दिगंबर शिंदे digambar.shinde@expressindia.com

माणदेशातील आटपाडीसारख्या कायम दुष्काळी भागात पाण्याची शाश्वत व्यवस्था झाली तर नवनवे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. संकेत मोरे या तरुण अभियंत्याने हे दाखवून दिले आहे. हमखास उत्पन्नाची खात्री देणारा तरंगत्या पाण्यावरील मत्स्य उत्पादन शेतीच्या त्यांच्या या प्रयोगाविषयी..

माणदेशातील आटपाडीसारख्या कायम दुष्काळी भागात पाण्याची शाश्वत व्यवस्था झाली तर नवनवे प्रयोग यशस्वी होऊ शकतात. हे येथील एका तरुण अभियंत्याने दाखवून दिले आहे. बाजाराशी निगडित असला तरी आपणाला हवे तेव्हा उत्पादन घेऊन हमखास उत्पन्नाची खात्री देणारा तरंगत्या पाण्यावरील मत्स्य उत्पादन करण्याचा अनोखा प्रयत्न आटपाडीतील संकेत मोरे या तरुण अभियंत्याने यशस्वी केला आहे. त्यांच्या या तलावातून वर्षांला शंभर टन माशांचे उत्पादन घेतले जात आहे.

बंदिस्त शेळीपालन म्हटले की, आटपाडीच्या नारायण देशपांडे यांचे नाव समोर येते. कायम दुष्काळीचा शिक्का कपाळी असलेल्या माणदेशातील आटपाडी तालुकाही आता टेंभू सिंचन प्रकल्पाच्या पाण्यामुळे नव-नवीन कल्पना पुढे आणत असून बंदिस्त शेळी पालनाबरोबरच येथील तरुण अभियंत्याने बंदिस्त मत्स्यपालनाचा उद्योग उभारला असून हा संपूर्ण प्रकल्प तरंगत्या पाण्यावर उभारला आहे. या प्रकल्पासून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळत असून मत्स्य उद्योगातील अशाश्वता कमी करून हमखास उत्पन्नाची हमी देणारा हा प्रकल्प पथदर्शीच म्हणायला हवा.

आटपाडी हा कमी पर्जन्यवृष्टीमुळे कायम अविकसित राहिलेला तालुका आता सिंचन योजनेच्या शाश्वत पाण्यामुळे बदलत आहे. सांगोला आणि आटपाडी या तालुक्यातील डाळिंबांनी सातसमुद्रापार माणदेशी मातीची गोडी पोहोचवली. आता नव्या दमाचे तरुण वेगळा प्रयोग हाती घेऊन येथील मासेही ग्राहकांच्या हाती देऊन वेगळी चव जिभेवर रेंगाळण्यास सज्ज झाला आहे.

आतापर्यंत आपण मत्स्य शेतीचे अनेक प्रकार पाहिले. पण सांगलीतील आटपाडीमधील संकेत मोरे या तरुणाने केज कल्चर मत्स्य शेतीचा अनोखा प्रयोग केला. मेकॅनिकल पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य शेती करण्याचे ठरवले. संकेतचे वडील शिवाजीराव मोरे शासकीय तलाव भाडेकराराने घेऊन त्यात मत्स्य बीज सोडून उत्पादन घेत होते. पण यात नुकसान जास्त होत होते. तलावातील पाणी वाढले की मासे वाहून जायचे, वेळेवर मासे सापडायचे नाहीत. त्यामुळे शिवाजीराव यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या आधारे आधुनिक पद्धतीने मत्स्य शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या वेळी तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प  करण्याचा निर्णय झाला. तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्पात जितके बीज टाकले जाईल तितके उत्पादनाची पूर्ण खात्री आहे. ज्या वेळी दर चांगला असेल तेव्हाच आपण मासे विकू शकतो. मोकळ्या तलावात जसे मासे सापडणे अवघड असते तसे या प्रकल्पात मात्र आपल्याला बाजारात मागणी असेल, तेवढ्या वजनाचे मासे विक्रीसाठी काढू शकतो.

