खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले ‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारामध्ये..
पुढील रविवारी
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई

राजू शेट्टी विरुद्ध सारे, पण लढणार कोण?
राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येण्याची किमया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. सध्या या मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध सारे असे चित्र निर्माण झाले आहे. ऊस गाळणीचा हंगाम सुरू होत असतानाच दरावरून शेट्टी यांनी शड्डू ठोकला आहे. हे सारे त्यांना निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर आणि शिराळा हे दोन मतदारसंघ हातकणंगलेमध्ये समाविष्ट होतात. शेट्टी यांना आव्हान देण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना रिंगणात उतरविण्याची चर्चा आहे. स्वत: जयंत पाटील मात्र लोकसभा लढविण्यास अजिबात इच्छुक नाहीत. हा मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात मारावा, अशी त्यांची भूमिका आहे. इचलकरंजीचे वयोवृद्ध नेते कलाप्पाण्णा आवाडे, विनय कोरे यांचीही नावे घेतली जात आहेत. जैन, लिंगायत समाजाची मते मोठय़ा प्रमाणावर असल्याने शेट्टी यांच्याच समाजाचा उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव आहे. मागील हंगामाच्या वेळी उसाच्या दरावरून शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याने त्याची प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीसाठी ही बाब त्रासदायक आहे. गेली पाच वर्षे शेट्टी हे विरोधकांबरोबर राहिले. यामुळे भाजप त्यांना मदत करणार आहे. शेट्टी यांना आव्हान कोण देऊ शकेल, याचाच अद्याप शोध सुरू आहे.
लोकसभा मतदारसंघ : हातकणंगले
विद्यमान खासदार : राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना.    
मागील निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने यांचा पराभव.
जनसंपर्क
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्यालय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी खेडोपाडी नित्याचाच संपर्क.     
मतदारसंघातील कामगिरी :
*पंचगंगा नदीचा राष्ट्रीय नदी संवर्धन गंगा सुधार योजनेत समावेशासाठी पाठपुरावा.
*कोल्हापूर-नांदेड रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग दर्जा देण्यासंदर्भात विशेष प्रयत्न.
*उसासह कांदा, कापूस, बेदाणा, भात, सोयाबीन या पिकांसाठी आंदोलन करून हमीभाव मिळविला.
*वस्त्रोद्योग, प्रदूषण, खंडपीठ, टोलविरोध यासाठी सातत्याने आंदोलने.
*खासदार निधीचा पुरेपूर वापर करीत मतदारसंघात २० कोटींची विकासकामे.
लोकसभेतील कामगिरी
एकूण प्रश्न २९०, तारांकित २१, अतारांकित २६९, ३९ वेळा चर्चेत सहभाग, एकूण हजेरी २४८ दिवस (३३५ दिवसांपैकी)
लोकसभेत मांडलेले प्रश्न
*शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटीचा मुद्दा उपस्थित केला. कोल्हापूर विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ करणे.
*आरक्षणाचे फायदे महाराष्ट्रातील मराठा समाजाला देणे.
*उसाला योग्य आधारभूत किंमत मिळण्यासाठी नव्या पद्धतीची गरज
*मेडिक्लेम पॉलिसीसाठी रकमेचा दावा करताना आयुर्वेद उपचार पद्धतीचा समावेश हवा.
नाटकी आंदोलनकार
खासदार नसून ते नाटकी आंदोलनकार आहेत. मतदारसंघातील प्रश्नांना लोकप्रतिनिधी म्हणून वाचा फोडण्यात दारुण अपयश. विधायक-विकासकामांची कामे करणे हे त्यांचे कर्तव्य असताना आंदोलनात उत्तीर्ण झाल्याचे ते सांगत गेल्याने मतदारसंघ विकासाच्या वाटेवर दूरवर मागे गेला. ऊस आंदोलन वगळता एकही रचनात्मक काम केले नाही. दुर्गम भाग प्राथमिक सुविधांपासून वंचित. वस्त्रोद्योगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. कोल्हापुरात टोल नको म्हणून भांडताना स्वत:च्या मतदारसंघातील शिरोली-सांगली रस्ता विनाटोल करण्यात अपयश.
निवेदिता माने, राष्ट्रवादी काँग्रेस</strong>

कामावर लोक समाधानी
अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचा वाटा महत्त्वपूर्ण असल्याने शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची मागणी अनेकदा संसदेत केली. महालक्ष्मी, जोतिबा, पन्हाळा, विशाळगड, दाजीपूर अभयारण्यासाठी विशेष पॅकेजद्वारा निधीची तरतूद. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शहरी व ग्रामीण
भागात विकासकामांचा समन्वय ठेवण्यावर भर दिल्याने सर्वत्र कामाबाबत समाधानकारक.
राजू शेट्टी, खासदार