अ‍ॅड. आशीष शेलार

एरवी मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवणारे करोनाकाळात अनेक रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराचीच पायमल्ली होत असताना कुठे आहेत? झाडांमध्ये जीव असतो, असे सांगत मेट्रो कारशेडविरोधी आंदोलन करणाऱ्यांना आजची मुंबईची अवस्था दिसत नाही का? राज्यात विद्यापीठांच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना विद्यार्थी आंदोलक काय करताहेत? राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बलुतेदार, गरीब सरकारच्या मदतीची वाट पाहात असताना मानवतेच्या रखवालदारांचा ‘एल्गार’ कुठेच का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधू पाहणारे हे टिपण..

‘युद्धात सगळे माफ असते’ असे म्हणून काही गोष्टी करोनाच्या या युद्धात सोडून देऊन चालणार नाहीत. कारण हीच ती वेळ आहे.. खरे चेहरे दिसण्याची आणि दाखवण्याची.. कोण ढोंगी आणि कोण खरा लढवय्या हे उघड करण्याची आणि होण्याची! नाही तर या युद्धातून आपण काहीच शिकलो नाही असे होईल. युद्ध संपल्यावर ‘पुनश्च हरि ओम’ करताना गफलत होईल. या युद्धातील खरे योद्धे समाजासमोर यायला हवेत. त्यांची इच्छा नसली तरीही त्यांचा उचित सन्मान होण्याची गरज आहे. नाही तर या युद्धातील करोनायोद्धय़ांची अवस्था धरणग्रस्तांसारखी व्हायची. वर्षांनुवर्षे संघर्ष करावा लागायचा. या योद्धय़ांचा सन्मान होणे जसे गरजेचे आहे, तसेच या युद्धात गायब असलेले, बिळात लपून बसलेल्यांचे ढोंगीपणही उघड होण्याची गरज आहे. कारण अशांपासून समाजाला नेहमीच धोका आहे, असे आमचे मत आहे. यांचे ढोंगी चेहरे उघड झाल्यावर समाज ठरवू शकेल की, यापुढे कुणाची संगत करायची आणि कुणाची नाही.

करोनाविरोधात संपूर्ण मानवजातीचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षांत अनेक हात देवदूतांप्रमाणे मदत करीत आहेत. यातील शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर यांच्यासह स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, काही समाजसेवी संस्था, तसेच स्वयंप्रेरणेने अनामिकपणे अनमोल काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे कौतुक एका स्वतंत्र लेखात मी सविस्तरपणे केले होते. पण या युद्धातील गायब, हरवलेले, लपून बसलेले, सोईस्करपणे पलायन केलेले चेहरे शोधण्याचा प्रयत्न आज करू. त्यासाठी फार नाही, थोडे मागे जाऊन पाहू.  महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वाहतूक कोंडीत गुदमरलेल्या मुंबईकरांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मेट्रोची कामे वेगाने सुरू केली. मेट्रोच्या कारशेडसाठी सर्व बाजूंनी विचार करून आरेमधील जागा निवडावी लागली. दुर्दैवाने काही झाडे तोडावी लागणार होती, पण त्यासाठी दुप्पट झाडे लावण्याचे नियोजन केले व लावली. पण तथाकथित पर्यावरणप्रेमी या मेट्रोच्या कामात सातत्याने अडचणी आणू लागले. अखेर हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य केले; मेट्रो कारशेडला परवानग्या दिल्या. न्यायालयाचे निर्देश अमान्य करून त्यानंतरही तथाकथित पर्यावरणवादी झाडांची बाजू घेऊन आंदोलनाच्या नावावर फुगडी घालत होते. आम्ही निसर्ग संपवून विकास व्हावा या भूमिकेचे नाहीत. पण ‘मुंबई भकास होईल, मुंबई बुडेल, जगबुडी होईल..’ असा टाहो फोडणारी, मुंबईचा कळवळा असलेली मंडळी- आज रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून मुंबईत जीव गमवावा लागत असताना; रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी नातेवाईक मुंबईभर वणवण करत असताना; धारावीतील पोलीस अधिकारी, वांद्रे पोलीस ठाण्यातील जवान उपचार मिळाले नाहीत म्हणून करोनास बळी पडले तेव्हा; मुंब्य्रातील गर्भवती महिलेचा रिक्षातच मृत्यू झाला तेव्हा, रुग्णालयाने रुग्णवाहिका न दिल्याने आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या शबा शेख या महिलेस कळवा ते कल्याण रेल्वे रुळांवरून प्रवास करावा लागला तेव्हा.. कुठे होते?

