News Flash

मनस्वितांचा पथदर्शकु..

आक्काबाईंच्या पाऊलखुणांवर समर्थ संप्रदायीमनस्विनींनी केलेल्या वाटचालीचा मागोवा घेणारा विशेष लेख..

(संग्रहित छायाचित्र)

मनीषा बाठे

समर्थ रामदासांच्या सज्जनगडावरील गादीचा सांभाळ समर्थोत्तर सुमारे चार दशके करणाऱ्या चिमणाबाई अर्थात आक्काबाई यांची यंदा स्मृति-त्रिशताब्दी आहे. त्यानिमित्ताने, आक्काबाईंच्या पाऊलखुणांवर समर्थ संप्रदायीमनस्विनींनी केलेल्या वाटचालीचा मागोवा घेणारा विशेष लेख..

सतराव्या शतकातच नव्हे, तर एकूणच ब्रिटिशपूर्व भारतात बहुतांश युवकांना ‘सुशिक्षित’ करण्याची वा ठरविण्याची सोय ही बहुधा एका विशिष्ट धार्मिक-आध्यात्मिक, संस्कृत भाषिक परंपरेकडे अथवा राजसत्तेकडे केंद्रित असावी, अशा नोंदी समाजशास्त्रीय इतिहासात आढळतात. विविध शतकांतील अनेक संतांनी जरी आपापल्या स्तरावर त्याचा विरोध करीत, भारतीय ज्ञानाला प्राकृत-व्यवहारी भाषेतून प्रवाहित करीत लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला, तरी तो यत्न हा काही अंशी त्यांच्या-त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित ठरत होता. अशा अनेक अव्यवस्थांचे प्रश्न महाराष्ट्राच्या समर्थ रामदासांना भारतभ्रमणात साडेतीनशे वर्षांपूर्वी जाणवले (‘समर्थाचे प्रपंचविज्ञान’, संपा. श्री. म. माटे). अर्थात, तसा समर्थविचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्काळी एका आधुनिक वैचारिक चळवळीचे स्वरूप धारण केलेल्या समाजगटाला नाव मिळाले : समर्थ रामदास स्थापित रामोपासक व ज्ञानोपासक ‘रामदासी संप्रदाय’!

समर्थानी अध्यात्म-उपासनेच्या बरोबरीने निर्माण केलेल्या ज्ञानोपासनेच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे तत्काळी मोठा तरुणवर्ग समर्थ-संप्रदायात सहभागी झाला होता. समर्थानी अनुयायांना ‘श्रीसांप्रदायाची २० लक्षणे’ अशी नियमावली आखून दिली, ती आजही प्रमाण मानली जाते. ‘प्रथम ते लिहिणे। दुसरे ते वाचणे।।.. प्रसंग जाणावा हा गुण सत्रावा। काळ समजावा सर्वा ठायीं।।’ अशा ग्रंथाभ्यास व समाजकारणाचा ध्यास घेण्याचा नेमस्तपणा एखाद्या संघटनेप्रमाणे संप्रदायाला आखून दिला होता. यातील ग्रंथाभ्यासासाठी समर्थानी जागोजागी संप्रदायासाठी मठस्थापना व तेथे व्यवहारी प्राकृत-मराठी वा स्थानिक बोलीभाषांमध्ये ग्रंथाध्ययन अशा सर्वसामान्यांसाठी लोकशिक्षणाच्या व्यवस्था निर्माण केल्या (‘महाराष्ट्र संस्कृती’, संपा. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे). या लोकशिक्षणाच्या व्यवस्थेत कोणताही वर्णभेद वा लिंगभेद नव्हता, याचे पुरावे आजही रामदासी दफ्तरांत लेखी स्वरूपात तथा गत साडेतीनशे वर्षांत आठ राज्यांतून शिल्लक १३० मठांत उपलब्ध आहेत.

