गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात ‘लोकसत्ता’ने समाजातील विविध क्षेत्रांत धडाडीने काम करणाऱ्या, राज्यातील कानाकोपऱ्यातील दहा निवडक सामाजिक संस्थांचा परिचय वाचकांना करून दिला. ‘लोकसत्ता’च्या या ‘सर्वकाय्रेषु सर्वदा’ उपक्रमाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद तर दिलाच, शिवाय अनेकांनी या संस्थांना आíथक मदतीचा हातही दिला. समाजात आजही दान देणाऱ्या हातांची कमतरता नाही, हेच या प्रतिसादाने दाखवून दिले. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील कार्यालयांत मदतीचा हा ओघ अव्याहत सुरूच आहे. या सर्व संस्थांचा अल्पपरिचय आज पुन्हा एकत्रितरित्या देत आहोत. संदर्भासाठी संस्थेचा पॅन क्रमांकही देण्यात येत आहे.
खरे वाचन मंदिर
थोर इतिहास संशोधक, कवी व नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या नावे सुरू झालेले मिरजेतील खरे वाचन मंदिर शतकपूर्तीकडे वाटचाल करत आहे. विद्यार्थ्यांसाठी समृद्ध अभ्यासिका, दुर्मीळ ग्रंथ अभ्यासण्याची सुविधा अशा अनेक ज्ञानोपयोगी कार्याचा अखंड वसा खरे वाचन मंदिराने जपला आहे. गेल्या नऊ दशकांपासून सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाला आता मदतरूपी आहुतीची गरज आहे. वाचनालयाच्या मालकीची इमारत आताशा जीर्ण झाली आहे. तिची पुनर्रचना करण्याबरोबरच वाचनालयाकडे असलेल्या अनेक दुर्मीळ साहित्याचे डिजिटलायझेशनही करायचे आहे. तसेच संस्थेकडे उपलब्ध असलेल्या बहुमोल ग्रंथसंपदेचे तसेच साहित्यठेव्याचे जतन करण्यासाठी व वाचनालयातील पुस्तकांची रचना व मांडणी यांना आधुनिक रूप देण्यासाठी, संस्थेच्या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या थोरांचे विचार विद्यार्थी संघाने कॅसेट व सीडीच्या माध्यमातून जतन करून ठेवले आहेत. ही व्याख्याने श्रोत्यांना परत ऐकण्याची संधी संस्थेला उपलब्ध करून द्यायची आहे. त्यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असलेला स्टुडिओ उभारण्याची संस्थेची धडपड असून त्यासाठी वाचन मंदिराला मदतीच्या हातांची प्रतीक्षा आहे.
संस्थेचा पॅन :  AAATM8725A
धनादेश या नावाने काढा  MIRAJ VIDYARTHI SANGH

झेप पुनर्वसन केंद्र
जन्मत:च आपलं तान्हुलं एका दुर्धर आजाराने पीडित आहे हे ऐकून कोणत्याही मातेचे हृदय विदीर्ण होईल. अशा मुलाचे संगोपन करून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी बळ देण्याचे शिवधनुष्य पेलणे म्हणजे एक प्रकारची कसोटीच. मात्र, तरीही नियतीच्या या घाल्यासमोर न डगमगता त्यास समर्थपणे तोंड देणाऱ्या नेत्रा तेंडुलकर-पाटकर यांची संघर्षगाथा विशेषच. सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) या आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची ‘आई’ झालेल्या नेत्राताईंच्या झेप पुनर्वसन केंद्राची महती त्यातूनच अधोरेखित होते. पदरी व्याधिग्रस्त मूल, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच पतीचे अकाली निधन अशा एकापाठोपाठ एक धक्क्यांतून सावरून नेत्राताईंनी झेपची निर्मिती केली. मात्र, अजूनही संस्थेला स्वत:ची हक्काची जागा मिळवता आलेली नाही. सध्याही भाडय़ाच्या जागेत संस्था सुरू आहे.
संस्थेचा पॅन : AAATZ0618F
धनादेश या नावाने काढा   ZEP REHABILITAION CENTRE

मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट
उतारवयात खरी गरज असते ती सोबत आणि शुश्रूषेची. मात्र, काही कारणास्तव या गरजांनाही दुरावलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्याचे काम डोंबिवलीतील मत्री चॅरिटेबल ट्रस्टने गेल्या आठ वर्षांपासून अखंडपणे चालवले आहे. डॉ. मालिनी केरकर यांनी २००५मध्ये सुरू केलेल्या मत्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे वृद्ध सेवा केंद्रात निवासी स्वरूपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. त्याचबरोबर घरी राहणाऱ्या वृद्धांनाही शुश्रूषेसाठी परिचारिका, आया उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करते. स्मृतिभ्रंश होऊन भटकणाऱ्या अनेक वृद्धांना त्यांच्या नातेवाइकांचा छडा लागेपर्यंत संस्थेत आसरा दिला जातो. तसेच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारही केले जातात. किमान ५० जणांची सोय होईल अशा अद्ययावत वृद्ध सेवा केंद्राची उभारणी करण्यासाठी आता मत्रीला मदतीच्या हातांची गरज आहे.एका इमारतीच्या तळमजल्यावर भाडय़ाच्या जागेत सध्या संस्थेचा कारभार सुरू आहे. डॉ. केरकरांनी विविध शासकीय व निमशासकीय संस्थांकडे जागा मिळण्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजून तरी यश आलेले नाही.
संस्थेचा पॅन : AACTM5393G
धनादेश या नावाने काढा   MAITRI CHARITABLE TRUST

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान
प्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर यांच्या नावाने १९८०मध्ये कणकवलीत स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत साहित्य-नाटय़क्षेत्राशी संबंधित मान्यवरांची व्याख्याने, परिसंवाद, बॅ. नाथ प एकांकिका स्पर्धा, समांतर रंगभूमीवरील गाजलेल्या नाटकांचे प्रयोग, शास्त्रीय गायन स्पर्धा व प्रशिक्षण अशा अनेक कार्यक्रमांचे आतापर्यंत नियोजन व आयोजन केले आहे. मात्र, कार्यक्रमांचे आयोजन करताना खर्चासाठी आíथक तरतूद करण्याचा ताण संस्थेवर कायमच येत असतो. तो नाहीसा होऊन केवळ दर्जेदार कार्यक्रमांच्या आयोजनावरच लक्ष केंद्रित करता यावे म्हणून प्रतिष्ठानला भक्कम आíथक पाठबळाची गरज आहे. सातशे प्रेक्षक बसू शकतील अशा क्षमतेचे नाटय़गृह बांधण्यात आले आहे. मात्र त्याचे अद्ययावतीकरण, ध्वनी व प्रकाशयोजना, वातानुकूलन व्यवस्था आदी कामे निधीअभावी रखडली आहेत.
संस्थेचा पॅन :AAATV6087G
धनादेश या नावाने काढा  VASANTRAO ACHAREKAR SANSKRITIK PRATISHTHAN

विमलाश्रम संस्था
सुसंस्कृत समाजात बहिष्कृत असा शिक्का बसलेला घटक म्हणजे वेश्या. या व्यवसायातील महिलांच्या मुलांना उपेक्षित न ठेवता त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी सर्वस्व वाहणाऱ्या राम इंगोलेंची कहाणी म्हणजे नागपूरची विमलाश्रम संस्था. सलग तीन दशकांपासून राम इंगोले या कार्यात आहेत. आजन्म अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा करून आíथक कुवत नसतानाही २०० पेक्षा अधिक मुलामुलींचा सांभाळ करण्याचे अवघड काम राम इंगोले करत आहेत. वेश्यांच्या मुलामुलींना दत्तक घेऊन त्यांना चांगल्या वातावरणाचे संस्कार देणे, त्यांना सुशिक्षित करून समाजात ताठ मानेने उभे करण्याचा वसा विमलाश्रमच्या माध्यमातून जपला जात आहे. राम इंगोले यांना या कामात जसा विरोध झाला तसा त्यांचे काम पाहून अनेकांनी मदतीचे हातही पुढे केले. नागपूर-उमरेड मार्गावरील पाचगाव येथे विमलाश्रमची शाळाही आहे. मात्र, तरीही विमलाश्रमची आíथक स्थिती कच्ची असल्याने हे समाजकार्य चालवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर आíथक मदतीची गरज आहे. सध्या मिळणारी मदत तोकडी आहे. एवढय़ा मुलांचा सांभाळ आणि पालनपोषण व शिक्षणाची जबाबदारी पेलण्याचे काम आव्हानात्मक आहे.
संस्थेचा पॅन :   AAATA8621R
धनादेश या नावाने काढा   VIMALASHRAM GHARKUL or AMRAPALI UTKARSHA SANGH

