ऋषिकेश मुळे

उपेक्षित माणसांना वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बालकाश्रम वगैरेंचा तरी आसरा मिळतो. पण अपंग, जखमी प्राण्यांचे काय, हा प्रश्न पडल्यानंतर गणराज जैन यांनी स्वत:च त्यावर उत्तर शोधले. हे उत्तर म्हणजे- ‘पाणवठा : अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम’!
हा ‘पाणवठा’ उपचारांबरोबरच या जखमी, अपंग प्राण्यांवर मायेची फुंकर घालतो..

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

बदलापूरच्या चामटोली गावातील ‘पाणवठा-अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम’! महापूर पाहुणा बनून येथून येऊन गेला हे तिथे पोहोचता क्षणीच लक्षात येते. प्राण्यांचे पिंजरे, इतर सामानाचीही नासधूस झालेली. पण जखमी प्राण्यांच्या सेवेत कुठेही खंड पडलेला नाही. गणराज जैन आणि त्यांची पत्नी डॉ. अर्चना पोटच्या गोळ्याप्रमाणे त्यांची सेवा करत असल्याचे पाहिल्यानंतर एका अनोख्या भूतदयेची प्रचीती येते.

गणराज हे काही वर्षांपूर्वी महाडला गेले होते. त्या वेळी त्यांना सर्पदंश झाला. मात्र, सर्पमित्र असलेल्या गणराज यांच्या मनात पशू, प्राण्यांबाबत असलेली भूतदया या घटनेने दुणावली. प्राण्यांसाठी अधिक संवेदनशीलतेने आणि खोलवर जाऊन काम करणे गरजेचे आहे, हे त्यांना प्रकर्षांने जाणवले. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. मात्र, अपंग प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था नाहीत, याची जाणीव जैन यांना झाली. या विचारांना नियोजन आणि कार्यतत्परतेची जोड देऊन गणराज जैन यांनी भारतातील पहिल्या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमाची स्थापना केली.

गणराज यांनी आधी महाड येथे प्राण्यांसाठीचे उपचार केंद्र उभारले होते. मात्र, आर्थिकदृष्टय़ा ते चालवणे अशक्य झाले होते. त्या वेळी मित्राने बदलापूर येथे प्राण्यांवर उपचार केंद्र सुरू करण्याचा सल्ला गणराज यांना दिला. त्यानुसार गणराज यांनी पत्नीसह थेट बदलापूर गाठले. अडीच वर्षांपूर्वी गणराज  आणि डॉ. अर्चना या दाम्पत्याने मिळून अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम म्हणून ‘पाणवठा’ हा प्रकल्प बदलापूर येथील चामटोली येथे सुरू केला. सुमारे ५० गुंठे जमिनीवर वसलेल्या या प्रकल्पात गणराज आणि डॉ. अर्चना इतर स्वयंसेवकांच्या मदतीने अपंग प्राण्यांचा सांभाळ करतात. सुरुवातीला इतक्या कमी जागेत प्राण्यांना सांभाळणे कठीण जात होते. पुरेशा निधीअभावी प्राण्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवणे जिकरीचे जात होते. पण या प्रकल्पाला ग्रामस्थांनी साथ दिली. पाणी आणि विजेचा प्रश्न गावकऱ्यांनीच सोडवला. आता कोठेही रस्त्यावर अपंग प्राणी दिसला तर गावकरी प्रथम गणराज यांच्याशी संपर्क साधतात आणि प्राण्यांना ‘पाणवठा’मध्ये घेऊन येतात. ‘पाणवठा’मध्ये अपंग प्राण्यांना आणल्यानंतर तिथे त्यांच्यावर आवश्यक उपचार होतात. अनेकदा हे उपचार दीर्घकाळ चालतात. गरज भासेल तेव्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले जाते.

