07 March 2021

News Flash

गुरूत्वाख्यान

विज्ञानकल्पना सत्यात उतरल्याची कैक उदाहरणे आहेत. रे ब्रॅडबरी यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये १९५०-६० साली अवतरलेली यंत्रे आज हेडफोन, फ्लॅट स्क्रीन टीव्ही, मोबाइल ही नावे घेऊन प्रत्यक्षात

| March 15, 2014 01:20 am

विज्ञानकल्पना सत्यात उतरल्याची कैक उदाहरणे आहेत. रे ब्रॅडबरी यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये १९५०-६० साली अवतरलेली यंत्रे आज हेडफोन, फ्लॅट स्क्रीन टीव्ही, मोबाइल ही नावे घेऊन प्रत्यक्षात साकारली. कथा असूनही फिलीप के. डिक यांच्या संकल्पना, आयझॅक असीमोव्ह यांचे यंत्रमानवी जग आज खऱ्या रूपात सादर होत आहे. परग्रहवासीयांची शक्यता षड्यंत्र सिद्धांतांनी घेरली गेली आहे. त्यातच चित्रपट, कथा-कादंबऱ्या भविष्यातील वास्तव अधिक प्रखर आणि कडव्या वास्तवरूपात दाखवीत आहेत. ऑस्कर पुरस्कार गाजविलेला आणि गेले वर्षभर अंतराळविज्ञानाच्या चर्चाना इंधन पुरविणारा ‘ग्रॅव्हिटी’ हा चित्रपटदेखील भविष्यातील वास्तवाचे दर्शन घडवीत विचारचक्रे कार्यान्वित करतो. या चित्रपटाच्या संकल्पनेनिमित्ताने गुरुत्वतत्त्वावर अल्पदृष्टिक्षेप..
असे खरेच घडले होते

ग्रॅव्हिटी चित्रपटात जे दाखवले आहे, त्यात रशियाच्या उपग्रहावर क्षेपणास्त्रांचा मारा होतो. अंतराळ कचऱ्याचे स्फोट होऊन अंतराळ स्थानकातील वैद्यकीय अभियंता असलेली डॉ. रायन स्टोन (साण्ड्रा बुलक) वाचते तर मॅट कोवाल्स्की (जॉर्ज क्लुनी) हा अभियंता अंताच्या प्रवासाला निघून जातो. ही कल्पना आज वाटत असली तरी ते पुढचे वास्तव आहे. चीनने त्यांचे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र २००७ मध्ये अवकाशात उडवून त्यांचा निकामी उपग्रह नष्ट केला. त्या वेळी अंतराळ कचऱ्याचे असे छोटे स्फोट होऊन २००९ मध्ये रशियाच्या कॉसमॉस व अमेरिकेच्या इडियम उपग्रहाची टक्कर झाली होती. त्या वेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा मार्ग बदलावा लागला होता. त्यात रशियाच्या एका उपग्रहाचे नुकसान झाले होते. म्हणजे चित्रपटात दाखवलेली हॉलीवूड परिकल्पना (फँटसी) एक दिवस प्रत्यक्षात 
येणार आहे.

