आजच्या काळात शिकवणी वर्गाशिवाय शिक्षण असूच शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. शेतीत काही दम उरला नसल्याने ग्रामीण भागातील लोकही पोटाला चिमटा काढून मुलांना एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या शिकवणी वर्गासाठी पाठवतात. मात्र यात फक्त परीक्षेचे तंत्र शिकायला मिळते. एमपीएससी परीक्षेत आलेले काही प्रश्न या शिकवणी वर्गाच्या चाचण्यांतील होते असे दिसून आले आहे. हा योगायोग म्हणण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे या सेवांच्या परीक्षा प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य प्रदेशातील व्यावसायिक पदांच्या परीक्षांतील ‘व्यापमं’ घोटाळा अशाच एका वेगळ्या तंत्राने करण्यात आलेली चलाखी होती. आताच्या घटनेत तसे काही नसेलही तरी सावध होण्याची गरज आहे.
खासगी क्लासमधील शिक्षक हे शाळा किंवा महाविद्यालयातल्या शिक्षकांपेक्षा जेव्हा मोठे वाटू लागतात, तेव्हा शिक्षणव्यवस्थेमध्ये काही तरी गोंधळ निर्माण झाला आहे, असे समजण्यास हरकत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या जीवनात आलेले- गरजू मुलांसाठी शिकवण्या घेणारे, पण प्रश्नपत्रिकेत काय असणार याचा ताकास तूर लागू न देणारे- चितळे मास्तर हे त्या काळातील शिक्षकांचे खरेखुरे प्रतिनिधी होते. त्यांना मुलांच्या अभ्यासाची अधिक काळजी होती. आता चकचकीत आणि वातानुकूलित सभागृहात विशिष्ट विषयाच्या शिकवणीला क्लास म्हटले जाऊ लागले आणि महाविद्यालयातील प्रशस्त बाकांवर बसण्याऐवजी, मिळेल तेवढय़ा जागेत तग धरून बसण्यात अधिक प्रतिष्ठा वाटू लागली. महाविद्यालये चकाटय़ा पिटण्यासाठी आणि क्लास अभ्यासासाठी, असे एक नवे सूत्र विद्यार्थिजगात रूढ झाले आणि महाविद्यालयातील ग्रंथालयांपेक्षाही क्लासमधून मिळणारी छापील सामग्री अधिक नेटकी आणि उपयुक्त वाटू लागली. परीक्षाकेंद्रित जगात क्लासला आलेले महत्त्व अन्य अनेक कारणांसाठीही असू शकते, याचा शोध क्लासला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे लागला, तो म्हणजे तिथे परीक्षेतील प्रश्नांची उत्तम तयारी करून घेतली जाते. एवढेच नव्हे, तर परीक्षेत काय विचारले जाणार आहे, याची बित्तंबातमीही दिली जाते. परीक्षेसाठी सभागृहात वेळेपूर्वी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका हाती पडेपर्यंतचा काळ सर्वाधिक ताणाचा असतो. अभ्यासात काय काय करायचे राहून गेले आहे, हे नेमके त्या थोडय़ा वेळात आठवते. हबेलहंडी उडते, ती त्यामुळे. अशा वेळी प्रश्नपत्रिका हाती पडल्यानंतर क्लासमध्ये दिलेले प्रश्नच थोडय़ाशा फरकाने दिसू लागले, की डोळे लकाकायला लागतात. अंगभर उत्साहाची शिरशिरी पसरते आणि सारे जग मुठीत आल्याचा भास होतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना जेव्हा असा अनुभव येऊ लागतो, तेव्हा त्यांच्यासाठी आभाळच ठेंगणे होते.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुण्यातील खासगी क्लासमधील चाचण्यांच्या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न जवळजवळ तसेच विचारण्यात आले होते, अशी माहिती पुढे आल्यामुळे या परीक्षा कोण आणि कोणासाठी घेतो, असा प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना गेल्या काही वर्षांत महत्त्व प्राप्त झाल्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी या परीक्षांना बसत आहेत. या परीक्षांसाठी मराठी माध्यमाची असलेली सोय आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या सोयी पाहून अनेकांना त्याची भुरळ पडते. त्यांच्यासाठी ही परीक्षा हा जीवनमरणाचा प्रश्न बनला असून कोणत्याही परिस्थितीत ती उत्तीर्ण होणे हे त्याचे स्वप्न ठरते. असे होते, याचे कारण शिक्षणाचे अन्य सर्व मार्ग या विद्यार्थ्यांसाठी बंद होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्याला आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे असे वाटते. शेतीत राम राहिला नाही आणि मुलाच्या भाळी पुन्हा तेच अनिश्चिततेचे वारे येण्यापेक्षा तो नोकरीला लागणे केव्हाही सुरक्षित अशी त्याची भावना असते. जे शिक्षण घेऊन किमान नोकरीची हमी मिळू शकेल, असे अभ्यासक्रम सध्याच्या काळात इतके महाग झाले आहेत, की ते राज्यातील मूठभरांच्याच हाती लागण्याची शक्यता अधिक. केवळ पदवी धारण करून काहीही मिळण्याची शक्यता नसल्याने, अधिक काही करण्यावाचून गत्यंतर नाही. ते करण्यासाठी कमीत कमी खर्च ही सर्वात पहिली अट असणे हीही या विद्यार्थ्यांची गरज बनली आहे.
