जीवन जगावं लागतं आणि त्यासाठी ज्या गोष्टींशी आपल्याला कायम बांधिलकी ठेवावी लागते, त्या माझ्या आयुष्यात मी किती पाळू लागलो आहे, याचा अंदाज मी कायम घेत असतो. त्यामुळे मला जेव्हा असे मोठाले सत्कार मिळतात तेव्हा मला खरोखरच संकोचल्यासारखं होतं. उलट कधी कधी असं वाटतं की, इतकं छोटं काम केल्यानंतर आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचं समाधान होऊन ते आपला जीवनगौरव करतात किंवा इतरांचेही करतात. तर… जरा थांबून लेखकांकडून आपल्यासुद्धा काय मागण्या आहेत, हे सामान्य वाचकानं ठरवायला पाहिजे…

लेखकाचं आणि शब्दाचं नातं आधी लेखकाला जर कळलं तर मग पुढच्या गोष्टी सुरू होतात. पुढे त्याचा लेखनक्रम, जीवनक्रम- जे काही असेल, ते सुरू होतं. एक तर मला आयुष्यात लेखन हे ‘करिअर’ आहे किंवा लेखन ही ‘कारकीर्द’ आहे असं कधी वाटलंच नाही. अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टीची ‘कारकीर्द’ होऊ शकत नाही. कारण तुम्हाला तिथून आनंदापलीकडे काहीच मिळवायचं नसतं. त्यामुळे लेखन ही माझ्यासाठी ‘कारकीर्द’ नव्हती. मात्र, लेखन करताना आपण लेखक आहोत की नाही अशी शंका मला यावी, याचं कारण ‘शब्द म्हणजे काय’ हे माझ्या वडिलांनी मला एकदा काही सूक्तं म्हणून दाखवली त्यातून कळलं. आजकाल झालं आहे काय, की तुम्ही संस्कृतमध्ये बोललात किंवा तुम्हाला संस्कृत येतं असं कळलं, की ताबडतोब तुम्ही एका विशिष्ट गटामध्ये ढकलले जाता. तुम्ही ‘उजवे’ आहात असं सांगितलं जातं. अगदी माझं गंगेवर प्रेम आहे, यमुना नदीची मिथकं मला आवडतात, मला थोडंफार संस्कृत येतं, एवढ्या एका कारणानं मी ‘उजवा’ ठरू शकतो. आणि हे या प्रकारचं ध्रुवीकरण महाराष्ट्रातच काय, पण भारतातच इतकं टोकाचं झालेलं आहे, की कुठलीच बाजू न घेता सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण आदर ठेवणं आता दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलेलं आहे. तुम्हाला इथे बसावं लागतं, नाही तर तिथे बसावं लागतं. अदरवाइज यू डोन्ट बिलाँग. तुम्हाला जागा नाही.

