|| हृषीकेश दत्ताराम शेर्लेकर

कृत्रिम प्रज्ञेच्या तीन टप्प्यांची माहिती घेतल्यानंतर ‘सुपर इंटेलिजन्स’ ही अवस्था आल्यावर काय काय शक्य होईल, तिथपर्यंत कधी व कसे पोहोचू, त्याचे फायदे- तोटे याची ही चर्चा..

‘‘अण्णा स्टॉप द कार, गाडी रोको, प्लीज ब्रेक’’, वगैरे सर्व प्रयत्न झाल्यावर शेवटी खाणाखुणा करून बघितल्या, लेकिन फिर भी वो नहीं रुकी..’’

मागील आठवडय़ात केरळच्या आयआयटीमध्ये व्याख्यान देऊन परतीच्या प्रवासामधील किस्सा. गाडीच्या बूटमधील लॅपटॉप बॅग हवी होती. म्हणून ड्रायव्हरला गाडी थांबव इतकेच सांगायचे होते. बराच वेळ प्रयत्न करून झाल्यावर आठवले माझे लाडके तंत्रज्ञान. मोबाइलवर गुगल ट्रान्सलेटर अ‍ॅप सुरू केले व टाइप केले ‘स्टॉप द कार’ आणि क्षणार्धात मल्याळीमध्ये भाषांतर झाले ‘कार नित्तरुक’, हेच कमी म्हणून की काय, स्पीकर बटण दाबल्यावर ‘कार नित्तरुक’ उच्चारायचे कसे हेदेखील कळले.  शंभराहून अधिक भाषांमध्ये भाषांतर करू शकतो आपण.  इतके सुंदर उपयुक्त साधन, हाताच्या बोटांवर कधीही उपलब्ध आणि तेही फुकट. तरी आपण त्याला म्हणतो मर्यादित एआय. का, तर हे अ‍ॅप फक्त भाषांतर करू शकते, इतर काहीही नाही. असो. आपल्या विषयाकडे वळू या.

मागील सदरात आपण एआयच्या उत्क्रांतीचे तीन टप्पे नॅरो, जनरल एआय आणि सुपर इंटेलिजन्सबद्दल थोडक्यात समजून घेतले. या सदरात जनरल एआय व सुपर इंटेलिजन्स ही अवस्था आल्यावर काय काय शक्य होईल, तिथपर्यंत कधी व कसे पोहोचू आणि मुख्य म्हणजे तुम्हाला-आम्हाला त्याचे फायदे-तोटे काय हे बघू.

थोडेसे पाठी वळून बघताना..

साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी – चिखलाच्या तलावात अणूंनी स्वत:ची एक नक्कल बनविली आणि पृथ्वीवरील जीवनाचा पहिला अध्याय लिहिला गेला.

चार दशलक्ष वर्षांपूर्वी – होमिनिड वंशजाच्या मेंदूचा आकार झपाटय़ाने वाढू लागला.  पन्नास हजार वर्षांपूर्वी – होमो सेपीअन्सचा उदय.

दहा हजार वर्षांपूर्वी – मानवी संस्कृती, सभ्यता व समाजनिर्मिती.  पाचशे वर्षांपूर्वी – प्रिंटिंग प्रेसचा शोध.  ऐंशी वर्षांपूर्वी – संगणकाचा आविष्कार.

गेली दोन दशके – संगणकावर आधारित एआयची झपाटय़ाने प्रगती.   सुपर इंटेलिजन्स – कठीण आहे वर्तवायला, पण उत्क्रांतीचा वेग हा इतका झपाटय़ाने वाढतोय की काही दशकेच लागतील हे वरील मुद्दय़ांवरून लक्षात आले असेलच.

आपण बघितलेच की, सुपर इंटेलिजन्स किंवा सिंग्युलॅरिटी (अरक) म्हणजे एआय सिस्टीममध्ये अमर्यादित, अमानवी, अफाट बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता येणे, जी सर्व मानवी बुद्धीच्या कैक पटींनी अधिक प्रगत असेल. काय काय घडेल हा विषय परिकल्पनेसारखा असला तरी थोडक्यात अशी प्रगती होईलच की नाही याबद्दल थोडेसे.

१. मानवी मेंदूचे कार्य हे शेवटी एक बायोमास अधिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल शास्त्र आहे जिचे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये हुबेहूब अनुकरण केले जाऊ  शकते कधी ना कधी.