गुरुत्व हा आपल्या पृथ्वीवरील सामान्य माणसांना मुद्दाम जाणवणारा विषय नसला तरी आपण जे वजनदार आहोत ते न्यूटनने शोधून काढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळेच आहोत. आपली पृथ्वी व इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरत आहेत तेही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच. गुरू ग्रह तर इतका मोठा आहे की, त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपण अनेक अवकाशस्थ गोलांच्या आघातापासून वाचलो आहोत. पृथ्वीचे हे सूर्याभोवती फिरणे गुरुत्वाकर्षणामुळेच आहे. अलीकडेच झालेल्या ऑस्कर सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावणाऱ्या ग्रॅव्हिटी चित्रपटातील रंजकता, काहीसा काल्पनिक भाग सोडला तरी अंतराळात घडणारी कुठलीही घटना ही पृथ्वीवरील जीवसृष्टीवर गंभीर आघात करू शकते. ग्रॅव्हिटी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नासाने अवकाशातील शून्य गुरुत्वाची काही छायाचित्रे दिली आहेत. त्यामुळे सत्य आणि कल्पना यांची तुलना करता येते. या चित्रपटातील सर्वच बाबी वैज्ञानिक सत्यावर आधारित नसल्या तरी त्यामुळे अवकाश प्रवासातील धोक्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ग्रॅव्हिटी चित्रपटातील पहिला भाग बघितला तर रशियन उपग्रहावर क्षेपणास्त्र हल्ला होतो व त्यामुळे अंतराळातील कचऱ्याच्या ढिगांची एक मालिकाच तयार होते व ती अंतराळ स्थानकाला धडक देते, त्याला केसलर सिंड्रोम असे म्हणतात. दिग्दर्शक क्युरॉन यांचा हा चित्रपट याच संकल्पनेवर बेतलेला आहे.अंतराळ कचऱ्याविषयी थोडे..
अंतराळात जसा माणसाचा चंचुप्रवेश उपग्रह व इतर माध्यमातून झाला तसा तेथे कचरा वाढत गेला. गोल्फच्या चेंडूपासून अनेक पदार्थ त्यात आहेत. पण हा कचरा पृथ्वीवरचाच असतो अशातला भाग नाही, तर अवकाशातील कुइपर बेल्टमधून तुटून आलेले घटकही त्यात पृथ्वीभोवती फिरत असतात. जुन्या उपग्रहांचे तुकडे, रॉकेटचे तुकडे यांचा त्यात समावेश आहे. ५ से.मी.चे १९००० तुकडे या ढिगाऱ्यात आहेत, याशिवाय ३ लाख तुकडे एक से.मी. पेक्षा लहान असून ते २०० कि.मी. पेक्षा कमी उंचीवर फिरत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ३०० ते ४०० कि.मी. उंचीवरून फिरत असते. अगदी नुसत्या डोळ्यांनी दिसण्याइतकेसुद्धा ते काही वेळा खाली येते. अंतराळ कचऱ्यात १ से.मी.पेक्षा जास्त आकाराच्या घटकांमध्ये सॉलिड रॉकेट बूस्टर्स, सरफेस डिग्रेडेशन उत्पादने, पेंटफ्लेक्स व कुलंट यांचा समावेश आहे. त्यातील बरेचसे घटक रॉरसॅट या अणुशक्तीवर आधारित उपग्रहातून बाहेर पडलेले आहेत. याशिवाय आपल्या प्रकाशीय उपकरणांनी केलेल्या निरीक्षणांनुसार दरवर्षी १० ते २० हजार टन उल्कापाषाण पृथ्वीवर पडत असतात. युक्रेनमध्ये चेबलिन्सकी येथे जो उल्कापाषाण आदळला होता, त्यामुळे हिरोशिमातील अणुस्फोटापेक्षा जास्त ऊर्जा निर्माण झाली होती. ही घटना गेल्या वर्षी घडली होती. त्याचा नासा या अमेरिकी संस्थेनेही धसका घेतला आहे. ज्यांच्या नावाने केसलर सिंड्रोम ओळखला जातो त्यांच्या मते अंतराळ कचऱ्याचा अतिप्रमाणामुळे आतापर्यंत अवकाशात ज्या घटना घडल्या आहेत, त्यातील ४२ टक्के कचरा अमेरिकेच्या ‘डेल्टा’ रॉकेट्सच्या स्फोटांच्या १९ टक्के घटनांनी बनला आहे. या कचऱ्याचे मोजमाप त्यांनी गॅबार्ड पद्धतीने केले आहे.
‘इन्व्हिसॅट’चा असाच धोका

ग्रॅव्हिटी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एका उपग्रहाचा धोका लिसेस्टर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ओळखला आहे. साधारण २०१२ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीच्या एन्व्हिसॅट या उपग्रहाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे अवकाशवीरांना सँड्रा बुलक व जॉर्ज क्लुनी यांनी अभिनय केलेल्या ग्रॅव्हिटी चित्रपटात दाखवल्यासारखा धोका निर्माण होऊ शकतो. हा उपग्रह ९ मीटर रुंद असून, तो ४९१ मैल उंचीवर आहे व नेमक्या याच उंचीवर अंतराळ कचरा अधिक आहे. हा मोकाट सुटलेला उपग्रह सुमारे १५० वर्षे अवकाशात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. याचे कारण म्हणजे दरवर्षी अवकाशातील किमान दोन पदार्थ एन्व्हिसॅट उपग्रहापासून २०० मीटर अंतरावरून जाणार आहेत. ग्रॅव्हिटी चित्रपटात ज्या चेन रिअ‍ॅक्शनचा साखळी अभिक्रियेचा उल्लेख येतो, तशा प्रकारे अंतराळ कचऱ्याचे आघात होऊन अंतराळ कचऱ्याचा ढग पृथ्वीभोवती निर्माण होण्याची शक्यता त्यात काही प्रमाणात आहे.केसलर सिंड्रोम
१९७८ मध्ये नासाचे वैज्ञानिक डोनाल्ड केसलर व डॅरेन मॅकनाइट यांनी केसलर सिंड्रोम ही कल्पना मांडली. नियतकालिकात त्यांनी असा दावा केला होता की, आपण अंतराळात आतापर्यंत उपग्रहापासून अनेक वस्तू सोडलेल्या आहेत. त्यांचे प्रमाण वाढून तिथे एवढा मोठा अंतराळ कचरा निर्माण झाला आहे की, तिथे या कचऱ्याच्या स्फोटांची मालिका तयार होऊन त्या कचऱ्याचा एक ढगच तयार होईल व तो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकास धोकादायक ठरेल. या दोघांच्या मते लघुग्रहांमुळेही या परिणामाचा धोका असतो. काही वेळा या अंतराळ कचऱ्याने उपग्रहांना धक्के देऊन निकामी केले आहे. या गोष्टी खऱ्या आहेत. त्यात इरिडियम उपग्रहापासून ते रशियाच्या उपग्रहापर्यंत काहींचा समावेश आहे.

