प्रणब मुखर्जी (प्रणबदा) यांची राजकीय कारकीर्द पाच दशकांची. त्यात त्यांनी अनेक भूमिका पार पाडल्या आणि जबाबदाऱ्या निभावल्या. काँग्रेसचा प्रचारकर्ता ते १३ वा राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ रोजी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्य़ातील मिराती खेडय़ातला. विद्यार्थिदशेत त्यांनी इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास केला. नंतर कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी ते काही काळ सरकारी कारकून होते. नंतर राज्यशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक झाले आणि पत्रकारही बनले.

प्रणबदांची राजकीय कारकीर्द १९६९ मध्ये सुरू झाली. व्ही.के. कृष्ण मेनन हे मिदनापूर मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवीत असताना त्यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांनी सांभाळली. मुखर्जी यांच्यातील कौशल्ये पाहून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. त्याच वर्षी ते राज्यसभेचे सदस्य बनले. नंतर काँग्रेस पक्षात त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

प्रणबदा १९७३ मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. इंदिरा गांधी यांचे ते विश्वासू सहकारी बनले. १९८२ मध्ये ते केंद्रातील सर्वात तरुण अर्थमंत्री होते. त्या वेळी ते ४७ वर्षांचे होते. १९८२-८४ या काळात ते अर्थमंत्री होते, तर १९८० ते १९८५ या काळात ते राज्यसभेत नेते होते.

मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून करपद्धतीत बदल केले. पूर्वलक्ष्यी प्रभावाने प्राप्तिकर आकारण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला, त्यामुळे व्होडाफोन प्रकरण झाले. त्यांनी बंद केलेली कर प्रकरणे परत सुरू केली. त्यामुळे भारतात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला.

काँग्रेस पक्षात काम करीत असताना त्यांची पंतप्रधानपदाची संधीही हुकली. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मुखर्जी काँग्रेस अध्यक्षपदाचे दावेदार होते, पण ते पद त्या वेळी राजीव गांधी यांच्याकडे गेले. त्यांना शेवटपर्यंत सत्तासंघर्ष करावा लागला. त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा स्वत:चा पक्ष काढला होता. तो १९८९ मध्ये काँग्रेसमध्ये विलीन केला. नरसिंह राव पंतप्रधान असताना पुन्हा मुखर्जी यांची कारकीर्द बहरली.  ते १९९१ मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर १९९५ मध्ये परराष्ट्रमंत्री. १९९८ मध्ये सोनिया गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदी  विराजमान करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. राजीव गांधी यांच्याशी त्यांचे संबंध फार चांगले नव्हते. प्रणबदा २००४ मध्ये  पश्चिम बंगालमधील जांगीपूर येथून लोकसभेवर निवडून आले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना संरक्षण (२००४-०६), परराष्ट्र (२००६-०९), अर्थ (२००९-१२) ही महत्त्वाची पदे दिली. ३९ मंत्रिगटांचे नेतृत्व त्यांनी केले. लोकसभेत ते काँग्रेसचे नेते होते.

संयुक्त पुरोगामी आघाडीने त्यांच्या नावाची शिफारस २०१२ मध्ये राष्ट्रपतिपदासाठी केली. त्या वेळी प्रणब मुखर्जी यांनी पी.ए. संगमा यांचा ७० टक्के मते मिळवून पराभव केला. २०१७ पर्यंत ते राष्ट्रपती होते. त्याच वर्षी ते राजकारणातून निवृत्त झाले. त्यांचे सर्व पक्षांत मित्र होते. प्रणबदा यांना २००८ मध्ये पद्मविभूषण तर २०१९ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते.

प्रणब मुखर्जी यांची ग्रंथसंपदा

* बियाँड सव्‍‌र्हायव्हल- इमर्जिग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी- १९८४

* ऑफ द ट्रॅक-१९८७

* सागा ऑफ दी स्ट्रगल अँड सॅक्रिफाइस-१९९२

* चॅलेंजेस बिफोर नेशन-१९९२

* थॉटस अँड रिफ्लेक्शन्स २०१४

* दी ड्रॅमेटिक डिकेड-  इंदिरा गांधी इयर्स २०१४

* दी टब्र्युलंट इयर्स- १९८०-२०१६ (२०१६)

* दी कोअ‍ॅलिशन इयर्स १९९६-२०१२ (२०१७)

श्रद्धांजली

संसदीय राजकारणातील भीष्म पितामह

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, संघटनकौशल्य, प्रशासकीय व संसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप उमटविणाऱ्या निवडक राजकारण्यांमध्ये प्रणब मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे देशाने संसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहेत. गेल्या पाच दशकांमध्ये प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची उंची वाढविली. मुखर्जी यांनी संसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण  योगदान दिले.

– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

महान मुत्सद्दी नेता

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे.  संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणबबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राजकारणातील एक पर्व

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्या पदाचा मान आणि सन्मान वाढविला. प्रणबदांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले.

– बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री

थोर मुत्सद्दी नेतृत्व

प्रणब मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावला.  अर्थ नीती व परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

-अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

प्रगल्भ राजकारणी

मुखर्जी यांच्या निधनामुळे गेल्या साठ वर्षांतील एका यशस्वी राजकीय जीवनाची अखेर झाली आहे. ते एक मुत्सद्दी, व्यासंगी आणि प्रगल्भ राजकारणी होते.

-डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार