19 September 2020

News Flash

मुक्तिसंग्रामातील उपेक्षित

हैदराबादच्या मुक्तिसंग्रामातील दलितांचा सहभाग विवक्षित ठिकाणी उल्लेख होऊनही दुर्लक्षितच राहिला आहे, अशी मांडणी करणारे हे टिपण..

(संग्रहित छायाचित्र)

बी. व्ही. जोंधळे

हैदराबादच्या मुक्तिसंग्रामातील दलितांचा सहभाग विवक्षित ठिकाणी उल्लेख होऊनही दुर्लक्षितच राहिला आहे, अशी मांडणी करणारे हे टिपण.. १७ सप्टेंबरच्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने!

हैदराबाद संस्थानातील जुलमी नि धर्माध निजामी राजवट उलथून टाकण्यासाठी स्टेट काँग्रेस, आर्य समाज, समाजवादी गट, कम्युनिस्ट पक्ष आदींनी मोठा लढा उभारला होता. तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानात पोलीस कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त करून भारतीय संघराज्यात विलीन केले. म्हणजे देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र हैदराबाद संस्थानातील प्रजेला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाले. मराठी भाषा, मराठी संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक व राजकीय हक्क यांच्या प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला, दहशतवाद व दडपशाहीविरुद्ध जो रणसंग्राम केला, तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. हैदराबाद संस्थानाच्या तेजस्वी इतिहासाची नोंद ग्रंथकर्त्यांनी व वृत्तपत्रांनी अक्षरबद्ध केली आहे. पण हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलित चळवळीचे योगदान अनुल्लेखाने मारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थानातील दलित चळवळीबाबत बुद्धिभ्रम निर्माण करून गैरसमजच प्रसृत करण्यात आले. ‘डॉ. आंबेडकरांचा हैदराबाद संस्थानाशी संबंधच आला नव्हता, निजामाचे बाबासाहेबांशी मत्रिपूर्ण संबंध होते आणि या भागातील पूर्वाश्रमीचे महार कासीम रझवीच्या संघटनेत मोठय़ा प्रमाणात सामील झाले होते’ असे खोटे आरोप करण्यात आले. पण ‘मराठवाडय़ातील दलित चळवळ आणि हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम’ (लेखक- प्रा. नरेंद्र गायकवाड, सुगावा प्रकाशन, पुणे), ‘डॉ. आंबेडकर आणि हैदराबाद संस्थान (लेखक- डॉ. एस. एस. नरवडे), ‘अवर स्ट्रगल फॉर इमॅन्सिपेशन’ (लेखक- पी. आर. व्यंकटस्वामी), ‘आंबेडकरी चळवळ आणि हैदराबाद संस्थानातील दलित मुक्तिसंग्राम’ (लेखक- डॉ. एल. वाय. अवचरमल, सुगावा प्रकाशन, पुणे), ‘मराठवाडय़ातील प्रबोधनपर्व’ (संपादक- डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. राजेंद्र गोणारकर) आणि डॉ. बी. एस. ढेंगळे यांचे शोधनिबंध पाहता, हैदराबाद संस्थानातील दलित चळवळीचे योगदान कसे कावेबाजपणे नाकारून बदनाम करण्यात आले हे लक्षात येते. खरे तर मराठवाडय़ात स्वातंत्र्यसनिकांच्या तुकडय़ांनी केलेल्या विविध कृतिमोहिमांमध्ये दलितही सहभागी होते. आर्य समाजाने केलेल्या सत्याग्रहात दलितांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. डॉ. आंबेडकरांच्या सांगण्यानुसार हैदराबाद शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनने स्पष्टपणे निजामविरोधी भूमिका घेतली होती.

हैदराबाद संस्थानात दलितांना अस्पृश्यतेच्या दुहेरी जाचाला तोंड द्यावे लागत होते. एक तर सवर्ण हिंदूंच्या आणि दुसरीकडे मुस्लीम धर्माधतेच्या. आर्थिक शोषण कमालीचे होते. शिक्षणाचा गंध नव्हता. अस्पृश्यांसाठी ज्या शाळा होत्या त्यांना मदरसा-ए-अर्जल म्हणत (अर्जल म्हणजे नीच, हलकट). पुढे निजामाच्या सरकारात बी. एस. व्यंकटराव यांचा शिक्षणमंत्री म्हणून समावेश झाला तेव्हा त्यांनी या शाळांचे नामकरण मदरसा-ए-पस्तअरव्वाम (दलितांची शाळा) असे केले. थोडक्यात, निरक्षरता, दारिद्रय़, गावकी अशा जखडबंद साखळदंडांनी दलितांचे जीवन बंदिस्त झालेले असतानाही त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला हे विशेष.