समर्थ रामदासांच्या या ज्ञानोपासक रचनेमुळे त्यांच्याकडे धाव घेणाऱ्या समाजगटात तत्कालीन तरुणांच्या बरोबरीने समाजातील विविध स्तर-वर्ग-वर्णातील स्त्रियादेखील होत्या. त्यात उपासक होणाऱ्या गृहस्थाश्रमींच्या पत्नींच्या बरोबरीने अनेक बालविधवा, विधवा, अगदी परित्यक्ता स्त्रियाही होत्या. त्या काळातील स्त्रियांबद्दलची विषमता, स्त्रियांना सुशिक्षित करण्याचा बहुधा अभाव अशा सामाजिक बाजू लक्षात घेऊनच समर्थानी रामदासी मठांमध्ये काही रचना प्रचलित केल्या होत्या, ज्या सुदैवाने २१ व्या शतकापर्यंत किमान स्त्रियांच्या बाबतीत तरी टिकलेल्या दिसतात. त्यातील एक रचना म्हणजे रामदासी संप्रदायातील अनुग्रहित किंवा उपासक स्त्रियांना मठातील स्वयंपाकसंलग्न कोणतीही कामे जबाबदारी म्हणून दिली जात नसत. ही कामे नियमानुसार पुरुष उपासकच करीत, अगदी भोजन-पंक्तींमध्येही रामदासीच वाढप्याचे काम करत. सांप्रदायिक मठात आलेल्या उपासक स्त्रियांना बहुतांश बौद्धिक कामे देण्याचा नेम समर्थाच्या काळापासून कायम आहे. स्त्रियांना लिहिता-वाचता येत नसेल तर त्यांना ते रामदासी मठांमध्ये शिकवले जाई. पुढे ग्रंथाभ्यास, पारायणे, जप-जाप्य-अनुष्ठाने आदींसाठी मोकळीक मिळे. याव्यतिरिक्त कामे करावयाची असल्यास ती बहुधा लिखापढीतील (दफ्तरी कामे) असल्याची नोंद आजही हस्तलिखितांत सापडते.

आज समर्थाच्या साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या ‘आधुनिक’ चळवळीकडे पाहिल्यावर जाणवते, की समर्थाच्या बरोबरीने त्यांच्या या विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या त्यांच्या मानसकन्याही तितक्याच सक्षम होत्या. कारण १७व्या शतकापर्यंत काही स्त्री संत व संतशिष्यांचे अपवादात्मक आयुष्य सोडले, तर अशा भारतीय पुरातन ग्रंथांच्या उदाहरणात अडकलेल्या गार्गी-मैत्रेयी ते अगदी शबरीपर्यंतच्या ज्ञानोपासक स्त्रियांचा हेवा करावा, इतकेच सर्वसामान्य स्त्रीच्या हाती समाजाने ठेवले होते. परंतु रामदासी संप्रदायाच्या रूपाने बुद्धिजीवी स्त्रियांना समर्थाच्या उत्तरायुष्यापर्यंत का असेना, पण समाजात मान्यता पावलेले अधिकृत ठिकाण लाभले होते, हे निश्चित.

वास्तविक पाहता, भारतातच नव्हे तर जगभरातील विविध धर्मामध्ये सर्वसाधारणपणे बहुतांश ठिकाणी स्त्रियांचे नेतृत्व अपवादात्मकच ठरले आहे. तरीही स्त्रियांनी धर्म-अध्यात्मांत नेतृत्व करावे, ही वेगळी भूमिका समर्थानी केवळ शक्तिस्तोत्रांसारख्या रचनांमधून सांकेतिक केली नाही, तर बरोबरीने समर्थानी १८ स्त्रियांना रामदासी मठांच्या मठपती होण्याचा मानही दिला होता. त्यातील वेणाबाई व बाईयाबाई (मिरज), अंबिकाबाई (राशिवडे व वाळवे), नबाबाई (तापीतीर, गुजरात), मनाबाई (राजांगणी), सखाबाई व कृष्णाबाई (चाफळ), अन्नपूर्णाबाई (उद्धवाची आई-टाकळी), सतीबाई (महाबळेश्वर), आपाबाई, द्वारकाबाई, गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई, भीमाबाई, गोदाबाई, अंताबाई (कृष्णातीरी) आणि सज्जनगड-संप्रदायाचे मुख्यालय सांभाळणाऱ्या समर्थशिष्या चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई या सर्व स्त्री-मठपतींचा उल्लेख ‘गिरिधर-बखरी’मध्ये येतो.

