आपल्या ओजस्वी वाणी आणि लेखणीने ७५ वर्षे शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे म्हणजे शिवचरित्र जगलेला शाहीर. दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामातील सेनानी, ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक आणि जगाला हेवा वाटेल अशा ‘शिवसृष्टी’चे संकल्पक निर्माते हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आयाम सर्वाना भारावून टाकणारे आहेत. छत्रपती श्री शिवाजी महाराज या बाराक्षरी मंत्राने भारावलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वयाची शंभर वर्षे पार करू शकले नाहीत. बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. २९ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. वडील मोरेश्वर पुरंदरे हे भावे प्रशालेमध्ये चित्रकला शिक्षक होते. त्याच शाळेत बाबासाहेबांचे शिक्षण झाले. स. प. महाविद्यालयामध्ये त्यांनी कला शाखेचे शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षांपासून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि उज्ज्वल परंपरेचे अभ्यासपूर्ण संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यापूर्वी वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी नारायणराव पेशवे यांच्या जीवनावर ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती. मात्र, ती प्रसिद्ध झाली नाही.

 इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती अशा गुणांचा समुच्चय बाबासाहेब यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होता. प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्टय़े होती.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?

भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले. तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब संशोधक म्हणून सहभागी झाले होते. पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पंधरा हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत. बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. मेहुणे

श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्याशी त्यांचे मैत्र होते. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत असत. पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके आणि ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते.

शिवचरित्र घरोघरी पोहोचावे हे ध्येय डोळय़ासमोर ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या पाच लाखांहून अधिक प्रती असंख्य घरांमध्ये पोहोचल्या आहेत. त्याचबरोबर ‘फुलवंती’ व ‘जाणता राजा’ ही नाटके त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. गेल्या ३६ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली. हे नाटक हिंदूी-इंग्रजीसह पाच अन्य भाषांत भाषांतरित केले गेले . ‘जाणता राजा’मध्ये १५० कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती व घोडेही असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी दहा दिवस आणि उतरवण्यासाठी पाच दिवस लागतात.

 बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. ‘महाराष्ट्र भूषण’ या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वत:जवळ ठेवून उरलेल्या पैशांत आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांनी दान केली. डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्या हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन

१४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते.

ध्वनिफिती

बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन – भाग १, २, ३ (ध्वनिफिती आणि सीडीज) 

शिवचरित्र कथन भाग १ ते १५ ध्वनिफितींचा आणि सीडीजचा संच

‘बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र सागर देशपांडे यांनी प्रसिद्ध केले आहे.

पुरस्कार

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार

पुण्यभूषण पुरस्कार

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार

पद्मविभूषण

बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्यसंपदा 

 आग्रा  

 कलावंतिणीचा सज्जा

 जाणता राजा

 पन्हाळगड

 पुरंदर

 पुरंदरच्या बुरुजावरून 

 पुरंदऱ्यांचा सरकारवाडा 

 पुरंदऱ्यांची नौबत

 प्रतापगड 

 फुलवंती

 महाराज

 मुजऱ्याचे मानकरी  राजगड

 राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध

(या पुस्तकाची हेमा हेर्लेकर यांची २०१४ मध्ये प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे.)

लालमहाल  

शिलंगणाचं सोनं 

शेलारिखड. (ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला ‘सर्जा’ हा मराठी चित्रपट निघाला होता.)

सावित्री  

सिंहगड 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावलेले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच ‘जाणता राजा’सारख्या महानाटय़ातून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

महाराष्ट्राच्या नव्या पिढीसमोर इतिहास साध्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. हा इतिहास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा, तो समजावा यासाठी बाबासाहेब यांनी राज्यात व्याख्याने दिली. बाबासाहेबांनी आपली १०० वर्षे पूर्ण केली. बाबासाहेब आपल्यात नाहीत ही अस्वस्थ करणारी घटना आहे. त्यांनी इतिहास समोर ठेवला. त्यातील काही वादग्रस्त मुद्दे होते. त्याविषयी भाष्य करणारा मी जाणकार नाही. काहीही असले तरी त्यांचे योगदान आपण विसरू शकत नाही.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

एक महान कर्मयोगी, तपस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. तीन पिढय़ांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच आहे. बाबासाहेबांची सर्वात मोठी ओळख कोणती? तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. शिवकाळ हाच त्यांचा श्वास, तोच त्यांचा प्राण होता. ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ आणि शब्दांचे पक्के आणि सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार.. असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. 