हैदराबाद संस्थानात अन्य राष्ट्रीय नेत्यांप्रमाणेच बाबासाहेबांनाही प्रवेशबंदी होती. तेव्हा बाबासाहेब १९३८ साली मकरणपूर (आताच्या कन्नड तालुक्यातील) या ब्रिटिश हद्दीतील गावी झालेल्या जिल्हा दलित परिषदेला उपस्थित होते. या परिषदेत मराठवाडय़ाचे नेते भाऊसाहेब मोरे, स्वागताध्यक्ष बी. एस. जाधव यांनी संस्थानातील अस्पृश्यतेचा जाच बाबासाहेबांच्या कानी घातला होता. बाबासाहेबांनी त्या वेळी संस्थानातील दलितांच्या प्रश्नात आपण लक्ष घालू असे आश्वासन दिले होते. बाबासाहेबांना हैदराबाद संस्थानात जरी बंदी असली तरी संस्थानातील दलित नेत्यांशी बाबासाहेबांचा चांगलाच संपर्क होता.

डॉ. आंबेडकरांची निजामाबाबतची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी म्हटले होते, पाकिस्तान किंवा हैदराबादेतील अनुसूचित जातींनी निजाम वा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवणे आत्मघातकीपणाचे ठरेल. निजाम हा भारताचा नंबर एकचा शत्रू असल्यामुळे अनुसूचित जातीच्या एकाही व्यक्तीने निजामाशी सहकार्य करू नये, तसेच मुस्लीम धर्म स्वीकारू नये. बाबासाहेबांना निजामाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची बाजू मांडावी म्हणून केलेली विनंती बाबासाहेबांनी धुडकावून लावली होती.

काही महार रझाकार झाले होते हे खरे, पण ते तत्कालीन शोषित समाजव्यवस्थेचे बळी होते. महारांबरोबरच अन्य दलित जातींचे लोकही रझाकार झाले होते. या संदर्भात जनरल के. एम. मुन्शी म्हणतात, दलित रझाकारांनी हिंसक कृती, खून, स्त्रियांचा विनयभंग, बलात्कार यांसारख्या अनैतिक कृत्यांत भाग घेतला नव्हता. ज्या गावी मुस्लिमांची संख्या जास्त तिथे दलित समाजातील तरुण मुस्लिमांच्या बाजूने ते सांगतील ती कामे करीत आणि ज्या गावी हिंदू मंडळींचे प्राबल्य आहे तिथे मुक्तिसंग्रामासाठी लढणाऱ्यांबरोबर ते होते. अशा स्थितीत ‘प्रत्येक गावचा महारवाडा रझाकारांच्या चळवळींचा विश्वासू भागीदार बनला होता’ असा विषारी आरोप का करण्यात यावा? हैदराबाद संस्थानातील सर्व दलित नेते धर्मातरविरोधी होते. मराठवाडय़ात धर्मातरित दलितांना स्वजातीत आणण्याचे मोठे काम भाऊसाहेब मोरे यांनी केले. पोलीस कारवाईत दोन हजारपेक्षा जास्त रझाकारांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी ३४० रझाकारांवर खटले चालविण्यात आले. त्यांना आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा देण्यात आली. अटक झालेल्या रझाकारांत एकही दलित नव्हता. शिवाय जे रझाकार मारले गेले त्यात एकही दलित जातीचा नव्हता हे विशेष.