मुंबईत ३ जूनपर्यंत १,४१७ जणांचा मृत्यू झाला. स्मशानभूमीत बाहेर मृतदेहांना घेऊन शववाहिकांच्या रांगा लागल्या आहेत. ख्यातकीर्त लेखक रत्नाकर मतकरी, लोककलावंत छगन चौघुले.. झालेल्या नुकसानाची किती आकडे, नावे आणि कशी मोजदाद करावी? ज्या मुंबईत आरेचे आंदोलन झाले, त्याच मुंबईत आज असे दुर्दैवी चित्र आहे. मानवी हक्कांचे म्हणाल तर बहुतांश रुग्णांच्या जगण्याच्या अधिकाराची पदोपदी पायमल्ली होते आहे, असे चित्र आहे. मग कुठे आहेत ते तथाकथित रक्षणकर्ते, मानवतेचे रखवालदार? झाडांना जीव असतो हे विज्ञान तत्कालीन फडणवीस सरकारला शिकवणारे, आता महाराष्ट्रात ढिम्म सरकारी यंत्रणेविरोधात चकार शब्दही का काढत नाहीत? किंवा पालिका, सरकारला का प्रश्न विचारत नाहीत? आता तर मानवतेचा लढा अधिक त्वेषाने लढावा अशी वेळ आहे; मग कुठे आहेत ही मंडळी? ही मंडळी ढासळलेल्या शासकीय यंत्रणेबाबत बोलत नाहीत की सेवाकार्य करताना दिसत नाहीत; मग आहेत तरी कुठे?

