01 March 2021

News Flash

कठमुल्ला?.. हे काय आहे?

लोकसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा रंगलेली होती.

लोकसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा रंगलेली होती. काँग्रेसच्या खासदार सुश्मिता देव यांनी सडेतोड युक्तिवाद केला. भाजपच्या वतीने दिल्लीच्या खासदार आणि वकील मीनाक्षी लेखी यांनी कुराणातील वचनांचा (आयत) आधार घेत तिहेरी तलाक हा गुन्हा कसा ठरतो हे पटवून दिलं. फारसी-उर्दू शेर सांगत लेखींनी उत्तम भाषण केलं. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सलीम नेहमीच खुसखुशीत बोलतात. त्यांच्या बोलण्यात गांभीर्य असतं. पण, ज्या आविर्भावात ते बोलतात तो पाहण्याजोगा असतो. भाजपचे मुस्लीम खासदार मुख्तार अब्बास नक्वीही बोलले. मधू दंडवते तलाकवर काय म्हणाले होते याचा इंगजी परिच्छेद नक्वी यांनी वाचून दाखवला आणि पुन्हा हिंदीत भाषण सुरू केलं. मुल्ला-मौलवींच्या कडव्या धर्माधतेवर टीका करताना त्यांनी ‘कठमुल्ला’ असा शब्दप्रयोग केला. हा शब्द ऐकताच तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय एकदम खवळले. असला कसला शब्द हा? तुम्ही असा शब्द वापरलाच कसा?.. त्यावर नक्वी म्हणाले, हा भलता-सलता शब्द नाही. उर्दू शब्द आहे. कठमुल्ला म्हणजे धर्माध. फॅनॅटिक.. नक्वी आदरयुक्त स्वरात म्हणाले, माझी इंग्रजी थोडी नाजूक आहे म्हणून मी उर्दू शब्द वापरला. मला जरा समजून घ्या.. नक्वींच्या वाक्यावर रॉय नरमले. नक्वींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यांना ‘कठमुल्ला’ शब्द पुन्हा वापरायचा होता पण, त्यांनी फॅनॅटिक.. फॅनॅटिक असं दोन-दोनदा म्हणत आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. रॉय म्हणाले, फॅनॅटिक म्हणा.. कठमुल्ला काय शब्द आम्हाला माहिती नाही!

 

तुम्ही तरी पाहिलं का?

हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये सातत्यानं गोंधळ होतोय. शुक्रवारीही राज्यसभा पंधरा मिनिटांमध्ये दिवसभरासाठी तहकूब झाली. लोकसभेत मात्र प्रश्नोत्तराचा तास कसाबसा झाला. सदस्य लोकसभा अध्यक्षांच्या मोकळ्या जागेत उभं राहून गोंगाट करत असल्यानं कोणत्या खासदारानं मुख्य प्रश्नाला उपप्रश्न विचारला. त्याला मंत्र्यांनी काय उत्तर दिलं हे ऐकू येत नाही. कुणाचं प्रश्नाकडं आणि उत्तराकडं लक्षही नसतं. त्यात मंत्री हळू आवाजात बोलत असेल तर मग विचारायलाच नको! या आठवडय़ाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी सरकारी बालकल्याण केंद्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्न आणि त्यावर उपप्रश्न विचारला होता. अण्णा द्रमुकच्या खासदाराने त्यांच्या पुढे येऊन फलकबाजी केल्यानं अडसुळांचा चेहरा कॅमेऱ्यासमोर झाकला गेला. त्याचा अरविंद सावंत यांना राग आला. त्यांनी उठून सदस्याला बाजूला केलं मग, अडसुळांनी प्रश्न पूर्ण केला. गोंधळातही महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी नेटानं उत्तर देत होत्या. त्यांनी अडसुळांनाच उलटा प्रश्न विचारला. तुम्ही सुरक्षेवर चिंता व्यक्त करत आहात. तुम्हाला मुलं आहेत. तुम्ही कधी तुमच्या भागातल्या बालकल्याण केंद्रांना भेट दिली आहे का?.. अडसूळ नुसतेच हसले. त्यांना कोणताच प्रतिवाद करता येईना. अडसुळांच्या हसण्यातील नकार ओळखून मेनका गांधी त्यांना म्हणाल्या की, तुम्ही स्वतच जर भेट दिलेली नसेल तर इतरांनी बालकांच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही असं कसं म्हणता येईल?.. खरंतर प्रत्येक खासदाराने बालकल्याण केंद्रांना भेटी दिल्या पाहिजेत. व्यवस्थेची तपासणी केली पाहिजे. आपापल्या मतदारसंघातील आमदारांनाही तुम्ही सांगायला हवं.. मेनकांचा तुलनेत बारीक आवाज किती खासदारांनी ऐकला असेल?

