विद्यार्थ्यांना नव्या आव्हानांसाठी तयार करून त्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर केवळ शिक्षण पुरेसे नसते. अन्यही अनेक कौशल्ये संपादन करणे, त्यासाठी विविध उपक्रमांत सहभागी होणे गरजेचे असते. याच विचारातून मुंबईत आठ वर्षांपूर्वी ‘आभा परिवर्तनवादी संस्थे’ची स्थापना करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच दृष्टिहीन, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी संस्था कार्य करते. कधी अवयवदानाविषयी जनजागृती, कधी ‘जागर संविधानाचा’ तर कधी वाचनालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून याचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. नवनव्या उपक्रमांची भर पडून कार्य विस्तारत असताना संस्थेला गरज आहे नव्या जागेची आणि आर्थिक पाठबळाचीही.
महाराष्ट्राच्या विविध भागांत मग ते भाग शहरी असोत अथवा ग्रामीण शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना असंख्य अडचणी येतात. अनेकदा त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम, शैक्षणिक साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे, हे तर कोणाच्या ध्यानी-मनीही नसते. विज्ञान शाखेत रसायनशास्त्राची पदवी घेतलेल्या राजेश मोरे यांनी दहा-बारा वर्षांपूर्वी ही परस्थिती बदलण्याचा ध्यास घेतला आणि त्या दिशेने कार्य सुरू केले. मुंबईतील ‘आभा परिवर्तनवादी संस्था’ ही त्याच ध्यासाची परिणती आहे. पदवीचे शिक्षण घेतानाच ते सामाजिक कार्यातही सहभागी होत होते. आदिवासी पाड्यांवर काम करणे, विद्यार्थ्यांसाठी पथनाट्य सादर करणे असे उपक्रम ते राबवत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी वा व्यवसाय या सरधोपट मार्गावरून जाणे त्यांनी नाकारले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्था स्थापन केली. त्यांना साथ देण्यासाठी समविचारी मंडळीही पुढे आली. संस्थेची आर्थिक बाजू सुरुवातीला मोरे आणि त्यांच्या या सहकाऱ्यांनीच सांभाळली. तेव्हा मोरे शिकवणी वर्ग चालवत. संस्थेचे काम सुरू ठेवायचे असेल, तर आर्थिक पाठबळाशिवाय काहीही साध्य करता येणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. स्वत: व्यवसाय करण्यास पर्याय नव्हता. पुढे त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून काम सुरू केले आणि संस्थेच्या उपक्रमांत भर पडू लागली.
दृष्टिहीनांसाठी ‘लिहिते हात’
आजही राज्यात दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रकल्प, पदवी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका लिहिणे आणि इतर शैक्षणिक कामांसाठी लेखनिक सहज उपलब्ध होत नाहीत. यासाठी संस्थेने २०१९ साली ‘प्रोजेक्ट लँटर्न’ हा उपक्रम सुरू केला. यातून त्यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रकल्प लिहिणे, स्पर्धा परीक्षा अशा कारणांसाठी लेखनिक मिळवून देण्यास सुरुवात केली. आज संस्थेच्या केंद्रात दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात. त्यात वाचन उपक्रम, व्याख्याने आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कार्यशाळा इत्यादींचा समावेश असतो. विविध ज्ञानशाखांत शिकणारे दृष्टिहीन विद्यार्थी आज संस्थेशी जोडले गेले आहेत. आतापर्यंत संस्थेने या उपक्रमांतर्गत तेराशेहून अधिक विद्यार्थ्यांना साहाय्य केले आहे.
संस्थेने २०१७ साली ‘खारीचा वाटा’ नावाचा उपक्रम सुरू केला. रायगड, रत्नागिरी, सातारा यांसारख्या जिल्ह्यांतील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्था प्रयत्न करत आहे. यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप करण्याबरोबरच वर्षभर त्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देऊन विविध व्याखाने, कार्यशाळा आणि इतर उपक्रमांचे आयोजन केले जाते. तळागळातील विद्यार्थी आणि ज्यांना खरोखरच गरज आहे असे विद्यार्थी सर्वांगीण विकासापासून वंचित राहू नयेत म्हणून हे उपक्रम राबविले जातात. शाळेतील शिक्षकांच्या मदतीने सर्वेक्षण करून ज्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवली जाते. आता या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. आतापर्यंत १५ शाळांमधील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. बदलत्या काळानुसार शालेय विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांमध्ये भर पडत आहे. मोबाइलच्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवणे, प्रयत्नपूर्वक मैदानी खेळांकडे, वाचनालयाकडे आणि इतर उपक्रमांकडे वळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी संस्थेने जानेवारी २०२५ मध्ये ‘सवंगडी’ उपक्रमाची सुरुवात केली. यात ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोडी सोडविणे, बुद्धिबळ खेळणे, संवाद साधणे यांसह कथाकथन, गायन आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. वाचनाची गोडी लागावी म्हणून पुस्तक परीक्षण लिहिण्यास प्रोत्साहन दिले जाते. याचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांना वाचन, खेळ आणि इतर छंदांकडे वळविणे हा आहे. आतापर्यंत ५०हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला आहे.
