सुधीर गाडगीळ

कुणा एखाद्याचा मुलगा ऑस्टिनला, तर कुणाचा शिकागोला असतो. परीक्षेत गुणवत्तेत वरच्या स्तरावर येऊनही त्याला इथे स्कोप नाही म्हणून उच्च शिक्षणासाठी त्याला अमेरिकेत पाठवलेला असतो. तो तिथे परीक्षा देतो. परदेशातल्या नोकरीत स्थिरावतो. तिथे मिळणाऱ्या अव्वाच्या सवा पैशानं तिथेच रमतो. तरी पण त्याला पुण्याची, मुंबईची, आपल्या गावाची आठवण येत राहतेच. त्यामुळे भारतात परतावं असं वरचेवर वाटत असतं. पण दरम्यान त्याचं तिथेच प्रेम जमतं आणि तो त्या तिकडच्या अमेरिकन मुलीशी किंवा फ्रेंच मैत्रिणीशी लग्न करतो आणि त्याचं आपल्या भारतीय जगात येण्याचं स्वप्न कायमचं दुरावतं.

पुढे मग तो आपल्या धाकटय़ा भावंडांपैकीही कुणाला तिकडेच परदेशात नेतो आणि हळूहळू इथलं मायदेशातलं त्याचं घर रिकामं होऊ लागतं. फक्त त्यांचे आई-वडीलच इथं राहतात. मग त्यांनाही पोरांच्या आठवणीने, नातवंडांच्या ओढीने अमेरिका, जपान, लंडन, अगदी अलीकडे चीनलाही जावंसं वाटतं. प्रदीर्घ अंतरामुळे पोरांनाही आई-बापाची ओढ असते. ते घरच्यांना तिकडे काही दिवसांकरिता घेऊन जातात. नवं जग पाहण्याचं कुतूहल संपल्यानंतर या आई- वडिलांच्या मनालाही भारतात परतीचे वेध लागतात. तिकडे पोरांनाही तिकडच्या अल्ट्रा मॉडर्न दुनियेत रमू लागल्याने इकडच्या आई-बापांचा तिकडच्या जगात रमलेल्या आपल्या संसारात ‘व्यत्यय’ वाटू लागतो. भेटण्यातलं अंतर वाढत जातं. ज्येष्ठांची पोरांकडे परदेशी जाण्याची गॅप वाढते. आणि इथंच परस्परांच्या गरजांपोटी का होईना, एकमेकांचे गुणदोष सांभाळून, एकमेकांना सांभाळून घेणारी घरं दुभंगण्याच्या मार्गावर जातात. एकत्र नांदण्याचा आनंद कमी होत जातो. आणि मग तू तिथे आणि मी इथे बरे आहोत, म्हणत पोरं आपल्या तिकडच्या मित्रांशी, मैत्रिणींशी आई-बापाच्या न आवडलेल्या सवयींवर, खटकणाऱ्या स्वभावावर बोलत राहतात. आधी बिचकत आणि नंतर थेट स्पष्टपणे ज्येष्ठांनाच सुनावतात. तर ज्येष्ठ मंडळी ‘मुलगा, सून उत्तम आहेत हो, पण आम्हालाच तिकडे नाही चैन पडत. आपण आणि आपलं इथलं (भारतातलं) घर बरं!’ म्हणत आपला इथला मुक्काम वाढवत राहतात. काहींमध्ये स्वभावासकट कुठल्याच कारणानं जनरेशन गॅप राहत नाही. आणि इथे किंवा तिथे सारे गुण्यागोविंदाने नांदतात. त्यातले काही इथे किंवा तिथे सोयीनुसार वेगळ्या फ्लॅट किंवा बंगल्यात राहून नाती जपतात आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यही टिकवतात.

