29 May 2020

News Flash

आली लहर..

महाराष्ट्रात गेले महिनाभर जे राजकीय महानाटय़ सुरू होते, त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे- अजित पवार!

(संग्रहित छायाचित्र)

 

मधु कांबळे

नव्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होतीलही कदाचित; परंतु त्यांच्या लहरी राजकारणाचे सावट या तीन-तिघाडय़ा सरकारच्या स्थिरतेवर कायम राहणार आहे..

महाराष्ट्रात गेले महिनाभर जे राजकीय महानाटय़ सुरू होते, त्यातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे- अजित पवार! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर पक्षात दबदबा असलेले नेतृत्व म्हणजे अजित पवार. त्यांना ‘दादा’ म्हणतात. मात्र दादांचे लहरी राजकारण कधी कधी पक्षाला आणि पक्षनेतृत्वालाही गोत्यात आणते.

यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपने शरद पवार यांना ठरवून लक्ष्य केले. मात्र कसलेले पवार भाजपशी दोन हात करायला निवडणुकीच्या मैदानात उतरले, त्यावेळी अजित पवारही शड्डू ठोकून आखाडय़ात उतरले होते. भाजपचे नेते तर यावेळी बारामतीत चमत्कार घडणार, अजित पवारांचा पराभव अटळ आहे, अशा आरोळ्या ठोकत होते. त्यातच फोडाफोडी करून अनेक आजी-माजी आमदारांची भाजपने पळवापळवी सुरू केली. त्यामुळे ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी’ असा राजकीय संघर्ष पेटणार असे वातावरण तयार झाले. अजित पवार तब्बल एक लाख ६५ हजार मतांनी निवडून आले, भाजपच्या उमेदवाराला अनामत रक्कमसुद्धा वाचवता आली नाही. राष्ट्रवादीच्या जागाही वाढल्या. त्यामुळे साऱ्यांच्याच जिवात जीव आला. पण ही सारी किमया पक्षनेतृत्व शरद पवार यांची.

निवडणुकीचे निकाल असे होते की, राष्ट्रवादीला पुन्हा विरोधी पक्षात बसावे लागणार होते. त्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली होती. अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, अशीही अटकळ होती. त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदीही निवड करण्यात आली; त्यावेळी केलेल्या भाषणात अजितदादांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीची थेट लढाई भाजपशीच, असे वातावरण तयार झाले.

मात्र, पुढे महाराष्ट्राचे राजकारणच वेगळे वळण घेऊ  लागले. मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधायला सुरुवात केली. त्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आडाखे बांधले जाऊ  लागले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी मोट बांधण्याची अवघड जबाबदारी पवार पार पाडत होते. त्यात यश येणार असे वातावरण तयार झाले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही सारी जमवाजमव सुरू असताना भाजपच्या गोटातून वेगळेच डाव रचले जात होते. आपल्या हातून सत्ता जाणार त्याचे कारण शरद पवार, असे भाजप नेत्यांना वाटू लागले आणि पवारांनाच धक्का देण्याचा डाव त्यांनी टाकला. चक्क अजित पवार यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. आदल्या रात्री शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बैठकीला हजर असणाऱ्या अजित पवार यांना सकाळी सकाळी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दूरचित्रवाहिन्यांवर पाहून सर्वानाच धक्का बसला. मात्र अजितदादांच्या लहरी राजकारणाने अजिबात विचलित न होता, शरद पवारांनी पक्षावर संपूर्ण ताबा घेतला. अजित पवारांचे बंड मोडून काढण्याची रणनीती आखली गेली. नव्याने उभ्या राहणाऱ्या आघाडीचा दबाव वाढवून त्यांना भाजपच्या सापळ्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले. त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही हातभार लागला. याआधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीविरोधात शरद पवार मैदानात उतरले असतानाही अजित पवार अचानकपणे आमदारकीचा राजीनामा देऊन गायब झाले होते. निकालानंतरच्या सत्तानाटय़ातील त्यांच्या हालचाली बघता, या राजीनामानाटय़ाचे गूढ उकलायला मदत होऊ शकेल.

अजितदादा आता पुन्हा पक्षात आले असले तरी, त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या नव्या सरकारात पुढे अजितदादांना सहभागी करून उपमुख्यमंत्रीही केले जाईल. परंतु त्यांच्या लहरी राजकारणाचे सावट या तीन-तिघाडय़ा सरकारच्या स्थिरतेवर कायम राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2019 12:44 am

Web Title: ncp ajit pawar assembly election abn 97
Next Stories
1 बिगरभाजप राजकारणाचा धडा
2 ‘महा’मुत्सद्दी!
3 शिवसेनेसोबतच्या आघाडीचे शिल्पकार
Just Now!
X