शिवसेना पक्षाचा सामाजिक आधार विस्तारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठा-कुणबी समूह शिवसेनेकडे सरकला आहे. याखेरीज मुंबई-ठाणे भागात शिवसेना पक्षाला मराठा भाषिकांच्या खेरीज अमराठी भाषिकांनी सामाजिक पाठिंबा दिला आहे. मराठीभाषिक आणि अमराठी भाषिकांची युती झालेली दिसते. हा सामाजिक आधार भाजप-शिवसेनेचा कणा ठरला आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचा पुनर्जन्म झाला. ही या निवडणुकीतील महाराष्ट्राच्या संदर्भात मोठी मनोरंजक कथा ठरली आहे. गेले एक दशकभर शिवसेनेची राजकीय कोंडी झाली होती. शिवसेनेची राजकीय कोंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी केली होती. यामध्ये गेल्या पाच वर्षांत भाजपची भूमिकादेखील महत्त्वाची होती. मात्र या लोकसभा निवडणुकीत नाटय़मयरीत्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल झाला. शिवसेनेच्या मदतीस मोदी घटक आला. मोदी घटकामुळे शिवसेना पक्षाची कोंडी फुटली. मोदी घटकामुळे शिवसेना थेट अठरा जागांवर गेली. राज्य पातळीवर शिवसेनेबरोबर युती करावी, की न करावी, शिवसेनेखेरीज मनसेबरोबर युती करावी किंवा मनसेने महायुतीत यावे, अशा प्रकारचा प्रवाह भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर होता. मथितार्थ भाजप शिवसेनेबरोबर युती करण्यासंदर्भात संदिग्ध होती. गडकरी यांनी मनसेने उमेदवार उभे करू नयेत, अशी भूमिका घेतली होती. मात्र सरतेशेवटी या सर्व प्रकारच्या संदिग्धता मोदी घटकामुळे एकदम नष्ट झाल्या. केवळ भाजपची आघाडी कोणाशी आहे, त्या आघाडीतील घटक पक्षाला मत देणे म्हणजे थेट मोदींना मत देणे अशी भूमिका मतदाराची राहिली. यामुळे शिवसेनेला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विरोधात लढा देण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. शिवाय मोदी घटकामुळे शिवसेना-भाजप संबंधांची एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून फेररचना झाली. शिवसेना आणि मनसे यांच्यापैकी कोणाबरोबर जावे, हा यक्ष प्रश्न मतदाराच्या समोर होता. गेल्या पाच वर्षांत मनसेबद्दल जनतेमध्ये मतभिन्नता उदयास आली. मनसे केवळ शिवसेना पक्षाला पराभूत करण्यासाठी नकारात्मक राजकारण करते, हा मुद्दा जनतेच्या मनामध्ये होता. यामुळे शिवसेना, मनसे आणि आघाडी अशी राजकीय स्पर्धा झाली नाही. मनसे हा घटक जनतेने नाकारला. त्यामुळे सरळ राजकीय स्पर्धा दुहेरी झाली. दुहेरी राजकीय स्पर्धेचा थेट फायदा शिवसेना पक्षाला झाला. कल्याण, ठाणे, नाशिक, मावळ, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई येथे निवडणूक दुहेरी राजकीय स्पर्धेत जनतेने बंदिस्त केली. त्याचा परिणाम म्हणून शिवसेनेला केवळ नवसंजीवनीच मिळाली नाही तर थेट शिवसेनेचा पुनर्जन्म झाला. प्रत्येक फेरीत नाशिकमध्ये शिवसेनाच पुढे राहिली, तर मनसेची अनामत रक्कम जप्त झाली, तर काही ठिकाणी मनसे तिसऱ्या स्थानावर गेली. याचे महत्त्वाचे कारण मनसेला शि   वसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्यामध्ये अंतर ठेवून विस्तार करण्यास अपयश आले. शोषित जनतेचा आवाज राज ठाकरे होते. तो आवाज या निवडणुकीत मतदारांना भावला नाही. राजच्या तुलनेत मोदींची नवनिर्माणाची कल्पना जनतेला आकर्षक वाटली. उद्योगाशी मैत्री, शेती-उद्योग या दोन घटकांचा समन्वय, सुशासन आणि वरून खाली या पद्धतीने विकास ही नवउदारमतवादी आणि मोदीवादी विचारप्रणाली शिवसेनेचा आधार ठरली आहे.
शिवसेना-भाजप यांच्या संबंधाची पुनर्रचना २००९ मध्ये झाली होती. त्या पुनर्रचनेवर हा शिक्का मारला गेला. याचाच अर्थ शिवसेनेची ‘हिंदुहृदयसम्राट’ ही प्रतिमा भाजपकडे सरकली आहे. भाजपचे नियंत्रण शिवसेनेवर आले. शिवसेना-भाजप यांचा राजकीय व्यवहार बदलला आहे. शिवसेनेला सातत्याने भाजपबरोबर जुळवून घ्यावे लागेल. कारण लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना भाजपची केंद्रात कोंडी करू शकणार नाही.
१९८९ ते २००४ पर्यंत शिवसेनेकडे असलेले ‘निर्णय निश्चिती’चे केंद्र भाजपकडे सरकले आहे. त्यामुळे शिवसेनेची राजकीय भूमिका भाजपच्या तुलनेत दुय्यम राहील, असा या निकालाचा अर्थ होतो.
शिवसेना पक्षाचा सामाजिक आधार विस्तारला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा मराठा-कुणबी समूह शिवसेनेकडे सरकला आहे. बंडू जाधव, श्रीकांत शिंदे, गोडसे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव, रवींद्र गायकवाड हे मराठा आहेत, अशी उदाहरणे आहेत. याखेरीज मुंबई-ठाणे भागात शिवसेना पक्षाला मराठा भाषिकांच्या खेरीज अमराठी भाषिकांनी सामाजिक पाठिंबा दिला आहे.
मराठीभाषिक आणि अमराठी भाषिकांची युती झालेली दिसते. हा सामाजिक आधार भाजप-शिवसेनेचा कणा ठरला आहे. भाजप-शिवसेना यांच्या या सामाजिक आधाराचा अर्थ सर्वसमावेशक स्वरूपाकडे सरकलेला आहे. कारण आठवले गट शिवसेनेने जोडला होता. तसेच शेतकऱ्यांचे हितसंबंधांचे प्रतीक राजू शेट्टी यांच्याशी जुळवाजुळवी केली. याखेरीज शिवसेना पक्षाचा गेल्या पाच वर्षांत मुस्लिमांशी फार मोठा तणाव निर्माण झाला नाही. याचा मथितार्थ शिवसेना राज्यात पुन्हा व्यापक झाली आहे. तिचा विजय चतुर राजनीती नाही तर सर्वसमावेशक जनाधारांचा विजय ठरला आहे.