News Flash

जागतिकीकरणाविना जगामध्ये भारत..

एकत्रितरीत्या हे तीनही प्रवाह, भारताची गणिते आणि त्यामागची गृहीतकेदेखील पालटून टाकू शकतात.

 

जागतिकीकरणाच्या काळाचा लाभ भारतानेही करून घेतला होता, त्यानंतरची पुढली पावले मेक इन इंडियासारख्या उपक्रमांतून साध्य होणार होती.. पण आता विकसित पाश्चात्त्य देशांमध्ये तर जागतिकीकरणविरोधी वातावरण दिसू लागले आहे. येत्या वर्षी२०१७ सोबतचयेणाऱ्या ट्रम्पोत्तरकाळात भारतालाही स्वतच्या व्यूहनीतीचा फेरविचार करावा लागणार आहे..

अडचणी एकटय़ादुकटय़ा येत नाहीत असे म्हणतात, पण यंदा खरोखरच अडथळय़ांचे त्रिकूट आंतरराष्ट्रीय राजकारणासमोर आहे. जगभरात ठिकठिकाणच्या घडामोडींतून सरत्या वर्षभरात बळ मिळालेले हे तीन प्रवाह, २०१७ या वर्षांत जगाची घडी बदलू शकतात. ते तीन प्रवाह म्हणजे : विकसित देशांमध्ये जागतिकीकरणाच्या विरोधात दिसलेला बंडाचा सूर, अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवू शकेल अशा तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याकडे कल आणि जगातील प्रमुख देशांत पुन्हा एकदा वाढणाऱ्या सत्ता-स्पर्धेची किंवा वरचढपणाची प्रवृत्ती. या तीनही प्रवाहांचा प्रभाव एकमेकांवर पडेल. एकत्रितरीत्या हे तीनही प्रवाह, भारताची गणिते आणि त्यामागची गृहीतकेदेखील पालटून टाकू शकतात. ही गृहीतके केवळ आजची नाहीत. भारतात गेल्या २५ वर्षांपासून सुरू झालेल्या नवरचनेच्या युगात जी राष्ट्रीय आर्थिक आणि संरक्षणविषयक व्यूहनीती आखली गेली, ती बदलण्याची वेळ येऊ शकते आहे.

आर्थिक उदारीकरण आणि आर्थिक जागतिकीकरण हे विकासाचे एकमेव उपलब्ध मार्ग असल्याबद्दल अगदी १९८०च्या दशकापासूनच जी जागतिक सहमती दिसू लागली, तिला ‘वॉशिंग्टन सहमती’ असे म्हटले जाते; परंतु डोनाल्ड ट्रम्प यांची निवड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी झाल्यानंतर सारेच चित्र बदलले आणि अमेरिकाप्रणीत सहमती अशी काही उरलीच नाही. याचे कारण असे की, ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारापासूनच, अमेरिकेचे मुक्त व्यापार करार रद्द करण्याची आणि आयात-निर्यातीवरील करांच्या दरांद्वारे चीनशी आर्थिक युद्धच छेडण्याची भाषा केली आहे. एवढेच नव्हे तर, कारखाने अमेरिकेबाहेर ठेवून तेथील उत्पादित माल अमेरिकेत आणून विकणाऱ्या अमेरिकी कंपन्यांवर दंडात्मक कारवाईच्या धमकावण्याही ट्रम्प यांनी सुरूच ठेवल्या आहेत.

‘एच-१ बी व्हिसा’सारख्या पद्धतीवरही ट्रम्प यांनी रान उठवले आहे. त्यांना असे वाटते की, या व्हिसा पद्धतीमुळेच अमेरिकेतील तंत्रकुशल कर्मचाऱ्यांना डावलून त्या जागी भारतीय किंवा अन्य देशीय कर्मचाऱ्यांना अमेरिकेत आणले जाते. शिवाय ट्रम्पना सर्व बेकायदा स्थलांतरित अमेरिकेतून हुसकून लावायचे आहेत आणि मेक्सिको व अमेरिका यांच्या सीमारेषेवर प्रचंड भिंतही बांधायची आहे. निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या सर्वच घोषणा खऱ्या होत नसतात असाच अनुभव अमेरिकेत आहे, परंतु ट्रम्प मात्र स्वत:च्या काही धमकावण्या खऱ्या करून दाखवतील, अशीच अपेक्षा आहे. ट्रम्प यांना जो काही निसटता विजय मिळाला आहे, तो तर परदेशांशी व्यापारामुळे अमेरिकेने गमावलेल्या (कथित) संधींबद्दलची धुसफुस आणि परदेशांतून अमेरिकेत- त्यातही, अमेरिकेच्या ‘मिडवेस्ट’ भागातील गौरवर्णीय कामगारांच्या भागात होणाऱ्या वाढत्या स्थलांतरावरील राग अशा अमेरिकी जनभावनांमुळेच मिळाला आहे.