अलीकडे एक छोटा फरक दिसू लागलाय, तो म्हणजे प्रदीर्घ काळ परदेशात नोकरी-व्यवसाय केल्यानंतर मायदेशी परतीचे वेध अनेकांना लागू लागलेत. ‘आता काय इथेही सगळ्या फॉरिन स्टाईल सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आणि मुख्य म्हणजे इथं राहून पैशाच्या पाठबळावर फॉरेन स्टाईल दैनंदिनी सांभाळत येते. मनात आलं की शाळेतल्या मित्राला, कॉलेजच्या सरांना, बिल्डिंगमधल्या जुन्या मैत्रिणीला भेटता येतं. तिथे सख्ख्या भावाला भेटायचं तरी त्याचीही अपॉइंटमेंट घ्यावी लागते,’ असा तरुण मंडळींचा सूर लागू लागलाय. परदेशात स्वतंत्रपणे स्वत:च्या व्यवसायात, निवृत्तीत स्थिरावलेलेही म्हणू लागलेत की, ‘अहो, इथे म्हणजे फक्त शनिवार- रविवार रात्री ठरावीक मंडळी, ठरावीक विषयावर, ठरलेला मेनू खात भेटणार. त्यामुळे त्या भेटीतही फ्रेश झाल्यासारखं वाटतच नाही.’

‘नात्यातल्या समारंभांतही एकत्रपणे इथे गप्पांचा, परस्परांकडच्या चविष्ट पदार्थाचा आनंद घेता येतो. तिकडे असताना इकडे अचानक वडील गेले तर विमानाच्या वेळापत्रकात अंत्यविधीसाठीही उपस्थित राहता आलं नाही,’ असे संवाद हल्ली कानी येऊ लागलेत. मुख्य म्हणजे इथलं गावातलं बालपण, गावची खासियत, सणावारांची इथली मौजमजा अशा सगळ्या नॉस्टेल्जियात बुडालेल्या दोन्ही पिढय़ा आता भेटू लागल्या आहेत.

मी नोंदवत असलेली ही सारी इम्प्रेशन्स पाच-सहा वर्षांपूर्वीची आहेत. आता त्यातही खूप बदल झाले आहेत. आता आठवण आली की परदेशातूनही इथल्या नातलगांशी कितीही वेळ व्हॉट्स अ‍ॅपवर बोलता येतं. तसंच तुलनेनं कधीही तिकडून इकडे सहजपणे येता येतं. त्यामुळे ओढ नि अंतर कमी झालंय. आज हे सारं मनात येण्याचं कारण मी सांस्कृतिक कार्यक्रमांनिमित्ताने जगभर हिंडलोय. तिथे मुक्काम केलाय. इथल्या मुलांविना पालकांच्या घरांतही डोकावलोय. बोलणं आणि बोलकं  करणं हा तर माझा छंदच. त्यातून दोन पिढय़ांतले मतप्रवाह, हितसंबंध खूप जवळून अनुभवलेत. परदेशी असणाऱ्या पोरांना आपल्या इकडच्या घरातल्या ज्येष्ठांविषयी भरभरून बोलताना ऐकलंय. यातूनच मी एक छोटी व्यावसायिक, पण नॉस्टेल्जिक, अर्काइव्हल गोष्टही केली. तिकडे स्थिरावलेल्या सधन पोरांकडून पैसे नि ऑर्डरी घेऊन त्यांच्या इकडच्या ज्येष्ठांवर फिल्मही केल्यात. त्या खूप आवडल्या त्यांना. कारण त्यातून तिथल्या मुलांना तिथे जन्मणाऱ्या आपल्या मुलांना इकडच्या आजी-आजोबांची दैनंदिनी दाखवण्याचा आनंद घेता आला. आणि तिकडच्या मुक्कामात इथलं दुरावलेलं घर, आपल्या आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून आपलं हुकलेलं बालपण त्यांना फॉरिनच्या घरात बसून पाहता आलं. माझ्या या चित्रफितींना ‘पॅकेजिंग ग्रँडपा’ असे म्हणत त्यांनी दादही दिली. आणि परदेशस्थ मुलांचा व भारत सोडू न इच्छिणाऱ्या त्यांच्या आई-वडलांतला दुरावाही कमी होत गेला. ध्वनिचित्रफितीमध्ये केल्या गेलेल्या परस्परांबद्दलच्या टिपणीतून माझ्या पिढीने अनुभवलेली इथली दैनंदिनी मला पुन्हा अनुभवता आली. तर परदेशस्थ मुलांच्या वक्तव्यातून या पिढीला आई-बापांच्या पिढीच्या स्वभावातलं काय खटकतंय, इथपासून त्यांनी सुचवलेल्या, अनुभवलेल्या काही गोष्टी आजही किती उपयुक्त आहेत, हे ऐकत नव्यांची जुन्यांशी मनातून पुसली न गेलेली जवळीक जाणवत गेली. त्यातल्या काही नोंदी अशा..

