05 March 2021

News Flash

पाकिस्तानी मुहाजीरांचे ‘रॉ कनेक्शन’

अल्ताफ हुसन हे पाकिस्तानातील मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट या पक्षाचे विजनवासात असलेले नेते. तेथील मुहाजीरांचा त्यांना पाठिंबा असल्याने पाक सरकार व सैन्याची नेहमीच त्यांच्यावर नजर असते.

| June 7, 2015 12:29 pm

अल्ताफ हुसन हे पाकिस्तानातील मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट या पक्षाचे विजनवासात असलेले नेते. तेथील मुहाजीरांचा त्यांना पाठिंबा असल्याने पाक सरकार व सैन्याची नेहमीच त्यांच्यावर नजर असते. ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेशी हुसैन यांचा संबंध आहे, असा पाकिस्तानचा आरोप असून आगामी काळात हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर जोरदारपणे मांडण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आपणही दक्ष राहावयास हवे.
पाकिस्तानमधील मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (एमक्यूएम) या तेथील एका मोठय़ा राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा अल्ताफ हुसन यांनी १ मे रोजी देशातील लोकांना संबोधित केले. दोन तास चाललेल्या या भाषणात आता तरुणांनी (मुहाजीर) दररोज कराचीतील क्लिफ्टनच्या सागरी किनाऱ्यावर व्यायाम करावा आणि हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण घ्यावे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. तसेच ‘रॉ’( रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिसीस विंग) या भारतीय गुप्तचर संस्थेला आवाहन करताना ते म्हणाले की त्यांनी आता आम्हाला मोकळेपणाने साथ दिली पाहिजे व हत्यारेसुद्धा पुरवली पाहिजे. कराचीच्या ‘लाईन झीरो’ या पक्षाच्या मुख्यालयात जमलेल्या समुदायाने टाळ्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला दाद दिली. मात्र त्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानात राजकीय भूकंप आला. चीनच्या ४६ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे आता देशाचे नशीब बदलणार हा आशावाद जाऊन सर्वाच्या चेहऱ्यावर चिंता आणि भय यांच्या रेषा स्पष्ट दिसू लागल्या आहेत.
३० एप्रिल रोजी काराचीस्थित मलीर विभागाचे एस.एस.पी. राव अन्वर यांनी दोन अतिरेकी ताहीर ऊर्फ लंबा आणि मामा जुनद यांना पकडले. नंतर त्यांच्या जाबजबाबाचा हवाला देऊन त्यांनी सांगितले की या दोघांना ‘रॉ’ने भारतात प्रशिक्षण दिले असून ते पाकिस्तानात दहशत निर्माण करत आहेत. तसेच ते दोघेही एमक्यूएम vishesh--2पक्षाचे कार्यकत्रे आहेत. त्यामुळे एमक्यूएम ही एक दहशतवादी संघटना असून तिच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी राव अन्वर यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अल्ताफ हुसन यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या दिवशी त्यांच्या या वक्तव्याची तीव्रता आणि परिणाम लक्षात घेऊन आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे सांगून अन्वर हे पाकिस्तानी जनतेची माफी मागून मोकळे झाले.
दिल्लीत २००४ मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अल्ताफ हुसन यांनी भारतीय उपखंडाची फाळणी ही सर्वात मोठी ऐतिहासिक चूक आहे असे सांगून, भारतीय जनमानसाला आवाहन केले होते की त्यांनी देश सोडून गेलेल्या लोकांना (मुहाजीरांना) माफ करावे आणि भारतात त्यांना परत घ्यावे. या त्यांच्या वक्तव्याने चर्चेचा धुराळा उडवला होता. १९७९ मध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा आरोप अल्ताफ हुसन यांच्यावर आहे. १९९२-९४ मध्ये पाकिस्तानी सन्याने चालवलेल्या ऑपरेशन ‘क्लीन-अप’दरम्यानसुद्धा अल्ताफ हुसन यांना पाकिस्तानी सन्याने लक्ष्य बनवले होते. पाकिस्तानी सन्याला त्या वेळी काही नकाशे सापडले होते, परंतु ती योजना अल्ताफ हुसन यांची आहे हे आजपर्यंत पाकिस्तानी न्यायालयांमध्ये सिद्ध होऊ शकले नाही.. परिणामी अल्ताफ हुसन यांना देश सोडावा लागला आणि ते लंडनमधून पक्षाचा कार्यभार पाहतात. अल्ताफ हुसन आणि एमक्यूएम दोघांवर पास्तिानी सन्याची विशेष नजर आहे. त्यांच्याकडून देशाच्या सुरक्षेला धोका आहे, असे पाकच्या सैन्याला वाटते. त्याच नजरेतून त्यांच्याकडे पाहिले जाते. १९७८ सालची मुहाजीर विद्यार्थी संघटना, १९८४ साली मुत्तहिदा कौमी मूव्हमेंटमध्ये रूपांतरित झाली. तेव्हा अल्ताफ हुसन यांनी डाव्या विचारांचा वारसा घेऊन नवा पाकिस्तान घडवण्यासाठी आणि मुहाजीरांच्या हक्कांचे रक्षण करताना एकेकाळी कराचीचा सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक जीवनपट ढवळून काढला होता.
