पंधरवडय़ापूर्वीच नामवंत उर्दू कथालेखक, कादंबरीकार जोगेंद्र पॉल यांचे निधन झाले. त्यानंतर आता देशातील अग्रगण्य उर्दू विद्वानांमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते,  ते असलूब अहमद अन्सारी यांच्या निधनाची बातमी आली. या दोन्ही साहित्यिकांनी नव्वदी पार केली होती. डॉ. अन्सारी हे अलिगढ विद्यापीठात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते तरी उर्दू भाषेचाही त्यांचा अफाट व्यासंग होता. गालिबचे काव्य एक अनोखे सौंदर्यविश्व आहे. ‘रंज का खूंगर हुआ इन्सां, तो मिट जाता हे रंज, मुश्किलें मुझ पर इतनी पडी कि आसाँ हो गई।’ असे म्हणणाऱ्या या शायराने अनेकांना भुरळ घातली. मराठी साहित्यप्रेमींना दिवंगत विद्याधर गोखले, गुलजार, डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासारख्या साहित्यिकांमुळे तरी गालिबचा चांगला परिचय झाला; पण डॉ. अन्सारी यांचे वैशिष्टय़ हे की, गालिबबरोबरच इक्बालच्या आणि इंग्रजीतील आधुनिकपूर्व काळातील शेक्सपीअरसोबतच आधुनिकतावादाची पहाट होण्यापूर्वीच आधुनिक विचारांचे पैलू दाखविणारा इंग्रजी कवी विल्यम ब्लेक यांच्याही प्रेमात बुडालेले. उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे जन्मलेल्या अन्सारी यांनी इंग्रजी साहित्यातच एमए केले. दुसरीकडे उर्दू ही मातृभाषा आणि नोकरीसाठी अलिगढ मुस्लीम विद्यापीठासारखे ठिकाण.. एवढे या बहुअंगी साहित्यप्रेमासाठी पुरेसे होते.

इंग्रजीचे अध्यापन करतानाच उर्दूतील उत्तमोत्तम पुस्तके त्यांनी वाचली. ‘सारे जहाँ से अच्छा..’ या राष्ट्राभिमान गीतामुळे जगाला परिचित झालेले मुहम्मद इक्बाल यांच्या साहित्याचा दांडगा अभ्यास त्यांचा होता. इंग्रजी भाषेचे व्यासंगी प्राध्यापक आणि उर्दूचे जाणकार या नात्याने देशविदेशातील अनेक विद्यापीठांत व्याख्याने देण्यासाठी त्यांना निमंत्रित केले जात  असे. ‘अलिगढम् क्रिटिकल मिसलेनी’ व ‘नक्द-ओ-नज्मर’ या नामांकित अभ्यासपत्रिकांचे ते संपादक होते. समीक्षेवरील ‘अ‍ॅरोज ऑफ इंटलेक्ट’ हे अन्सारी यांचे पहिले पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. साहित्य क्षेत्रात त्याची दखल घेतली गेल्याने अमेरिकेतही १९७० मध्ये ते पुनर्मुद्रित करण्यात आले. विल्यम  ब्लेक हा ब्रिटिश कवी त्याच्या काळात दुर्लक्षित राहिला. अन्सारी यांचे शेक्सपीअरच्या नाटकांवर जितके प्रेम होते तेवढेच ब्लॅकच्या काव्यावरही होते. त्याच्या काव्याचा समग्र आढावा घेणारे ‘विल्यम ब्लेक्स मायनर प्रोफेसीज’ हे त्याचे दुसरे पुस्तक एडवीन मेलेन प्रेसने २००१ मध्ये काढले होते. शेक्सपीअर व ब्लेक यांच्यावर अधिकारवाणीने बोलणारा वक्ता म्हणून ते पाश्चात्त्य जगातही ओळखले जात. ब्रिटनमधील स्ट्रॅटफर्ड येथे भरणाऱ्या वर्ल्ड शेक्सपीअर कॉन्फरन्समध्ये ते अनेक वेळा सहभागी झाले होते. शेक्सपीअरवर वेळोवेळी लिहिलेले त्यांचे लेख आजही साहित्याच्या अभ्यासकांना साभूत ठरतात.

इक्बाल त्यांचा आवडता कवी असल्याने त्याच्यावरही अन्सारी यांनी विपुल लेखन केले. ‘इक्बाल की तेरह नज्में’ या १९८० मध्ये आलेल्या त्यांच्या पुस्तकाचे अभ्यासकांनी कौतुक केले. इक्बाल यांच्या काव्याची नवी ओळख या पुस्तकामुळे झाल्याने ‘साहित्य अकादमी’च्या पुरस्काराची राजमुद्रादेखील अन्सारी यांच्या विद्वत्प्रतिभेवर उमटली. कवी इक्बाल यांच्या काव्याचा सखोल अभ्यास आणि तितकीच त्याची मूलगामी समीक्षा केल्याबद्दल त्यांना मग गालिब पुरस्कार आणि बहादूर शहा जफर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याशिवाय साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा मीर तकी मीर पुरस्कार, उत्तर प्रदेश उर्दू अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले. विदेशातील विविध विद्यापीठांच्या नियतकालिकांनी त्यांचे लेख आवर्जून प्रसिद्ध केले. २००६ मध्ये त्यांना गोरखपूर विद्यापीठाने डी.लिट. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता.

आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या अजातशत्रू साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीत समीक्षक म्हणून नाव कमावतानाच अभिजात उर्दू कवींची समीक्षा इंग्रजीमध्ये नेणारा आणि इंग्रजी कवींबद्दल उर्दूत सांगणारा दुवा त्यांच्या जाण्याने निखळला आहे.