हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात खासदार सभागृहात कमी आणि संसदेच्या लॉबीमध्ये जास्त दिसत होते. दोन्ही सभागृहं तहकूब होत असल्यानं काही खासदार नेहमीप्रमाणं सेंट्रल हॉलचा रस्ता पकडत होते. काही खासदार सेल्फी काढण्यात मग्न होते. गुरुवारी दोन्ही सभागृहं दिवसभरात पहिल्यांदा तहकूब झाली. तेवढय़ात सोनिया गांधी एकटय़ाच लगबगीनं चालत आल्या. त्यांचं आसपास असलेल्या माणसांकडं लक्ष नव्हतं. त्या तशाच पुढं निघून गेल्या आणि अचानक थांबल्या. त्या परत आल्या आणि काँग्रेसच्या खासदाराला त्यांनी नमस्कार केला. ‘तुम्हाला मी बघितलंच नाही. माफ करा.’ असं सोनिया म्हणाल्या. त्यांची विनम्रता पाहून कोणीतरी म्हणालं, याला म्हणतात काँग्रेस.. त्यावर ते खासदार म्हणाले, याला काँग्रेस नव्हे, गांधी कुटुंब म्हणतात.. काँग्रेस सदस्यच नव्हे तर समोरून आलेल्या कोणाही व्यक्तीला सोनिया इतक्याच विनम्रतेनं नमस्कार करतात. त्यांच्यातील मार्दव अगदी भाजप विचारांच्याही अनेकांना भावतं! भाजपमध्ये राजनाथ सिंहसारखे काही नेते अजूनही वाजपेयींची परंपरा चालवताना दिसतात.  संसदेतील ग्रंथालयाच्या इमारतीसमोर राजनाथ यांचा ताफा थांबलेला होता. अडवाणी येत असल्याचं पाहून राजनाथ यांनी लगेच ताफ्यातील गाडय़ा पुढे घ्यायला सांगितलं. अडवाणींना आपुलकीनं आतमध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली गेली. तिथं अडवाणी उभे होते. त्यांची दखलही न घेता एक वरिष्ठ नेता पुढं आला आणि  निघून गेला. राजनाथ यांच्या आणि या नेत्याच्या ‘विनम्रते’बद्दल संसदेतील नोकरशाहांमध्ये वेगवेगळे सूर उमटलेले दिसले.

 

राहुलचा संदेश

‘राफेल’चं कोलीत हातात मिळाल्यामुळं भाजपने राहुल गांधींना लक्ष्य केलं. ‘राफेल’वरून मोदींना भ्रष्टाचारी म्हणण्याची हिंमत फक्त काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी केल्यामुळं भाजप संधीची वाट पाहात होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने ती दिली! राजनाथ सिंह यांनी लोकसभेत राहुल गांधींचं नाव घेऊन टीका केली. भाजपच्या पक्षाध्यक्षांनीही धारेवर धरल्यामुळं राहुल दिवसभरात कधीतरी उत्तर देणार हे निश्चित होतं. दुपारी चारची वेळ ठरलेली होती. अमित शहांनी माहितीचा स्रोत जाहीर करण्याचं आव्हान दिल्यामुळं राहुल कदाचित कागदपत्रं देऊन मोदींना उघडे पाडतील असा होरा होता. न्यायालयाच्या निकालामुळं काँग्रेस अडचणीत आल्याचं दिसत होतं. राहुलना ठोस पुरावा द्यावाच लागेल अशी चर्चा संसदेच्या आवारात रंगलेली होती. पत्रकार काँग्रेस मुख्यालयात आशेनं राहुलसाठी ताटकळत बसलेले होते. मधल्या काळात राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निकाल लागला. हिरमुसलेल्या सचिन पायलट यांनी मुख्यालयात अशोक गेहलोतांना शुभेच्छा दिल्या. श्रमपरिहार करून पत्रकार राहुल यांच्या वार्तालापासाठी तयार झाले. पण, तेवढय़ात अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद सुरू केली. राहुल गांधींनीही परिषद आयोजित केल्याचं त्यांना माहिती होतं. राहुलची पत्रकार परिषद सुरू झाली असती तर जेटली-सीतारामन यांना टीव्हीचा पडदा व्यापता आला नसता. पण, त्यांनी धाडस करून राहुलविरोधात टीकास्त्र सोडलं. केंद्रीय मंत्री पत्रकारांशी बोलताहेत हे समजल्यानं राहुल यांची वेळ लांबत गेली. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा वाद मिटवून राहुलनी ‘राफेल’ला हात घातला. न्यायालयाचा आदेश वाचून त्यांना सल्ला देण्यातही काँग्रेस ‘विश्लेषकां’ना उशीर झाला. या सगळ्या खटाटोपात राहुल यांची पत्रकार परिषद सुरू व्हायला संध्याकाळी साडेसहा वाजले. राहुल यांनी मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतली खरी पण, पुरावे दिले नाहीत. जे मुद्दे मांडले ते तीन याचिकाकर्त्यांनी राहुल यांची पत्रकार परिषद होण्याआधीच तासभर जाहीर केलेले होते. त्यामुळं राहुल यांची पत्रकार परिषद निव्वळ पुनरावृत्ती ठरली. तरीही ‘राफेल’ प्रकरण एवढय़ात संपू देणार नाही हा संदेश मात्र राहुलनी भाजपपर्यंत पोहोचवलाच.