पुणे भारत गायन समाज
सर्वसामान्यांना अभिजात संगीताची ओळख व्हावी, शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या शतकमहोत्सवी पुणे भारत गायन समाज या संस्थेला नव्या काळाशी सुसंगत असे विविध सांगीतिक उपक्रम राबवायचे आहेत. संस्थेने विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुजुर्ग कलाकारांच्या गायन व वादनकलेचे ग्रामोफोनच्या माध्यमातून जतन करून ठेवलेले आहे. अशा सुमारे चार हजार ग्रामोफोन रेकॉर्ड्सचा संग्रह संस्थेकडे आहे. त्याचे सीडीमध्ये रूपांतर करण्याचा पुणे भारत गायन समाज संस्थेचा मानस आहे. मात्र संस्था सध्या आíथक मेटाकुटीला आली आहे. संस्थेची ख्याती असल्याने अनेक लोकप्रिय कलाकार आपली कला सेवा म्हणून रुजू करतात. अत्यल्प शुल्कात संगीत ज्ञानदानाचे कार्यही संस्था करते. पुणे शहराचा विकासाचा वेग पाहता शहराच्या अन्य भागातही शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. विविध उपक्रम राबवण्याचेही संस्थेचे संकल्प आहेत. मात्र, सध्याच्या व्यापारी व व्यावसायिक जगात या साऱ्या बाबी अर्थाअभावी कागदावरच आहेत. त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संस्थेला आíथक मदतीची गरज आहे.
संस्थेचा पॅन :  AAATP2846S
धनादेश या नावाने काढा  PUNE BHARAT GAYAN SAMAJ

इन्फंट इंडिया
एचआयव्हीबाधित मुलांचा सांभाळ करून त्यांची देखभाल करण्याचे काम खरेच धाडसाचे. विरोधाला न जुमानता सरकारी नोकरीचाही त्याग करून सेवाव्रत स्वीकारण्याचे शिवधनुष्य दत्ता आणि संध्या बारगजे या दाम्पत्याने उचलले आहे. इन्फंट इंडिया या संस्थेच्या माध्यमातून हे काम बारगजे दाम्पत्याने सुरू केले आहे. बीड जिल्ह्य़ातील ही संस्था अलीकडे नावारूपाला येऊ लागली आहे. चांगल्या कामासाठी मदतीचे हातही पुढे येऊ लागले आहेत. मात्र, तरीही संस्थेचे एनजीओकरण होऊ न देता सुरू असणारा इन्फंटचा प्रवास उल्लेखनीय आहे. संस्थेच्या जागेचा आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी येथील मुलांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्यांची समस्या कायम आहे. वर्गखोल्यांसाठी मदत झाली तर बरे होईल अशी अपेक्षा आहे.
संस्थेचा पॅन :  AAAI1785P
धनादेश या नावाने काढा INFANT INDIA

इंद्रधनू प्रकल्प
रस्त्यावर बेवारस महिला दिसली की कोणीही चार हात लांबूनच जातो. तिला जडलेली रोगराई, अस्वच्छतेमुळे तिच्या शरीराला येत असलेली दरुगधी, तिचे विचित्र चालणे-बोलणे यांमुळे असे होत असेल कदाचित. मात्र, अशाच बेवारस महिलांना मदत करून त्यांना पूर्णपणे बरे करण्याचे कार्य अहमदनगर येथील राजेंद्र व सुचेता धामणे या डॉक्टर दाम्पत्याने गेल्या काही वर्षांपासून अव्याहतपणे राबवले आहे. इंद्रधनू प्रकल्पांतर्गत बेवारस व अनाथ महिलांना आधार देऊन त्यांच्यावर केवळ उपचारच नव्हे तर त्यांना पुन्हा तंदुरुस्त करून ताठ मानेने उभे करण्याचे काम केले जाते. मानसिक संतुलन बिघडलेल्या महिलांना अनेकदा त्यांचे नातेवाईकच रस्त्यावर बेवारस अवस्थेत सोडून देतात. अशा महिलांना इंद्रधनू प्रकल्पात आणले जाते. त्यांच्यावर तेथे उपचार केले जातात. बरे झाल्यानंतर या महिलांना पुन्हा त्यांच्या नातेवाइकांकडे सोडण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा अशा महिलांचा पुन्हा स्वीकार न करण्याचाच अनुभव अधिक येतो. धामणे दाम्पत्याच्या या कार्याला समाजाच्या सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे.
संस्थेचा पॅन : AABAM0578R
धनादेश या नावाने काढा     MAULI SEVA PRATISHTHAN