कचरा हटविण्याचा उपाय
पृथ्वीवर जशी कचऱ्याची समस्या आहे तशी ती अंतराळातही आहे. प्रचंड मोठय़ा प्रमाणात कचरा पृथ्वीभोवती फिरतो आहे. त्या अंतराळ कचऱ्यामुळे अंतराळात कसे अपघात होऊ शकतात हे सात ऑस्कर विजेत्या ग्रॅव्हिटी चित्रपटात दाखवले आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन उद्योग विभागाच्या को-ऑपरेटिव्ह रिसर्च सेंटरने २० दशलक्ष डॉलरची योजना आखली असून त्यात पृथ्वीभोवती फिरणारा कचरा शोधून त्याची विल्हेवाट लावण्याचे उपाय सुचवण्यास वैज्ञानिकांना सांगितले जाणार आहे. द न्यू स्पेस इन्व्हिरॉनमेंट को-ऑपरेटिव्ह रिसर्च सेंटर या संस्थेने अंतराळ कचऱ्यातील घटकांवर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियातील माऊंट स्ट्रॉमलो- ऑब्झर्वेटरीच्या माध्यमातून हे काम केले जाईल. या पदार्थावर लेसर किरणांचा मारा करून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या पदार्थाची दिशा बदलण्यात येईल. किंबहुना हे पदार्थ पृथ्वीवर आपल्याला हवे तिथे पडून जळून जातील.

अंतराळात तीन लाख सुटे तुकडे कचऱ्याच्या रूपात फिरत असून त्यामुळे उपग्रहांना धोका आहे. आता तर इतका कचरा झाला आहे, की तोच एकमेकांवर आदळण्याचा धोका आहे. नवीन आघातांमुळे वाढणारा कचरा कमी करणे हा आमचा पहिला उद्देश असून पृथ्वीवरून लेसर पाठवून कचरा नष्ट करणे हा त्यानंतरचा हेतू आहे.
सीआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेन ग्रीन

’ ‘चित्रपटात अंतराळ कचऱ्याचा ढग’ हा निकामी उपग्रहावर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र आघातामुळे तयार होतो. त्यातून साखळी अभिक्रिया बनते. त्यामुळे क्लुनी व सँड्रा बुलक अंतराळ यानापासून बाहेर फेकले जातात. इन्व्हिसॅट उपग्रहामुळे अगदी तसेच घडेल असे नाही. पण त्याचा धोका दुर्लक्षिता येणार नाही. – भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी के. टी. रेमर

अंतराळातील कचऱ्याची समस्या गंभीर आहे. हा कचरा नष्ट करण्यासाठी लेसर किरणांचा मारा करण्याची आमची योजना आहे. त्यामुळे टकरींमुळे होणारे धोके टळू शकतील.
मॅथ्यू कॉलनेस, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्‍‌र्हसिटी

अंतराळ कचऱ्याचा प्रश्न आजपासून २०-३० वर्षांत ‘केसलर सिंड्रोम’ नावाचे कल्पित सत्यात आणल्याशिवाय राहणार नाही. – नासाचे माजी अभियंता, टॉम जोन्स

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2014 1:20 am

Web Title: the information about gravity
Next Stories
1 संगीतमय आइस्क्रीम
2 निवडणूक खर्चाचा घोळच!
3 फुकुशिमाचे उपधक्के
Just Now!
X