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघ शाखेतून प्राप्त झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. ‘जाणता राजा’ नाटय़ शिल्पाची निर्मिती केली. त्या देशभक्त शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांच्या स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनम्र श्रद्धांजली.

मोहन भागवत, सरसंघचालक

बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च

के ले; परंतु असे असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हाने याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते. बाबासाहेब मला नेहमी सांगत, ‘‘महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेले तेथे पोहोचणे!’’ शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला आहे.. 

राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

शिवचरित्र अनेकांनी लिहिले, यापुढेही लिहिले जाईल; पण बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाद्वारे मांडलेले शिवचरित्र चित्ताकर्षक आणि रोमहर्षक असेच आहे. उत्तम हिऱ्याला उत्तम कोंदण लाभावे असे हे शिवचरित्र एकमेवाद्वितीय आहे. कोणी काही म्हणो, पण बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास संशोधकच होते हे त्यांनी मराठय़ांच्या इतिहासासंदर्भात केलेल्या संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

गजानन भास्कर मेहेंदळे, ज्येष्ठ इतिहास संशोधक 

इतिहास संशोधक म्हणून बाबासाहेबांनी केलेले काम खूप मोठे आहे. १८ व्या शतकातील मराठय़ांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी अनेक पत्रे त्यांनी उजेडात आणली. इतिहास संशोधन एक शास्त्र आहे आणि ते पुराव्यावर आधारलेले आहे. त्यासाठी त्यांनी मोडी, पर्शियन, डच, पोर्तुगाल भाषेचा अभ्यास केला आणि सर्व अंगांनी शिवचरित्र लिहिले. हे शिवचरित्र सामान्य व्यक्तीला भावणारे आहे.

पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

बाबासाहेब माझ्या थोरल्या बहिणीचे यजमान. माझ्या जडणघडणीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा माझ्यावर विशेष प्रभाव होता.  रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पाच दिवस माझी आणि त्यांची भेट झाली होती. त्या भेटीत मला त्यांच्यात जाणवलेला फरक म्हणजे एरवी ‘‘मी १२० वर्षे जगणार आहे आणि माझ्या आत्मचरित्राचे दोन खंड पूर्ण करणार आहे,’’ असे एका उत्साहाने सांगणारे बाबासाहेब त्या भेटीत पहिलेच वाक्य असे बोलले की, ‘‘दिलीपराव, मी माझं सामान बांधून प्लॅटफॉर्मवर मला नेणाऱ्या गाडीची वाट पाहत बसलो आहे.’’ पण, ‘‘बाबासाहेब, आपल्याकडे गाडय़ा नेहमी लेट येतात,’’ असे मी त्यांना म्हणालो आणि नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या. आज ते गेले आणि त्यांच्या अशा आठवणी उरल्या.

दिलीप माजगावकर, संचालक, राजहंस प्रकाशन

बाबासाहेब आणि माझे आजोबा गो. नी. दांडेकर यांचे खूप वैयक्तिक चांगले ऋणानुबंध होते. अनेक पिढय़ांनी त्यांच्याकडून इतिहास ऐकलाय. शिवप्रेम म्हणजे काय हे वेगवेगळय़ा माध्यमांतून त्यांनी पोहोचविले. प्रत्येक शिवप्रेमीने इतिहासाचा गाढा अभ्यास करायला हवा.

मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री

बाबासाहेबांच्या निधनाने चालताबोलता इतिहासकार हरपला. त्यांच्या शिवचरित्र कथनातून देशभक्ती समजली. आपल्या वाणीने चमत्कार घडविणारा हा एक क्रांतिवीर काळाच्या पडद्याआड गेला.

भूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)