प्रबोधिनी ट्रस्ट
गतिमंद मुलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही तितकासा उल्लेखनीय नाहीच. गतिमंदांनाही इतरांप्रमाणेच आनंदाने जगण्याचा, आरोग्याचा, शिक्षण व व्यवसायाचा हक्क असतोच की. या मुलांना समाजात आत्मविश्वासाने वावरता यावे यासाठी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे गरजेचे असते. याच विचारातून साडेतीन दशकांपूर्वी नाशिकच्या प्रबोधिनी ट्रस्टची स्थापना झाली. चार मुले व भाडय़ाच्या दोन खोल्या यापासून प्रबोधिनीने १ जानेवारी १९७७ रोजी गतिमंदांसाठीच्या विशेष शाळेची मुहूर्तमेढ रोवली. मानसिकदृष्टय़ा अपंग असलेल्या मुलांसाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम बालवाडी सुरू करण्याचा मानही प्रबोधिनीकडेच जातो. प्रौढ गतिमंदांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही प्रबोधिनीतर्फे संरक्षित कार्यशाळेद्वारे पार पाडली जाते. कार्यशाळेत फाइल व द्रोणनिर्मिती, कापडी पिशव्या तयार करणे, मसाला व पूजासाहित्य तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेचा पसारा वाढला असला तरी जागेची टंचाई कायम आहे. तसेच वाढता खर्चही आता आटोक्यात नाही. दररोजच्या खर्चाचा भार
पेलणे ट्रस्टच्या आवाक्याबाहेर जात आहे.
संस्थेचा पॅन : AAATP2314A
धनादेश या नावाने काढा  PRABODHINI TRUST

समतोल फाऊंडेशन
विविध कारणांमुळे डोक्यात राख घालून घराचा त्याग करणाऱ्या कोवळ्या वयातील मुलांची संख्या काही कमी नाही. घरदार सोडून आलेल्या यातील बहुतेक मुलांनी मायानगरी मुंबईची वाट धरलेली असते. मुंबईत आल्यावर खऱ्या परिस्थितीची जाणीव होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मग भीक मागणे, बुटपॉलिश करणे अथवा पडेल ती कामे करून पोटाची खळगी भरण्याशिवाय त्यांच्यापुढे गत्यंतरच उरत नाही. घरातून परागंदा झालेल्या अशा मुलांना संस्थेत आणून त्यांच्यात पुन्हा घराची ओढ निर्माण करण्याचे कार्य गेल्या आठ वर्षांपासून समतोल फाऊंडेशन करत आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील एका छोटय़ाशा गाळ्यात सुरू असलेल्या या संस्थेचे काम मात्र मोठे आहे. आजवर सहा हजार मुलांना समतोलने पुन्हा आपल्या घरटय़ाकडे सुखरूप पाठवले आहे. मात्र, घर सोडून मुंबईत आसरा घेणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे समतोलचे हे कार्य अव्याहत सुरूच आहे. त्यांच्या या कार्याला समाजाकडून आíथक मदतीची अपेक्षा आहे.
संस्थेचा पॅन : AAHTS1241A
धनादेश या नावाने काढा  SAMTOL FOUNDATION

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२१४
महापे कार्यालय   
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय     
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय       
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट  नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४१०००
नाशिक कार्यालय        
संपादकीय विभाग,
स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय       
संपादकीय विभाग,  प्लॉट नं. १९, ग्रेट  नागरोड, उंटखाना, नागपूर -४४०००९.  ०७१२-२७०६९२३
औरंगाबाद कार्यालय        
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद.  ०२४०-२३४६३०३.
नगर कार्यालय          
संपादकीय विभाग,  आशिष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१- २४५१५४४/ २४५१९०७.
दिल्ली कार्यालय          
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग नवी दिल्ली – ११०००२ ०११-२३७०२१००.