काही वर्षांपूर्वी एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमांना मोठी गर्दी होत होती. उद्योगांमध्ये अशा विद्यार्थ्यांना नोकऱ्याही मिळत असत. आता या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली, कारण गरजेपेक्षा अधिक संख्येने उपलब्ध असलेले उमेदवार. बी.एड. आणि डी.एड. या अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांत होऊ लागलेली गर्दी याच कारणांसाठी होती. खासगी शिक्षणसंस्थेत नोकरी मिळण्यासाठी पैसे देऊन तरी ती मिळण्याची शक्यता असल्याने हजारोंच्या संख्येने बी.एड., डी.एड. होऊ लागले. अध्यापन हे आपले जीवनध्येय आहे आणि देशाची पुढील पिढी घडवण्याचे राष्ट्रकार्य आपल्या हातून होणार आहे, असा कोणताही गैरसमज करून न घेता किती तरी जणांनी हे अभ्यासक्रम पूर्ण केले. बालवाडी ते बी.एड. असे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शिक्षणसंस्थांसाठी ते एक चलनी नाणे झाले. आपणच शिकवायचे आणि आपणच नोकरीही द्यायची अशा देवघेवीमुळे या क्षेत्रात जो भ्रष्टाचार माजला, त्याचेही भांडे अखेर फुटले आणि विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षक अधिक अशी अवस्था आली. परिणामी अध्यापन क्षेत्रातील नोकरीच्या संधी क्षीण झाल्या. डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रचंड शुल्क द्यावे लागते. त्यामानाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत केवळ गुणवत्ता हाच निकष असल्याने अभ्यासाच्या जोरावर प्रतिष्ठेची नोकरी मिळण्याची शक्यता विद्यार्थ्यांना अधिक वाटू लागली.
सरकारी नोकरीतही वरिष्ठ पद मिळण्याला आलेली शोभा, अधिकारांच्या बरोबरीनेच अन्य मार्गाने मिळणाऱ्या आर्थिक स्रोतामुळेही वाढत गेली. सत्ता, अधिकार आणि वरकड कमाई हे आकर्षण असले, तरीही लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची काठिण्यपातळी कायमच वरची राहिलेली आहे. केवळ उपलब्ध सामग्रीवर अभ्यास करून ती परीक्षा उत्तीर्ण होणे फारसे सोपे नसल्यामुळे आपोआपच खासगी क्लासचा आधार घेणे भाग पडते. क्लास ही शिक्षण यंत्रणेतील आधुनिक व्यवस्था आहे. भरमसाट शुल्क आकारून एखाद्या शाळेप्रमाणे विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी तयार करणारे हे नवे कारखाने. लोकसेवा परीक्षांमध्ये पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे त्याच्या तयारीसाठी क्लासला जाणाऱ्यांची संख्या प्रचंड म्हणावी अशी. आयोगही पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण करताना विशिष्ट प्रमाण ठरवते. त्यानुसार पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नेहमीच अधिक राहते. नंतरच्या मुख्य परीक्षेत अडकलेल्यांना पुन्हा एकदा पूर्वपरीक्षा द्यावी लागत असल्याने त्यांना पुन्हा क्लासचा आधार घेणे भाग पडते. या क्लासमधून घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील प्रश्नच जर आयोगाच्या परीक्षेतही आले, तर आपोआपच विद्यार्थ्यांमधील कुजबुज वाढते आणि त्याचा फायदाही क्लासचालकांना मिळतो. हे सारे ठरवून किंवा संगनमताने होते, असे कधीच सिद्ध होणार नसल्याने त्याबाबत सगळेच जण अळीमिळी गुपचिळी करतात. आयोगाच्या अंतिम परीक्षांचा निकाल सरकारी यंत्रणेत किती जागा भरायच्या आहेत, याच्याशी निगडित असल्याने तेथे फारच थोडय़ांची डाळ शिजते.