लोकशाही मूल्ये, घटनेने दिलेले अधिकार आणि कर्तव्ये याविषयी विद्यार्थी सजग असावेत, त्यातून एका सशक्त समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी २०१५ पासून ‘जागर संविधानाचा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धा आयोजित केल्या जातात. राज्याच्या विविध भागांतील सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात संस्था यशस्वी झाली आहे. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी कार्य करतानाच २०१८ पासून संस्थेकडून अवयवदानासाठीही ‘संकल्प अवयवदानाचा’ या उपक्रमातून नियमित जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत पंधराशेहून अधिक नागरिकांनी या उपक्रमांतर्गत नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळविण्यासाठी संस्थेच्या वरळी येथील केंद्रात ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. अनेक दात्यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली असून सध्या ३ हजारांहून अधिक पुस्तके केंद्रात आहेत.
करोनाकाळातही संस्थेने स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवले होते. या काळात संस्थेने वरळी, प्रभादेवी, लोअर परळ आदी भागांत धान्य वाटप करून हजारो कुटुंबीयांना आधार दिला. या काळात संस्थेला अनेक जणांचे आर्थिक सहकार्य लाभले. कोविडकाळात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या पूरस्थितीतही स्वयंसेवकांनी पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत अन्न पोहोचविले. तसेच चिपळूण आणि रायगड येथील पुराचा फटका बसलेल्या गावांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. नवनवीन अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
संस्थेसाठी प्रशस्त जागेची निकड
सध्या संस्थेकडे मुंबईतील वरळी येथे एका संस्थेच्या देणगीतून उभे राहिलेले एक केंद्र आहे. शालेय विद्यार्थी, दृष्टिहीन विद्यार्थी यांच्यासाठीचे उपक्रम आणि सवंगडी उपक्रम असे विविध उपक्रम या केंद्रात राबविले जातात. वाचनालयही याच जागेत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सध्याची जागा अपुरी पडत आहे. संस्थेला प्रशस्त जागेची गरज आहे. तसेच आणखी दोन- तीन केंद्रे सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी असलेल्या या उपक्रमांसाठी गरज आहे ती आर्थिक मदतीची. सध्या शंभरहून अधिक स्वयंसेवक विविध उपक्रमांत गरजेनुसार सहभागी होतात. तर पंचवीसहून अधिक स्वयंसेवक विविध प्रकल्पांच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
संस्थेचे कार्य हे समाजातील व्यक्तींच्या दातृत्वावरच अवलंबून आहे. अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यात आपला सहभाग नोंदविला आहे. असे असले, तरी नवे प्रकल्प, त्यासाठी आवश्यक असणारी जागा आणि सुरू असणारे प्रकल्प यासाठी निधीची आवश्यकता आहे. आर्थिक पाठबळ मिळाल्यास समाजातील गरजू आणि विविध सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित व्हावे, यासाठी संस्था अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते.
संस्थेपर्यंत कसे जाल?
वरळी कोळीवाड्यातील ‘अमर प्रेम क्रीडा मंडळा’च्या जवळ असणाऱ्या विठ्ठल पाटील चाळीच्या तळमजल्यावर संस्थेचे केंद्र आहे. संपर्क – ८८७९७३५१६५.
ऑनलाइन देणगीसाठी तपशील
आभा परिवर्तनवादी संस्था
Aabha Parivartanvadi Sanstha
बँकेचे नाव : कॉसमॉस बँक, शाखा दादर
चालू खाते क्रमांक : ०१२१००१०२९८२९
आयएफएससी कोड : सीओएसबी०००००१२
सदैव मोबाइलमध्ये डोके घालून बसलेल्या मुलांना एकत्र खेळण्यातील मजा कळावी, अवांतर वाचनाने त्यांच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात आणि छंद जोपासता यावेत यासाठी ‘आभा परिवर्तनवादी संस्थे’च्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात.
(समाप्त)