रेडिओ दणदणत ठेवणं, संध्याकाळी उशिरा घरी परतणं, याबाबत वडिलांची बोलणी खावी लागणाऱ्या मधल्या पिढीचं म्हणणं असतं की, अरे, आता आमच्या पोरांनी धांगडधिंगा घातला तर बाबांना चालतो. आजोबांच्या कोटाच्या खिशातला चांदीच्या डबीतला पेढा पळवण्याचा अधिकार फक्त नातवाचा. लाल रंग टाकलेला बर्फाचा गोळा खाण्यासाठी आईने पैसे दिले नाहीत तर त्यासाठी हुकमी पैसे मिळण्याचे ठिकाण म्हणजे आजी. घराघरातलं हे निरागस नातं पुसट होत चाललंय. तर वरिष्ठ म्हणताहेत, कुणीतरी जवळ असण्याच्या काळात जवळच्याचाच आधार तुटत चाललाय. यातून वृद्धाश्रमांची पाश्चात्त्य संकल्पना अत्याधुनिक सोयींसह आपल्याकडे वेगाने मूळ धरतेय..

‘अरे, माझे आजी-आजोबा रोज भजन-कीर्तनाला जायचे. कधी कधी मीही जायचो. कथा, प्रवचनांतून  शब्दमांडणी अनुभवता यायची. ‘पार्वती पळाली, धर धर महादेव’ असं खटय़ाळपणे म्हणणारे आफळेबुवाही मी ऐकलेत.’

‘आता पोरांचा कसला स्पीकरवरच्या गाण्यांचा दणदणाट! आमच्या लहानपणी हत्ती काढलेल्या पाटाभोवती फेर धरून वाडय़ातल्या साऱ्या पोरींनी सुरेल आवाजात ‘ऐलमा-पैलमा’चा फेर धरलेला आणि ‘एक लिंबू झेलू बाईं’नी स्वर पकडलेला. वाघावर बसलेली, अंगावर अनेक आयुधं असलेली, क्वचित जीभ बाहेर काढलेली, अंगारलेल्या डोळ्यांची महिषासुरमर्दिनी त्यावेळी दिसे. वर्षभर उत्तररात्रीला बाहेर पडायला मज्जाव होता. पिवळ्या बारक्या दिव्याच्या प्रकाशात बाहेर जायला भीतीही वाटे. या पाश्र्वभूमीवर नवरात्रात देवीला रात्री उशिरापर्यंत जाणे हा मुक्ततेचा परमोच्च बिंदू होता.’

‘तुम्हाला फ्रँक लॉइडचं घर दाखवतो. नाइन थ्री वन शिकागो अ‍ॅव्हेन्यू. अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नऊ हा त्याचा पीरियड. अमेरिकन आर्किटेक्ट. त्याचं घर आणि स्टुडिओ जपून ठेवलाय. युरोपियन आणि जापनिज आर्किटेक्चरचा एकत्र नमुना.’

‘प्रात:काळी आमच्या गिरगावच्या चौपाटीवर चालायला निघालात तर गाजरापासून गवारीपर्यंत कुठल्याही फळभाजीचे सात्त्विक रस विकणारा तुम्हाला भेटेल. कबुतरांना टाकण्यासाठी कडधान्यांचे डबे घेऊन बसलेला विक्रेताही दिसतो. दुपारी कॅमेरा, घडय़ाळ, कॅसेट्स, कापड, किल्ल्या, कान कोरणे, लायटर, तक्ते, नकाशे अशी वाट्टेल ती वस्तू रस्त्यावर तुम्हाला परदेशात मिळणारच नाही.’

‘अत्तराची आणि कुराण या पवित्र धर्मग्रंथाची जुनी दुकानं माझी उत्सुकता नेहमीच वाढवतात. या दुकानांवर १८३०, १८४७ अशी स्थापना वर्षे लिहिलेली असतात. दीडशे वर्षे फक्त कुराण ग्रंथच विकण्याचं सातत्य या मंडळींना कसं काय जमू शकलं असेल, असं मनात डोकावत असतानाच मला मुंबईत निवृत्तीनंतरच्या दुपारी दुकाने भटकत जाण्याच्या माझ्या छंदात कधीतरी खलील फकी भेटतात आणि चष्म्याच्या चकचकीत फ्रेमआडून डोकावणारे त्यांचे श्रद्धाळू डोळे आज इतक्या दिवसांनीही आठवतात. ते हसले की त्यांची उजवीकडची सोन्याची दाढ चकाकते.’