 

असाही योगायोग!

सलग दोन शुक्रवार भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. साडेबारा-एक वाजताची वेळ. खरंतर दीनदयाळ रोडवरील कार्यालयात भाजप बीट करणारे पत्रकारही एरवी जायला तयार नसतात. पण, पक्षाध्यक्षांचीच पत्रकार परिषद असल्यानं भरदुपारी ते हजर झाले. खरंतर त्याच वेळी केंद्रीय मंत्र्यांच्या भोजनाचा कार्यक्रमही ठरलेला होता. भोजन समारंभाला खासकरून पत्रकारांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं. या शुक्रवारी साडेबारा वाजता केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जेवायला बोलावलेलं होतं. पण, दुपारी एक वाजता अमित शहांनी वार्तालापासाठी बोलावलं होतं. राफेलचा मुद्दा महत्त्वाचा असल्यानं सुषमांचं भोजन सोडून पत्रकारांना यावं लागलं. गेल्या शुक्रवारीही अमित शहांसाठी पत्रकार आले होते. त्या दिवशी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या निवासस्थानी भोजनाचा स्वाद घेण्यासाठी पत्रकारांना जायचं होतं. शाळेत गेल्याचा भास होणाऱ्या भाजपच्या मुख्यालयामध्ये जेवणाच्या या ‘योगायोगा’वरून हास्यविनोद होत होते. केंद्रीय मंत्र्यानं जेवण ठेवलं की शहांची पत्रकार परिषद कशी काय असते? मार्गदर्शक नेते मुरली मनोहर जोशी यांनी यंदाच्या ‘दिवाळी मीलना’साठी पत्रकारांना निमंत्रण दिलं होतं. नेमकं त्याचवेळी भाजपच्या मुख्यालयात तीन केंद्रीय मंत्र्यांनी गप्पा मारण्यासाठी पत्रकारांना बोलावलेलं होतं. हे सगळे ‘योगायोग’च असावेत असं पत्रकारांना वाटलं.

 

बदललेले दिवस

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाल्यानंतर अकबर रोडवरील काँग्रेसचं मुख्यालय ओस पडलेलं असायचं.  साडेचार र्वष ‘एआयसीसी’ कार्यालय विजनवासात गेलेलं होतं. त्यामुळं सुरक्षा व्यवस्थाही फारशी नसे. सहज कोणीही येऊ शकत असे. राहुल गांधींची पत्रकार परिषद असेल तर थोडी काळजी घेतली जायची. पण, तीन राज्यांमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यामुळं मुख्यालयातलं वातावरणच बदलून गेलेलं आहे. निकालाच्या दिवशी तिथं उभं राहायला जागा नव्हती. तिथल्या कँटिनमध्ये राबता वाढलेला आहे. काँग्रेसकडं सत्ता आल्यामुळं मुख्यालयाबाहेर आणि आवारातही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शुक्रवारी राहुल गांधींची पत्रकार परिषद असल्यानं कॉन्फरन्स हॉलचा ताबा ‘एसपीजी’च्या सुरक्षा रक्षकांनी घेतलेला होता. ं वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन आणि पत्रकार वेळेआधी आलेले होते. पण, सुरक्षा व्यवस्थेनं त्यांना ताटकळत ठेवलेलं होतं.  खरंतर राहुल यांच्या पत्रकार परिषदा यापूर्वीही झालेल्या आहेत. त्यावेळी सुरक्षेचा फारसा बाऊ केला गेला नव्हता. पण, सत्तेचे धनी झाल्यामुळं हा फरक झाला असावा. आगामी लोकसभा निवडणुका जेमतेम चार महिन्यांवर आल्यानं काँग्रेसच्या मुख्यालयातील वर्दळ वाढत जाणार आहे. काँग्रेसचे दिवस बदलू लागल्यानं नेत्यांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे. गायब झालेले नेतेही मुख्यालयात दिसू लागलेले आहेत.

– दिल्लीवाला