आपल्या हद्दीत एखादा प्राणी वनविभागाला जखमी किंवा अपंग अवस्थेत आढळून आला तर वनविभाग जैन यांच्याशी संपर्क साधते. अशा प्राण्यांना वनविभाग पाणवठा अनाथाश्रमाकडे सोपवते. तिथे या प्राण्यांचा सांभाळ, पालनपोषण होते. गणराज हे स्वखर्चातून या प्राण्यांचा सांभाळ करतात. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर, तो प्राणी बरा झाल्यानंतर त्यांना वनविभागाच्या हवाली करण्यात येते. अशा १५० हून अधिक प्राण्यांचा सांभाळ पाणवठा प्रकल्पात करण्यात आला. उपचारानंतर बऱ्या झालेल्या प्राण्यांना पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे. आतापर्यंत इतर प्राण्यांसह मगर, खवल्या मांजर, मोर, सर्प आदींना जखमी अवस्थेत अनाथाश्रमात आणण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यावर वनविभागाच्या सूचनेनुसार त्यांना नियोजित स्थळी सोडण्यात आले आहे.  एखादा प्राणी कुठे अडकून पडला असेल, तर गणराज यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याची सुटका करण्यापासून ते पुढील काळजी घेण्याचे काम गणराज करतील, असा विश्वास आता येथील ग्रामस्थांमध्येही निर्माण झाला आहे. गणराज हे पूर्ण वेळ या प्रकल्पात असतात, तर डॉ. अर्चना या वांगणी येथे एक रुग्णालय चालवतात. त्याद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून पाणवठा प्रकल्पाचा खर्च भागवला जातो. प्राण्यांचा सांभाळ आणि त्यांच्यावरील उपचाराचा सर्व खर्च जैन दाम्पत्य करते. नि:स्वार्थ भावनेने अशा अपंग प्राण्यांना सांभाळताना आत्मिक समाधान मिळते, असे गणराज सांगतात.

सध्या ‘पाणवठा’ प्रकल्पात २५ प्राणी आहेत. २७ आणि २८ जुलै रोजी बदलापुरात आलेल्या महापुरामुळे या प्रकल्पातील १० प्राण्यांचा मृत्यू झाला. महापुरात प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले. सरकारने या पाणवठा प्रकल्पाला प्राण्यांच्या अनाथाश्रमाचा दर्जा द्यायला हवा, अशी अपेक्षा गणराज जैन यांनी व्यक्ती केली आहे. महापुरामुळे पाणवठा प्रकल्पाची दुरवस्था झाली आहे. सर्व पिंजरे आणि सामानाचे नुकसान झाल्यामुळे मांजरी, श्वान, विविध पक्ष्यांना गणराज यांनी त्यांच्या इमारतीमधील खोलीत ठेवले आहे. काही प्राणी हे प्रकल्पात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. पाणवठा आश्रमात सध्या एक पाय किंवा दोन पाय नसलेल्या मांजरी, दोन पायांनी अधू असणारे श्वान, आंधळे श्वान, यांसारखे विविध प्राणी आणि पक्षी आहेत.  विविध प्रजातींच्या श्वानांवर प्रकल्पात उपचार सुरू आहेत. अपंग घोडेही या ठिकाणी आश्रय घेत होते. मात्र, पुरामुळे येथील अनेक अपंग प्राणी मृत्युमुखी पडले. घोडी अवनी पुरात वाहून गेली. अनेकजण घरात पाळलेले प्राणी विविध अपघातांमुळे अपंग झाल्यानंतर त्यांना दूरवर रस्त्यावर मोकाट सोडतात. या प्राण्यांना पाणवठा प्रकल्पामध्ये आणून त्यांचा सांभाळ केला जातो. हेमश्वेता पांचाळ ही तरुणी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या प्रकल्पात विनावेतन पूर्ण वेळ काम करते. दोन वर्षांपूर्वी जैन दाम्पत्याने अंकुश नावाचा मुलगा दत्तक घेतला असून तोही या प्रकल्पात कार्यरत आहे. इतरही स्वयंसेवक या प्रकल्पात जैन दाम्पत्याला मदत करत आहेत.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

‘पाणवठा-अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम’

ठाणे जिल्ह्य़ातील बदलापूर पूर्व भागात पोद्दार कॉम्प्लेक्सजवळ, चामटोली गावातील कांबरी फार्ममागे पाणवठा-अपंग प्राण्याचे अनाथाश्रम आहे. तिथे जाण्यासाठी बदलापूर स्थानकाबाहेर रिक्षा उपलब्ध असतात.

‘पाणवठा फाऊंडेशन’(Panvatha Foundation)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००