|| सुहास सरदेशमुख

औरंगाबादमध्ये कधीही नाव विचारले आणि पहिले नाव सांगितले की, लोक उत्सुकतेने आडनाव सांगायची वाट पाहतात. एकदा आडनाव सांगितले की, त्याला त्याच्या रकान्यात टाकता येते असा जणू नियम व्हावा इतके वातावरण दूषित झालेले आहे. अशा वातावरणात इम्तियाज जलील यांची वाढ झाली आहे.

पोषाख शेरवानी, भाषेचा लेहजा हैदराबादी आणि भाषणाची आक्रमकता किती? भाजपने प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी देत निवडणुकीमध्ये आक्रमक हिंदुत्व प्रचाराचा भाग राहील, असा संदेश दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी जुन्या औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती किराडपुरा भागात अ‍ॅड. असदुद्दीन ओवेसींचे भाषण होते. ज्या आरोपीला ‘एनआयए’ने पकडले, जी व्यक्ती थेट बॉम्बस्फोटात सहभागी असते, त्या महिलेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (ओवेसींच्या भाषेत मोडी) एवढे प्रेम का दाखवतात. अशीच कृती मी केली तर?- ‘मैं भी किसी मुस्लीम बेकसूर ‘एनआयए’ने गिरफ्तार किये बच्चे के साथ फोटू निकालता तो भारत की मीडिया मुझे कही नही छोडती’ असा आक्रमक मुद्दा ते तरुणाईसमोर ठेवत होते. त्याचबरोबर शहरातील पाणीप्रश्नावरून ते खासदार चंद्रकांत खरे यांच्यावरही शाब्दिक हल्ला करत होते. पण आवेसी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. कारण त्यांना माहीत होते, मुस्लीम मते काँग्रेसलाही जाऊ शकतील. याच सभेत मध्येच कोणी तरी घोषणा द्यायचे ‘नारा ए तकबीर’ मग प्रतिसाद मिळायचा ‘अल्ला हू अकबर’! हे सारे वातावरण औरंगाबादकरांना आता परिचयाचे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशाच भाषणांमुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघातून इम्तियाज जलील हे निवडून आले होते. भाजप आणि शिवसेनेच्या मतांमध्ये झालेली फूट  आणि मुस्लीम मतांचे एकत्रीकरण यातून इम्तियाज जलील आमदार झाले.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यावर दलित-मुस्लीम युतीची चर्चा आवेसींनी सुरू केली होती. एमआयएमचे पाच दलित समाजातील नगरसेवक निवडून आले होते. निवडणुका आल्या आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एका पत्रकार बैठकीत ‘एमआयएम’ बरोबर आघाडी कराल का, असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, ‘तो राजकीय पक्ष आहे आणि लोकशाही मानणारा आहे.’ त्यांच्या वक्तव्याला संधी मानून ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांशी पत्रव्यवहार केला. जेवढा मोठेपणा द्यायचा तो दिला गेला. पुढे जाहीर भाषणात प्रकाश आंबेडकर हे ओवेसी यांचे मोठे बंधू झाले. गेल्या वर्षी भीमा-कोरेगाव घडून गेले होते. दलित समाज एकवटला होता. त्यांना नेता मिळाला होता. दलित समाजातील तरुण समाजमाध्यमांवर ‘वंचित’ची भूमिका प्रखरपणे मांडत होता. त्याला मराठवाडय़ात चांगला प्रतिसाद मिळत होता. या काळात पुन्हा दलित-मुस्लीम एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवायचीच यासाठी आमदार इम्तियाज जलील आक्रमक झाले होते. पण प्रकाश आंबेडकर यांनी अन्य नावाची घोषणा केली होती. यावरून जलील यांचा ओवेसी यांच्याशीही त्यांचा वाद झाला. ‘एमआयएम’ फुटीच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचली. राजकीय पक्ष जर निवडणूक लढवणार नसेल तर त्याचे कार्यकर्ते फुटतात. पुढे विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सगळा आमदार इम्तियाज जलील यांचा प्रवास अस्तित्व राखण्याचा होता. ते निवडून येण्याची शक्यताही तेव्हा कोणाच्या विचारात नव्हती. ‘एमआयएम’ हा पक्ष रझाकाराचा वारसा चालविणारा पक्ष असे मराठवाडय़ात ठामपणे सांगितले जाते. मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना मराठवाडय़ातील गाव खेडय़ात १९३८ पासून माहीत. कासीम रझवी या संघटनेचा दुसरा अध्यक्ष. मूळ लातूरचा. संघटनेच्या माध्यमातून त्याने केलेल्या अत्याचाराची आठवण सांगणारे काहीजण अजूनही मराठवाडय़ात आहेत. तोच वारसा आवेसी यांच्या पक्षाचा, असा आरोप होतो. ते तो खोडून काढतात. आमचा आणि कासीम रझवीचा संबंध नाही, असे खासदार जलील सांगतात. व्यासपीठावर चढले की कट्टर आणि एरवी कमालीचा मधाळ वाणीचा अशी आमदार इम्तियाज जलील यांची प्रतिमा आहे. पण ही प्रतिमा निवडणूक जिंकण्यास पुरेशी नव्हती. त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळाले ते जातीय फुटीतून.

मराठा मोर्चामुळे मराठवाडा आणि औरंगाबादमध्ये वातावरण ढवळून निघाले होते. आधी मनसे, मग शिवसेनेतून आमदार झालेल्या हर्षवर्धन जाधव यांची अपक्ष उमेदवारी शिवसेनेच्या मुळावरच आली. जाधव यांना मिळालेल्या २ लाख ८३ हजार मतांमुळे शिवसेनेच्या खैरे यांचा पराभव झाला. विधानसभेत युतीतील तर लोकसभेत शिवसेना आणि जाधव यांच्यातील मतविभाजनाचा फायदा जलील यांना मिळाला आहे.

जातीयवाद हा औरंगबादकरांच्या मानगुटीवरच जणू काही बसला आहे. याला काँग्रेस-राष्ट्रवादीची धोरणेही कारणीभूत आहेत. औरंगाबादमध्ये या दोन पक्षांनी पदाधिकारी निवडताना किंवा प्रमुख पद देताना तो व्यक्ती मुस्लीम समुदायाचा असावा, अशी पेरणी जाणीवपूर्वक केली. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून बहुसंख्याक मराठा समाजावर अन्याय होतो आहे, अशी भावना सातत्याने निर्माण होत गेली. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तसा नेता शिल्लक राहिला नाही. जे स्वत:ला नेते म्हणवून घेतात त्यांनी स्वत:चे अस्तित्व जातीपुरते मर्यादित ठेवले. परिणामी औरंगाबादमध्ये कधीही नाव विचारले आणि पहिले नाव सांगितले की, लोक उत्सुकतेने आडनाव सांगायची वाट पाहतात. एकदा आडनाव सांगितले की, त्याला त्याच्या रकान्यात टाकता येते असा जणू नियम व्हावा इतके वातावरण दूषित झालेले आहे. अशा वातावरणात इम्तियाज जलील यांची वाढ झाली आहे.  शहराच्या एका भागात हिरवा रंग उधळला जातो आणि दुसऱ्या बाजूला गुलाल असतो. विभाजन आणि फूट याच्या केंद्रस्थानी कधी धर्म येतो, कधी जात आणली जाते. या लोकसभा निवडणुकीत धर्मही होता आणि जातही!