तसे चिमणाबाई या इ.स. १६४४ मध्ये संप्रदायात सहभागी झाल्या. त्या मूळच्या कराडच्या रुद्राजीपंत देशपांडे या जमीनदाराची बालविधवा कन्या होत. मुलीची हुशारी लक्षात घेऊन रुद्राजीपंतांनी कन्येला समर्थ संप्रदायाचे उपासक केले. चिमणाबाई लिहिण्या-वाचण्याच्या बरोबरीने घरच्या सुबत्तेमुळे दफ्तरी फडावरील कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी अशा कौशल्यांत निपुण असल्याने समर्थानीही या चिमणाबाईंना ‘आक्का’ म्हणून संबोधल्याने त्यांचा सांप्रदायिक दफ्तरात उल्लेख ‘आक्कास्वामी’ असा आढळतो. वास्तविक समर्थाच्या प्रमुख २१ शिष्यांमधील १७ पुरुष शिष्य हे कायमच भारतभरातील विस्तारात व्यस्त असत. तसेच उर्वरित चार स्त्रियांमध्ये वेणाबाई या मिरज मठपती (मठात आजही त्यांचे विपुल लघुग्रंथ व स्फुट रचना उपलब्ध), सतीबाई या महाबळेश्वर मठपती (समर्थशिष्य बाजीपंत सरदारांच्या पत्नी), अंबिकाबाई या राशिवडे व वाळव्याच्या मठपती (यांचेही साहित्य उपलब्ध) आणि आक्काबाई या सज्जनगडाच्या मठपती होत्या. समर्थोत्तर ३९ वर्षे भारतभरातील सर्व मठांच्या मुख्यालयाचे काम पाहणाऱ्या संप्रदायाच्या उत्तरदायी म्हणून एकमेव आक्काबाई! त्या हकिकतींच्या पानांमध्ये अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतात. आक्काबाईंनी ‘स्त्री-महंत मठपती’ या नात्याने समर्थाच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप देऊन अनेक रामदासी मठपतींना उत्सवात विविध मानकऱ्यांची कामे नेमत, देशभरातील मठपतींना सज्जनगडावर उपस्थित राहण्याची मुत्सद्दी यंत्रणा निर्माण केली होती.

ज्याप्रमाणे शक्तिस्तोत्रांत समर्थ लिहितात : ‘रामवरदायिनी माता। दासे धुंडुन काढली। वोळखी पाडितां ठाई। भिन्न भेद असेचिना।।’ हा केवळ श्लोक नसून समर्थानी स्व-संप्रदायात स्त्रियांच्या बाबतीत आचरणात आणलेला नियम होता, की प्रत्येकीला बुद्धिक्षमतेला शोभणारे स्थान देणे. तत्कालीन समाजात स्त्रियांना केवळ मठपती व्यवस्थापकच नव्हे, तर उभे राहून कीर्तनाचा अधिकार समर्थ संप्रदायात लाभला होता. ज्या काळात प्रस्थापित स्त्रियांनादेखील माजघरातून दिवाणखान्यात येण्यास परवानगी घ्यावी लागे, त्या काळात समर्थशिष्या मठपती पदस्थ या नात्याने मंदिरांत विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीने उभे राहून सर्वासमोर खाली बसलेल्या समाजाला आध्यात्मिक ज्ञान शिकवावे, हे खरोखरच क्रांतिकारी ठरले असावे.