मुंबई, पुण्यापाठोपाठ राज्याच्या जवळजवळ सर्व शहरांमध्ये लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमांच्या खासगी क्लासची चलती आहे. अनेक ठिकाणी स्वत: लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या, परंतु त्यात अनुभवी असलेल्यांनी आपापले क्लास काढले आहेत. या परीक्षेत स्वत: उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेल्या अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील अशांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी क्लास काढले आहेत. तेथे प्रचंड शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षेपर्यंत नेण्याची तयारीही करून घेतली जाते. हाताच्या बोटावर मोजता येतील, असे खासगी क्लास विविध प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना दिसतात. त्यासाठी विशेष साहित्य तयार केले जाते. भाषणे, चर्चा असे कार्यक्रम राबवले जातात, परंतु हे सारे इतक्या थोडय़ा प्रमाणात घडते, की त्याचा लाभ फारच थोडय़ांना मिळतो. आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे आयोगाच्या परीक्षा देण्यात घालवणाऱ्या पिढय़ा हे एक प्रकारे नुकसान आहे. आयोगाने वयोमर्यादा वाढवून ती अडतीस वर्षे केल्यामुळे चाळिशीत नोकरी मिळणाऱ्यास सरकारी नोकरीत फार काळ कामही करता येण्याची शक्यता कमी. गेल्या काही वर्षांत लोकसेवा परीक्षेकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसत आहे. त्यामुळे लोकसेवा आयोगाच्या परीक्षा गुणवत्ता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अवघड होते आहे. त्यामुळे अशा गुणवान विद्यार्थ्यांनी स्टाफ सिलेक्शन बोर्डसारख्या परीक्षांकडे वळण्याची गरज आहे. खालच्या पदांसाठी सरकारी आस्थापनेत जागा असतानाही उमेदवार न मिळाल्यामुळे त्या मोकळ्या राहतात, हे लक्षात घेता किमान नोकरीची हमीच हवी असेल, तर ‘खाईन तर तुपाशी’ ही वृत्ती सोडून देणे केव्हाही योग्य. कमीत कमी पैशांत आणि केवळ गुणवत्तेवर आधारित अशा चार्टर्ड अकौन्टन्सी कंपनी सेक्रेटरी, विविध उद्योगांमध्ये लागणाऱ्या परिघावरील सेवा यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याची खरी आवश्यकता आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे चर्चेत असतो. कधी निकालातील गोंधळामुळे, तर कधी तेथील गैरकारभारामुळे. या परीक्षांची गुणवत्ता केवळ निकालात नसून तिच्या हाताळणीतही असते. भारतातील चार्टर्ड अकौन्टन्सीच्या परीक्षेत ती ज्या गुणवत्तेने पाळली जाते, ती पाळणे आयोगाला अशक्य नाही. खासगी क्लासमध्ये असलेल्या अध्यापनाच्या सोयी आणि त्यासाठी असणारे कुशल मनुष्यबळ हे लोकसेवा आयोगापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे विविध विषयांतील तज्ज्ञ कायमस्वरूपी नाहीत. त्यामुळे गरजेनुसार अनेक जणांची मदत घेऊन परीक्षांचे आयोजन करणे भाग पडते. हे आव्हान पेलण्यासाठी आयोगाने स्वत:ची यंत्रणा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या क्लासमध्ये घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका तपासणे शक्य नसल्याचे आयोग म्हणत असला, तरीही या क्लासमध्ये अध्यापन करणाऱ्यांपैकीच काही जण आयोगाच्याही प्रश्नपत्रिका काढत आहेत काय, याचा तपास तर घ्यायलाच हवा. खासगी क्लासमध्ये चाचण्यांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न किरकोळ बदल करून विचारण्याने आयोगाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. क्लासचालकांसाठी असे घडणे फायद्याचे असले तरीही आयोगाने अधिक सजग राहून आपल्या विश्वासार्हतेबाबत काळजी घेतली नाही, तर या परीक्षाही क्लासचालकांच्याच मर्जीने होतात, असा आरोप होऊ शकतो. शेतीत राम उरला नाही आणि कौटुंबिक उत्पन्नाची साधने आटू लागली आहेत. अशा स्थितीत राज्यातील युवकांना गुणवत्तेवर आधारित साधन मिळणे अधिक आवश्यक आहे. प्रतिष्ठेच्या नादापायी सारी उमेद करपवण्यापेक्षा आपली गुणवत्ता वाढवणे अधिक श्रेयस्कर असते, याचा विसर युवकांना पडता कामा नये.

 

मुकुंद संगोराम
mukund.sangoram@expressindia.com