२. मानवी बुद्धी ही जैविकदृष्टय़ा उत्क्रांत होत आली आहे आणि म्हणूनच मानव कधी ना कधी या उत्क्रांतीचे रहस्य शोधून, त्याची नक्कल करू शकतो.

३. साखळी प्रतिक्रिया – एकदा का आपण असे मानवी बुद्धीच्या जवळपास जाणारे सॉफ्टवेअर बनविले, जे स्वत:मध्ये सुधारणा करू शकते, की कधीही न संपणारी साखळी प्रतिक्रिया सुरू होईल. मग तेच स्वयंचलित बुद्धिमान सॉफ्टवेअर, स्वत:च्या रचना, कार्यक्षमता व गुणवत्तेमध्ये प्रत्येक फेरीत थोडी थोडी सुधारणा करत अफाट बुद्धिमत्ता व ज्ञानग्रहणक्षमता अशी पातळी गाठू शकते  अर्थातच कधी ना कधी.

४.  माझे वैयक्तिक मत असे की, आजवरच्या इतिहासातही जेव्हा अशा भव्यदिव्य ध्येयाने व जिद्दीने काही माणसे झपाटली गेली, तेव्हाच अत्यंत पुरोगामी, ऐतिहासिक व जगाची दिशा बदलणारे शोध लागले. या घडीला गुगल डीपमाइंड, ओपन एआय (संस्थापक एलोन मस्क) आणि इतरही काही दिग्गज संस्था जनरल एआय, सुपर इंटेलिजन्स या स्पष्ट ध्येयावर आपले सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ व अब्जावधी डॉलर्स गुंतवून आहेत. मी म्हणेन केवळ याच प्रमुख कारणामुळे आज ना उद्या सुपर इंटेलिजन्ट नामक मशीन्स नक्कीच अस्तित्वात येतील.

पण सुपर इंटेलिजन्सपर्यंत आपण पोहोचणार कसे? सध्या शास्त्रज्ञ ज्या विविध मार्गाचा अवलंब करू पाहताहेत ते खालीलप्रमाणे –

१. जैविक मानवी बुद्धिमत्ताविस्तार – एक विचारधारा अशीही आहे की, मनुष्यच जैविक उत्क्रांतीच्या द्वारे अति-प्रगत होईल. शास्त्रज्ञ मिशेल ए. होफमन यांच्याप्रमाणे मानवी मेंदू सध्याच्या आकाराच्या दोन-तीन पट (३५०० सीएम क्यूब) इतका मोठा होईल तेव्हा जैविक उत्क्रांतीची भौतिक मर्यादा गाठली जाईल. असा अति-प्रगत मनुष्य मग अति-प्रगत मशीन्स सहजच बनवू शकेल. काय थट्टा वाटतेय ना? पण आपला सध्याचा मेंदू हा आदिमानवाच्या कमीत कमी तिप्पट मोठा आहे.

२. कृत्रिम बुद्धिमत्ता उत्क्रांती – वरीलप्रमाणे बुद्धिमान सॉफ्टवेअरपासून साखळी प्रतिक्रियाद्वारे अति-प्रगत मशीन्सचा उदय.

३. संपूर्ण मेंदू इम्यूलेशन – मानवी मेंदूची डिजिटल कॉपी करण्याची कला अवगत होणे. मग असे अनेक डिजिटल मेंदू एकमेकाला जोडून अफाट क्षमता असलेल्या मशीन्स निर्माण करता येणे.

४. मेंदू संगणक इंटरफेस (बीसीआय) – मेंदूच्या सूक्ष्म लहरींबरोबर इलेक्ट्रिकल साधनांद्वारे अनुवाद व विश्लेषण. बीसीआय ही संगणकआधारित प्रणाली आहे जी मेंदूलहरी मिळवते, त्यांचे विश्लेषण करते आणि अपेक्षित कार्य करण्यासाठी आज्ञांमध्ये अनुवाद करते. थोडक्यात, मेंदूत काय चाललेय याची आपल्याला माहिती मिळू शकते. या तंत्रज्ञानामध्ये बरीच प्रगती झाल्यावर वरील मुद्दय़ाला चालना मिळेल.