पाश्चात्त्यांमध्ये सध्या जो करडा नूर पसरलेला दिसतो, त्यावर राजकीय महत्त्वाकांक्षेची पायाभरणी करणारे डोनाल्ड ट्रम्प हे काही एकमेव नव्हेत. सरत्या वर्षीच्याच उन्हाळय़ात ‘ब्रेग्झिट’ हा शब्द रूढ झाला.. ब्रिटनमधील जनतेच्या सार्वमताने युरोपीय समुदायातून बाहेर पडण्याचा दिलेला कौल त्या वेळी आश्चर्यजनक वाटला होता. जागतिकीकरणवाद आणि देशांहून वरचढ ठरणाऱ्या आर्थिक महासंघवजा आंतरराष्ट्रीय संस्था यांबद्दलचा तिरस्कार युरोपसारख्या स्थिरावलेल्या आणि पोक्त अशा खंडातदेखील किती खोलवर रुजला आहे, हेच त्या सार्वमतातून दिसून आले. आता येत्या काही महिन्यांत ‘ब्रेग्झिट’पाठोपाठ ‘फ्रेग्झिट’ हा शब्दही चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. फ्रान्समधील सार्वत्रिक निवडणूक येत्या काही महिन्यांत होत असून त्यातील अध्यक्षपदाच्या उमेदवार मारी ल पेन यांनी असे जाहीर आश्वासनच दिले आहे की, २०१७ मध्ये आपण निवडून आल्यास युरोपीय समुदायातून फ्रान्सला बाहेर काढण्यासाठी देशात सार्वमत घेतले जाईल. मारी ल पेन या अति-उजव्या उमेदवार आहेत.

आजवर भारताची व्यूहनीती अशी होती की, जागतिकीकरणाला आपण आपल्या गतीने स्वीकारावे आणि हे करताना पाश्चात्त्यांकडून भरभर आणि सर्वदूर बदलांसाठी येणारा दबाव नेहमीच रोखावा. परंतु आता पाश्चात्त्य देशच जर जागतिकीकरणाच्या विरोधी मताचे झाले, तर दिल्लीतही नव्या (नवरचनेनंतरच्या) आर्थिक व्यूहरचनेसाठी विचार घडून यावा लागेल. म्हणजे भरपूर प्रमाणात नवा विचार भारतालाही करावा लागेल. त्यातच, दुसरा प्रवाहदेखील बळकट होतो आहे : तोदेखील पाश्चात्त्य देशांना जागतिकीकरणाच्या विरोधात जाण्यास चेव यावा, असाच आहे. कृत्रिम प्रज्ञा, रोबोटिक्स (यंत्रमानवशास्त्र) तसेच ‘बिग डेटा’ म्हणून ओळखली जाणारी सर्व लोकांच्या सर्व सवयींसह सर्व प्रकारच्या संप्रेषणांची साठवण या तीन बाबींचा प्रत्यक्षात वापर होऊ लागल्यास तो याआधी घडलेल्या साऱ्याच परिवर्तनांपेक्षाही लोकांसाठी अधिक धक्कादायक ठरेल.

माहिती-तंत्रज्ञान क्रांतीच्याही नंतरची ही ‘चौथी औद्योगिक क्रांती’ घडल्यास तिचा सर्वात मोठा फटका बसेल तो रोजगारसंधींना. व्हाइट हाऊसने गेल्या आठवडय़ात प्रसृत केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, यंत्रमानवीकरण आणि तादृश यंत्रचलीकरण यांमध्ये ‘काही दशलक्ष (म्हणजे किमान काही कोटी) अमेरिकनांना त्यांच्या आजच्या उपजीविकेस मुकावे लागेल, अशी धक्का-क्षमता आहे’. याआधीच्या काळातदेखील तंत्रज्ञानाने औद्योगिक बदलांची मन्वंतरे घडवली, प्रत्येक नव्या तंत्रज्ञानामागोमाग मानवी रोजगारसंधी कमी झाल्या- पण त्या जितक्या कमी झाल्या त्या तुलनेत वाढल्यादेखील, म्हणजे फक्त या रोजगारसंधींची मागणी बदलली, असा अनुभव आलेला आहे. मात्र या वेळी तसे होणार नसून अनेक व्यवसाय बंद पाडण्याची आणि मुख्य म्हणजे उत्पादन-प्रक्रियेतील कामगारांवर किंवा मानवी बुद्धी/श्रमांपायी होणारा खर्च प्रचंड प्रमाणात घटवला जाऊ शकतो. कामगार-कर्मचाऱ्यांच्या मोलाचे हे नाटय़मय अवमूल्यन घडून आल्यास, दीर्घकाळात आधुनिक समाजरचनाच पालटू लागणे आणि समाजात नवी उतरंड तयार होणे अटळ आहे.

