लोकसभेच्या निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
तडफदार आणि लाडके उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
पुणे, लातूर
पुणे जिल्ह्य़ातील शिरूर हा मतदारसंघ खरा तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, पण या मतदारसंघातून लागोपाठ दोनदा शिवसेनेच्या वतीने शिवाजीराव आढळराव हे निवडून आले. वास्तविक आढळराव हे पूर्वी शरद पवार यांच्या निकटचे मानले जात, पण दिलीप वळसे-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे बिनसले आणि आढळराव यांनी सरळ शिवसेनेची वाट धरली. गेल्या वेळी राष्ट्रवादीने आढळराव यांच्या पराभवासाठी सुरुवातीला जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. शरद पवार हे स्वत:च या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती, परंतु राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाला नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असतानाही शिवसेनेचे आढळराव सुमारे पावणेदोन लाख मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचा पदोपदी अडवणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एखाद्या कामाच्या श्रेयावरून मग आढळराव आणि राष्ट्रवादीत जुंपते. मतदारसंघात ठेवलेला चांगला जनसंपर्क ही बाब आढळराव यांच्यासाठी फायद्याची ठरते. आढळराव यांच्या बाबतीत मग संशयाचे वातावरण तयार केले जाते. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशी आवई उठविली जाते. आगामी निवडणुकीत आढळराव यांचा पराभव करण्याचे राष्ट्रवादीचे ध्येय आहे, पण विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार नाहीत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रात आपले स्वत:चे अस्तित्व तयार करण्यात आढळराव हे यशस्वी झाले आहेत. हीच बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
लोकसभा मतदारसंघ :शिरूर
विद्यमान खासदार :शिवाजीराव आढळराव (शिवसेना)
मागील निकाल : राष्ट्रवादीचे आमदार
विलास लांडे यांचा पराभव
जनसंपर्क
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संपर्क साधण्यासाठी त्यांनी कार्यालये निश्चित केली असून, त्यानुसार ते वेळ देतात. मतदारसंघात सतत फिरतीवर असतात. रात्री-बेरात्री मोबाइलवर थेट संपर्क साधता येतो, असे नागरिक सांगतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*पुणे-नाशिक व चांडोली ते सिन्नर
१४०० कोटींच्या रस्त्यास मंजुरी
*कवडीपाट ते हडपसर रस्त्याचे चौपदरीकरण, िपपळवडी-रांजणगाव सांडस-आंबेगावात नदीवर पूल
*बैलगाडी
शर्यत बंदी उठवण्यासाठी लढा
*हुतात्मा राजगुरू यांचे टपाल तिकीट काढण्यात यश
*दौंड-पुणे रेल्वे विद्युतीकरण
*पंतप्रधान ग्रामसडक योजनेत
मतदारसंघातील तीन तालुके
*भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ व भैरवनाथ नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून भरीव कामगिरी
*पंतप्रधान निधीतून रुग्णांना दोन कोटींची मदत
लोकसभेतील कामगिरी
*सभागृहात उपस्थित केलेले प्रश्न: ९०८ (तारांकित : ७४, अतारांकित : ८३४)
*नियम ३७७ अंतर्गत एका मुद्यावर चर्चा, अर्थसंकल्पांवर एकूण ७ वेळा चर्चा.
लोकसभेत विचारलेले महत्त्वाचे प्रश्न :
*जीवनावश्यक वस्तूंच्या दरात होणारी भाववाढ
*राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्मार्ट कार्ड देण्याचा मुद्दा
*ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याविषयीचा मुद्दा
*दुग्ध उत्पादन लाभप्रद करण्याविषयी सरकारच्या योजना
*माध्यमिक शिक्षणावरील गुंतवणुकीतील घसरण
*कोळसा क्षेत्रातील खासगी सहभाग
एकूण हजेरी : १३६ दिवस (३१४ दिवसांपैकी)
मी राष्ट्रवादीच्या ‘हिटलिस्ट’वर!
महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ‘हिटलिस्ट’वर आढळराव हेच नाव आहे. शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे यांच्या माध्यमातून शक्य तिथे खोडा घालण्याचे काम सुरू आहे. विरोधी पक्षाचा खासदार म्हणून अडचणी निर्माण केल्या जातात. तरीही सर्वाधिक कामे आपण केली व सर्वात जास्त निधी आणला. शरद पवार आपल्यासमोर उभे राहू शकले नाही, त्यांची िहमत झाली नाही, याचे शल्य राष्ट्रवादीला आहे. अजितदादा सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांचे अस्तित्व नाकारतात. कामाचे श्रेय मिळू न देण्याची खबरदारी शरद पवार घेतात. केंद्राकडे पाठपुरावा आपण करतो व त्याचे श्रेय राष्ट्रवादी घेते. आपल्याला डावलले जाते.
शिवाजीराव आढळराव
काडीचेही योगदान नाही!
मतदारसंघाचे नाव जगाच्या नकाशावर नेण्याची घोषणा व त्यासाठीचा खासदारांचा कथित आराखडा कागदावरच राहिला. नाशिक-पुणे रस्ता सहापदरी का होऊ शकला नाही? चाकण विमानतळाच्या बाबतीत खासदार नेहमी दुहेरी भूमिका घेतात. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी दिलीप वळसेंनी प्रयत्न केले. त्याचे श्रेय खासदार स्वत:कडे घेतात. विकास झाला तरच उद्योग येतील, मात्र खासदारांचे कशातच योगदान नाही. त्यांनी काय कामे केली, कुणाला कळलीच नाहीत.
विलास लांडे