प्रत्येक मृत्यू हा दुर्दैवी असतो. अशीच आणखी एक घटना आहे- न्यायमूर्ती लोया प्रकरण. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्या न्यायालयांनी या प्रकरणावर निकाल दिले, तरी ते मान्य न करता पुन:पुन्हा न्यायालयात जाऊन लढा लढणारे आज कुठे आहेत? महाराष्ट्रातील गरीब, शेतकरी, मजूर, टॅक्सी/रिक्षाचालक, कामगार, बलुतेदारांना एकही रुपयाची मदत राज्य शासनाने दिली नाही. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या सगळ्या राज्यांनी आपापले पॅकेज जाहीर केले, मदत केली. महाराष्ट्रात गरिबांचे हाल सुरू असताना तथाकथित मानवतेचे पुजारी, पुरोगामी महाराष्ट्र सरकारने गरिबांना मदत द्यावी म्हणून न्यायालयात गेल्याचे ऐकिवात नाही. मी स्वत: या प्रश्नी याचिका केली आहे. म्हणून विचारावेसे वाटले- ती पाहिलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर झालेली आंदोलने आणि त्यांचे बरेच विषय आहेत. कधी शेतकऱ्यांच्या आडून काम बंद आंदोलने करण्यात आली, कधी पायी मोर्चे काढण्यात आले, कधी आझाद मैदान, कधी मंत्रालयात, कधी पुण्यात तर कधी नागपूर आणि गडचिरोलीत.. अशी मालिका बरोबर सहा वर्षे या देशात सुरू आहे. नवनवीन चेहरे समोर आले. देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी धडपडत राहिले. त्या वेळी या देशातील काही जणांना याचे फार कौतुकही वाटत होते. या सगळ्या घटनांची मालिका कधी सुरू झाली याचा शोध घेत मागे गेल्यावर असे निदर्शनास येते की, जेव्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आल्यावर अशा ढोंगी, तथाकथित आंदोलनाला सुरुवात झाली. या फसव्या आंदोलनांचा आणि निदर्शनांचा सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी आंदोलनात जामिया मिलिया, शाहीन बाग आणि जेएनयू असा उच्चांक गाठला गेला. कधी कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, उमर खालिद, मेहक प्रभू, शार्जील इमाम, आयेशा घोष हे आंदोलनांतून समोर दिसणारे तरुण चेहरे. पण या चेहऱ्यांमागे माथी भडकवणारे वेगळे. हे सगळे आता करोनाच्या युद्धात काय करीत आहेत? महाराष्ट्रात शासन वेळीच निर्णय घेत नाही, त्यामुळे शैक्षणिक वर्षे धोक्यात आले आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द झाल्या. पण सरासरी गुण देणार- मग एटीकेटी असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का, पुढील प्रवेशात अडचणी येतील का, ‘करोना पदवीधर’चा शिक्का बसेल का, अशा नैराश्याने विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? बारावीच्या निकालाचे काय? पुढच्या शैक्षणिक वर्षांचे काय? एकूणच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आले आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना हे ‘स्टार विद्यार्थी आंदोलक’ दिसत नाहीत. प्रत्यक्ष आंदोलन सोडा, पण समाजमाध्यमांवर प्रश्न मांडले, सरकारला सूचनांचे निवेदन दिले असे काही या स्टार आंदोलकांनी केले, बोलले, आवाज उठवला असे कुठे ऐकण्यात आले नाही. जामिया, जेएनयूमध्येच विद्यार्थी आहेत आणि महाराष्ट्रात विद्यार्थी नाहीत, असले तर त्यांचे प्रश्न नाहीत असे काही आहे का? स्टार आंदोलक जर या प्रश्नांना हात घालत नाहीयेत, तर मग ते कुणाला कसली मदत तरी करीत आहेत का? तसे काही वाचायला मिळालेले नाही. करोनाकाळात अडचणीत आलेल्यांना मुलीच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे खर्च करून मदत करणाऱ्या गरीब बापाचे कौतुक करणाऱ्या बातम्या आल्या. स्वयंप्रेरणेने स्वत:च्या ट्रॅक्टरला सॅनिटायझर फवारणी यंत्रात रूपांतरित करून गावात निर्जंतुकीकरण करणाऱ्या नाशिकच्या बागलाणमधील शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक झाले. जसे जमेल तसे या देशातील लाखो हात एकमेकांना मदत करीत आहेत. मग हे ‘स्टार आंदोलक’ सध्या काय करताहेत? ‘आझाद काश्मीर’चा फलक हातात घेऊन गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रगट होणारी तरुणाई ‘करोनापासून आझाद होऊ या’ म्हणून देशवासीयांना आधार देताना दिसत नाही. करोनामुळे अमेरिकेसारखा देश हादरला आहे. भारतात परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही आणि जाऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार डोळ्यांत तेल घालून काम करते आहे. जे अडचणीत आहेत त्या सगळ्यांना मदत करते आहे. अन्नधान्य पुरवते आहे. देशाची कोठारे सरकारने खुली केली. पण दुर्दैवाने देशातील अन्य राज्यांनी जशी मदतीची पॅकेज दिली तसे महाराष्ट्रातील सरकारने दिले नाही. अन्न-वस्त्र-निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. महाराष्ट्रात गरिबांना या मूलभूत गरजांपासून वंचित राहण्याची वेळ आली, पण अशा वेळी हे तथाकथित मानवतावादी गेले कुठे?

त्यांचा ‘एल्गार’ करोनाविरोधात, महाराष्ट्रातील शासकीय अनास्थेच्या विरोधात, ढिम्म प्रशासनाविरोधात ना समाजमाध्यमांवर दिसत, ना प्रत्यक्षात, ना न्यायालयात. हे सगळे मानवतावादी, पुरोगामी एरवी मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी केवढा मोठा लढा लढतात! गेल्या सहा वर्षांत आपल्या देशात या मानवतेच्या रक्षणकर्त्यांनी केवढा मोठा गाजावाजा केला होता! कविता, पुस्तिका, परिषदा, भाषणे असा सारा डामडौल. किती वेळ आणि पैसा खर्च झाला गरिबांच्या तथाकथित न्यायासाठी! मग सध्या हे करतात काय? महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बलुतेदार, मध्यमवर्गीय, गरीब शासनाच्या मदतीची वाट पाहात आहेत. अशा वेळी हे मानवतेचे तथाकथित रखवालदार कुठे गायब झाले?

लेखक राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री व भाजपचे विद्यमान विधानसभा सदस्य आहेत.