मी जरा संस्कृत बोललो, की अतिशय कडव्या ध्रुवीकरणामुळे मी एकदम ‘उजवा’ ठरतो किंवा दुसऱ्या कुठल्या कारणानं एकदम ‘डावा’ ठरतो. मला हे कधी कळत नाही. याचं कारण असं की, मी कुठलाही आदर्शवाद कधी स्वीकारलेला नाही. या माझ्या विधानात अजिबात तुच्छता नाही. निरनिराळ्या आयडिऑलॉजीज् असतात. आदर्शवाद असतात. त्या अत्यंत सद्हेतूने, विचारपूर्वक जन्मलेल्या असतात. त्यांनी जगाचं भलं व्हावं असंही लोकांना वाटत असतं. परंतु हळूहळू आपल्या असं लक्षात यायला लागतं की, त्या अपुऱ्या पडत आहेत. या विचारसरणींमुळे काही तात्कालिक प्रश्न सुटतात. काही काळापुरते सुटतात. ते जातात. नवीन प्रश्न येतात. आणि तोपर्यंत त्या विचारसरणीला हळूहळू एक बंदिस्तपणा येऊ शकतो. जे धर्मांचं झालेलं आहे, तेच आपल्याकडे विचारसरणींचं झालेलं आहे. दरवेळेला एखादा नवीन विचार आला की असं वाटतं, हा, आता मानवजातीच्या कल्याणाची गोष्ट आपल्याला सापडली! पण तसं होत नाही. याचं कारण असं की, या विचारसरणीसुद्धा इन्स्टिट्यूशनलाइझ् होतात. त्यांची पीठं बनतात. त्या पीठांचे जे कुणी अधिकारी असतात आणि त्यांचे जे कुणी अनुयायी असतात, ते तितकेच कडवे होतात, जितके कुठल्या धर्माचे होतात. ते आणि आपण असा विचार होऊ लागतो. एकात्मतेसाठी प्रयत्न करणारेच हळूहळू नकळत विभाजन करतात. मग तुम्हाला त्या अनुयायांमध्ये बसावं लागतं किंवा मग तुम्हाला दुसरी कुठली विचारसरणी बरी वाटत असेल तिथे बसावं लागतं. खरं तर हल्ली सोयीची विचारसरणी कुठली आहे ते पाहूनच लोक तिथे जातात. लेखकसुद्धा. मला स्वत:ला कुठलीही विचारसरणी जवळ करावीशी वाटली नाही. याचं कारण त्या मला अत्यंत आदरणीय वाटल्या, त्यांची जगाचं कल्याण करण्याची प्रतिज्ञा मला माहिती असली तरीसुद्धा मला त्या कायम अपुऱ्या वाटलेल्या आहेत. काही काळ त्या सुखाचा आभास निर्माण करतात. काही काळ काही सुखं दाखवतात. सुधारणाही होतात. महाराष्ट्रातली आपल्याकडची जी रिफॉर्मेशनची चळवळ आहे, त्याचे परिणाम दिसतातच आपल्याला. त्यामुळे मला तिच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु म्हणून मी एखाद्या विचारसरणीशी स्वत:ला घट्ट बांधून घेईन ही शक्यताच मला दिसत नाही. त्याबाबतीत मी एकांडा आहे. कारण मला कळपात राहणं शक्य नाही. कारण त्याच्यात राहिलं तर त्याचे सर्व नियम पाळावे लागतात. आणि ते दरवेळेला बरोबरच असतात असं नाही. पुष्कळदा असं होतं की, या विचारसरणींमध्ये साचलेपण येतं. त्या पुढे सरकत नाहीत, त्यांच्यात काळानुरूप बदल होत नाहीत. पण हट्टाग्रह कायम राहतात. ते इतके टोकाचे असतात की, कधी कधी दोन मित्र एकमेकांना समजून घेऊ शकत नाहीत. अंतरं कमी होण्याऐवजी वाढू लागतात. तेव्हा माझ्यासारख्या माणसाची फार पंचाईत होते. माझी एक अतिशय जवळची समाजवादी मैत्रीण आहे. व्यक्ती म्हणून आमच्यामधला स्नेह खूप खोल आणि अगदी चांगला आहे. परंतु काही मुद्द्यांच्या वेळेला तिची पहिली प्रतिक्रिया असते की, ‘‘तो ‘हिंदू’ आहे फार.’’ हे मी दोन-तीन वेळा ऐकून घेतल्यानंतर ‘मी हिंदू आहे फार’ म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडला; म्हणजे मी जन्मलेला हिंदूच आहे, पण तसा आहे म्हणून त्याचा मी कधी बडिवार केला नाही, आणि नाही म्हणून ते नाकारण्याची गरज नाही.

पण हिंदूंचीसुद्धा एक ज्ञानपरंपरा होती. ज्ञानपरंपरेला धर्म नसतो. ज्ञानपरंपरेला देव नसतो. तिला काहीच चिकटत नाही. ज्ञानपरंपरा हे निखळ सुंदर, तेवतं काम असतं मानवसमूहाचं. ती जेवढी मला प्रिय आहे, तेवढीच मला पाश्चात्त्य ज्ञानपरंपराही प्रिय आहे. तेव्हा निव्वळ मला हीसुद्धा ज्ञानपरंपरा प्रिय आहे, एवढ्याने जर मी ‘हिंदू’, ‘उजवा’ होत असेन, तर मला असं वाटतं की, आपल्या स्वत:च्या विचार करण्यावर आपण फार मोठ्या मर्यादा आणून टाकतो. अशी मर्यादा मला स्वत:वर घालून घ्यायची नाहीए.

