अ‍ॅड. राजा देसाई

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त (१२ जानेवारी) हा विशेष लेख..  विवेकानंदांनी सांगितलेला धार्मिकतेचा अर्थ उलगडणारा!

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता

आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान व त्यांतून मिळालेली उपकरणे, सोयी, भौतिक समृद्धी, उपभोक्तावाद आणि अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य अशा अनेक गोष्टी साऱ्याच धर्म-संस्कृतींना प्रचंड धक्के देत आहेत. पण आपले लक्ष सध्या तिकडे नाहीये. मुस्लिमांच्या नेहमीच्या ‘इस्लाम खतरेमें’सारखे ‘आपणही का बरं कधीच ‘खतरेमें’ नाही’ याचे जणू वैषम्य हिंदू मनाला वाटू लागले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी असणे हे आता हिंदू असण्याचे अविभाज्य अंग बनविण्याचा आटापिटा चालू आहे. मानवजातीसाठी श्रेयसाची दृष्टी देणाऱ्या महात्मा गांधींच्या ‘हिंद स्वराज’ची मुळे म्हणूनच काहींना हिंदू राष्ट्रवादात दिसू लागली आहेत. आंतरिक शुद्धतेसाठी करावयाचा संघर्ष (‘जिहाद’) आता चक्क ‘लव्ह’च्याच विरुद्ध छेडला जात आहे. या साऱ्या घोषणांचा गलबलाट आणि वातावरण सामान्य धार्मिकांच्या मनांत धर्माचा प्राण असलेला शांती-प्रेम हा भाव जागवेल की अशांती-द्वेष? अशा परिस्थितीत कितीही कर्मकांड वाटले तरी, स्वामी विवेकानंदांसारख्या धर्मात्म्यांच्या विचारांचे स्मरण करून देण्याशिवाय काय बरे करावे?

जीवनातील संघर्ष कधीच संपत नसतात; परिस्थितीनुरूप कारणे बदलतात एवढेच. ‘प्रथम कळ कोणी काढली’ हा प्रश्न व्यवहार झाला; तो नैसर्गिक असला तरी त्यातून काहीही हाती लागत नाही म्हणून ‘झाले गेले गंगेला मिळाले’ म्हणणारा धर्म आला. आज नव्हे, तर सव्वाशे वर्षांपूर्वीच स्वामी विवेकानंदांनी सांगितले : ‘धार्मिक श्रेष्ठत्वासाठी झगडे करणे या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. प्रत्येक जीवात भगवंत आहे हे कळण्यात सारा धर्म-ईश्वर आला. वरवर दिसणाऱ्या सर्व भेदांच्या मुळाशी जे एकत्व विद्यमान आहे तेच सत्य व तोच ईश्वर. या अनुभूतीनेच संपूर्ण मानवजातीविषयी साम्यबुद्धी निर्माण होईल. प्रेमभावनेने विस्तार पावणे हेच जीवन, तर घृणा करणे हा मृत्यू. भारत जेव्हा संकुचित झाला तेव्हाच त्याचे पतन झाले.’

समूहा-समूहांतून जसे प्रेम, जवळीक, सहकार्य असते, तसेच द्वेष, दुरावाही असतो. वास्तव असे नसते तर क्रांतिविचार व कार्याची जरुरीच काय होती? आज माणूस ज्या सांस्कृतिक अवस्थेस येऊन पोहोचला आहे, तेथे तो लाखो वर्षांनी आला आहे. अजूनही भरपूर अमानवीपण त्याच्यात शिल्लक आहे. ते पटकन नष्ट व्हावे, या क्रांतिकारी अधीरतेला विवेकवादी आधार काय?  पण हे प्रश्न बाजूला ठेवून निदान आजच्या रखरखीत वास्तवाचा तरी विचार करायलाच हवा.

पाश्चात्त्य ‘इझम्स्’च्या कायम ‘प्रो-अ‍ॅण्टी’ राजकीय दृष्टीने भारताच्या ‘मिनी जगा’चे प्रश्न सुटतील का? स्वामी विवेकानंदांनी स्पष्टपणे सांगितले आहे : ‘उत्तुंग आदर्शाप्रत पोहोचता येत नाही म्हणून त्यांनाच खाली ओढण्याचे पाप करू नका. धर्म सोडून भारताची उभारणी राजनीतीच्या कण्यावर करण्याचा उद्योग पूर्वी एकदा इथे झाला. पण त्यात राजनीती यशस्वी झाली असती तर देशाचा समूळ नाश झाला असता, हे कधीही विसरू नका.’ विवेकानंद म्हणतात : ‘धर्मासंबंधीच्या सर्व संकुचित, कलहप्रसवू, आक्रमक, पंथ-जमात-राष्ट्रनिष्ठ संकल्पना (ज्या पूर्वी िहदू धर्मात कधीच नव्हत्या) पूर्णत: लयास जायला हव्यात. त्यांनी आजपर्यंत जगाचे प्रचंड नुकसान केले आहे. भौतिक साधनांनी जवळ येत असलेले जग मनाने जवळ येण्यासाठी धर्मानी विशाल झाले पाहिजे. निधर्मी उपयुक्ततावादी माणसेही निकोप, नीतिमान आयुष्य जगून मानवाची थोर सेवा करून गेली आहेत.’

