अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात लक्षवेधी असं काहीच नव्हतं. साडेचार वर्षांतील मोदी सरकारच्या योजनांची यादी राष्ट्रपतींनी वाचून दाखवली. सेंट्रल हॉलमधल्या वातावरणातही फारसा जोश नव्हता. खरं तर सदस्यांची संख्या जास्त आणि हॉलमधील आसनस्थानं कमी आहेत. पण ही बाकंदेखील रिकामी होती. अनेक खासदार अभिभाषणाला गैरहजर असावेत. सोनिया गांधींचीही अनुपस्थिती जाणवली. पहिल्या बाकावर सोनियांच्या जागी राहुल गांधी बसलेले होते. काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच राहुल अग्रस्थानी बसलेले पाहायला मिळाले. अभिभाषणाच्या दरम्यान दोन वेळा थोडी हालचाल दिसली. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात ‘सर्जिकल स्ट्राइक’चा उल्लेख केल्यावर भाजपच्या खासदारांनी बाकं वाजवून हॉलमध्ये तात्पुरतं चैतन्य निर्माण केलं. राफेलचं पहिलं विमान या वर्षी हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होत असल्याचं राष्ट्रपती अभिभाषणात म्हणाले तेव्हाही सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवली. विविध मुद्दय़ांचा समावेश असलेलं भाषण सव्वा तासात संपलं. त्या तुलनेत अर्थमंत्री पीयूष गोयल यांचं अर्थसंकल्पीय भाषण आक्रमक होतं. मध्यमवर्गासाठी करसवलती जाहीर झाल्यावर सभागृहात भाजप सदस्यांपैकी कोणी तरी ओरडलं, ‘सर्जिकल स्ट्राइक’.. करसवलतींची घोषणा लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निर्णायक मुद्दा ठरेल असं या सदस्याला सुचवायचं असावं.

स्वच्छ भारत!

गेल्या वर्षी मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेतला तेव्हा ती कल्पना नवी होती. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी गप्पा मारणं. त्यांना आश्वस्त करणं. देशाच्या पंतप्रधानांनी मुलांसाठी तास-दोन तास देणं ही बाब लोकांसाठीही कौतुकाची होती. वेगवेगळ्या राज्यांतून आलेले विद्यार्थी पंतप्रधानांशी थेट संवाद साधताहेत असं आपल्याकडं अपवादात्मकच घडतं. मोदींनी ते करून दाखवलं. गेल्या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या एक-दोन प्रश्नांमुळं कार्यक्रम रंगला होता. पुढच्या वर्षी तुम्हीही निवडणुकीच्या परीक्षेला बसणार आहात. तुमची तयारी कशी आहे, हा प्रश्न अनेकांचे लक्ष वेधणारा ठरला. या वर्षी मात्र अशी गंमत आली नाही. चर्चेत उत्स्फूर्तता नसेल तर कार्यक्रम निव्वळ औपचारिक होऊन जातो. या वेळी तसंच काहीसं पाहायला मिळालं. या वेळीही प्रश्न आधी निवडले गेले होते. आयत्या वेळी कोणा विद्यार्थ्यांला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली गेली नाही. सभागृहात मागे बसलेल्या विद्यार्थ्यांला मोदींना प्रश्न विचारायचा होता. त्याने मोदींचं लक्ष वेधून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अख्ख्या सभागृहाचं लक्ष त्याच्याकडं वेधलं गेलं, पण मोदींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यंदा विद्यार्थ्यांबरोबर पालक आणि शिक्षकांनाही सहभागी करून घेतलेलं होतं. मुलांच्या मनात आपल्या आई-वडिलांबद्दल, शिक्षकांबद्दल काय असू शकतं हे बरोबर ताडून मोदी विद्यार्थ्यांशी बोलत होते. त्याला मात्र विद्यार्थीवर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता. काही विद्यार्थी होस्टेलवर राहतात. कधी कधी एकाकी वाटू शकतं. अस्वस्थही होत असाल. असं झालं तर मनातलं सगळं कागदावर उतरवून काढा. पुन:पुन्हा लिहा. सगळा राग, सगळी अस्वस्थता निघून जाईल. मग, कागद फाडून टाका आणि खिशात ठेवा.. असं मोदी म्हणाले आणि क्षणभर थांबले. विद्यार्थ्यांना कळलं नाही की फाडलेले कागद खिशात का ठेवायचे?.. मोदी म्हणाले, स्वच्छ भारत!.. मग, मात्र अख्खं सभागृह हास्यानं दणाणून गेलं.

वरुण येणार का?