‘वातानुकू लित व्यवस्था, मंद संगीत, उत्तम सुगंध आणि उत्तम डिझाइन्सच्या वॉलफ्रेम्स असलेल्या शिकागोच्या एका कोपऱ्यातल्या सलूनमध्ये शिरताच मला माझ्या शाळेच्या वयात कटिंग म्हटल्यावर अंगावर काटा आणणारं माझ्या बालपणीचं सलूनचं रूप डोळ्यापुढे आलं. पोपटी वा गुलाबी रंगाचा कळकट, दमट टॉवेल, हाताने दाबून धरलेली अवघडलेली मान, मानेला टोचणारे, घरंगळलेले केस, समोर मोठ्ठा आरसा, कारागिराने डाव्या हाताच्या पंजावर गिऱ्हाईकाच्या उतरवलेल्या दाढीचा फेस साठवलेला, पलीकडच्या खुर्चीशी कात्रीच्या भीतीनं भोकाड पसरलेलं पोरगं..’

‘रोज लाँड्रीचे कपडे वापरण्याचा शौक मला परवडत नाही. पँट-शर्टची एकच जोडी मी वर्षभर वापरतो. नीटनेटकं राहण्यासाठी कपडय़ाचे गठ्ठे कपाटात असण्याची गरज नसते, ती मनाची गरज असावी लागते. भरपूर पैसे खर्च करून आमच्या ‘एनआरआय’ चिरंजीवांनी पाठवलेल्या जर्किन-ट्राऊझरच्या कळपातही रोज धुऊन, इस्त्री करून वापरलेली पॅन्टही छान दिसते.’

‘तापल्या दुपारी आमच्या लेनमधून घंटा वाजवत जाणारा बर्फाचा गोळेवाला, म्हातारीचे केसवाला, डबे-बाटलीवाला असे सगळे येत-जात असताना आम्ही मात्र घरगुती सिनेमा बघण्याच्या खटपटीत असू. दारं, खिडक्या, जाळीतून उन्हाचा कवडसाही आत शिरू नये म्हणून सर्वत्र गोधडय़ा व ब्लँकेट्स लावून अंधारगुडूप खोली करण्यात आम्ही मग्न असायचो. पूर्ण अंधार झाला की सिनेमा पाहायला जमलेल्या पोरांना गप्प करून खिडकीचं उंच दार जरासं किलकिलं केलं जायचं. त्या जराशा फटीतून येणारी कडक उन्हाची तिरीप खिडकीच्या कोनाडय़ाची वरची महिरप प्रकाशमान करे आणि रस्त्यावरून जाणारे आरंभी उल्लेखिलेले फेरीवाले सुस्पष्ट स्वरूपात कोनाडय़ाच्या भिंतीवरून उलटे चालताना दिसत. दुपारचा छायाप्रकाशाचा हा अद्भुत खेळ पाहण्यात आम्ही रमायचो. आता घरातल्या भिंतीभर पसरणाऱ्या पडद्यावरचा फिल्म शो पाहणाऱ्यांना या घरगुती सिनेमाची गंमत कशी कळणार?’

मनावर रेंगाळलेली अशी अनेक निरीक्षणं. गप्पांतून कळलेली. मुलीच्या बाळंतपणासाठी म्हणून केवळ परस्पर गरजेतून परदेशात आलेले आई-बाप. बाळ होताच कधी एकदा भारतात परततोय म्हणून अधीर झालेले. त्यांच्या भावना सविस्तर दिलेल्या नाहीत. नातेसंबंधांतला फोलपणा (अपरिहार्यतेतून आलेला!) जाणवू नये म्हणून! एक जाणवलं, तुम्ही राहा कुठेही.. आवडीनिवडी, गरजा, सवयी, अनुभव, निरीक्षणं, प्रतिक्रिया यांत अंतर हे असतंच. पण सुसंवादाने नात्यातला गोडवा टिकवणं हे तर आपल्या हाती आहे!