माझ्या अभ्यासातील समर्थ सांप्रदायिक दफ्तरांतील अगदी अलीकडेच उदाहरण म्हणजे मनाबाई रजपूत! या इ.स. १८५० मध्ये समर्थाच्या परांडय़ाच्या मठातील समर्थोत्तर सातवे मठपती हंसराजस्वामींच्या कालखंडातील आहेत. मनाबाई रजपूत या वैधव्य आल्यावर मठात हंसराजस्वामींकडे येत. मनाबाई अशिक्षित-निरक्षर होत्या. परंतु रामदासी मठाश्रयित स्त्रियांना स्वयंपाक वा स्वच्छतेची कामे लावून निर्बुद्ध वागणूक देऊ नये, हा समर्थापासूनच्या मठकार्य इतिहासाचा पायंडा असल्यामुळे हंसराजस्वामींनी मनाबाईंनादेखील इतर चार पुरुष शिष्यांच्या बरोबरीने प्रथम अक्षरओळख करून दिली. मनाबाईंना उत्तम लेखन-वाचन येऊ लागल्यानंतर हंसराजस्वामींनी रामदासी लक्षणांच्या नियमांनुसार त्यांचे लेखन, वाचन, अर्थातर, शंकानिवृत्ती, पद्य गाणे, पाठांतर, प्रबंध, प्रचीती, प्रबोध अशा सर्व अध्ययन टप्प्यांमधून प्रवास आरंभला. त्यांची जडणघडण एका आदर्श ज्ञानोपासकाप्रमाणे केली. वैराग्यपूर्ण ज्ञानोपासनेचा नेम मनाबाईंनीही पाळला. पुढे मनाबाईंच्या अध्ययनादरम्यान हंसराजस्वामींनी वेदान्त शिकवण्यासाठी एक आगळावेगळा प्रयोग केला. हंसराजस्वामी मनाबाईंना वेदान्तातील मंत्रांना समजावणाऱ्या कथा पूर्वरंगात सांगत, मग ते एका पाटीवर लिहून देत. मनाबाई त्या पाटीवरील पूर्ण मजकूर वाचून मग तो कागदावर रामदासी लेखन नियमांनुसार उतरवून काढत. नंतर पुढील दिवशी त्याच पाटीवर हंसराजस्वामी त्या कथेचा पूर्वरंग संपेपर्यंत क्रम सुरू ठेवत. नंतर त्याच कथेच्या उत्तरार्धात ‘शुद्ध वेदान्त’ व स्वानुभव अशी सांगड घालून समजावीत आणि त्याच पाटीवर पुन्हा लेखन करून देत. पुन्हा मनाबाई त्या पाटीवरील मजकूर वाचून ग्रंथबद्ध करीत (संदर्भ : डॉ. कल्याण काळे लिखित ‘हंसराजस्वामी प्रबंध’). पुढे या ग्रंथाला ‘कथाकल्पलता’ हे नाव लाभले. हंसराजस्वामींनी फक्त मनाबाईंचा अभ्यास न मानता, तो संदर्भ ग्रंथ म्हणून इतरांना अध्ययनास दिल्याच्या अनेक शिष्यांच्या नोंदी परांडय़ाच्या दफ्तरांत आजही मिळतात. रामदासी ज्ञानोपासनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या जाती-गोत्र-लिंग-वंश अशा भिंती नव्हत्या. याची साक्ष म्हणजे समर्थाप्रमाणे डोमगांव मठपती कल्याणस्वामींच्याही स्त्री-शिष्या काळुबाई व आनुआका या दोघी होत. तसेच मिरजेच्या समर्थशिष्या वेणाबाई यांच्या शिष्या बाईयाबाईंचे श्रीगिरिधर हे शिष्य होते. याच गिरिधर लिखित हकिकती व साहित्य अभ्यासकांना समर्थकालीन हस्तलिखिते म्हणून सहज प्रमाण ठरवता येतात.

(लेखिका रामदासी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)

maneesha.bathe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:08 am

Web Title: special article tracking the path taken by samarth sampradayi manaswini on the footsteps of akkabai abn 97
Next Stories
1 चाँदनी चौकातून : ‘ब चमूं’च्या देशा..
2 आंदोलनातील स्त्रिया बदल घडवतील?
3 कुपोषणाचा प्रश्न सुटण्यासाठी..
Just Now!
X