पाकिस्तानी सन्याने उत्तर वजिरीस्तान आणि फाटा प्रांतातील दहशतवाद्यांविरोधी ऑपरेशन ‘जब्रे-अज्ब’ संपवून आपला मोर्चा आता शहरांकडे वळवला आहे. खास करून कराचीकडे. कराची सध्या संघटित गुन्हेगारी, सुपारीबाज खुनी आणि खंडणीखोरांच्या विळख्यात सापडली आहे. कराची हा अल्ताफ हुसन आणि एमक्यूएमचा बालेकिल्ला आहे. सन्याचे कराची ऑपरेशन मुख्यत एमक्यूएम म्हणजेच पर्यायाने मुहाजीर समाजाची साफसफाई करेल अशी धास्ती त्यांना वाटते. पाकिस्तानी सन्याचा मायनस वन फॉम्र्युला म्हणजे कराची उणे अल्ताफ हुसन आणि एमक्यूएम .. गेल्या मार्च महिन्यात सन्याने पक्षाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. एप्रिल महिन्यात झालेल्या राष्ट्रीय असेंब्लीच्या पोटनिवडणुकीत एमक्यूएमने ‘जागो, मुहाजीर जागो’ असा नारा देऊन कराचीवर आपले वर्चस्व निर्वविाद सिद्ध केले. ते सर्वाच्या जिव्हारी लागले आहे.
पाकिस्तानी मुहाजीरांचा आत्मशोध
आज कराचीतील चार कुटुंबांपकी तीन कुटुंबांचे भारतात आप्तस्वकीय आहेत. मुहाजीर समुदायाने त्यांना असणारी भारताची ओढ कधी लपवून ठेवली नाही. भारतीय संस्कृती त्यांना नेहमीच साद घालत असते. कराचीतील ओरंगी टाऊनमधील बनारसी क्लॉथ मार्केट असो वा अलिगढ कॉलनी, बिहार कॉलनी, दिल्ली कॉलनी, आग्रा ताज कॉलनी, पंजाबी सौदागरण कॉलनी, बेंगलोर टाऊन, बनारस चौक इत्यादी त्यांच्या (भारतीय) अस्मितेच्या/अस्तित्वाच्या खाणाखुणा त्यांनी जाणीवपूर्वक निर्माण करून जपल्या आहेत, हे विशेष. फाळणीनंतर हिजरत (स्थलांतरित) करून आलेल्यांनी (मुहाजीर) मोठय़ा संख्येने कराची, हैदराबाद आणि सिंध प्रांतात आश्रय घेतला होता. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम याच्या जोरावर या समुदायाने आपले विशेष आणि प्रबळ स्थान निर्माण केले आहे. हा समुदाय सर्वाधिक उच्चशिक्षित आणि वैचारिकदृष्टीने प्रगल्भ असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले आहे. परंतु, जिद्द आणि परिश्रमाने पाकिस्तानच्या निर्मितीत आणि उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मुहाजीर समाजाचा पाकिस्तानी जनतेला विसर पडला आहे. त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहिले जाते. त्यांना दुय्यम लेखले जाते, किंबहुना ते आता राष्ट्रद्रोही झाले आहेत. मुहाजीर समुदायाने या दुजाभावाला कंटाळून १९७६ सालीच नारा दिला होता की, ‘सिंध में होगा कैसा गुजरा, आधा हमारा, आधा तुम्हारा!’ अल्ताफ हुसन यांना आज सिंधप्रांतात स्वतंत्र राज्य हवे आहे. परंतु, ‘मरसु मरसु सिंध ना देसु’ असा नारा सिंधमध्ये केव्हाच
बुलंद झाला आहे. तेव्हा त्यांना स्वतंत्र
राज्य मिळणे कठीण आहे. एक उर्दू शेर अल्ताफ हुसन आणि मुहाजीर समाजाच्या दोलायमान मानसिकतेवर अचूक प्रकाश टाकतो. ‘जब हमारे पास मुल्क था (भारत), तब हम आजादी कि तलाश में निकले थे ! आज हम आजाद है, और मुल्क कि तलाश में हैं’!
‘रॉ’ आणि अल्ताफ हुसन यांचे नेमके संबंध शोधणे मोठे अवघड आहे. कारण भारतात यासंबंधी कधी खुली चर्चा झाली नाही. दुसरीकडे पाकिस्तान फक्त आरोप करतो पण सबळ पुरावे दाखवत नाही. २००९च्या इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात पाकिस्तानने काही पुरावे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दाखवले होते, तेव्हा त्यांचा चिंतातुर चेहरा मला आजही आठवतो. येत्या काही दिवसांत पाकिस्तानी सन्य भारतीय गुप्तचर संस्थांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर पुरावे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठेवण्याच्या तयारीत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज राहावयास हवे. पाकिस्तानी मुहाजीरांचे भारतीय गुप्तहेर संस्थांशी संबंध यावर पुराव्याअभावी फारसे बोलता येणार नाही, परंतु एक मात्र नक्की की मुहाजीरांचे भारतीय संस्कृतीशी घट्ट नाते आहे. यापासून काश्मीरमधील मिरवाईझ उमर फारुख, मसरत आलम, यासीन मलिक यांसारख्या फुटीरवादी नेत्यांनी बोध घ्यावा.
सुरेंद्र हरिश्चंद्र जाधव – surenforpublication@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 12:29 pm

Web Title: muhajir raw connection
टॅग : Pakistan
Next Stories
1 चोहीकडे? आनंद गडे!!
2 एम. फार्म : नवे नियम, नवा घोळ
3 साहित्य-सर्जनाचा संवाद
Just Now!
X