 

लग्नाची अशीही गोष्ट

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याच्या ठरावावर लोकसभेत चर्चा करताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजप आणि पीडीपी यांच्या आघाडी सरकारची तुलना ‘अनैसर्गिक लग्ना’शी केली. त्याचा प्रतिवाद करताना जम्मूचे भाजपचे खासदार जितेंद्र सिंह दीक्षित यांनी आघाडी आणि लग्नाची सांगड घालत शब्दांचे भरपूर खेळ केले. भारतीय लग्नात विजोड जोडपी कशी पाहायला मिळतात, त्यांचा संसार कसा चालतो आणि मोडतो वगैरे अनेक रुपकं जितेंद्र सिंह यांनी वापरली. अखेर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ठरावाला उत्तर द्यायला उभे राहिले. त्यांनीही आपल्या सहकाऱ्याच्या पुस्तकातील पान उलटत ‘लग्न’ शब्दप्रयोगाचा वापर केला. राजनाथ म्हणाले की, लग्न नैसर्गिक होतं की, अनैसर्गिक हे मला माहिती नाही. ते कसं होतं याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण, कधी कधी नैसर्गिक लग्नदेखील मोडतात, हे मी पाहिलेलं आहे.. राजनाथ हे सगळं शशी थरूर यांच्याकडं बघून बोलत होते. त्यांचं वाक्य संपताच सत्ताधारी बाकावरून एकच हशा आला. राजनाथ यांच्या वाक्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन गंभीर होत त्यांना म्हणाल्या की, शशी थरूर हे लग्न या विषयातील तज्ज्ञ आहेत असं वाटतं का?.. या सगळ्यावर थरूर कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त न करता बाकावर बसून होते. पण, सत्ताधाऱ्यांचा हशा बघून फारुख अब्दुल्ला एकदम संतापले. गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना तुम्ही हसता कसे?.. अब्दुल्लांच्या वाक्यावर भाजपचे खासदार आक्रमक झाले पण, राजनाथ यांनी हस्तक्षेप करत आपल्या खासदारांना खडेबोल सुनावले. अब्दुल्ला हे सभागृहातील वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांनी एखादा शब्द ऐकवला तर तुम्ही ऐकून घेतले पाहिजे.. राजनाथ यांच्या वाक्यावर मात्र सभागृहात शांतता पसरली.

 

हनुमान चालिसा

इस्लाम धर्मात तलाक हा गुन्हाच मानला जातो, असं स्मृती इराणी ठणकावून सांगत होत्या. इस्लामिक इतिहास पाहिला तर दुसऱ्या खलिफासमोर पहिल्यांदा तलाकचा प्रश्न आला. पतीने तलाक दिल्याचं कबूल केलं तेव्हा खलिफानं त्याला चाळीस फटके मारण्याची शिक्षा दिली होती.. केंद्रीयमंत्री नेहमीच्या आक्रमक शैलीत सांगत होत्या. तेवढय़ात महम्मद सलीम विरोधी बाकांवरून मोठय़ा आवाजात म्हणाले, खलिफाचं नाव सांगा मॅडम!.. त्यावर स्मृति इराणींनी टेचात उत्तर दिलं. हजरत साब का नाम मेरे मूँह से सुनाना चाहते हो सलीमजी तो आपके मूँह से मैं भी हनुमान चालीसा सुनना चाहती हूँ. कभी दम हो तो सुना दीजिए .. इराणींचं म्हणणं सलीम यांनी ना गांभीर्यानं घेतलं ना मनाला लावून घेतलं. त्यांनी भाजपच्या धार्मिक राजकारणावर जोरदार मात्र टीका केली. तिहेरी तलाकच्या चर्चेत काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन, कुराणचा अभिमान वाटतो असं म्हणाल्या. कुराणचा आधार घेत त्यांनी तलाक देणं चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यावर मीनाक्षी लेखी यांनी कुराणमधील एखादं वचन तरी सांगा, असं म्हणत रंजन यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. रंजीत रंजन यांनी लेखींकडं अजिबात लक्ष दिलं नाही. शांतपणे त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं आणि भाजपच्या विधेयकला विरोध केला!.. पाच तासांच्या या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांची जुगलबंदी सुरू होती.

– दिल्लीवाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:11 am

Web Title: loksatta chandni chowkatun 20
Next Stories
1 शेती कर्जमुक्त कशी होईल?
2 शेतकरी महिलांची परवड
3 कचऱ्यापासून निर्मित खताला बाजारपेठ हवी
Just Now!
X