दलितांचे नेते व दलित समाज रझाकारांना सामील होते, हा आरोप किती बिनबुडाचा आहे या संदर्भातील हे उदाहरण लक्षणीय ठरावे. १९४८ साली भारत सरकार कोणत्याही वेळी हैदराबादविरुद्ध सनिकी कारवाई करील अशी स्थिती निर्माण झाली होती. निजामाचा पाठिंबा असलेल्या रझाकार संघटनेच्या मनात हिंदूच्या सामूहिक कत्तलीचा कट घोळत होता. कासीम रझवीने ३१ मार्च १९४७ ला गुप्त बैठक घेऊन त्यात हिंदूंच्या कतलेआमचा ठराव मांडला. तेव्हा शामसुंदर व व्यंकटराव हे दलित नेते स्तंभित झाले. त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. मुत्सद्देगिरीने ते म्हणाले, ‘हिंदू कसे ओळखणार? हिंदूंप्रमाणेच धोतर-शर्ट वापरणाऱ्या दलितांचीही कत्तल होईल.’ रझवीने अनेक युक्तिवाद करून सामूहिक कत्तलीचा आग्रह धरला. परंतु दोघांच्याही थंड उत्तराने तो थिजून गेला. दोघांपैकी एकाने जरी किंचित अनुकूलता दर्शवली असती तर अ‍ॅक्शनपूर्व कतलेआममध्ये हजारो निष्पाप हिंदू मारले गेले असते. परंतु व्यंकटराव व शामसुंदर यांनी हे होऊ दिले नाही. तरीही दलित समाजाला रझाकाराचे हस्तक ठरविले जावे?

याशिवाय हैदराबाद मुक्तिलढय़ात दलित स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी दलित समाजाचे कार्यकर्ते आमच्या लढय़ात सहभागी होते असे म्हटले आहे. ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाचे लेखक प्रा. उत्तम सूर्यवंशी यांनी म्हटलेय, या लढय़ात हिंदू, मुस्लीम, दलित, आदिवासी व स्त्रिया यांनी सक्रिय भाग घेतला. निजामावर बॉम्ब फेकणाऱ्या कटातील एक सूत्रधार आर्यवीरदलाचे स्वयंसेवक जगदीश आर्य (हैदराबाद) यांनी म्हटलेय, ‘मराठवाडय़ातील दलितांनी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय मदत केली. परंतु तेच आज अज्ञातावस्थेत आहेत.’ स्वातंत्र्यसैनिक अमृत द. कुरुंदकर यांनी अंबड येथील इतिहास परिषदेत सादर केलेल्या शोधनिबंधात म्हटले आहे, ‘भारतीय स्वातंत्र्यलढय़ात भाग घेणाऱ्या दलितांचे जे प्रमाण असेल त्यापेक्षा अधिक प्रमाण हैदराबाद मुक्तिलढय़ात दलितांचे होते.’ पत्रमहर्षी अनंत भालेरावांनी ‘हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा’ या ग्रंथात दलित हुतात्म्यांचा उल्लेख केला आहे. मराठवाडय़ातील हुतात्मा स्मारकाच्या उभारणीनिमित्ताने प्रकाशित ‘हुतात्मा दर्शन’ या जिल्हा माहिती पुस्तकातही दलित हुतात्म्यांची नावे आढळतात. वसंत ब. पोतदार यांनी ‘हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम’ या ग्रंथात मराठवाडय़ाच्या प्रत्येक तालुक्यातील दलित स्वातंत्र्यसैनिकांची व हुतात्म्यांची नावे नोंदवली आहेत.

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांच्या सहभागाची उपेक्षाच झालेली असताना दुसरीकडे काही जाणकारांनी विस्कळीत फुटकळ स्वरूपात लेखन करून हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांच्या सहभागाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला हे खरे. पण मराठवाडय़ातील सामाजिक सलोखा दृढ करण्याच्या दृष्टीने हैदराबाद मुक्तिसंग्रामातील दलितांच्या सहभागाचा इतिहास महाराष्ट्र शासनाने प्रकाशन समिती स्थापून नव्याने लिहून काढला पाहिजे असे वाटते.

(लेखक दलित चळवळीचे अभ्यासक आहेत. )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 12:05 am

Web Title: participation of dalits in the liberation struggle of hyderabad is ignored even though it is mentioned in various places abn 97
Next Stories
1 पिकेल खूप; पण विकेल काय?
2 खरे ‘मध्यमवर्गीय’ कोण?
3 डाळिंबावर तेल्याचे संकट
Just Now!
X