अभिजात मराठीसाठी लढा देणारे अभ्यासक म्हणतात, ‘‘मराठीचा वाडा म्हणजे मराठवाडा!’’ गाथा सप्तशतीपासून ते लिळाचरित्रातील मराठी
भाषा जन्माचे दाखले असणाऱ्या या प्रदेशाला कवी मुकुंदराज, दासोपंत एकनाथ, संत गोरोबाकाकाच्या विचारांचा समृद्ध वारसा. एके काळी याच प्रदेशातून रोमपर्यंत व्यापार होता. मराठवाडय़ाची अनेक शक्तिस्थळे, अनेक धर्मसं प्रदायाचे तत्त्वज्ञान या प्रदेशातून निर्माण झाले. वेरूळ, अजिंठा येथील लेणी आणि मोगल साम्राज्यातील बीबी का मकबरासारख्या अनेक वास्तू आजही लक्ष वेधून घेतात. हा संपन्नतेचा इतिहास डोळसपणे पाहिला तर मराठवाडय़ाला मागासपणाची लावलेली बिरुदावली चूक असल्याची भावना प्रबळ होते. इतिहासात या प्रदेशात देवीतत्त्व पूजकांची मोठी परंपरा आहे. तुळजाभवानीचे मंदिर तसे दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे, असा पुरातत्त्व विभागाचा अंदाज आहे.
माहुरची रेणुकामाता, अंबाजोगाईची जोगेश्वरी ही देवीची ठाणी पूजा पद्धती आणि परंपरा सांगणाऱ्या आहेत. या प्रदेशाला अवर्षणप्रवणतेचा शापदेखील हजारो वर्षांचा. या प्रदेशाने किती दुष्काळ सहन केले, याचा अभ्यासदेखील उपलब्ध आहे. मराठवाडय़ातील लोक आजही शक्तिस्थळाचा शोध घेत असतात. आपल्यातील न्यूनगंडपणालाच आपले शक्तिस्थान बनवायला हवे, असे वातावरण हळूहळू निर्माण होऊ लागले आहे. निसर्गाने अनेक बाबतीत हात आखडते ठेवलेले. मात्र ३३० दिवस मिळणारा स्वच्छ सूर्यप्रकाश भविष्यात मराठवाडय़ाचा कायापालट करून टाकणारा ठरू शकतो. त्या अनुषंगाने अलीकडेच प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यानंतर आठ जिल्ह्य़ांतील साडेआठ हजार गावांचा हा प्रदेश सतत निर्सगाशी लढा देतो. दरवेळी उभा राहतो, कोलमडतो, धडपडतो. पण हरण्याची वृत्ती फारशी नाही. प्रत्येक जिल्ह्य़ाचे वेगळेपण निराळे. सामाजिक रंगरूप तसे सारखेच वाटत असले तरी आíथक व्यवहार कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाशी जोडलेले असल्याने त्याचा परिणाम काही ना काही अंशी होतच राहतो. पण प्रत्येक जिल्ह्य़ाचा इतिहास जरी नीटपणे समोर ठेवला तरी जागतिक स्तरावरील पर्यटनाला चालना देता येऊ शकेल. इतिहास आणि पर्यटन याची सांगड नव्याने घालण्याची गरज आहे. इतिहासाचे पलू नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे नवे तंत्र स्वीकारायला हवे. तसेच शक्तिस्थानाचा विचार रोजगार उपलब्धतेच्या अनुषंगाने करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्याचे विज्ञान समजून घ्यायला हवे. मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि िहगोली जिल्ह्य़ात सौर ऊर्जेचे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात घेता येऊ शकतील. उन्हाची तीव्रता आणि उन्हाचा जमिनीशी होणारा कोन अधिक ऊर्जा निर्माण करू शकते, असे शास्त्रज्ञ आवर्जून सांगतात. ‘नासा’ या अंतराळ संशोधन केंद्रातील संशोधकांनी मराठवाडय़ात सौर ऊर्जेचे प्रयोग यशस्वी होऊ शकतात, असे कळविलेले आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्य़ात असे काही प्रयोग सुरू झाले आहेत. पण त्याची क्षमता तशी कमी आहे. असे प्रयोग ठिकठिकाणी व्हावेत, असे धोरण मात्र अजून ठरलेले नाही. सौर ऊर्जेसाठी लागणारे पॅनल आणि इतर उपकरणांचे कारखाने या भागात उभे करता येऊ शकतील. सध्या काही उद्योजक या अनुषंगाने प्रयत्न करीत असले तरी त्याचा वेग वाढविता यावा, असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. जालना हे मुळातच व्यापारीवृत्तीचे गाव आहे. स्टील उद्योगापासून ते बियाणांच्या अनुषंगाने असणाऱ्या उद्योगसमूहांसाठी विशेष सवलती द्यायला हव्यात. सोयाबीन, मका, कापूस या पिकांसाठीचे प्रक्रिया उद्योग उभारायला हवेत. कुंथलगिरीचा पेढा परदेशात पाठवता येऊ शकेल काय? सकारात्मकपणे अनेक बाबी मराठवाडय़ात घडवता येऊ शकतात. त्या आज नाहीत असे नाही, पण ही शक्तिस्थळे शोधून त्यावर नव्याने काम व्हायला हवे. असे करताना इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची सांगड घालता आली पाहिजे. बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. श्रम करण्याची एवढी शक्ती अन्य कोणत्याही जिल्ह्य़ात नाही. कष्ट करून अधिक पसे मिळावेत म्हणून या जिल्ह्य़ातील माणूस परप्रांतात जातो. त्याच्या हाताला जिल्ह्य़ातच काम देता येऊ शकेल, असे उद्योग उभारणे हे आव्हान आहे. औरंगाबादसारख्या जिल्ह्य़ात पर्यटन हा व्यवसाय अधिक  बहरू शकतो. वेरूळ आणि अजिंठा लेण्यांची तशी माहिती मराठी माणसालाच नाही. शिल्प अथवा चित्र कसे बघावे, हे समजावून सांगतानाच लेण्या बनविणाऱ्या कलाकारांच्या काळातील अर्थशास्त्र, समाजमानस, राज्यकत्रे यांची माहिती देऊन पर्यटनाला चालना देता येऊ शकते. येणारा पर्यटक अधिक काळ थांबावा, यासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत. ते समजून घ्यायला हवेत. सुविधा निर्माण करताना मराठवाडय़ाचा माणूस केंद्रस्थानी राहावा, असे धोरणात्मक बदल मात्र होण्याची गरज आहे. मराठवाडा ही तशी संघर्षांची भूमी आहे. मात्र काही प्रयोग यशस्वी ठरल्यास मराठवाडा अन्य प्रदेशाच्या बरोबरीने विकासात सहभाग देऊ शकतो. असे प्रयोग सुरू झाले आहेत. काही प्रयोगाला सरकारचे सहकार्य आहे. काही प्रयोग व्यक्तिगत पातळीवर सुरू आहेत.नसर्गिक साधनसंपत्तीचा फेरविचार करून मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांचा एकत्रित विचार केल्यास विकासाचा वेग वाढू शकतो. वैभवशाली इतिहास असणाऱ्या या प्रदेशाचे भवितव्यही तेवढेच चांगले असू शकते. मात्र त्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळायला
हवी.