राहुल गांधी अमेठीच्या दौऱ्यावर होते, त्याच दिवशी प्रियंका गांधी-वढेरा यांची काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सकाळी राहुल अमेठीत पोहोचताच काँग्रेस कार्यकर्त्यांनं त्यांना विचारलं होतं की, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं नेतृत्व कोणाला देणार? त्यावर राहुल यांनी, संध्याकाळपर्यंत वाट बघ, नंतर मला भेट, असं सांगितलं. राहुल यांची अमेठी भेट सुरू होती, त्याच दरम्यान दिल्लीत काँग्रेसनं प्रियंका राजकारणात सक्रिय होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अमेठीतील कार्यकर्ता राहुल यांना भेटला की नाही हे माहिती नाही. पण काँग्रेस मुख्यालयातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा जोश दिसत होता. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रियंका म्हणजे रामबाण उपाय असंच या कार्यकर्त्यांना वाटत होतं. प्रियंका यांच्यामुळं दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात काम मिळालेल्या एका उच्चवर्णीय कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता पूर्व उत्तर प्रदेशमधील जागा काँग्रेसच जिंकणार, असा दावा त्यानं कोणताही विचार न करता केलेला होता.. आता चर्चा रंगली आहे ती वरुण गांधी काँग्रेसमध्ये कधी येणार याची! प्रियंका सक्रिय झाल्या की त्या वरुणला काँग्रेसमध्ये आणतील, असं बोललं जातंय. प्रियंका आणि वरुण यांच्यात सख्य आहे. सोनिया आणि मेनका गांधी यांच्यातील संबंध फारसे चांगले नसले तरी भावा-बहिणीमध्ये वितुष्ट नाही. एकमेकांबद्दल आपलेपणा आहे. अमेठी, रायबरेली आणि वरुणचा सुल्तानपूर हे तीनही लोकसभा मतदारसंघ एकमेकांशी लागून आहेत. गांधी कुटुंबानं हे मतदारसंघ आत्तापर्यंत तरी ताब्यात ठेवलेले आहेत. वरुण काँग्रेसमध्ये येणं पक्षाला फायद्याचं ठरू शकतं असा मतप्रवाह आहे. पण, वरुण काँग्रेसमध्ये खरंच प्रवेश करणार का आणि कधी, हे नजीकच्या भविष्यात कळेलच.

रन आणि कॅच

दिल्लीत एका कार्यक्रमाला नितीन गडकरी, सुरेश प्रभू, रामदास आठवले सगळेच येणार असं जाहीर झालं होतं. अलीकडं गडकरी काय बोलतात याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. पण या कार्यक्रमाला मात्र गडकरी आलेच नाहीत. सुरेश प्रभूही उशिराच आले.  प्रभूंनी छोटं भाषण केलं आणि ते निघून गेले. रामदास आठवलेही उशिरा आले, पण त्यांची एंट्री नेहमीप्रमाणे जोरदार होती. आठवले आल्यावर मात्र कार्यक्रमात एकदम उत्साह संचारलेला दिसला. केंद्रीय मंत्री कविता ऐकवतील असं वाटत होतं, पण त्यांनी कार्यक्रमाचा औचित्यभंग केला नाही. रामदास आठवले यांना दिल्लीत ‘कालिदास’ ही उपाधी मिळलेली आहे. त्यांची कविता ऐकायला अनेकांना आवडतं. आठवले यांच्यावर अनेकांचं मर्जी आहे. संसदेत त्यांच्या कवितांना भरभरून प्रतिसाद मिळतो. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर झालेल्या चर्चेत आठवलेंनी तुफान फटकेबाजी केली होती. मोदींचं गुणगान केलं होतं. तेव्हा मोदींनाही हसू आवरलं नाही. परवा झालेल्या कार्यक्रमात आठवलेंनी पुन्हा मोदींची स्तुती केली. लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत आठवले म्हणाले, मोदीजीने कहा है जितने रन बनाने है उतने बनाओ.. हम रन बनाएंगे. खूब रन बनाएंगे. मोदीजीने कहा है राहुल का कॅच पकडो.. हम कॅच पकडेंगे और राहुल को आऊट करेंगे.. ही राजकीय टिप्पणी अर्थातच प्रभावी होती. तेवढय़ात कोणी तरी म्हणालं, आठवले संघर्ष करो.. त्यावर आठवले म्हणाले, तू संघर्ष कब करेगा. आठवले यांनी या महाशयांना गप्प केलं. आठवले कविता करून लोकांना हसवत असले तरी राजकीय भान मात्र ते कधी विसरत नाहीत.