‘फक्त आपलाच धर्म खरा’ म्हणून रक्त सांडले जात होते त्यापूर्वीही शेकडो वर्षे भारताने संपूर्ण सृष्टीच्याच एकत्वाचा विचार मांडला व मानवी इतिहासात तुलनेने त्यानुसार असामान्य व्यवहारही केला. तो विचार आणि व्यवहार भारतीय राष्ट्रीय ऐक्याचा आधार आहे.

अवतीभोवती कितीही अनैतिकता दाटून असली तरीही नैतिकता हाच सदैव जीवनाचा आधार आहे. धर्म-ईश्वर विचार तर नैतिकतेपासून वेगळा काढलाच जाऊ शकत नाही. कोणताही धर्म नैतिकतेविरुद्ध शिकवण देत नाही. मात्र नैतिकतेचा विवेकाधिष्ठित व विज्ञाननिष्ठ आधार शोधण्याचा प्रश्न पडेल त्या वेळी केवळ ‘फेथ-बेस्ड्’ नसलेल्या िहदू धर्माच्या मौलिकतेत शिरावे लागेल. स्वामी विवेकानंद यांनी नैतिकतेची अत्यंत सोपी व अगदी समर्पक व्याख्या केली आहे : ‘भोगाच्या वेळी ‘तू’ प्रथम, तर त्यागाच्या वेळी ‘मी’!’ पण आजच्या सत्ताकारणमय जीवनात तर ‘मी’शिवाय कशालाच स्थान नाही. दुर्दैव असे की, एरवी सज्जन असलेली माणसेही अशा राजकारणाबरोबर वाहात जातात.

काय आहे या नैतिकतेचा भारतीय आधार? ‘सर्व खल्विदं ब्रह्मं’ : एक अविनाशी बुद्धिमान चतन्यशक्ती अनंत विश्वाच्या कणाकणाला अखंडपणे व्यापून आहे. सर्व प्राणिमात्र जणू एका शरीराचे अनंत अवयव. म्हणून भारतासाठी सारे धर्म सत्य आहेत व सारे भेदभाव हे अज्ञान आहे. सारीच माणसे व सारेच समूह आपापल्या आदर्शापासून नेहमीच अनंत योजने दूर असतात, तरीही हजारो वर्षे प्राणपणाने जपलेल्या आदर्शाचा समाजमानसावर परिणाम हा होतच असतो. शेकडो वर्षांच्या परदास्याचे नष्टचर्य संपलेले नसतानाही ‘आपला समाज अजून जिवंत कसा?’ या पश्चिमेतील प्रश्नाला विवेकानंदांचे उत्तर होते : ‘विश्वाच्या एकत्वाच्या अनुभूतीपूर्ण विचारांतून येणारी तीच सहिष्णुता! हा एकत्वाचा धर्म भारत जेव्हा सोडील तेव्हा त्याला कोणीही वाचवू शकणार नाही.’ मात्र हा विचार निधर्मी भावुकतेने वा ‘विशफुल थिंकिंग’मधून स्वीकारला किंवा ‘राष्ट्रवादी’ व्यवहाराच्या नावाखाली बाजूला ठेवला तर नवे कर्मकांड जन्माला येते. मग गांधी वा विवेकानंदांचा ओठांनी जप करीत आपापल्या शत्रूंची निवड करून त्यांच्याविषयीचा द्वेषभाव अभिमानाने मिरवण्यातील विरोधाभास आपल्याला स्पर्शही करीत नाही!

जीवनात द्वेषाइतकी वाईट गोष्ट नाही. विवेकानंदांनी म्हटले आहे : ‘राष्ट्र आणि धर्म यांचा उन्माद, द्वेष व त्यांतून येणारी असहिष्णुता माणसाला पशू बनवते व ती मानवी संस्कृतीच्या विनाशाला कारणीभूत होते. ‘अद्वेष्टा सर्वभूतानाम्’सारखी विचार-मौक्तिके ही पांडित्यपूर्ण प्रवचनांसाठी नाहीत; ती व्यवहारात उतरवण्याची धडपड नसेल तर धर्माचे टिळे लावायचेच कशाला? जे जे एकत्वाप्रत नेते ते ते सत्य, तो तो ईश्वर. म्हणून प्रेम सत्य; द्वेष असत्य. आपले विचार व कर्म माणसा-माणसाला जवळ आणतात की अलग करतात, हा निकष प्रत्येक वेळी लावा. बुद्धदेवांच्या हृदयातील असीम प्रेम-करुणा तुमच्याजवळ असेल, तर तुम्ही हिंदू आहात की मुसलमान याची किंमत शून्य आहे!’

rajadesai13@yahoo.com