अजूनही काही मार्ग आहेत, नवीन निघतील, काही एकमेकांत मिसळतील. महत्त्वाचे म्हणजे पुढे कसे जायचे याचे शास्त्रज्ञांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सुपर इंटेलिजन्सचे काही प्रकार खालीलप्रमाणे –

१. स्पीड सुपर  इंटेलिजन्स

मानवी बुद्धीच्या कैक पटींनी वेगात प्रक्रिया करू शकतील अशी मशीन्स. आपल्यापेक्षा दहा लाख पट वेग जरी शक्य झाला तर आपल्याला जे पुस्तक वाचायला काही दिवस लागतात तेच पुस्तक काही मायक्रोसेकंदांत वाचले जाईल. याच मशीन्सला आपले भौतिक विश्व मात्र एका स्लोमोशनप्रमाणे भासेल. या वेगाचा फायदा करायचा म्हटला तर आपले मानवी शरीर व त्याच्या मर्यादा आड येतील, तेव्हा आपण जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल विश्वात करू लागू. उदाहरणार्थ, प्रवासाला पर्याय म्हणून आभासी भेटीगाठी.

२. कलेक्टिव्ह सुपर इंटेलिजन्स

अमेरिकन शास्त्रज्ञ रे कुर्झवेईल म्हणतात की, २०४५ पर्यंत अस्तिवात असेल वायरलेस पद्धतीने कृत्रिम मेंदू व आपले स्वत:चे जैविक निओकोर्टेक्स (मेंदूचा भाग) जोडण्याचे साधन. याद्वारे आपल्या बुद्धिमत्तेला एक अब्ज पटीने वाढवण्यास आपण सक्षम होऊ. इतकेच नाही तर आपण दुसऱ्या व्यक्तीच्या निओकोर्टेक्सशी कनेक्ट करण्यातही सक्षम होऊ, ज्याने अनेक मानव आणि मशीन्सचे मिश्रण बनेल ज्याला कलेक्टिव्ह सुपर इंटेलिजन्स म्हणता येईल.

तसेच क्वालिटी सुपर इंटेलिजन्स आदी प्रकारही आहेत. पण हे सर्व क्लिष्ट ज्ञान बाजूला सारून बघू या तुम्हाला-आम्हाला जनरल व सुपर इंटेलिजन्सचे थोडक्यात फायदे-तोटे.

१. पूरक साहाय्य

दिव्यांग, अशक्त, वयोवृद्ध, मतिमंदांसाठी रोबोटिक साहाय्यक जे त्यांच्या उणिवांना पूरक ठरतील. आपल्यासारखे फक्त साहाय्य, सहानुभूती वगैरे दाखविणारे नसतील. ते सदैव साहाय्य करतील, तेही न थकता, न कंटाळता, न मोबदला मागता. उदाहरणार्थ, कोमात असलेल्या पेशंटच्या प्रगत बीसीआयमार्फत शेवटच्या इच्छा, त्यावर कार्य.

श्रमदानाला व कष्टाला पर्याय. दिमतीला पर्सनल डिजिटल असिस्टंट किंवा रोबोटिक सहायक असताना रोजची धावपळ, घरची, ऑफिसची कामे किती तरी सुखकारक होतील, नाही का? ‘‘अगं अलेक्सा, जरा चहा टाक आणि साखर कमी हो..’’

कठीण, क्लिष्ट कामामध्ये मानव आणि मशीन्सचे एकमेकांना पूरक साहाय्य. शस्त्रक्रिया, गुन्हेशोध, बचावकार्य इत्यादी.

२. ज्ञान अंतर्दृष्टी

आजवर अतक्र्य व अशक्य असे ज्ञान, सुपर इंटेलिजन्ट मशीन्सद्वारे सहज मिळवता येणे. त्यात विश्वाचा पसारा, अ-भौतिक सूक्ष्म जग, प्राणिविश्व आणि आपल्या कल्पनेपलीकडील काहीही.

गरिबीचे एक प्रमुख कारण ज्ञानाची, माहितीची कमतरता, नवीन विश्वात कलेक्टिव्ह सुपर इंटेलिजन्सद्वारे कोणाचे या कारणामुळे तरी नक्कीच अडणार नाही.   स्पीड सुपर इंटेलिजन्सद्वारे वेगवान प्रगती. उदाहरणार्थ, रिसर्च प्रोजेक्ट्स, शोधकार्य, मूलभूत शिक्षणाचा अवधीही आदी.

३. त्याचबरोबर जगाचा विनाश, सुरक्षा, गोपनीयता, नैतिकता आणि नियंत्रण अशी अवघड आव्हानेदेखील आहेतच या सगळ्यांबरोबर. त्यावर सविस्तर पुढे.

hrishikesh.sherlekar@gmail.com

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.