अभियंता पदवी प्राप्त केल्यानंतर गावी आलेल्या संकेतने कराड येथील कृषी प्रदर्शनामध्ये बंदिस्त मत्स्य पालनाचा प्रकल्प पाहिला. खात्रीलायक मत्स्य उत्पादनांसाठी हा प्रकल्प त्याला आवडला. यातील पुढील अभ्यास करण्यासाठी भुवनेश्वर व कोलकता येथे प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर संकेतने तलावामध्ये तरंगता मत्स्य संवर्धन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला.

या प्रकल्पासाठी आटपाडीपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कामत तलाव निवडण्यात आला. हा तलाव १०० एकर परिसरात असून मत्स्य विकास महामंडळाकडून मत्स्यपालनासाठी घेण्यात आला. हा तलाव टेंभू योजनेच्या पाण्यासाठी साठवण तलाव असल्याने पाण्याची हमखास सोय आहे. तलावाच्या मध्यभागी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन प्रकल्प उभारला. प्लॅस्टिकच्या २०० हून अधिक बॅरेलचा वापर करून हा प्रकल्प तरंगता राहील याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे ७५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मत्स्य पालनासाठी २४ पिंजरे तयार करण्यात आले आहेत. ६ मीटर लांब पाच मीटर रुंद व पाच मीटर खोलीचे हे पिंजरे आहेत. तीलापिया आणि पंगेसियस दोन जातीच्या माशांचे एकूण २४ पिंजऱ्यात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमधून हा प्रकल्प उभारण्यासाठी मदत घेतली आहे.

चार वर्षांपूर्वी या व्यवसायाचा संकेतने श्रीगणेशा केला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ६ पिंजरे बनवले. यात वार्षिक ३० टन उत्पादन घेत असताना संकेतने या काळात मासे विक्रीचा, व्यवस्थापनाचा अनुभव घेतला आणि नंतर २४ पिंजऱ्याची उभारणी केली. सध्या या २४ पिंजऱ्यातील माशासाठी ४०० किलो खाद्य लागते, जसजसे मासे मोठे होत जाते तसे खाद्याची मागणी वाढत जाते. दररोज २० ते २५ हजार रुपयांचा खर्च हा फक्त खाद्यावर होतो. खाद्याची मागणी वाढेल तसे खर्च वाढत जातो. तळ्यात तरंगत्या पद्धतीने असा हा प्रकल्प उभा करणे हे मोठी जोखीम जरी असली तरी या व्यवसाय मध्ये अचूक उत्पादनाची शाश्वती देखील आहे. या पिंजऱ्यात जास्तीत जास्त अडीच किलोपर्यंत मासा तयार होतो. पण साधारण १ किलोपर्यंत मासा झाला की दर चांगला असले तर त्याची विक्री केली जाते.

एका पिंजऱ्यामध्ये पाच हजार मत्स्य बीज सोडले जाते. एक मासा तयार विक्री योग्य होईपर्यंत सुमारे दीड किलो खाद्य लागते. सर्वसाधारण या खाद्याचा दर चाळीस रुपये किलो आहे. प्रति बीज पाच रुपये खर्च करावे लागतात. एका पिंजऱ्यामध्ये सुमारे पाच टन माशांचे उत्पादन होते. स्थानिक पातळीवर शंभर रुपये किलो या दराने विक्री केली जाते. तसेच इंदापूर, भिगवण मच्छी मार्केटमध्येही मागणी असते. जर दर नसेल तर मासे बाहेर काढले जात नाहीत. एक किलो मासा तयार होण्यासाठी सर्वसाधारण ७० ते ७५ रुपये खर्च येतो.

या प्रकल्पामध्ये असलेल्या २४ पिंजऱ्यामध्ये जसे मासे बाहेर काढले जातील, तसे दुसरे बीज सोडण्यात येते. यामुळे उत्पादनामध्ये सातत्य राखता येते. मागणी असेल तरच मासे बाहेर काढले जातात. या वर्षी या प्रकल्पातून १०० टन मत्स्य उत्पादन घेतले असल्याचे मोरे यांनी सांगितले.

* प्रकल्प खर्च – ७५ लाख रुपये

* अनुदान- २१.६० लाख

* एकूण मत्स्य उत्पादन- १०० टन वार्षिक

* माशांचे प्रकार- तीलापिया आणि पंगेसियस.