शापाकडून उ:शापाकडे

समाजसेवेला वाहून घेतलेल्या वृषाली मगदूम म्हणूनच ठरल्या आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’. 

आरती कदम

नवी मुंबई परिसरातील एक हजार कचरावेचक स्त्रियांना एकत्र करत सन्मानाचे आयुष्य देणे, बलात्कारितांना असंवेदनशील व्यवस्थेशी संघर्ष करत न्याय मिळवून देणे, स्टिंग ऑपरेशनद्वारे लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिंक अत्याचाराला वाचा फोडणे, कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी स्त्रीला आत्मविश्वासाचे आयुष्य मिळवून देणे, यासारखी कामे स्त्रीमुक्ती संघटनेशी संलग्न होत वृषाली मगदूम गेली तीन दशके करत आल्या आहेत. लेखनाच्या माध्यमातून चळवळीकडे वळलेल्या वृषाली इंग्रजी साहित्य शिकवणाऱ्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिकाही होत्या. सेवानिवृत्तीनंतर पूर्णत: समाजसेवेला वाहून घेतलेल्या वृषाली मगदूम म्हणूनच ठरल्या आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’. 

भारतासारख्या देशाला शाप आहे तो गरिबीचा, जाती-धर्म, उच्च-नीच, स्त्री-पुरुष यांच्यातल्या भेदभावाचा. त्यातून निर्माण होणारी असमानतेची मानसिकता मग अनेक प्रश्नांना जन्म देते आणि समाजाला अधोगतीकडे नेणारी अंधश्रद्धा, दारूचे व्यसन, बालविवाह, लैंगिक शोषण, शिक्षणातील गळती, बेरोजगारी, कौटुंबिक हिंसाचार अशा न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका सुरू होते. याच प्रश्नांच्या घुसमटीत गेली तीस वर्षे प्रामुख्याने झोपडपट्टीतील लोकांसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदूम यांच्यासारखी माणसे त्या शापाला उ:शापात बदलवतात आणि समाज घडवतात.    

नवी मुंबई परिसरातील कचरावेचक स्त्रियांना सन्मानाचे आयुष्य देणे, बलात्काराला बळी पडलेल्या मुली-स्त्रियांना न्याय मिळवून देणे, स्टिंग ऑपरेशन करत लिंग निवडीस प्रतिबंध करणे, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैिंगक अत्याचाराला वाचा फोडणे, कौटुंबिक हिंसाचार थांबवणे हे त्यांच्या कामांचे मुख्य स्वरूप असले तरी त्यांचा मूळ पिंड हा लेखकाचा आणि शिक्षकाचा आहे. आतापर्यंत त्यांची ११ पुस्तके  प्रकाशित झाली असून त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. शिवाय महाविद्यालयात इंग्रजी साहित्य शिकवणाऱ्या त्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका होत्या. २०११ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांनी पूर्णत: समाजसेवेला वाहून घेतले आहे.

स्वातंत्र्यसैनिक आणि नास्तिक असलेल्या पित्याच्या पोटी जन्मलेल्या वृषाली यांच्यावर लहानपणापासून खुल्या विचारांचे संस्कार झाले. त्यातच अजित मगदूम यांच्यासारखा सेवाभावी वृत्तीचा वर्गमित्र भेटला आणि त्याच्याशीच पुढे जन्मगाठ बांधली गेल्यानंतर एकत्रित समाजसेवेचा प्रवास सुरू झाला. कोरेगाव येथे ‘सत्यशोध’ या संस्थेची स्थापना झाली आणि ३५ अंध मुलांना सामान्य मुलांच्या शाळेत धडे देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा पायंडा पाडला गेला, तो आजतागायत चालूच आहे. दरम्यान, प्राध्यापकी सुरू झाली. संसारात दोन मुलांचा समावेश झाला आणि आयुष्य सामान्य पायवाटेवरून चालू लागले. मात्र नवी मुंबईतील महाविद्यालयात बदली झाली आणि कामाचा प्रचंड मोठा कॅ नव्हास समोर आला. दरम्यान, त्या स्त्री-मुक्ती संघटनेशी जोडल्या गेल्या. अर्थात सुरुवात झाली, ती या संघटनेच्या माध्यमातून सोडवल्या जाणाऱ्या प्रश्नांना लेखक म्हणून शब्दबद्ध करण्याच्या भूमिके तून. पण प्रश्नच इतके  कठीण होत गेले की त्याची चळवळ कधी झाली कळलेच नाही. पहिली घटना होती एका नवविवाहितेची. तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या के ली असल्याचे सासरचे सांगत होते, मात्र चौकशीतून लक्षात आले, की तिला विहिरीत ढकलले गेले होते. तिला न्याय मिळावा म्हणून वृषाली यांनी या प्रकरणात थेट उडीच घेतली आणि तो न्यायदानाचा यज्ञ अद्याप सुरूच आहे.