अशी तंत्राधारित क्रांती घडून आल्यास, भारताने देशांतर्गत रोजगारसंधी वाढविण्याच्या हेतूने औद्योगिक उत्पादन क्षेत्रात नवप्राण आणण्यासाठी जो मार्ग सध्या अवलंबण्याचे ठरविले आहे, तो मार्ग यापुढे कठीण ठरू शकतो. ‘बहुराष्ट्रीय कंपन्यांनो, भारतात वस्तू बनवा (मेक इन इंडिया) आणि जगभरात कोठेही विका’ असा आपण हल्ली निवडलेला मार्ग यापूर्वी जागतिकीकरणाच्या बहराच्या काळात जेव्हा चीनने निवडला, तेव्हा तो सुकर होता. त्यावर चीनची आर्थिक व्यूहनीती सुमारे तीन दशके अवलंबून होती; पण पाश्चात्त्य देशांमध्ये जागतिकीकरण-विरोधी भावनाच प्रबळ होत असताना आपल्याला त्याच आर्थिक व्यूहनीतीची पुनरावृत्ती करणे अशक्यप्राय ठरेल. म्हणजे आता भारतालाही पुन्हा आताच्या नवतंत्रज्ञानामुळे कायकाय फरक पडणार आहे याचा स्वतंत्रपणे अभ्यास करून, त्यांमधील गुंतवणूक वाढवतानाच अशा वाढीचे सामाजिक परिणाम अरिष्टदायी होऊ नयेत याची काळजी घेणे या साऱ्यालाच २०१७ पासून अग्रक्रम द्यावा लागेल.

ही चौथी औद्योगिक क्रांती राजकीय अस्थिरता घेऊनच येईल आणि त्या दोहोंचे परिणाम जागतिक सत्तासमतोलावर दिसत राहतील. प्रमुख देशांमधील अंतर्गत राजकारण कोठे जाते आहे, यावरही आंतरराष्ट्रीय सत्तासमतोलातील बरेच काही अवलंबून राहील, हेदेखील उघडच आहे. जे अंतर्गत राजकीय वादळे पेलू शकतात ते अशी वादळे झेलू न शकणाऱ्यांपेक्षा जागतिक स्तरावरही सशक्त ठरतात.

दुसरीकडे, बर्लिनची भिंत पडल्यानंतर जगातील प्रमुख सत्तांमध्ये जे सलोख्याचे आणि तुलनेने शांततेचे वातावरण दिसून येऊ लागले होते, तेही आता संपुष्टात येऊ लागले आहे. युरोपबाबत ठाम भूमिका घेऊ लागलेला रशिया किंवा हिंदी महासागरच्या दक्षिण चीन समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात नौदल सामर्थ्यांच्या बेटकुळय़ा दाखवू लागलेला चीन ही त्याची उदाहरणे होत. या सत्तास्पर्धेच्या अटकळी गेल्या काही वर्षांपासून होत्या, परंतु मॉस्को आणि बीजिंगमध्ये आज इतका आत्मविश्वास दिसू लागला आहे की, युरेशिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन खंडांच्या पट्टय़ात अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर पटकावलेल्या अव्वल स्थानाला रशिया वा चीनकडून आव्हानही मिळू शकते. अमेरिकेने या पडझडीच्या खुणा जाणून नवी पावले संयतपणे टाकली पाहिजेत, असे प्रयत्न राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते.

‘त्याची एवढय़ा जलदीने गरज नाही’ असे आता ओबामांचे उत्तराधिकारी ट्रम्प म्हणत आहेत. नवनियुक्त अध्यक्षांच्या अशा वागण्यामुळे होणारे नुकसान उघड आहे- ‘होऊ दे शस्त्रास्त्र स्पर्धा’ असे ट्रम्प यांनी गेल्याच आठवडय़ात जाहीर केले. अमेरिकेचे आण्विक सामथ्र्य आपण वाढवू, असे ट्वीटही त्यांनी त्याआधीच केले होते. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ – हा ट्रम्प यांचा नारा आहे आणि अमेरिकी नौदल सक्षम करणे, कृत्रिम प्रज्ञेत तसेच अतिनवीन अस्त्रांमधील गुंतवणूक वाढविणे आणि अमेरिकेचा सैनिकी दबदबा पुन्हा निर्माण करणे हाच त्यांचा, त्यांच्या देशाला पुन्हा महान करण्याचा मार्ग आहे.

शीतयुद्धाच्या अखेरीपासून दिल्लीने आंतरराष्ट्रीय संबंधवृद्धीत बऱ्यापैकी प्रगती केली होती. आता पुढील वादळे ओळखून नव्या व्यूहात्मक पर्यायांचा विचार भारतास करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

लेखक दिल्लीस्थित ‘कार्नेजी इंडिया’चे एक संचालक असून ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार-संपादक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:35 am

Web Title: globalization world and india
Next Stories
1 ..तरच मराठीचा जागर सुरू होईल
2 काळ्या पैशाच्या नावानं..
3 शेतीचा अनुकरणीय प्रयोग 
Just Now!
X