एक लक्षात घ्या, शतकानुशतकं निरनिराळ्या विचारसरणी निर्माण झाल्या. सगळ्यांचे हेतू अत्यंत उदात्त आणि चांगले होते. परंतु तरीही मानवजातीचं कुठलंही दु:ख दूर झालेलं नाही. याचं कारण असं की, या सगळ्यांच्या मर्यादा आहेत. अत्यंत कृतज्ञ भाव ठेवूनसुद्धा हे कबूल करावं लागेल की, या सगळ्यांच्या मर्यादा असतात. आणि त्या मर्यादाच जेव्हा शृंखला बनतात तेव्हा आपली मनं कोती, अनुदार होतात. आपली मनं शुद्ध असली तर कुठल्याही आदर्शवादाची गरजच काय? तेव्हा लेखकानं आपलं मन जास्तीत जास्त शुद्ध ठेवावं. सगळ्यांनीच आपलं मन आधी शुद्ध करावं. समाज मग आपोआपच आदर्श होईल.

तेव्हा या सर्वच विचारसरणी ज्या एका अनादि अनंत छत्राखाली येतात, त्या छत्राशी मी माझं नातं जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि ते छत्र म्हणजे जीवन. सार्वभौम जीवन. आता झालं आहे काय, की तुम्हाला अवतीभोवतीचे प्रश्न दिसत नाहीत का, ज्वलंत प्रश्न दिसत नाहीत का, त्याच्याबद्दल तुम्ही लिहिलं पाहिजे असा हट्टच धरलेला असतो लोकांनी. ते जर तुम्ही केलं नाही, तर तुम्ही लेखक नाही. अमुक केलं नाही तर तुम्ही लेखक नाही. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, हे लोकांनी ठरवूनच टाकलेलं आहे. तर ज्वलंत प्रश्नांना लेखकांनी भिडलं पाहिजे, अवतीभोवतीचं वास्तव दाखवलं पाहिजे ही गोष्ट खरीच आहे, पण त्याच वेळी लेखकावर एक बंधन आपण घालतो आहे याचं भान असावं. एरवी लेखक एक व्यक्ती म्हणून त्यांना भिडत असतोच. आपल्यामध्ये किती सच्चेपणा आहे, किती इंटेग्रिटी आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्याशी मुकाबलाही करत असतो. परंतु माझं लेखनाचं एक सत्य, लेखनाचं एक जग आहे. ते स्वायत्त आहे. ते त्या सार्वभौम जीवनाशी बांधील आहे. ते थोडंसं वेगळं असू शकतं. तुम्हाला ऐकू येतात तेच ड्रम्स मला ऐकू येतील असं म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण इथं असहिष्णुतेचा अगदी कडेलोट होतो. म्हणून मला फार दु:ख होतं.

याच्यावर एक आक्षेप होऊ शकतो की, तुम्हाला सगळ्या गोष्टींपासून पळ काढायचा असतो, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा सामना करायचा नसतो. हा आरोप फारसा खोटा आहे असंही नाही. हे कवच अंगावर घेऊन माणसं पुष्कळदा स्वत:चा बचाव करतात, हे बघतो मी. परंतु मग त्याची परीक्षा अशी आहे की, व्यक्ती म्हणून तुमच्या व्यक्तिजीवनामध्ये तुम्ही जेव्हा निरनिराळ्या प्रश्नांना भिडता, त्या वेळेला तुम्ही काय भूमिका घेता, यावरून तुमचं जगणं खरंखोटं हे आपल्याला कळू शकतं. पण जेव्हा लिखाणाशी आपला संबंध येतो किंवा एखाद्या लेखकाच्या लेखनाबद्दल आपण विचार करू शकतो, तेव्हा त्याची भूमिका काय हेसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. मी आता कठोरपणे बोलायचं तर असं म्हणेन की, आपण अशा भूमिका समजून घ्यायला लागलो, तपासू लागलो की लक्षात येतं- अनेकांच्या भूमिका स्वच्छच नसतात त्यांच्याशी, किंवा असतात त्या तकलादू असतात.

(महेश एलकुंचवार यांच्या भाषणाचे शुभदा चंद्रचूड यांनी केलेले हे शब्दांकन ‘महाराष्ट्र फाऊंडेशन स्मरणिका-२०२१’च्या सौजन्याने. लेखातील छायाचित्र : विवेक रानडे)