स्त्री-मुक्ती संघटनेचे नवी मुंबई परिसरातील काम प्रामुख्याने वृषाली करतात. येथील ११ झोपडपट्टय़ांतील १,००० कचरावेचक स्त्रिया त्यांनी एकत्र आणल्या. बहुतांशी मराठवाडा, उस्मानाबाद येथून आलेल्या दलित, मातंग आणि बंजारा समाजातील या स्त्रिया आहेत. संघटनेच्या मदतीमुळे त्यांना महापालिके चे ओळखपत्र मिळाले. मात्र त्यांना  रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. आज यातल्या कित्येक जणी आत्मविश्वासाने वावरत इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करत आहेत. त्यांचे बचतगटही आहेत आणि डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन कचरा वेचण्याच्या घृणास्पद कामातून त्यांची काही अंशी सुटका झाली आहे. आज ७० स्त्रिया परिसरातील इमारतींमधील सुका-ओला कचरा वेगळा करत, ओल्या कचऱ्यातून खत बनवून सुका कचरा संस्थेच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी देत आहेत. संघटनेमार्फत त्यांच्या मुलांसाठीही वृषाली यांनी या झोपडपट्टीमध्येच शिक्षणाची सोय केली असून सध्या १२० मुले शिकत आहेत. गेल्या ३ वर्षांपासून कॉम्प्युटर आणि टेलरिंग क्लासेस सुरू के ले असून ८० मुले शिकत आहेत. शिवाय दानशूर व्यक्तीकडून देणगी मिळवत अनेक मुले उच्चशिक्षणही घेत आहेत. खेळू लोंढे अभियंता होऊन आता इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये शिकवत आहे तर समाधान गायकवाड याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेऊन तो नोकरी करतो आहे. मनीषा दांडगे हिने पदवीधर होऊन समाजिक कार्य सुरू के ले आहे.

वृषाली यांना या कामात खूप समाधान आहे, परंतु त्यांची खरी कसोटी लागते, ती लैंगिक अत्याचाराचे प्रश्न सोडवताना. समाजाची नकारात्मक मानसिकता, पोलिसांचे संवेदनक्षम नसणे, रुग्णालयांकडून सहकार्य न मिळणे यामुळे पीडित मुली-स्त्रियांना न्याय मिळवून देणे कठीण होते. अशा वेळी व्यवस्थेशी कधी वाद घालत, कधी कायद्याचा बडगा दाखवत तर कधी स्त्री मुक्ती संघटनेमार्फ त दबाव आणत प्रश्न सोडवावे लागतात. बलात्कारित मुलीला न्याय मिळवून देण्याबरोबरच तिच्या आरोग्याची, काही वेळा तिला होणाऱ्या बाळाची योग्य सोय करणे, तिला तिच्या पायावर उभे करणे, या सगळ्या गोष्टी वृषाली सहकाऱ्यांसह अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने करताहेत. कचरावेचकांची परिसर सखी विकास संस्था, अन्नपूर्णा परिवार, अन्वय प्रतिष्ठान या संस्थांबरोबरही त्यांचे काम सुरू आहे.

दुसरा कळीचा मुद्दा आहे तो कार्यालयीन ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा. सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, स्टेट बँक ऑफ इंडिया, कें द्रीय औद्योगिक सुरक्षा बल, अशा ठिकाणी ‘विशाखा’ गाइडलाइन्सअंतर्गत असलेल्या समितीत स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचा समावेश असतो, ज्यामुळे तटस्थपणे निवाडा देणे शक्य होते. गेल्या काही वर्षांतल्या ५० निकालांमध्ये दोषी पुरुषांची बदली करण्यात आली, तर काहींना नोकरीवरून काढूनही टाकण्यात आले आहे.

अन्यायाचे आणखी एक रूप म्हणजे गर्भाची लिंगनिवड. गेली काही वर्ष त्या राज्य शासनाच्या समितीत काम करीत असून  गैरकृत्य करणाऱ्या सोनोग्राफी कें द्रांवर छापे मारले गेले आहेत. त्यातून त्या त्या डॉक्टरांना अटकही करण्यात आली आहे. एकदा तर बनावट आई बनून एका तरुणीबरोबर त्यांनी स्टिंग ऑपरेशन घडवून ते सोनोग्राफी कें द्र बंद पाडण्यात यश मिळवले. 

कुटुंब, प्राध्यापकीय नोकरी, लेखन आणि समाजसेवा या गोष्टी एकत्रितपणे करताना त्यांनी ती तारेवरची कसरत होऊ दिली नाही, उलट त्या कामात त्यांना समाधान मिळत गेले. यामागे होते ते त्यांचे वेळेचे योग्य व्यवस्थापन. पहाटे चार वाजता आवडीच्या लेखनकामाने सुरू होणारा त्यांचा दिवस पुढे त्याच ऊर्जेने अधिकाधिक सक्रिय होत जातो. लैंगिक अत्याचार असोत, की कौटुंबिक छळाच्या घटना. वृषाली यांनी अनुभवलेली वा सोडवलेली एक एक प्रकरणे अंगावर काटा आणणारी आहेत. माणसे इतकी क्रूर कशी वागू शकतात, हा प्रश्न अनुत्तरित राहणारा असला, तरी वृषाली मगदूम यांच्यासारखी माणसे त्या प्रश्नालाच शस्त्र बनवून त्यावर मात करीत आहेत. म्हणूनच त्यांचे कार्य आदर्शवत.

संपर्क

वृषाली मगदूम

पत्ता- एफ १५, आयकर कॉलनी,

सेक्टर  २१, बेलापूर,

नवी मुंबई-  ४००६१४

संपर्क   क्रमांक- ९३२२२५५३९०

ई-मेल- vamagdum@gmail.com

मुख्य प्रायोजक   :      ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सह प्रायोजक    :      महाराष्ट्र औद्योगिक

विकास महामंडळ व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड

सन्स प्रा. लि. सनटेक रिअल्टी लि.

पॉवर्ड बाय : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे,राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article about loksatta durga vrushali magdum zws

ताज्या बातम्या